उत्तम व संतुलित आहार हा केवळ शारीरिक आरोग्य राखण्यासाठीच आवश्यक नाही तर आहाराचा आपल्या मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम होतो. कदाचित याच कारणामुळे बरेच लोक तणावाखाली असताना एकतर खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात किंवा याउलट काही लोक इमोशनल बिंज इटिंगमध्ये ओढले जातात. अनेकदा दिवसभराच्या कामामुळे थकल्यानंतर मूड चांगला होण्यासाठी लोकांना काहीतरी चांगलं खावंसं वाटतं. अशावेळी लोक आइस्क्रीम, पिझ्झा अशा काही कंफर्ट फूडकडे वळतात. हे जंक फूड खाल्ल्यानंतर तुम्हाला काही काळ बरे वाटू शकते, परंतु काही काळानंतर तुम्हाला आणखी थकवा आणि सुस्तपणा जाणवतो. म्हणून, आपण आपल्या आहाराची निवड हुशारीने केली पाहिजे. असे अनेक पदार्थ आहेत जे केवळ तुमचा मूडच सुधारत नाहीत तर आरोग्यावरही सकारात्मक परिणाम करतात. जाणून घेऊया की अन्नाचा तुमच्या मूडवर कसा परिणाम होतो आणि मूड सुधारण्यासाठी कोणते हेल्दी पदार्थ खायला हवेत.
चुकीचे खाद्यपदार्थ निवडणे टाळा
जेव्हा आपला दिवस चांगला जात नाही तेव्हा आपल्याला काहीतरी चमचमीत किंवा गोड खावेसे वाटते. अशावेळी आपला अस्वास्थ्यकर जंक फूड खाण्याकडे कल असतो. यामुळे काही वेळ तर बरे वाटते. पण नंतर आपल्याला आळशीपणा जाणवतो. म्हणून, आपला मूड सुधारण्यासाठी आपण जे काही खातो, ते एकंदर आरोग्यासाठी निरोगी असले पाहिजे. एका अभ्यासात असेही दिसून आले आहे की भरपूर फळे आणि भाज्या खाल्ल्याने केवळ मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत नाही तर आनंदाची भावना आणि एकंदर समाधानी वाटते. काही पदार्थ आणि पोषक तत्वे अशी आहेत जी तुमचा मूड सुधारण्यास मदत करू शकतात तर इतर अस्वास्थ्यकर पदार्थ तुमची उर्जा पातळी कमी करू शकतात, म्हणून जेव्हा तुम्हाला काहीतरी टेस्टी खावेसे वाटेल तेव्हा तुम्ही जंक फूड खाणे टाळा.
कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचे सेवन करणे
जेव्हा आपली मनस्थिती चांगली नसते तेव्हा कॉम्प्लेक्स कर्बोदकांचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. प्रथिने आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचे काँबिनेशन तुमचा मूड सुधारण्यास मदत करू शकते. रताळे, क्विनोआ आणि ओट्ससारखे पदार्थ मेंदूमध्ये ‘सेरोटोनिन’ नावाचे फील-गुड रसायन वाढवतात आणि ते खाल्ल्यानंतर तुम्हाला शांत आणि आनंदी वाटते.
प्रथिनेयुक्त पदार्थ
मासे, चिकन, टर्की, चीज, बीन्स, अंडी, टोफू इत्यादी प्रथिनेयुक्त पदार्थ खाल्ल्याने मेंदूमध्ये डोपामाइन आणि नॉरपेनेफ्रिन ही संप्रेरके स्रवतात. ही रसायने चांगला मूड, प्रेरणा आणि चांगल्या एकाग्रतेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
फळे आणि भाज्या खाणे
रंगीबेरंगी फळे आणि भाज्यांमधून आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मिळू शकतात. हे तुमच्या शरीराचे पोषण करण्यास आणि तुम्हाला आनंदी वाटण्यास मदत करतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आहारात अधिकाधिक फळे आणि भाज्यांचा समावेश करावा.
या पोषक घटकांचा आहारात समावेश करा
तुम्ही जर मांसाहारी असाल तर तुमच्या आहारात सीफूडचा नक्कीच समावेश करा. ते नैराश्याशी लढण्यासाठी देखील ओळखले जातात. सी-फूडमध्ये सामान्यत: ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स असतात, ज्यामुळे नैराश्य दूर होण्यास मदत होते. जर तुम्हाला निरोगी राहून तुमचा मूड चांगला ठेवायचा असेल, तर काही पोषक घटकांचा तुमच्या आहारात समावेश करा. लोह, फोलेट, व्हिटॅमिन सी, ओमेगा -3 फॅटी ऍसिडस्, सेलेनियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, बी6, बी12, थायमिन, जस्त आणि पोटॅशियम ही काही पोषक तत्त्वे आहेत जी तुमची मनस्थिती चांगली ठेवण्यास व तुम्हाला तणावमुक्त राहण्यास मदत करतात.
त्यामुळे भूक लागल्यावर अन्नाला केवळ पोट भरण्याचे साधन न मानता योग्य आहाराची निवड करून स्वत:ला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी बनवा.
Photo Credit – istock
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक