डीआयडी लिल मास्टर्स सीझन 5 हा डान्स रियालिटी शो प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. शोमधील लहान लहान मुले अप्रतिम डान्स परफॉर्मन्स देताना दिसतात, ज्यामुळे अनेकदा प्रेक्षक आणि जज थक्क होतात. अलीकडील प्रोमोज नुसार, आगामी एपिसोड हा नाईटिंगेल ऑफ इंडिया म्हणजेच स्वरसम्राज्ञी गानकोकिळा लता मंगेशकर यांना समर्पित केला जाईल आणि या एपिसोडमध्ये लतादीदींच्या धाकट्या भगिनी आणि दिग्गज ज्येष्ठ गायिका आशा भोसले खास उपस्थिती दर्शवणार आहेत. या भागात आशाताई पाहुण्या जज म्हणून येणार आहेत.
लतादीदींच्या पावन स्मृतींना समर्पित खास भाग
डीआयडी लिल मास्टर्स सीझन 5 चा हा आगामी भाग हा खूप खास असेल कारण शोचे परीक्षक दिवंगत दिग्गज गायिका लता मंगेशकर यांचे स्मरण करणार आहेत. आशा भोसले यांच्या उपस्थितीत हा एपिसोड त्यांच्या गाण्यांना समर्पित करण्यात येणार आहे. एपिसोडच्या प्रोमोमध्ये स्पर्धक आशाताई आणि लतादीदी यांच्यातील गोड बंधाबद्दल अभिनय करताना दिसले. लहान लहान मुलांचा हा सुंदर परफॉर्मन्स बघून आशाताईंना लतादीदींची खूप आठवण आली आणि त्यांच्या आठवणींत आशाताईंना अश्रू अनावर झाले. या प्रोमोमध्ये दिसतेय की “मेरी दीदी मेरे साथ है” म्हणत आशाताई भावूक होताना दिसल्या.
लतादीदींच्या जाण्याने झाली मोठी पोकळी
संगीताची अविरत सेवा केल्यानंतर 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी गानसरस्वती लता मंगेशकर यांचे निधन झाले. ‘क्वीन ऑफ मेलडी’ भारतरत्न लतादीदींचे शिवाजी पार्क, मुंबई येथे पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लता मंगेशकर या COVID-19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना 8 जानेवारी रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचे निधन झाले. बॉलीवूडच्या गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, या ज्येष्ठ गायिका भारतातील सर्वात प्रसिद्ध कलाकार होत्या कारण त्यांनी सात दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत विविध भाषांमधील 30,000 गाणी गायली. लतादीदींना त्यांच्या गायन प्रतिभेसाठी केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख मिळाली.
लतादीदींना वाहिली श्रद्धांजली
आज लतादीदी शरीराने आपल्यात नाहीत पण आजही चाहत्यांच्या मनात त्यांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या आवाजाने आणि त्यांच्या संगीतातून त्या अमर झाल्या आहेत. त्यांचा स्वर्गीय आवाज व गाणी ऐकून त्यांचे चाहते अनेकदा भावूक होतात. अशीच काहीशी घटना डान्स इंडिया लिटिल मास्टर्सच्या सेटवर घडली. आशाताईंना पाहताच तिथे उपस्थित असलेल्यांना सर्वांना लतादीदींची आठवण झाली. त्यांच्या मातृतुल्य मोठ्या बहिणीबद्दल बोलताना आशाताईही भावूक झाल्या. झी टीव्हीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्सशी संबंधित एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आशाताई आपल्या मोठ्या बहिणीला श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. त्याचवेळी, प्रोमोमध्ये एक स्पर्धक लताच्या भूमिकेत परफॉर्म करताना दिसत आहे. हे पाहिल्यानंतर आशाताई भावूक झाल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाले.
झी टीव्हीने या प्रोमो व्हिडिओद्वारे खुलासा केला आहे की हा भाग पूर्णपणे लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आहे. झी टीव्हीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर लिहिले की, ‘झी टीव्हीच्या मंचावर अशी एक ऐतिहासिक संध्याकाळ साजरी केली जाईल जिथे आशा भोसले यांच्या उपस्थितीत नृत्याद्वारे लता मंगेशकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला जाईल. 23 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता डीआयडी लिटल मास्टरचा हा भाग तुम्हाला बघता येईल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक