भारताचे पहिले फिल्ड मार्शल व वॉर हिरो असलेले सॅम माणेकशॉ यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक लवकरच येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘सॅम बहादूर’ असेल आणि यात विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. नुकतेच या चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. मेघना गुलजार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून रॉनी स्क्रूवाला या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. सॅम माणेकशॉ यांची लष्करी कारकीर्द जवळपास चार दशके आणि पाच युद्धांची होती. फील्ड मार्शल पदावर बढती मिळालेले ते पहिले भारतीय सैन्य अधिकारी होते. 1971 च्या भारत-पाक युद्धात त्यांच्या लष्करी विजयामुळे बांगलादेशची निर्मिती झाली.
शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा व्हिडीओ व्हायरल
शूटिंगच्या पहिल्या दिवशी, चित्रपटाच्या निर्मात्यांनी या प्रोजेक्टशी संबंधित एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये सॅम बहादूरच्या भूमिकेत विकी कौशल त्याच्या सहकलाकार, सान्या आणि फातिमासह दिसतोय. हा व्हिडिओ विकीच्या सॅम बहादूरच्या रूपात आणि त्याच्या टेबल वाचन सत्रापासून ते मेघना गुलजार आणि तिच्या टीमच्या वाचन सत्रापर्यंतच्या अद्भुत परिवर्तनावर प्रकाश टाकतो.हा प्रवास सुरू करण्यास उत्सुक असलेल्या दिग्दर्शिका मेघना गुलजार म्हणतात की, “अखेरीस, अनेक वर्षांच्या व्यापक संशोधन, लेखन आणि कठोर तयारीनंतर, शेवटी सॅम बहादूरची सुरुवात झाली आहे. आम्हाला सॅम माणेकशॉ यांची प्रेरणादायी जीवनकथा सांगण्याची संधी मिळाली याचा खूप आनंद आहे.
चित्रपटाची संपूर्ण टीम सॅम माणेकशॉ यांची कथा सांगण्यास अत्यंत उत्सुक
अभिनेत्री फातिमा सना शेख म्हणते की, ‘आपल्या देशाच्या महान युद्ध नायकांपैकी एक असलेल्या सॅम माणेकशॉ यांच्या प्रेरणादायी कथेचा भाग बनणे हा मोठा सन्मान आहे. मला आशा आहे की ज्यांनी सॅम माणेकशॉ यांच्याबद्दल ऐकले नाही ते देखील त्यांना पाहिल्यानंतर नेहमी त्यांची आठवण ठेवतील” तर चित्रपटातील तिच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना सान्या मल्होत्रा म्हणते, “सॅम माणेकशॉ यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांची सपोर्ट सिस्टम असलेल्या सिल्लूची भूमिका साकारणे हा एक मोठा सन्मान आहे. विकीसोबत मी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहे. मेघना गुलजारसोबतचा हा माझा पहिला चित्रपट आहे. माझ्या पात्राला पूर्ण न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल.”
भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ
सॅम माणेकशॉ यांचा जन्म 3 एप्रिल 1914 रोजी अमृतसर येथे पारशी कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब गुजरातमधील वलसाड शहरातून पंजाबमध्ये स्थलांतरित झाले होते. माणेकशॉ यांचे सुरुवातीचे शिक्षण अमृतसरमध्ये झाले, नंतर ते नैनितालच्या शेरवुड कॉलेजमध्ये दाखल झाले. इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडूनच्या पहिल्या बॅचसाठी (1932) निवड झालेल्या 40 विद्यार्थ्यांपैकी ते एक होते. तेथून 1934 मध्ये कमिशन मिळाल्यानंतर ते भारतीय सैन्यात दाखल झाले.17 व्या इन्फंट्री डिव्हिजनमध्ये असताना, त्यांनी प्रथम दुसऱ्या महायुद्धात युद्धाचा अनुभव घेतला, 4-12 फ्रंटियर फोर्स रेजिमेंटचे कर्णधार म्हणून बर्मा मोहिमेदरम्यान सेतांग नदीच्या काठावर जपानी लोकांशी लढताना ते गंभीर जखमी झाले होते.
7 जून 1969 रोजी, सॅम माणेकशॉ यांनी जनरल कुमारमंगलम यांच्यानंतर भारताचे 8 वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला, त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवाचा कस लागायची वेळ आली जेव्हा हजारो निर्वासित पूर्व पाकिस्तानमधून भारतात येऊ लागले आणि युद्ध अटळ होते. 1971 च्या डिसेंबरमध्ये ही भीती खरी ठरली. सॅम माणेकशॉ यांच्या लढाऊ कौशल्यासमोर पाकिस्तानचा पराभव झाला आणि बांगलादेशची निर्मिती झाली, त्यांची देशभक्ती आणि देशाची निस्वार्थ सेवा केल्यामुळे त्यांना 1972 मध्ये पद्मविभूषण आणि 1 जानेवारी 1973 रोजी फील्ड मार्शल म्हणून सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या या बायोपिकची सर्वांनाच उत्सुकता आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक