अंघोळ केल्यामुळे तुम्हाला फ्रेश आणि उत्साही वाटते. कारण अंघोळ केल्यामुळे अंगाला चांगला मसाज मिळतो आणि त्वचा स्वच्छ होत असते. मात्र जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने अंघोळ करत असाल तर मात्र तुम्हाला खूप थकवा येतो आणि काहीच करण्याची इच्छा वाटत नाही. जर तुम्हाला दररोज सकाळी असं कंटाळवाणं वाटत असेल तर तुमची अंघोळ करण्याची पद्धत चुकीची आहे. थंडीच्या दिवसात अथवा थंड वातावरणात राहणाऱ्या लोकांना गरम पाण्याने अंघोळ करायची सवय असते. त्यामुळे आपण नेहमीच अगदी गरम नाही पण कोमट पाण्याने अंघोळ करतो. कारण त्यामुळे अंग चांगलं शेकलं जातं आणि मांसपेशींना आराम मिळतो. चांगली झोप लागण्यासाठी रात्री गरम पाण्याने अंघोळ केली जाते. फार गरम होत असेल अथवा कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्येच फक्त थंड पाणी अंघोळीसाठी वापरलं जातं. म्हणजे थोडक्यात अनेकांना गरम पाण्याने अंघोळ करण्याची सवय असते. असं असूनही बऱ्याचदा गरम पाण्याने अंघोळ केली की खूप थकल्यासारखं आणि निरूत्साही वाटतं. जाणून घ्या यामागचं कारण
गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे येतो का थकवा
गरम पाणी अंघोळीसाठी आणि पिण्यासाठी वापरणं नक्कीच फायदेशीर असतं. यासाठी वाचा दररोज गरम पाणी पिण्याचे फायदे (Warm Water Benefits In Marathi) पण गरम पाण्याने अंघोळ केल्यावर तुम्ही लगेच एक चूक करता ती म्हणजे त्यानंतर लगेच थंड वातावरणात येता. थंडीच्या दिवसात अथवा इतर दिवसांमध्येही वातावरणात गारवा असतो. ज्यामुळे शरीराच्या तापमानात लगेच बदल होतो. ज्यामुळे शरीर आरामदायक स्थितीत जातं. ज्यामुळे तुम्हाला थकल्यासारखं अथवा झोप आल्यासारखं वाटू लागतं. पण जर सकाळी अंघोळ केल्यावर असा थकवा नको असेल तर तुम्हाला अंघोळ करण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी.
गरम पाण्याने अंघोळ कशी करावी
गरम गरम पाण्याने अंघोळ करावी असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र कधीच अति गरम पाणी अंघोळीसाठी वापरू नका. कारण यामुळे तुमच्या त्वचा आणि आरोग्यावर चुकीचे परिणाम होतात. यासाठी कोमट पाणी अंघोळीसाठी वापरणं हा एक उत्तम उपाय आहे. शिवाय अंघोळ झाल्यावर काही सेंकद अंगावर थोडं नॉर्मल तापमानाचं पाणी घ्या. बाथरूममधून बाहेर पडण्यापूर्वी जर तुम्ही थोडं सामान्य तापमानाचं पाणी अंगावर घेतलं तर त्यामुळे तुमच्या शरीरातील तापमानामध्ये हळू हळू बदल होत जातो. तुमच्या शरीरातील मांसपेशी आणि रक्तप्रवाह सुधारतो आणि तुम्हाला फ्रेश आणि टवटवीत वाटू लागतं. अंघोळ करण्याची ही पद्धत योग्य आहेच शिवाय तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर योग्य परिणाम करणारी आहे. यामुळे तुमच्या शरीराला आराम मिळतोच पण त्यासोबतच तुमच्या मनालाही आनंद मिळतो. ज्यामुळे तुमच्या मनातील नकारात्मक, चिंतेचे विचार दूर होतात. ताणतणाव, चिंता काळजी दूर करण्याचा हा चांगला उपाय आहे. रोग प्रतिकार शक्ती कमी असेल तर ती वाढण्यासाठी, शरीरातील चरबी कमी होण्यासाठी तुम्हाला यामुळे मदत होते. दिवसाची सुरूवात चांगली असेल तर त्याचा तुमच्या कामावर आणि जगण्यावर छान परिणाम होतो.