ADVERTISEMENT
home / मनोरंजन
Film Review : विकासाचा पर्दाफाश करणारा ‘मुळशी  पॅटर्न’

Film Review : विकासाचा पर्दाफाश करणारा ‘मुळशी पॅटर्न’

भारत एक विकसनशील देश आहे. असं आपण अगदी लहानपणापासून ऐकतोय,पाहतोय..पण हा विकास फक्त शहरातच पाहायला मिळतो. शहरांचा विस्तार होतोय. पण या विकासासाठी नेमकी काय किंमत देशाला मोजावी लागते हे पहायचं असेल तर मुळशी पॅटर्न नक्की बघा… ही कथा आणि या कथेतली पात्र काल्पनिक असली तरी हेच वास्तव आहे. चित्रपटात रंगवलेलं वास्तव फक्त जाणवतंच नाही तर बोचतं देखील. विकास कोणाच्यातरी विनाशावर उभा राहतो तेव्हा समाजाला गुन्हेगारीचा शाप लागतो…या चित्रपटात हा वास्तववाद उभा करण्यात लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडे यांना यश आलंय.

सिनेमा सुरु होताच एक वाक्य कानी पडतं शहरं कशी वाढली आहेत हे शहरात राहून नाही कळत त्यासाठी वरूनच पाहायला हवे.त्याच वेळी कॅमेराने वरच्या अॅंगलने घेतलेली दृश्यं दिसू लागतात आणि क्षणातच आपल्याला एकेकाळी हिरव्यागार शेतीनं नटलेली जमीन कशी हळूहळू करड्या आणि रुक्ष इमारतींच्या जंगलात बदलत गेली याची दारुण दृश्य दिसू लागतात.मध्येच निळ्या-काळ्या ताडपत्र्यांनी रंगवलेल्या झोपडपट्ट्या दात विचकून भेसूर हसतायत असं जाणवत रहातं.हे वास्तव फक्त मुळशी पुरतं किंवा पुण्या-मुंबई पुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण देशात असाच विनाशक विकास घडतोय दाखविणारं विदारक सत्य. चित्रपट पहाताना देशातल्या प्रत्येक विनाशक वृत्तीचा पॅटर्न इथेच दडलेला आहे असं जाणवतं रहातं.

ही कथा आहे मुळशी तालुक्यातल्या एका गावातील पाटील कुटुंबाची. सोन्यासारखी जमीन कवडीमोलांनं विकून, हातातल्या पैश्यावर बेफान जगून झाल्यावर जेव्हा बाकी शून्य उरते, तेव्हा आपल्या श्रीमंतीचा प्रतिक असलेला वाडा सोडून या कुटूंबाला पुण्यातील कुठल्याश्यी झोपडपट्टीच्या वळचणीला यावं लागतं. एके काळी पाटीलकी आणि हिंद केसरी गाजवलेल्या या पाटलाला (मोहन जोशी) आणि त्यांचा मुलाला, राहुलला (ओम भूतकर) शहरात हमाली करावी लागते. त्यामुळे राहूलच्या मनात बापाबद्दल प्रचंड राग आणि घृणा निर्माण होते. पण पुढे त्यांनी शेतजमीन विकली नसती तरी मारुन मुटकून ती जमीन ताब्यात घेतलीच गेली असती हे सत्य लपून रहात नाही.

राहुलच्या मनातील क्रोध, आक्रोश त्याला नकळत गुन्हेगारीच्या वळणावर घेऊन जातो. वडील कसे नाकर्ते आहेत, त्यांनी काहीच कसं केलं नाही हे सिध्द करण्याच्या हट्टापायी तो दुष्टचक्रात पुरता गुंततो. त्याचा आपल्या बापाकडून जमीन बळकावणा-या नन्या भाई, विकासक शिंदे, व्यवस्था, सरकार, आयटी कंपनीत काम करणाऱ्या चाकरामान्यांवर असा प्रत्येकावर रोष आहे. पुढे हा रोषच त्याला राहुलचा राहुलभाई आणि नंतर अक्षरशः बकासूर बनवतो. त्याला सगळ्याच गोष्टींची हाव निर्माण होते. तो कशालाच घाबरत नाही.

ADVERTISEMENT

mulshi-pattern-fi-image

या चित्रपटाची खासियत ही आहे की यात गुन्हेगार असलेल्या राहुलची (ओम भूतकर) भूमिका जरी प्रमुख असली तरी तो या चित्रपटाचा ‘’हिरो’ नाही. या चित्रपटात कसं वागू नये याचा बोध होत रहातो आणि हेच मुळशी पॅटर्नचं यश आहे. या चित्रपटातले प्रत्येक कलाकार समाजातल्या प्रत्येक घटकाचं प्रतिनिधित्व करतात. लेखकाने यातून एक पोलीस पॅटर्नही दाखवला आहे. उपेंद्र लिमयेनं जो राकट, कणखर पोलीस वठवला त्याला तोड नाही. कायद्याला मर्यादा असतात आणि खाकीलाही… मात्र त्यातून तोडगा काढत फक्त गुन्हेगार नाही तर गुन्हेगारी वृत्ती संपवण्याचा प्रयत्न करणारा हा ऑफीसर प्रेक्षकांची दाद मिळवून जातो.

चित्रपटात प्रत्येक कलाकाराने अप्रतिम काम केलंय. मग तो हताश झालेला पाटील (मोहन जोशी) असो की आक्रोश पोटातच ठेवणारी पाटलीण बाई (सविता मालपेकर) असो. आपल्या दोस्तावर जीव टाकणारा गण्या (क्षितिज दाते), राहुलच्या धाडसावर भाळलेली, पण माजावर चिडलेली मालविका गायकवाड, सगळं तटस्थपणे पाहणारा, जमीन विकून हमालीच्या ओझ्याखाली दबलेला तरीही सत्याची कास न सोडलेला म्हातारा (महेश मांजरेकर) प्रत्येकाने आपापल्या भूमिका चपखल वठवल्या आहेत. राहुलभाईचे सच्चे विरोधक,त्याच्या इतका बेरडपणा अंगी बाळगू न शकणारे पिंट्या भाई (रमेश परदेशी) आणि दया भाई (देवेंद्र गायकवाड)यांनी चांगले काम केले आहेत. वकिलाची भूमिका सुनील अभ्यंकर यांनी छान साकारली आहे. संवेदनशील तरीही परखड, तत्वनिष्ठ असे पोलीस इस्पेक्टर उद्य सुरेश विश्वकर्मा यांनी चांगला साकारलायं. उपेंद्र लिमयेने साकारलेला इस्पेक्टर क़डू आणि राहूल म्हणजेच बकासूर साकारलेला ओम भुतकर आमने सामने पहायला मजा येते. अर्थातच दिग्दर्शक,लेखक असलेल्या प्रविण तरडेने नन्या भाई तरडे चांगलाच वठवला आहे.

सिनेमा शेवटी सुन्न करतो बकासूराचा अंत होतो तेव्हा….कारण माणसाचं जेव्हा जनावर होतं तेव्हा त्याचा शेवट हा असाच होतो.

ADVERTISEMENT

फोटो सौजन्य : Instagram 

27 Nov 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT