मुंबई-पुणे-मुंबई 3 मध्ये येणार नवीन पाहुणा

मुंबई-पुणे-मुंबई 3 मध्ये येणार नवीन पाहुणा

'Being a father doesn't start when a child is born, it start when mother is pregnant.' या गौतमच्या ओळीने मुंबई-पुणे-मुंबई ३ (MPM3) च्या ट्रेलरची सुरूवात होते. नुकतंच सतीश राजवाडे दिग्दर्शित MPM3 चं पहिलं ट्रेलर प्रदर्शित झालं. पहिल्या दोन भागांच्या यशानंतर MPM चा येणारा हा तिसरा भाग म्हणजे MPM च्या चाहत्यांसाठी पर्वणीच आहे. मराठीमध्ये तिसरा भाग येणारा हा पहिला चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये फारच उत्सुकता आहे. चित्रपटाची अजून एक जमेची बाजू अशी की, चाहत्यांची सर्वात आवडती जोडी स्वप्नील आणि मुक्ता पुन्हा या चित्रपटात दिसणार आहे.


MPM (2010) साली आलेल्या पहिल्या भागात आपण अनोळखी गौतम आणि गौरी यांच्यातलं हळूहळू फुलत जाणारं प्रेम पाहिलं होतं. या चित्रपटाला भरघोस यश मिळालं होतं. त्यानंतर दुसऱ्या भागाची घोषणा झाली ती 2015 मध्ये. ज्यात आपण त्यांचा लग्नापर्यंतचा प्रवास पाहिला आणि आता तिसऱ्या भागात त्यांच्या कुटुंबाच्या वेलीवर उमलणारं फुल असा हा प्रवासाचा पुढचा टप्पा यात दिसणार आहे.


Mpm3-pic1


फोटो सौजन्य : Instagram 


गौरी आणि गौतमचा प्रेमी युगुल ते जोडपं हा प्रवास आपण पाहिला. आता या चित्रपटात दिसत आहे ते त्यांच्या येणाऱ्या बाळाच्या चाहूलीने सुरू झालेली दोन्ही कुटुंबातील धावपळ आणि उत्साह. गौतम आणि गौरीच्या लग्नाला आता तीन वर्ष झाली असून त्यांना मिळाली आहे गुड न्यूज. गुड न्यूज मिळाल्यावर सुरू झालेली दोघांची थट्टा मस्करी या ट्रेलरमध्ये छान दाखवण्यात आली आहे. दोन्ही कुटुंबात येणाऱ्या नव्या पाहुण्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे. गौरीचा बाळंतपणातील प्रत्येक छोटा-मोठा क्षण, आई होताना तिच्यात होणारे बदल आणि इतर गोष्टी यात दाखवण्यात आलं आहे. नेहमीप्रमाणे गौरीची होणारी घालमेल ट्रेलरमध्येही ओझरती दिसून येत आहे. मग गौतमचं आणि तिच्या कुटुंबाचं तिला सांभाळून घेणं हेही छान दाखवलंय. ट्रेलरमध्ये जरी सगळं गोड गोड दिसत असलं तरी MPM च्या फॅन्सना या गोष्टींमध्येही काहीतरी ट्विस्ट असणार याची खात्री आहे.


खरंतर ट्रेलरच्या आधीच या चित्रपटातील मुक्ता बर्वेवर चित्रित डोहाळे जेवणाचं ‘कुणी येणार गं’ हे गाण प्रदर्शित करण्यात आलं होतं. हे गाणं देवयानी कर्वे- कोठारी आणि पल्लवी राजवाडे यांनी लिहिलं असून साध्या सोप्या रचनेतून एका नव्या पाहुण्याच्या आगमनाने संपूर्ण कुटुंबाला होणारा अानंद यातून व्यक्त करण्यात आला आहे. हे गाणं हृषिकेश रानडे, आनंदी जोशी, सई टेंभेकर, जयदीप बगवाडकर, वर्षा भावे, योगिता गोडबोले आणि मंदार आपटे यांनी गायलं आहे. निलेश मोहरीरने त्याच्या नेहमीच्या संगीत शैलीने हे गाणंसुद्धा मधुर आणि हलकंफुलकं केलं आहे.


चित्रपटाच्या या भागातही आपली सर्व आवडती स्टारकास्ट प्रशांत दामले, सुहास जोशी आणि सविता प्रभुणे दिसत आहेत. बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा स्वप्नील आणि मुक्ताची जोडी आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या जोडीने आत्तापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले असून MPM 3 हा त्यांचा एकत्रितपणे येणारा  चौथा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एव्हरेस्ट मराठी आणि इरॉस इंटरनॅशनलने केली आहे. मग पुन्हा एकदा तयार व्हा 7 डिसेंबरला आपल्या आवडत्या MPM3 पहायला.

Subscribe to POPxoTV