जेव्हा एखाद्या स्त्रीला ती गरोदर आहे असे कळते तेव्हापासूनच तिची व तिच्या बाळाची नाळ जुळते. बाळ उदरात असल्यापासून जी बाळासाठी आईची काळजी सुरु होते ती शेवटपर्यंत कमी होत नाही. खास करून जेव्हा बाळ लहानाचे मोठे होत असते तेव्हा तर आई त्या बाळाला डोळ्यांत तेल घालून जपते. विशेषत: जेव्हा बाळाला पहिल्यांदा दात येतात तेव्हा त्याचा बऱ्याच बाळांना त्रास होऊ शकतो. कारण यावेळी मुलांना जुलाब, उलट्या, ताप अशा त्रासाला सामोरे जावे लागते. बाळाला त्रास झाला की आईलाही त्रास होतो. जुन्या काळात अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी घरगुती उपाय केले जात होते. जाणून घेऊया असेच काही घरगुती उपाय, जे केल्याने मुलांना दात येतांना होणार्या वेदना आणि अस्वस्थता कमी करता येतील.
दात येण्याची लक्षणे
दात येण्यापूर्वी बाळांना काही लक्षणे जाणवतात. बद्धकोष्ठता, वारंवार जुलाब होणे,हिरड्या सुजणे, सारखा ताप येणे, काहीही चावण्याचा प्रयत्न करणे, चिडचिड होणे आणि रडणे हा त्रास बाळांना दात येण्यापूर्वी होतो. हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही पुढील उपाय करू शकता.
बाळाच्या हिरड्यांना मसाज करा
दात येतांना आधी बाळाच्या हिरड्यांना सूज येते, त्यामुळे बाळांना त्रास होतो. त्यांच्या हिरड्या शिवशिवतात व त्यांना काहीतरी सारखे चावावेसे वाटते. यामुळे बाळे वाटेल ते सगळे तोंडात घालतात. हा त्रास कमी करण्यासाठी मुलांच्या हिरड्यांना तुमच्या बोटाने हळुवार मसाज करा. यासाठी सर्वप्रथम तुमचे हात पूर्णपणे स्वच्छ धुवून घ्या आणि स्वच्छ धुतलेले मऊ सुती कापड बोटावर गुंडाळा. त्यानंतर बोटाने हलका दाब देऊन बाळाच्या हिरड्यांवर मसाज करा. यामुळे तुमच्या बाळाच्या हिरड्या दुखत असतील तर त्याला आराम मिळेल.
गाजर किंवा सफरचंद खायला द्या
दात येण्यापूर्वी तोंडात होणाऱ्या वेदना टाळण्यासाठी, बाळाला गाजराचा लांब तुकडा किंवा सफरचंदाचे जाड तुकडे हातात द्या. फक्त बाळाच्या घशात हे तुकडे अडकणार नाही याची काळजी घ्या. जसजसे मूल गाजराचा किंवा सफरचंदाचा तुकडा चघळेल किंवा हिरड्यांनी चावायचा प्रयत्न करेल तसतसा त्यांचा रस तोंडात हळूहळू जात राहील, ज्यामुळे वेदना कमी होईल. पण लक्षात ठेवा की गाजर किंवा सफरचंदाचे लहान तुकडे बाळाच्या हातात देऊ नका, ते बाळाच्या घशात अडकू शकतात.
बाळाला कॅमोमाइल फ्लॉवरचे पाणी पाजा –
ज्या बाळांना दात येताना हिरड्यांना सूज येते त्यांना कॅमोमाइल फ्लॉवरचे पाणी पाजल्यास त्यांना वेदनांपासून आराम मिळतो. यासाठी प्रथम कॅमोमाइल फ्लॉवर सुकवून पावडर बनवून घ्या. अर्धा कप पाण्यात थोडी पावडर उकळवा, थंड करा आणि 2-3 तासांच्या अंतराने मुलाला द्या. यामुळे हिरड्या आणि मज्जातंतुवेदना यापासून बाळाला आराम मिळेल.
बाळाला हायड्रेटेड ठेवा
बाळ रांगत असताना खाली काहीही पडलेले असेल ते तोंडात घालतात. त्यामुळे पोटाला इन्फेक्शन होऊन ताप किंवा जुलाब होतात. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते आणि शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे बॅक्टेरिया वेगाने वाढू लागतात. यामुळे बाळाला त्रास होऊ नये म्हणून बाळाला पुरेसे द्रवपदार्थ देणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे बाळाला नारळपाणी, लिंबूपाणी आणि ओआरएस देत राहा, जेणेकरून त्याला डिहायड्रेशन होऊ नये.
बाळाला हलका आहार द्या
बाळाला जेव्हा ताप येतो तेव्हा त्याला मूग डाळीची पातळ खिचडी द्या. ही डाळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मूगडाळीचे पाणी किंवा खिचडी दिल्याने मुलांची भूक तर भागतेच शिवाय रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
बाळांना दात येताना ही काळजी घ्या.
Photo Credit- istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक