या वर्षात मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आले आहेत. वर्षाच्या सुरूवातीपासूनच अनेक मराठी चित्रपटांनी हिंदी चित्रपटांपेक्षाही चांगली कमाई केली आहे आणि तीदेखील चांगली कथा, पटकथा आणि कलाकारांच्या अभिनयामुळेच. तसंच हल्ली मराठी चित्रपटांचे चित्रीकरणही परदेशात करण्यात येते आणि त्याशिवाय मराठी प्रेक्षकांना वेगवेगळ्या कलाकारांच्या अभिनयामुळे अगदी अमराठी प्रेक्षकाही मराठी चित्रपटांकडे वळू लागले आहेत. असं असतानाही दिग्दर्शक आणि अभिनेता (तेही अत्यंत कसलेला अभिनेता) असणारे महेश मांजरेकर एका मुलाखतीमध्ये म्हणाले की, ‘मराठीमध्ये चांगले चित्रपट प्रदर्शित होत नाहीत असं अजिबात नाही. पण प्रेक्षक आहेत कुठे? तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण ते मांडण्यापूर्वी चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहा. पण मराठी चित्रपट चित्रपटगृहात पाहण्यासारखे नाहीत असे प्रेक्षकांनी ठरवूनच टाकले आहे. हे अतिशय वेदनादायी आहे. मराठी प्रेक्षक साऊथचे चित्रपट पाहायला जातात’. खरं तर हे कुठेतरी मराठी प्रेक्षक म्हणून खटकलं आणि म्हणूनच या चित्रपटाचा खरा रिव्ह्यू द्यावासा वाटत आहे (मी चित्रपट मराठी असो वा हिंदी चित्रपटगृहातच पाहते – आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट) …चला तर मग मला आलेला अनुभव तुमच्यापर्यंत पोहचवत आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्की सांगा.
दे धक्का 2 (De Dhakka 2) का पाहावा आणि का पाहू नये
14 वर्षांपूर्वी दे धक्का हा चित्रपट तुफान गाजला आणि त्याची कारणंही होती. सहज अभिनय, कथा आणि उत्तम दिग्दर्शन. तसंच यातील सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय. जिथे पहिला चित्रपट संपतो तिथूनच या चित्रपटाची कथा सुरू होते. त्यामुळे हीच टीम घेऊन पुन्हा एकदा दे धक्का 2 काढण्यात आला. प्रेक्षकांनाही उत्सुकता होतीच (मलाही). पण चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिल्यानंतर ही उत्सुकता कुठच्या कुठे निघून गेली आणि त्याची नक्की काय कारणं आहेत, ते मी इथे सांगणार आहे. पण त्याआधी का पाहावा हे आधी जाणून घेऊया
- मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर, गौरी इंगावले, सक्षम कुळकर्णी यांच्या सहज अभिनयासाठी नक्की पाहा
- लंडन, स्कॉटलंड येथील देखावे आणि लोकेशन्स अत्यंत सुंदर आहेत
- गौरी इंगावलेचे सुंदर नृत्य हादेखील यातील महत्त्वाचा भाग आहे विसरून चालणार नाही
- महेश मांजरेकरने केलेली लहानशी पण परिणामकारक अशी बब्बरची भूमिका
- सिद्धार्थ जाधवचा धनाजी मन जिंकून जातो
- हलक्याफुलक्या कलाकारांचा हा गोतावळा चेहऱ्यावर मधूनमधून हसू नक्कीच आणतो
- मराठीतील म्हणी नव्या पिढीच्या कानावरून नक्कीच जातील आणि त्यांना याबाबत उत्सुकताही नक्कीच जाणवेल
- टाईमपास म्हणून, निखळ मनोरंजन (हाच जर दिग्दर्शकाचा उद्देश असेल तर) आणि तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की पाहावा
चित्रपट का पाहू नये
- कथा असूनही अत्यंत पोरकटपणा वाटणारे दिग्दर्शन यामध्ये करण्यात आले आहे असे वाटते. महेश मांजरेकर दिग्दर्शक म्हणून अत्यंत गाजलेले आहेत. पण अशा पद्धतीचा चित्रपट नक्की त्यांना का काढावा वाटला याचं उत्तर नाही
- शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे आणि भारती आचरेकर यांच्यासारख्या कसदार कलाकारांना यामध्ये खरंच काहीही वाव आहे असं वाटत नाही
- उगीच कुठेही कोणताही प्रसंग ओढूनताणून असावा असं जाणवत राहातं
- प्रवीण तरडेसारखा कसदार कलाकार-दिग्दर्शक या चित्रपटात वाया गेला आहे असं जाणवतं
- मेंदूतील बुद्धी वापरायची असेल तर हा चित्रपट न पाहणंच योग्य. कारण यामध्ये अनेक ठिकाणी कोणतेही तर्कवितर्क वापरण्यात आलेले नाही.
मराठी प्रेक्षकांना काहीही बोलण्यापूर्वी आपण नक्की काय चित्रपट बनविला आहे त्यानुसार निर्माते आणि दिग्दर्शकांनी बोलावे इतकंच साधंसुधं मत आहे. चित्रपट अत्यंत मेहनतीने तयार होत असतो. त्यामुळे एक प्रेक्षक म्हणून त्याला नावं ठेवण्याइतके आम्ही मोठे नाही. मात्र जेव्हा प्रेक्षक म्हणून आमच्याकडे बोटं दाखवली जातात आणि नावं ठेवली जातात तेव्हा चित्रपटाचे परीक्षण योग्यच व्हायला हवे असं मनाला वाटलं म्हणून हा आटापिटा! बाकी तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही तो तुमच्या मनानुसार ठरवूनच पाहा!
चित्रपटः दे धक्का 2
कलाकारः मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर, गौरी इंगावले, सक्षम कुळकर्णी, आनंद इंगळे, महेश मांजरेकर
दिग्दर्शक – महेश मांजरेकर, सुदेश मांजरेकर
स्टारः **