भेंडी ही एक अशी भाजी आहे जी अनेक जणांना आवडते. पण प्रत्येकाच्या घरी भेंडीची भाजी बनविण्याची पद्धत मात्र वेगळी आहे. भेंडी केवळ स्वादिष्टच नसते तर भेंडीमुळे शरीरालाही फायदे होतात. भेंडीची भाजी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकता. पण परफेक्ट भेंडी बनवणं हे जरा कठीणच आहे. कारण अनेक महिलांना भेंडी बनवताना ती बुळबुळीत होते अशी तक्रार असते. तर काही जणींकडून भेंडी लवकर शिजते त्यामुळे ती व्यवस्थित लागत नाही अशीही तक्रार ऐकू येते. तुमच्यासहदेखील असं काही होत असेल तर आम्ही सांगितलेले काही हॅक्स वापरून तुम्ही परफेक्ट भेंडी नक्कीच करू शकता.
परफेक्ट भेंडी बनविण्याचे कुकिंग हॅक्स (Cooking Hacks For Perfect Bhendi Sabji)
भेंडी अनेक पद्धतीने शिजवली जाते. पण भेंडी कुरकुरीत राहण्यासाठी आणि भेंडीचा मूळ रंग तसाच राहण्यासाठी, याशिवाय त्यातील पोषक तत्व तशीच राखण्यासाठी योग्य कुकिंग टिप्सचा वापर करायला हवा –
भेंडी शिजवताना मीठ घालू नका
तुम्ही भेंडीची भाजी करत असताना कधीही भेंडीची भाजी करताना भेंडी शिजताना मीठ घालणं योग्य नाही. मीठ आधीच घातल्यास, भेंडीची भाजी चिकट होते. त्यामुळे भाजी शिजत आल्यावर मीठ घालावे. जेणेकरून भाजी चिकट होत नाही आणि सुटसुटीत राहते. याशिवाय भेंडी काळीही पडत नाही हे नक्की लक्षात ठेवावे.
भेंडीचा रंग राहील तसाच
तुम्हाला भेंडीचा हिरवा रंग तसाच ठेवायचा असेल तर तुम्ही भेंडीची भाजी करताना अजिबात त्यावर झाकण ठेऊन वाफवू नका. असं केल्याने नक्कीच भेंडी शिजायला थोडा वेळ लागतो. मात्र यामुळे भेंडीचा रंग बदलत नाही. थोडा वेळ जास्त लागेल पण भेंडीचा रंग तसाच हिरवा राहील आणि भेंडी शिजल्यावर दिसायलाही उत्तम दिसेल.
जास्त शिजवण्याची चूक करू नका
तुमची भेंडीची भाजी परफेक्ट बनायला हवी असेल तर तुम्ही भेंडी जास्त वेळ शिजवू नका. कारण भेंडी जास्त शिजवल्यास, यातील पोषक तत्व निघून जातात. भेंडीमध्ये विटामिन ई, विटामिन सी, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, लोहं, तांबे, मँगनीज आणि फायबरचे प्रमाण हे अधिक प्रमाणात असते. जास्त शिजवल्यास, ही तत्व त्यामध्ये राहात नाहीत आणि मग भेंडी खाल्ल्याचा शरीराला फायदा मिळत नाही. तसंच भेंडीची मूळ चवही यामुळे निघून जाते.
भेंडी खाण्याचे फायदे
सहसा उन्हाळ्याच्या दिवसात अधिक प्रमाणात भेंडी खाल्ली जाते. तर पावसाळ्यात नवधारी भेंडे येतात. ज्याचे श्रावणामध्ये नवधारी भेंड्याचे भरीत अथवा रस्सा भाजी करण्यात येते. भेंडी खाण्याचे काय फायदे आहेत जाणून घ्या –
- भेंडीतील पोषक तत्व कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करून हृदय रोगापासून दूर ठेवण्यासही फायदेशीर ठरते
- रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठीही भेंडीचा उपयोग होतो
- गॅसची समस्या असेल तर कमी करण्यसााठी आणि तुमची पचनक्रिया योग्य करण्यासाठी भेंडीचा आहारात समावेश करून घ्यायला हवा
- विटामिन सी चा चांगला स्रोत म्हणून भेंडीची भाजी नियमित खावी
तुम्हीही तुमच्या नियमित आहारात भेंडीचा समावेश नक्की करून घ्या आणि तंदुरूस्त राहण्यासाठी परफेक्ट भेंडी नक्की बनवा!