एखाद्या गोष्टीचा राग येणे हे सामान्य आहे, परंतु एखाद्याला जर प्रत्येकच गोष्टीचा राग येऊ लागला तर त्या व्यक्तीसोबत राहणे फार कठीण होऊन बसते. विशेषत: अशी रागीट स्वभावाची व्यक्ती जेव्हा तुमची जोडीदार असते, तेव्हा समस्या आणखी वाढतात. अशा परिस्थितीत चिडक्या स्वभावाच्या जोडीदाराचा सामना करण्यासाठी तुम्हाला त्याला कशा पद्धतीने हाताळायचे हे माहित असायला हवे. तापट जोडीदाराची नकारात्मक वृत्ती आणि वागणूक तुमची उर्जा कमी करू शकते. सततच्या रागीट वागणुकीमुळे तुम्हाला निराश आणि हताश वाटू शकते. म्हणूनच चिडक्या जोडीदाराशी डील करण्यासाठी येथे काही टिप्स दिल्या आहेत. त्यांचा उपयोग करून तुम्ही घरातले वातावरण व स्वतःची मनःशांती टिकवून ठेवू शकता.
वाद वाढू देऊ नका आणि भावनिकरित्या तटस्थ राहा
जेव्हा तुम्ही चिडलेल्या जोडीदारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते बचावात्मक वागतात आणि त्यांची वागणूक अधिक असहयोगी होऊ शकते . जोडीदाराच्या रागाला रागानेच प्रत्युत्तर दिल्याने काही फायदा होत नाही. समोरच्या व्यक्तीचा राग कधी ना कधी शांत होणारच असतो. तुम्ही जितके शांत राहाल तितक्या लवकर त्यांचा राग कमी होईल. तुम्ही दुप्पट रागात त्यांच्याशी वाद घातल्याने परिस्थिती अधिक चिघळते. त्यापेक्षा तुम्ही तटस्थ राहून त्यांचा राग पर्सनली न घेता शांत राहणे शहाणपणाचे ठरते. त्यांचा राग हा त्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यांचा स्वभाव रागीट आहे याचा अर्थ तुम्ही कुठेतरी कमी पडताय असा समज करून घेऊ नका.
शांत परंतु खंबीर राहा
समोरची व्यक्ती सारखीच चिडत असेल तर तुम्ही कायमच शांत राहावे असे नसते. अशाने समोरच्या व्यक्तीला त्यांचा राग हे त्यांचे हत्यार वाटू लागते. म्हणूनच शांत पण खंबीर राहणे आवश्यक आहे. आपले म्हणणे शांततेत पण ठामपणे जोडीदाराला सांगावे. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावना आणि इच्छांचा विचार करून तुमच्या इच्छा थेट आणि आदरपूर्वक व्यक्त करू शकता. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे व आदराने वागता- बोलता तेव्हा तुमचा आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि खुल्या विचारांचे दर्शन घडते.
संवाद साधा व समजून घ्या
लोक चिडचिड करतात कारण त्यांना वाटते की त्यांचे ऐकले जात नाही,त्यांना गांभीर्याने घेतले जात नाही किंवा त्यांचे कौतुक केले जात नाही. अशा वेळी त्यांना निराश आणि दुर्लक्षित वाटू शकते. तुमच्या जोडीदाराचा राग वाढू नये म्हणून, जोपर्यंत त्यांना त्यांचे म्हणणे ऐकले गेले आहे व समजून घेतले गेले आहे याची खात्री होत नाही तोवर त्यांचे म्हणणे ऐकून व समजून घेण्याचा प्रयत्न करा. याचा अर्थ त्यांच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही सहमती द्यावी असे नाही पण कमीत कमी त्यांचे म्हणणे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करता आहात हे त्यांना दिसू द्या म्हणजे त्यांची चिडचिड कमी होऊ शकेल.
तुमचा जोडीदार शांत असेल तेव्हा तुमचे म्हणणे त्यांच्यापर्यंत पोचवा
जेव्हा तुमच्या जोडीदाराची भावनिक स्थिती चांगली नसते तेव्हा ते तुमचे म्हणणे ऐकून घेण्याच्या परिस्थितीत नसतात. जोपर्यंत त्यांच्या मनावर रागाचे वर्चस्व आहे तोपर्यंत तुमच्या समस्येचे निराकरण होणार नाही. तर्कसंगत चर्चा करण्यासाठी त्यांचा राग शांत झाल्यावर शांतपणे तुमचे मत त्यांना सांगा.
सर्वात महत्वाचे म्हणजे तापट स्वभावाच्या नावाखाली तुमच्यावर शारीरिक व मानसिक अत्याचार होत असतील, तुमचा शारीरिक व मानसिक छळ होत असेल तर ते नाते संपवण्यातच शहाणपणा आहे. कुठलीही चांगली व्यक्ती कितीही राग आला तरी आपल्या जोडीदाराला शारीरिक व मानसिक त्रास देणार नाही. म्हणूनच राग ही ज्यांची विकृती आहे व जे रागाच्या भरात दुसऱ्याचे नुकसान करतात अशा व्यक्तीशी नाते ठेवू नका. कारण अति राग ही एक समस्या आहे आणि त्यासाठी दुसऱ्याचे नुकसान करण्याचा कुणालाच हक्क नाही.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक