‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक करणार सलमान खान

‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक करणार सलमान खान

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नेहमीच वेगळे विषय हाताळले गेले आहेत आणि असाच एक वेगळा विषय हाताळला गेला होता नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटामध्ये. मुळशीची कथा आणि त्यातील कलाकारांमुळे हा विषय जास्त चांगला प्रेक्षकांसमोर सादर झाला. मराठी चित्रपटाच्या प्रेमात बॉलीवूडदेखील आहे. याचवर्षी ‘सैराट’चा रिमेक करण जोहरने बनवला होता. आता बॉलीवूडचा दबंग खान सलमान खानदेखील रिमेक करणार असून हा चित्रपट असणार आहे, ‘मुळशी पॅटर्न’. सलमान खान या कथेच्या प्रेमात असून लेखक आणि दिग्दर्शक असलेल्या प्रवीण तरडेच्या या चित्रपटाने मराठीतही चांगली 12 कोटींची कमाई केली असून आता सलमानने याचा रिमेक बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याने आपला मेहुणा आयुष शर्मा याची प्रमुख भूमिकेसाठी निवड केली असल्याचंही म्हटलं जात आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला या चित्रपटाच्या रिमेकसंदर्भात सलमाननं चर्चा केल्याचं वृत्त आहे.


mahesh and mohan %281%29


आयुषने याचवर्षी ‘लव्ह यात्री’मधून केलं पदार्पण


आयुष शर्मा हा सलमानची बहीण अर्पिता खानचा नवरा असून त्याने याचवर्षी नवरात्रीदरम्यान ‘लव्ह यात्री’ बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नसला तरीही त्याच्या चित्रपटातील गाण्यांनी धमाल उडवून दिली होती. शिवाय आयुषच्या अभिनयाचीदेखील चर्चा झाली होती. सलमान खानचा मेहुणा असल्यामुळे आता ‘मुळशी पॅटर्न’मधून त्याला अजून एक संधी मिळू शकते. ‘मुळशी पॅटर्न’मधील मुख्य भूमिका ओम भूतकरने साकारली असून त्याच्या कामाचंही प्रचंड कौतुक झालं आहे. मात्र आता आयुष ही भूमिका कशी साकारेल हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कळेल. सलमानने नेहमीच मराठी चित्रपटांप्रती प्रेम दाखवलं असून नुकतंच रितेश देखमुखच्या प्रदर्शित झालेल्या ‘माऊली’ ट्रेलरबद्दलही भरभरून सोशल मीडियावर सलमान बोलला आहे. 2019 मध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु करण्यात येणार असून गुन्हेगारी विश्वासंदर्भात चित्रपट असल्यामुळे आयुषला यासाठी खास प्रशिक्षण घ्यावं लागणार असल्याचं म्हटलं जात आहे.


ayush and warina


काय आहे ‘मुळशी पॅटर्न’


‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट मूळ घटनांवर आधारित असून यामध्ये मुळशी तालुक्यातील तरूण शेतकरी गुन्हेगारी क्षेत्राकडे कसे वळले हे दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटामध्ये ओम भूतकर, उपेंद्र लिमये, महेश मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट चांगला गाजला आणि 12 कोटींची दणदणीत कमाईदेखील या चित्रपटानं केली.


फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम