साडी हा महिलांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. घरात एखादं मंगल कार्य असो वा ऑफिसमध्ये एखादं सेलिब्रेशन सर्वात पहिली पसंती महिला साडीला देतात. सणसमारंभात साडी नेसण्याची एक वेगळीच हौस असते. मात्र उन्हाळा सुरू झाला की आवड असूनही साडीचा पेहराव बाजूला ठेवला जातो. कारण साडीत उन्हाळ्यात जास्त उकडण्याची शक्यता असते. मात्र जर तुम्हाला उन्हाळ्यातही साडीत कूल दिसायचं असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा.
उन्हाळ्यात अशा प्रकारच्या साड्या नेसा
उन्हाळ्यात तुम्ही कोणत्या प्रकारच्या साड्या नेसता यावर तुम्हाला उकाड्याचा त्रास होणार का हे अवलंबून आहे. यासाठी उन्हाळ्यासाठी खास सूती, हलक्या वजनाच्या, खादी अथवा लीनन मटेरिअलच्या साड्या निवडा. आजकाल बाजारात क्लासिक सुती साड्या सहज मिळतात. ज्यामुळे हवा खेळती राहते आणि साडी नेसण्याचा आनंद घेता येतो. याशिवाय तुम्ही हलक्या वजनाच्या जॉर्जेट, शिफॉनच्या साड्याही या काळात नेसू शकता.ऑर्गेंजा नेसण्याचा हा अगदी उत्तम काळ आहे.
साडीवरील डिझाईन असावं असं
उन्हाळ्यात लग्नकार्य, सण-समारंभ भरपूर असतात. अशा वेळी तुम्हाला कार्यक्रमात शोभून दिसतील पण जास्त त्रास होणार नाही अशा साड्या निवडाव्या लागतील. जर तुम्हाला काठापदराच्या अथवा हेव्ही डिझाईनच्या साड्या नको असतील तर तुम्ही चिकनकारी, फुलकारी अथवा काश्मिरी वर्कच्या सिल्कच्या साड्या निवडू शकता. मात्र चुकूनही या काळात सीक्वेन्स, वेल्वेट, जरी वर्क अथवा जरदोसी वर्कच्या साड्या नेसू नका. कारण त्यामुळे तुम्हाला प्रचंड उकाडा जाणवू शकतो. कॉटन सिल्कच्या हलक्या साड्या लग्न समारंभात शोभून दिसतात. शिवाय अशा साड्यांमध्ये तुम्हाला आरामदायक वाटू शकतं.
उन्हाळ्यात साडी नेसताना काय काळजी घ्याल –
साडी नेसण्याची प्रत्येकीची एक वेगळी पद्धत असते. मात्र जर तुम्ही उन्हाळ्यात काही विशिष्ट पद्धतीची साडी नेसण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला थोडं कमी गरम होईल.
- उन्हाळ्यात साडी नेसताना सर्वात महत्त्वाचं तुम्ही साडीसाठी सूती कापडाचे पेटीकोट निवडा.
- ब्लाऊजसाठी आतून लावलेलं लायनिंगदेखील शक्य असल्यास सूती असावं.
- साडीसाठी तुम्ही ट्यूब स्टाईल ब्लाऊज, ऑफ शोल्डर ब्लाऊज, स्लीव्ज लेस अथवा स्ट्रिप्सचं ब्लाऊज निवडलं तर तुम्हाला जास्त आरामदायक वाटेल.
- साडीसोबत दुपट्टा कितीही छान वाटत असला तरी उन्हाळ्यात अशा प्रकारच्या स्टाईल करणं शक्य असल्यास टाळा.
- शिफॉन, ऑर्गेंजा अशा प्रकारच्या अथवा नेटची साडी नेसल्यावर कंबरेवर मॅचिंग बेल्ट लावा. ज्यामुळे तुम्ही स्टायलिश दिसालच शिवाय साडी जास्त फुलणार नाही आणि उन्हाळ्यात तुम्हाला साडीचा त्रास होणार नाही.
- खांद्यावर साडीचा सिंगल पदर न सोडता तो व्यवस्थित पिन अप करा ज्यामुळे तुम्हाला फार उकाडा जाणवणार नाही.