लग्नात प्रियांका-निककडून मिळणार खास भेट!

लग्नात प्रियांका-निककडून मिळणार खास भेट!

जगप्रसिद्ध असणारी आणि मिस वर्ल्ड प्रियांका चोप्रा अमेरिकन गायक - अभिनेता निक जोन्सबरोबर जोधपूरमधील उमेद भवन पॅलेसमध्ये २ डिसेंबरला विवाहबद्ध होत आहे. सुरुवातीपासूनच दोघांचंही नातं खूपच चर्चेत राहिलं आहे. सध्या प्रियांकाच्या घरी खूपच लगीनघाई सुरु आहे. २८ तारखेला घरच्या पूजेपासून त्यांच्या लग्नाच्या विधीला सुरुवातही झाली आहे. प्रियांका आणि निकच्या लग्नाला अगदी जवळचे नातेवाईक आणि त्यांचे काही खास जवळचे मित्रच उपस्थित राहणार आहेत. साधारण ८० लोकांच्या उपस्थितीमध्ये या दोघांचंही लग्न जोधपूरमध्ये २ डिसेंबरला पार पडणार आहे. भारतात लग्नामध्ये येणाऱ्या वऱ्हाडी लोकांना खास भेट देण्याची पद्धत असते. आपल्या प्रत्येकाला घरात लग्नामध्ये असणारी ही पद्धत नक्कीच माहीत आहे. प्रियांका आणि निकदेखील आपल्या पाहुण्यांना अशीच खास भेट देणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडेल की, त्यांच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना अशी काय खास भेट मिळणार आहे, तर आम्ही तुम्हाला याबद्दल सांगतो.


काय असेल खास भेट?


प्रियांका आणि निक २०१७ मध्ये एकमेकांना भेटल्यापासून अगदी आकंठ प्रेमात आहेत. त्यांची भेट ही ड्वेन जॉन्सनमार्फत झाली असून ड्वेन हा त्या दोघांच्याही आयुष्यात खूपच महत्त्वाचा व्यक्ती आहे. त्यामुळे ड्वेनदेखील खास लग्नासाठी भारतात येणार आहे. दरम्यान प्रियांका आणि निक आपल्या लग्नात येणाऱ्या प्रत्येकाला एक चांदीचं नाणं भेट देणार असून हे नाणं अतिशय खास आहे. याच्या एका बाजूला ‘एनपी’ अर्थात निक आणि प्रियांका या नावाच्या सुरुवातीची अक्षरं कोरण्यात आली असून दुसऱ्या बाजूला गणपती आणि लक्ष्मी यांच्या प्रतिमा कोरण्यात आलेल्या आहेत.


special gift
जोधपूरमध्ये २९ पासून विधींना सुरुवात


घरी २८ तारखेला पूजा झाल्यानंतर २९ ला जोधपूरच्या विमानतळावरून सर्व वऱ्हाडी आणि प्रियांका - निक हेलिकॉप्टरने उमेद भवन पॅलेसला येतील. त्यानंतर तिथे विधींना सुरुवात होईल. प्रियांका आणि निकने आपल्या लग्नाची तारीख अधिकृतरित्या घोषित केली नसली तरीही २ तारखेला हिंदू पद्धतीने आणि ३ तारखेला ख्रिश्चन पद्धतीने विवाह होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे सध्या सर्वाच्याच चर्चेचा विषय या दोघांचं लग्न झालं आहे. शिवाय प्रियांका आणि निक दोघे कसे दिसतील याचीही सर्वांना उत्सुकता आहे. २९ ला प्रियांकाच्या हातावर मेंदी लागणार असून ३० तारखेला प्रियांका आणि निक एक पार्टी होस्ट करणार असल्याचंही वृत्त आहे. तर १ तारखेला हळद असेल. दरम्यान येणाऱ्या प्रत्येकाला चांदीचं नाणं खास भेट म्हणून देण्यात येणार आहे. जेणेकरून प्रियांका आणि निकचं लग्न सर्वांना लक्षात राहील.


इमेज सोर्स - इन्स्टाग्राम