ओटीटी नेटफ्लिक्स सध्या दर वाढवल्यामुळे जगात सगळीकडे आपली पोझिशन जपण्यासाठी धडपडते आहे. भारतातील आपले स्थान मजबूत ठेवण्यासाठीही नेटफ्लिक्सने कंबर कसली आहे. त्यासाठी आधी रणवीर सिंग व बेअर ग्रिल्सचा शो नेटफ्लिक्सवर आला आणि आता निर्माता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या महत्त्वाकांक्षी भव्यदिव्य वेब सीरिज ‘हिरा मंडी’चे शूटिंग सुरू झाले आहे. सुमारे 200 कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेल्या ‘हिरा मंडी’ या वेबसिरीजची कथा देशाच्या फाळणीपूर्वीची असून त्यात राजकारण, षड्यंत्र आणि देशद्रोह यांवर आधारित कथांचा समावेश आहे. या मालिकेतील पहिला सीन मनीषा कोईराला आणि अदिती राव हैदरी यांच्यावर शूट करण्यात आला आहे. सध्या कथ्थकचे प्रशिक्षण घेत असलेली अभिनेत्री रिचा चढ्ढाही लवकरच तिच्या भागाचे शूटिंग सुरू करणार आहे. अलीकडेच संजय लीला भन्साळी यांचा गतकाळातील सुपरहिट अभिनेत्री मुमताज यांच्याबरोबरचा एक फोटो सगळीकडे व्हायरल झाला आहे. यावरून चाहते असा अंदाज लावत आहेत की कदाचित आता मुमताज देखील अनेक वर्षांनी हिरा मंडी मधून अभिनयक्षेत्रात पुनरागमन करतील.
या दोन अभिनेत्री कदाचित एकत्र दिसणार
सोशल मीडियावर व्हायरल झालेला या फोटोमध्ये संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर मुमताज आणि मनीषा कोईराला देखील आहे. सोशल मीडियावर हा फोटो समोर येताच लोकांनी अंदाज लावणे सुरु केले की, या दोघीही लवकरच एकत्र ‘हिरा मंडी’मध्ये काम करताना दिसतील.. मात्र संजय लीला भन्साळी यांनी याबद्दल अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. याआधीही काही रिपोर्ट्समध्ये माधुरी दीक्षित, रिचा चढ्ढा, हुमा कुरेशी, सोनाक्षी सिन्हा या वेबी सिरीज मध्ये दिसणार असल्याचा अंदाज लावण्यात आला होता.
हा व्हायरल झालेला फोटो मनीषा कोईरालाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केला आहे. फोटोत तिघेही खूप खुश दिसत आहेत. मनीषाने या फोटोला कॅप्शनही दिले आहे. तिने लिहिले, ‘महापुरुषांच्या सहवासात… मला अशा सर्जनशील लोकांसोबत राहायला आवडते… खूप… माझा चेहराच सांगतोय. यांच्याबरोबर मी यापूर्वीही एकत्र काम केले आहे. या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत होता.”
45 वर्षांनंतर मुमताज यांचे पुनरागमन होण्याची शक्यता
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर भन्साळींच्या या वेब सीरिजमधून अभिनेत्री मुमताज तब्बल 45 वर्षांनंतर पुन्हा एकदा अभिनयाच्या क्षेत्रात परतणार आहेत. या मालिकेसाठी भन्साळींनी आधीही मुमताज यांच्याशी संपर्क केला होता, पण काही कारणांमुळे त्यांनी या प्रोजेक्टवर काम करण्यास नकार दिला. आता हा फोटो समोर आल्यानंतर ‘हिरा मंडी’च्या कलाकारांची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.
हिरा मंडी हा Netflix चा महत्वाकांक्षी प्रकल्प
‘हिरा मंडी’ ही वेबसीरिज ‘सेक्रेड गेम्स’ नंतरचा नेटफ्लिक्सचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. निर्माते आणि लेखक संजय लीला भन्साळी असल्याने या वेबसिरीजबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता आहे. ओटीटीवर येणारा भन्साळी यांचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे.
मुजऱ्याने झाली शूटिंगला सुरुवात
‘हीरा मंडी’ या वेबसिरीजसाठी मुंबईत दोन भव्य आणि भव्य सेट उभारण्यात आले आहेत. यापैकी एका सेटवर पहिले शूटिंग शेड्युल सुरू झाले आहे. शूटिंगच्या पहिल्या दिवशी भन्साळींच्या ‘खामोशी द म्युझिकल’ ची नायिका मनीषा कोईराला हिने पुनरागमन केले. तिच्यासोबत अदिती राव हैदरीने देखील शूटिंगमध्ये भाग घेतला. या दोघींवर एक मुजरा चित्रित केला जात असून शूटिंगला उपस्थित लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘हिरा मंडी’ या वेब सीरिजची सुरुवात चांगली झाली आहे. यानंतर मालिकेतील बाकीचे कलाकारही शूटिंगमध्ये सहभागी होतील.
लेखक मोईन बेग यांच्या कथेवर आधारित ‘हीरा मंडी’ ही वेबसिरीज चित्रपट म्हणून बनवण्यासाठी भन्साळी गेल्या दीड दशकांपासून प्रयत्न करत आहेत. आता हा भव्यदिव्य प्रोजेक्ट ओटीटीवर केव्हा येईल याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक