‘कहानी नहीं किस्से हैं ये..’. ज्यांनी गुल्लक या वेबसीरिजचे पहिले दोन सिझन पहिले असतील असेल, त्यांनी प्रत्येक वेळी ही ओळ ऐकली असेल. भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबाच्या कथा छोट्या पडद्यावर खूप गाजल्या आहेत. ‘हम लोग’ पासून ‘वागळे की दुनिया’ पर्यंत घरोघरच्या कथा प्रेक्षकांना फारच आवडल्या आहेत. मराठीतही ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ सारखी हलकीफुलकी सुंदर मालिका प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे. ओटीटी आल्यावरही सेक्स, संपेन्स थ्रिलर, हिंसक कथानके, भयपटांच्या भाऊगर्दीत पंचायत’, ‘ये मेरी फॅमिली’ आणि ‘गुल्लक’ सारख्या मध्यमवर्गीय लोकांच्या रोजच्या आयुष्यातील हलके फुलके किस्से दाखवणाऱ्या मालिका म्हणजे प्रेक्षकांसाठी टेन्शन विसरून एक मोकळा श्वास घेण्याची जागा ठरली. ‘
पंचायत’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. पण त्याआधी सोनी लिव्हने त्यांच्या लोकप्रिय वेब सीरिज ‘गुल्लक’ ‘चा तिसरा सीझन पाच भागांसह रिलीज केला आहे. यावेळी गुल्लकची कथा थोडी उपहासात्मक विनोदाच्या पलीकडे जाऊन प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचली आहे. यावेळी हे प्रकरण थोडेसे भावनिक झाले आहे. अन्नू मिश्रा मोठा झाला आहे आणि घरच्या जबाबदाऱ्या त्याच्या खांद्यावर आल्या आहेत. पण गुल्लकचा हा सीझन अन्नू मिश्राचा धाकटा भाऊ अमन मिश्रामुळे खास लक्षात राहतो.
मध्यमवर्गीय समस्यांचे दर्शन
‘गुल्लक’ या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची कथा अन्नू मिश्राला नोकरी मिळाल्यापासून सुरू होते. मध्यमवर्गीयांमध्ये नवीन नोकरी मिळाल्यावर जी चैन करण्याचा विचार पोरांच्या मनात येतो, अन्नू मिश्राच्या मनातले विचारही त्याच दिशेने जात असतात. लेखक दुर्गेश सिंग यांनी संतकवी तुलसीदास यांच्या ‘हानि लाभ जीवन मरण, यश अपयश विधि हाथ’ ही ओळ घेऊनच या सीझनचे पाच भाग लिहिले आहेत. घरातले प्रमुख सदस्य संतोष मिश्रा हे कोंबडी खाणारे आणि पिणारे आहेत. त्यांच्या पत्नी शांती मिश्रा यांच्या अडचणीही पूर्वीसारख्याच आहेत. घरात येणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी सत्यनारायण कथा करावी यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. वर्गात टॉपर असूनही पुढील शिक्षण स्वतःच्या मनाने घेऊ दिले जात नसल्याबद्दल अमन मिश्रा नाराज आहे. अशात मिश्रा कुटुंबाचे लांबचे नातेवाईक मध्येच त्यांच्या मुलीला घेऊन येतात. मध्येच कथा काही काळ इकडे तिकडे भरटकते, पण अखेर अन्नू मिश्रा स्वतःच्या वडिलांच्याच पाऊलावर पाउल ठेवतो.
लेखक आणि दिग्दर्शकांची टीम या मालिकेचे हिरो
दुर्गेश सिंगने लिहिलेली पटकथा आणि संवाद विदित त्रिपाठीने आणखी चांगले केले आहेत. या दोघांनीही मिळून कथा छान लिहिली आहे. तसेच दिग्दर्शक पलाश वासवानी यांनी कथेतील सर्व पात्रांना आवश्यक तेवढी शिथिलता दिली आहे आणि मालिकेतील कलाकारांनी देखील अत्यंत सुंदर काम केले आहे. काहीही ओढूनताणून आणलेले वाटत नाही. कुठल्याही मध्यमवर्गीय घरात घडेल असा सहज नैसर्गिक अभिनय सर्वच कलाकारांनी केला आहे. पहिल्या सीझनपासून मिश्रा कुटुंबीय प्रेक्षकांना इतके आपलेसे करून घेतात की प्रेक्षक देखील सहज त्या कुटुंबाचा एक भाग झाले आहेत. लेखक आणि दिग्दर्शकांची टीम या मालिकेचे खरे हिरो आहेतच पण मालिकेतील सर्वच कलाकारांनी अतिशय सुंदर काम केले आहे. खास करून वैभव राज गुप्ता, हर्ष मायर, गीतांजली कुलकर्णी आणि जमील खान यांची केमिस्ट्री अगदी उत्तम जमली आहे. तर पडोसन या व्यक्तिरेखेमध्ये सुनीता राजवारने पुन्हा जादू केली आहे.
सोनी लिव्हची ही मालिका प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाला आवडेल अशीच आहे, त्यामुळे ती मस्ट वॉच आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक