अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि पर्ण पेठे (Parn Pethe) हे सुपरस्टार हंगामा प्लेच्या अधांतरी या आगामी ओरिजनल मराठी शोमध्ये प्रमुख भूमिकेत लवकरच दिसणार आहेत. या शोमध्ये लोकप्रिय अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni), आशय कुलकर्णी (Ashay Kulkarni) आणि आरोह वेलणकर (Aaroh Welankar) यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अधांतरी ही काहीशी मजेशीर प्रेमळ आणि प्रत्येकाला आपलीशी वाटेल अशी रोमँटिक – कॉमेडी ड्रामा असणारी कथा आहे. लाँग-डिस्टंस नात्यात असलेल्या जोडप्याला काही कारणांमुळे बराच काळ एकत्र रहावे लागते. ही कारणे त्यांच्या नियंत्रणाबाहेरील आहेत. त्यानंतर नक्की काय काय घडते आणि हे जोडपे कसे हँडल करते याबाबत ही ओरिजनल सिरीज आहे.
अधिक वाचा – …आणि मिलिंद शिंदे थोडक्यात बचावले…
विनोदी बाजासह विषय मांडला आहे
क्लासमेट, लॉस्ट अँड फाऊंड, ऑनलाइन बिनलाइन, गुलाबजाम, रणांगण अशा मराठी सिनेमांमधील भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सिद्धार्थ चांदेकर याच्या सांग तू आहेस का? जीवलगा, प्रेम हे, सिटी ऑफ ड्रिम्स आणि इतर मालिकांमधील भूमिकाही गाजल्या आहेत. त्यामुळे सिद्धार्थ हे नाव प्रेक्षकांना नक्कीच नवे नाही. अधांतरीमधील आपल्या व्यक्तिरेखेविषयी सिद्धार्थने सांगितले, “मागील वर्षभरात प्रत्येक जोडप्याला जो अनुभव आलाय असाच काळ या सिरीजमध्येही आहे. त्यामुळे ही कथा फारच आपलीशी वाटते. शिवाय, पर्ण आणि माझी व्यक्तीरेखाही अगदी तुमच्या-आमच्यासारखी आहे. प्रत्येक जोडपं बांधिलकी, अनुरूपता आणि एकमेकांशी अधिक घट्ट बंध असावेत अशी अपेक्षा करतो. या शोमध्ये हे सगळे प्रश्न काहीशा नाट्यमय मात्र विनोदी पद्धतीने मांडण्यात आले आहेत.” सिद्धार्थ या नव्या सिरीजसाठी खूपच उत्साहीत असून प्रेक्षकांना नक्कीच ही सिरीज आवडेल असा त्याला विश्वास आहे.
अधिक वाचा – सिटी ऑफ ड्रिम्समध्ये या अभिनेत्याची होणार सरप्राईज एन्ट्री
आताच्या जगात परफेक्ट असणारी कथा
फास्टर फेणे, फोटोकॉपी, बघतोस काय मुजरा कर, वायझेड, रमा माधव हे सिनेमे आणि अनेक नाटकांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली पर्ण पेठेने सांगितले की,, “परफेक्ट नसलेल्या लोकांच्या जगात एकदम परफेक्ट बसणारी कथा आहे अधांतरीची. मी मुग्धा या मुंबईतील एका मुलीची भूमिका साकारली आहे. ती लाँग डिस्टंस रिलेशनशीपमध्ये आहे. मात्र, बॉयफ्रेंडसोबत खूप मोठा काळ घालवाला लागतो तेव्हा एकेक गोष्टी स्पष्ट होत जातात. हल्लीच्या आधुनिक जगात नातेसंबंध टिकवून ठेवणे लोकांसाठी फारच कठीण झाले आहे. अशा जगातील अनेक गोष्टींचं प्रतिबिंब यामध्ये प्रेक्षकांना दिसून येणार आहे.” तर सध्या ‘माझा होशील ना’ या मालिकेतील आणि रिक्षा रोको मित्रमंडळ, मादुरी आणि हॉस्टेल डेज अशा सिनेमांमध्ये झळकलेला विराजस कुलकर्णी म्हणाला, “ही प्रेमकथा असली तरी अधांतरी ही प्रेक्षकांनी पाहिलेल्या इतर कथांपेक्षा वेगळी आहे. यातलं जोडपं एकमेकांना अधिक नीट जाणून घेण्याचा प्रयत्न करतंय आणि त्याचवेळी काही अनपेक्षित प्रसंगांचाही अनुभव घेतंय. या शोमधील व्यक्तिरेखांमध्ये प्रेक्षकांना स्वत:मधील काही गोष्टी दिसतील, असं मला वाटतं.”
माझा होशील ना, किती सांगायचंय मला, पाहिले न मी तुला आणि एक थी बेगम या मालिका तसेच काय बी या मराठी सिनेमात झळकलेला आशय कुलकर्णीने यावेळी सांगितले की,, “मागील दीड वर्ष प्रचंड अनिश्चिततेचं होतं. या शोमध्ये प्रेक्षकांना हीच स्थिती पहायला मिळेल आणि त्याचा आनंदही घेता येईल. इतकंच नाही, फार आपल्यातल्याच वाटणाऱ्या व्यक्तिरेखांमुळे प्रेक्षकांना ते या कथेचाच भाग असल्याची भावना देतील आणि या कथेत त्यांना गुंतवून टाकतील.” तर रेगे, घंटा हे सिनेमे आणि लाडाची मी लेक गं, गुलमोहर, बिग बॉस मराठी 2 साठी ओळखला जाणारा आरोह वेलणकर म्हणाला की, “अधांतरी ही साधी मात्र फार वेगळी कथा आहे. या कथेच्या अंतरंगात बरंच काही आहे. या शोमध्ये माझी छोटीशी भूमिका असली तरी या शोमध्ये असावं असं मला वाटलं कारण एक अभिनेता म्हणून तुमच्याशी संवाद साधणाऱ्या कथेचा भाग असणं तुम्हाला नेहमीच आवडतं.” गणराज असोसिएट्स निर्मित आणि जीत अशोक दिग्दर्शित हा शो लवकरच हंगामा प्ले वर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
अधिक वाचा – हृता दुर्गुळे परत येतेय, नवी मालिका नवा लुक
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक