आपल्या डोळ्यांनी केवळ हे सुंदर जगच पाहता येतं असं नाही, तर आपल्या चेहऱ्याची सौंदर्यता वाढवण्याचं कामही आपले डोळे करत असतात. त्यामुळे डोळ्यांची निगा राखणं अतिशय गरजेचं आहे. मात्र, रोजचा थकवा आणि ताणामुळे बऱ्याचदा आपल्या डोळ्यांखाली सूज येते ज्याला अंडरआय बॅग म्हटलं जातं.
थकवा आणि चिंतेशिवाय असं घडण्यासाठी अनेक कारणं असतात, जसं अंगामध्ये कमी पोषण, मानसिक ताण, अनुवंशिकता, पाण्याची कमतरता, वाढतं वय, अॅलर्जी, धुम्रपान आणि झोप पूर्ण न होणं. कारण काहीही असो, मात्र चेहऱ्यावर अंडरआय बॅग अजिबात चांगले वाटत नाहीत. त्यासाठी आम्ही तुम्हाला अंडरआय बॅगपासून वाचण्यासाठी किंवा हे काढून टाकण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत.
तुमच्या डोळ्यांच्या खालच्या भागामध्ये झोपण्यापूर्वी विटामिन ई युक्त ऑईल लावावं. तसंच थंड पाण्यामध्ये विटामिन ई युक्त ऑईलचे काही थेंब घालावे आणि त्यामध्ये कापूस भिजवून झोपण्यापूर्वी १० मिनिट्स आपल्या डोळ्यांवर ठेवावा असंही करू शकता. असं केल्याने सूज कमी होते.
डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी सर्वात चांगला उपाय आहे दूध. यासाठी तुम्हाला तुमच्या फ्रिजमध्ये आईस ट्रे मध्ये दुधाचे क्यूब्स जमवून घ्यावे लागतील. त्यानंतर हे दूधाचे बर्फाचे तुकडे एका पातळ कपड्यात लपेटून आपल्या डोळ्यांना शेकवावं. या उपायामुळं डोळ्यांची सूज कमी होईलच शिवाय थकवादेखील निघून जाईल.
त्याशिवाय तुम्ही दोन चमचे दुधात एक चमचा कॉफी पावडर मिसळून पेस्ट करून घ्या आणि ही पेस्ट डोळ्यांखाली लावा. हे सुकू द्यावं. साधारण १० ते १५ मिनिट्सनंतर थंड पाण्यानं धुवावं. तुम्हाला नक्की तुमच्या चेहऱ्यावर फरक जाणवेल आणि सूज हळूहळू कमी होईल. तसंच तुम्हाला घाई असल्यास, अजून एक उपायदेखील आहे. कापसाचा बोळा थंड दुधामध्ये बुडवून आपल्या डोळ्यांवर ठेवावा. तुम्हाला खूपच आरामदायी वाटेल.
डोळ्यांसाठी काकडी अतिशय फायदेशीर समजली जाते. त्यासाठी एका काकडीचे पातळ स्लाईस करून घ्यावे आणि साधारणतः २० ते २५ मिनिट्स आपल्या डोळ्यांवर ठेवावे. त्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या ताणासह डोळ्यांखाली आलेली सूज आणि काळे डागही निघून जातात.
अंड्यातील सफेदी डोळ्यांच्या खाली येणारी सूज तर दूर करतेच शिवाय तुमच्या वाढत्या वयाप्रमाणे आलेली फाईन - लाईन्सदेखील कमी करते. त्यासाठी तुम्हाला एका ब्रशच्या सहाय्याने अंड्यातील सफेद आपल्या डोळ्यांच्या आसपासच्या भागात लावून साधारण २० मिनिट्स नंतर थंड पाण्याने डोळे धुवायचे आहेत. यामुळे तुमच्या त्वचेवर चमक तर येतेच त्याशिवाय तुमची त्वचा चांगली होते.
दोन टी बॅग्ज पाण्यात भिजवून फ्रिजमध्ये ठेवून द्याव्यात. दो ते तीन मिनिट्सनंतर फ्रिजमधून काढून २० मिनिट्ससाठी बंद डोळ्यांवर ठेवून द्याव्यात. त्यानंतर डोळे थंड पाण्यानं धुवावेत. डोळ्यांना आराम तर मिळतोच त्याशिवाय डोळ्यांची सूजही कमी होते.
फ्रीजरमध्ये थंड करण्यात आलेले दोन चमचे डोळ्यांवर ठेवावे. जेव्हा चमच्याचं तापमान कमी होईल तेव्हा पुन्हा थंड करून पुन्हा डोळ्यांवर ठेवावे. असं केल्यामुळे डोळ्यांखालील सूज कमी होईल.
या उपायांशिवाय पूर्ण झोप घेणे, संतुलित आहार खाणे आणि आवश्यक तितकं पाणी पिणं हेदेखील अंडरआय बॅग्ज नाहीसे करू शकतात. मात्र हे सगळे उपाय केल्यानंतरही तुमच्या डोळ्याखाली बॅग्ज तयार होत असतील तर याचा अर्थ त्याची कारणं काहीतरी वेगळी आहेत. त्यामुळे याची कारणं जाणून घेण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांची भेट घेण्याची गरज आहे.
You Might Like This:
त्वचेसाठी गुणकारी ठरणारी काकडी