वयानुसार आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात. जसेजसे वय वाढते तसे त्वचेतही अनेक बदल होतात. वय वाढले की ते आपल्या त्वचेवरून दिसून येते. विशेषतः चेहऱ्यावर आणि हातांवर सुरकुत्यांच्या रूपात वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात. अनेक लोक चेहरा तरुण दिसावा यासाठी स्किनकेअर रुटीनचे अगदी नित्यनेमाने पालन करतात. पण दुर्दैवाने स्किनकेअर रुटीनमध्ये हातांच्या त्वचेसाठी फारसे काही केले जात नाही आणि त्याकडे अनावधानाने दुर्लक्ष होते. जरी आपण वय वाढणे व त्यामुळे येणारे वृद्धत्व आणि त्वचेत होणारे बदल थांबवू शकत नसलो तरीही आपण ते कमी नक्कीच करू शकतो. हातांवर सुरकुत्या पडू नये म्हणून किंवा हात अधिक काळ कोमल व तरुण दिसावे म्हणून आपण काही घरगुती उपाय नक्कीच करू शकतो. पण आपण जर दुर्लक्ष केले, तर आपले हात अधिक वेगाने सुरकुतलेले व म्हातारे दिसू शकतात कारण हातांची त्वचा पातळ आणि नाजूक असते. आपले हात हायड्रेटेड ठेवणे हे मऊ आणि सुंदर हात मिळविण्यासाठी सर्वात महत्वाचे पाऊल आहे. नैसर्गिकरित्या सुरकुत्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही सोपे घरगुती उपाय करू शकता.
हातांवर सुरकुत्या का पडतात?
आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळीच कामे करायला सतत हातांचा वापर करत असल्याने, हातांची नाजूक त्वचा सुरकुतते आणि लवचिकता गमावते. हातांवर सुरकुत्या पडण्यामागे वृद्धत्व, जास्त वेळा हात धुणे, निर्जलीकरण (डिहायड्रेशन),रसायनांशी वारंवार संपर्क येणे, भांडी धुणे किंवा साफसफाई करणे यांसारखी रोजची कामे, जास्त वेळ उन्हात घालवणे, धुम्रपान ही काही विशिष्ट कारणे आहेत. यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकतो.
तरुण ,कोमल व सुंदर हातांसाठी घरगुती उपाय
लिंबाचा रस आणि साखर यांचे स्क्रब
लिंबाचा रस आणि साखर यांचे मिश्रण एक्सफोलिएशनसाठी उत्कृष्ट आहे. लिंबू तुमच्या हातावरील गडद डाग, वय वाढल्यामुळे होणारे पिगमेंटेशन आणि घाण काढून टाकते. साखरेच्या स्क्रबमुळे त्वचेच्या मृतपेशी निघून जातात आणि हात नितळ व मऊ होतात.
दुधाची स्निग्धता
सुरकुतलेल्या हातांसाठी दूध चमत्कार करू शकते. एक्सफोलिएट केल्यानंतर, आपण हात मॉइश्चराइझ केले पाहिजेत व त्यासाठी दूध हा एक उत्कृष्ट पर्याय आहे.कारण त्यात भरपूर स्निग्धता, अँटिऑक्सिडंट्स आणि आवश्यक फॅटी ऍसिडस् असतात. हातांचे स्क्रबिंग केल्यानंतर 15 मिनिटे आपले हात दुधात भिजवा.याने हात मऊ व कोमल राहण्यास मदत होईल.
बनाना पल्प
केळीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे ते सुरकुत्यांविरूद्ध लढतात. एक केळे बारीक करा व त्याचा पल्प हातांना लावा. ते सुकले की स्वच्छ धुवा.तुम्ही आठवड्यातून दोनदा बनाना पल्प मास्क हातांना लावू शकता.
ऑलिव्ह ऑइल
रोज रात्री झोपण्यापूर्वी हातांना ऑलिव्ह ऑईलने मसाज करा. तेल लावल्यानंतर हातमोजे घाला आणि रात्रभर राहू द्या. सकाळी कोमट पाण्याने हात स्वच्छ धुवा. यामुळे तुमचे हात मऊ आणि सुंदर होतील.
टोमॅटोचा रस
टोमॅटोचा रस हा अँटिऑक्सिडंट्सचा उत्कृष्ट स्रोत आहे. लाइकोपीनने समृद्ध असलेला टोमॅटो आपल्या त्वचेचे संरक्षण आणि पोषण करू शकतो. हातांना टोमॅटोचा रस चोळून लावा आणि 10-15 मिनिटे ठेवून थंड पाण्याने धुवा. अँटिऑक्सिडंट्सचा चांगला डोस हवा असेल तर तुम्ही टोमॅटोचा रस पिऊ देखील शकता.
कोरफड
कोरफडमध्ये मॅलिक ऍसिड असते, जे त्वचा लवचिक बनवते. हे सुरकुत्या आणि त्वचा पातळ होण्यासारखी वृद्धत्वाची चिन्हे लक्षणीयरीत्या कमी करू शकते. हातांवर कोरफडीचे जेल लावा आणि हळुवारपणे ते चोळून त्वचेमध्ये मुरवा. किमान 15 मिनिटे तसेच राहू द्या व नंतर पाण्याने हात स्वच्छ धुवा.
हे घरगुती उपचार करून तुम्ही तुमचे हात अधिक काळ तरुण,सुंदर व कोमल ठेवू शकता.
Photo Credit- istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक