मासांहार करणाऱ्यांसाठी श्रावण हा अगदी नकोसा असा काळ आहे. कारण या महिन्यात मासे किंवा चिकन असा कोणताही मासांहार केला जात नाही. खूप जण हा काळ पाळतात. तर काही जण मात्र या काळातही आपला आहार बदलत नाही. श्रावण या महिन्याचे महत्व आपल्यात एक वेगळेच आहे. हिंदू धर्मात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र असा महिना मानला जातो. या काळात अनेक सण देखील येतात. श्रावणात नॉन-व्हेज न खाण्यामागे अनेक कारणं आहेत. पण तुम्ही या काळात मासे- चिकन खात असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहीत असायला हव्यात. या गोष्टी अनेकांना माहीत असतील तर अनेकांना पहिल्यांदा कळतील यात काही शंकाच नाही.
या कारणासाठी श्रावणात करत नाही मासांहार
प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारणं असतात. श्रावणातच या गोष्टी का खायच्या नाहीत असे अनेकांच्या डोक्यात नक्कीच येत असेल पण त्यामागेही काही शास्त्रीय कारणं आहेत. ही शास्त्रीय कारणे वाचून मगच तुम्ही या दिवसात कशाचे सेवन करायला हवे हे ठरवायला हवे.
- श्रावणाचा हा काळ प्राण्यांच्या दृष्टिकोनातून प्रजननाचा असतो. त्यामुळे आपण त्यांना या काळात मारणे हे अगदी अपवित्र मानले जाते. प्राण्याची हत्या ही एका दृष्टीकोनातून क्रूर कृत्य आहे. त्यामुळे कोणा मनुष्याकडून हा गुन्हा होऊ नये यासाठी या काळात मासांहार करु नका असा सल्ला दिला जातो
- श्रावणाच्या या काळात इतका पाऊस असतो की, या काळात मासेमारी करणे हे खरंतरं शक्य नसते. कोळ्यांच्या बोटी या पाण्यात या काळात उतरत नाहीत. त्यामुळे मासे हे फ्रेश मिळत नाहीत. त्यामुळे आपल्याला या काळात जे मासे मिळतात. ते साठवणीचे मासे असतात. जे या काळातील वातावरणासाठी अजिबात चांगले नसतात. जर तुम्हाला मासे खाण्याची इतकीच इच्छा झाली असेल तर तुम्ही सुके मासे खाल्ले तरी चालतील.
- श्रावणात वातावरणात एक आल्हाददायक गारवा आलेला असतो. हा आल्हाददायक गारवा कितीही प्रसन्न वाटत असला तरीदेखील तो आरोग्यासाठी अपायकारक असतो. कारण मासे, मटण किंवा अंडी यांच्यामध्ये बॅक्टेरिया वाढण्याची अधिक भिती असते.त्यामुळे असे पदार्थ आपल्याला बाधू शकतात. त्यामुळे याचे सेवन करु नका असे सांगितले जाते.
- वातावरणातील गारवा पोटातही एक वेगळा गारवा आणत असतो. या काळात उष्णता आणणारे पदार्थ अवश्य खावे. पण आपल्याकडे अन्य आहारातूनही पोटाला उष्णता मिळू शकते. पावसाळ्यात पचनशक्ती मंदावल्यामुळे हे अन्न पचत नाही. त्यामुळे हे पदार्थ टाळलेले बरे असतात.
श्रावण हा महिना सणांचा असल्यामुळेही या काळात बरेचदा गोड-धोड पदार्थ करण्याचे योग येत असतात. दूधापासून बनवले जाणारे पदार्थ असतात. अशा जेवणासोबत चिकन- अंडी- मासे असे काहीही येऊ नये म्हणूनच की काय या गोष्टी या दिवसात खाऊ नका असे सांगितले जाते.
या इतक्या गोष्टी वाचूनही तुम्हाला मासांहार करायचा असेल तर तुम्ही तुमच्या पोटाची काळजी घेऊन आणि मोजके खाऊन या जेवणाचा आनंद घेऊ शकता.