रणबीर-आलियाचं लग्न या चर्चेला काही दिवसांपासून अक्षरशः उधाण आलं होतं. काही जणांना अजूनही वाटत होतं की ही नेहमीप्रमाणेच आताही ही एक अफवाच असेल. कारण गेल्या तीन वर्षांपासून #Ralia कधी लग्न करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. बी टाऊनमधील या सेलिब्रेटी लग्नाच्या तारीख, वेन्यूबद्दल खूप गुप्तता पाळण्यात आली होती. घर आणि आर के स्टुडिओला सजावट केली होती पण लग्नाची अधिकृत घोषणा मात्र करण्यात आलेली नव्हती. पाहुणे मंडळी आणि इतर लोकांच्या फोनवर स्टिकर लावण्यात येत होते. त्यामुळे लग्न नक्की आहे की नाही असा प्रश्न सर्वांना पडला होता. शेवटी जेव्हा नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी यांनी हळदी समारंभात काल लग्नाची तारीख जाहीर केली तेव्हा सर्वांचा जीव भांड्यांत पडला. मुलाकडची मंडळी नटून थटून मेंहदी आणि हळदी समारंभासाठी नवरी मुलीच्या घरी गेली होती. हळदीसमारंभ आणि मेंदीच्या कार्यक्रमासाठी नीतू कपूरसह रिद्धिमा, करिना आणि करिष्मा कपूर या करवल्या मिरवताना दिसल्या होत्या. मात्र नवरी मुलगी आणि नवऱ्या मुलाची झलक काही मीडियाला पाहता आला नाही. कालपासून लग्नाचे सर्व विधी पार पडवल्यावर आज गाजावाजा न करताही अगदी थाटामाटात रालियाचा लग्नसोहळाही पार पडला. लग्नासाठी अगदी खास मोजक्याच मंडळींना आमंत्रण होतं.
रालियाच्या लग्नाची लगबग
रालियाच्या लग्नासाठी चौदा एप्रिलला वऱ्हाडी मंडळी आरामात दुपारनंतर हळू हळू लग्न स्थळी निघाले…लग्नाचे सर्व विधी पाली हिलमधील वास्तू अपार्टमेंटमध्ये पार पडत होते. लग्नाला येताना करिना आणि सैफचा शाही अंदाज दिसून आला, करिश्मा कपूर, नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर नटून थटून लग्नस्थळी पोहचल्या. इकडे मुलीची आई सोनी राजदान, शाहीन भट एका गाडीतून तर महेश भट आणि पूजा भट एका गाडीतून विवाह स्थळी पोहचताना दिसले. मात्र सर्वांनाच वेध लागले होते नवरा-नवरीचे… कारण कालपासून आलिया भट आणि रणबीर कपूरचं दर्शन मीडियाला झालं नव्हतं. हळू हळू घरच्या लोकांप्रमाणेच मोजकीच बोलावलेली पाहुणेमंडळीदेखील लग्नाला पोहचली. अंबानी कुटुंबातून लग्नासाठी खास आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी आले होते. करण जोहरही उपस्थित होता. करण आलियाला मुलीप्रमाणे मानतो. त्यामुळे त्याच्यासाठी हे लग्न नक्कीच खास होतं. करणसोबत आलिया आणि रणबीरचा खास मित्र आणि ब्रम्हास्त्रचा दिग्दर्शक अयान मुखर्जीपण उपस्थित होता. दोघांना आलियाला नवरीच्या रुपात पाहून अक्षरशः गहिवरून आलं होतं.
रालियाच्या लग्नाचा शाही अंदाज
रणबीर आणि आलियाचा लग्न सोहळा #AliaTookKapoorAndSon मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पण तरीही शाही थाटात पार पडला. एकीकडे मुलीचं लग्न लागताना लग्नापूर्वी पिता महेश भट आणि भाऊ राहुल भट भावूक झाले होते. तर आयुष्यात या खास दिवशी वडील नाहीत म्हणून रणबीरदेखील थोडा इमोशनल झाला होता. मात्र लग्नमंडपात ऋषीकपूर यांचा फोटो खास फुलांनी सजवून ठेवला होता. आई नीतू कपूरने रणबीरला टीळा लावून आर्शीवाद दिले तर आलियाची नवरीच्या रूपात नजरही नीतूने काढली. एकूण चार पंडितांच्या उपस्थितीत मंत्रघोषात पारंपरिक पद्धतीने रालियाचं लग्न लागलं. सप्तपदी चालत रणबीर आलियाने सात जन्माची वचने घेतली. करण जोहरने पुढे सरसावत आलिया आणि रणबीरची लग्नगाठ बांधली आणि त्यांना भरभरून आर्शीवाद दिले.
आलिया रणबीरवर लहानपणापासून होती फिदा
एका मुलाखतीत पूर्वी आलियाने सांगितलं होतं की ती अकरा वर्षांची असताना पहिल्यांदा भेटली होती आणि रणबीर तिचा सर्वात पहिला क्रश होता. आलियाने जेव्हा रणबीरला सावरिया चित्रपटात पाहिलं तेव्हापासूनच ती त्याच्यावर फिदा होती. मात्र हे ती एक फॅन गर्ल म्हणून असलेलं क्रश होतं. 2017 मध्ये हे दोघं खऱ्या अर्थाने एकत्र आले. ब्रम्हास्त्रच्या सेटवर त्यांनी एकत्र काम केलं आणि एकमेकांसोबत खूप वेळ घालवला. आलिया आणि रणबीरने त्याचं रिलेशनशिप जाहीर करण्यासाठी सोनम कपूरच्या रिसेप्शनचं निमित्त शोधलं होतं. आता सोनम कपूर आई होणार आहे तर #Ralia ने एकमेकांसोबत सात जन्म एकत्र राहण्याचं वचन घेतलेलंय. 2019 साली फिल्मफेअर पुरस्काराच्या वेळी या दोघांची रिअल केमिस्ट्री जगासमोर आली. ऋषी कपूरच्या आजारपणातही आलिया रणबीरसोबत कायम होती. कठीण काळात तिने त्याला खऱ्या अर्थाने आधार दिला. या दोघांचं एकमेकांसोबत असणं चाहत्यांनाही आवडू लागलं. मात्र अचानक झालेल्या लॉकडाऊन आणि ऋषी कपूरच्या आजारपणामुळे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय लांबवला. पण तरिही एकमेकांची साथ कधीच सोडली नाही. त्यांच्या ब्रेकअपच्या अफवादेखील या काळात पसरल्या होत्या. त्यामुळे रालियाचं लग्न ही देखील एक अफवाच आहे असं सर्वांना वाटत होतं.
मात्र अखेर तो क्षण आला ज्या क्षणाची अनेक चाहते आतूरतेने वाट पाहत होते.
आता या दोघांनी कायम एकमेकांसोबत राहावं आणि लग्नात घेतलेल्या वचनांना आयुष्यभर प्रामाणिकपणे पाळावं हिच सर्वांची इच्छा आहे.