प्रत्येकाच्या मनात घराचं एक विशेष स्थान असतं. घरातील प्रसन्न वातावरण त्या घरात राहणाऱ्या माणसांना सकारात्मक ऊर्जा देत असतं. घर किती मोठं आहे या पेक्षा ते ‘स्वच्छ आणि नीटनेटकं’ आहे का? हे फार महत्वाचं आहे. काही लोकांना सतत घरात नवनवीन बदल करण्याची आवड असते. घराची सजावट करताना जितकं महत्त्वाचं फर्निचर आणि घराचा रंग असतो तितकंच महत्त्वाचे घरात लावलेले पडदेदेखील असतात. त्यामुळे घराचा लुक बदल्यासाठी प्रत्येकवेळी फार खर्चिक इंटेरिअरच करण्याची गरज असते असं नाही. कधी कधी तर फक्त घराचा रंग आणि पडदे बदलूनही तुम्ही घराला एक ‘युनिक’ लुक देऊ शकता. तुमचं घर लहान असो वा अगदी आलिशान... तुमच्या घरातील पडदे कसे आहेत यावरुन तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख ठरू शकते. कारण आपल्या आवडीनिवडी घराच्या सजावटीतून प्रतिबिंबीत होत असतात.
खरंतर साजेशा रंगसंगतीचे कोणतेही पडदे घराच्या सौदर्यांत भरच घालतात. सध्या बाजारात विविध रंगाचे आणि विविध कापडांचे पडदे उपलब्ध आहेत. कॉटन, लीनन, वेलवेट, सिल्क, हॅन्डलूम, नेट अशा विविध प्रकारच्या कापडाचे पडदे तुम्ही खरेदी करू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पडद्याच्या या कापडांची निवड करू शकता. मात्र सिल्क,नेट आणि वेलवेट असे प्रकार केवळ सणासुदीला अथवा एखाद्या खास कार्यक्रमांसाठी उठून दिसतात. कारण या नाजूक पडद्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे त्यांच्या मेंटेंनन्ससाठी खर्चही जास्त होतो. अशा पडद्यांना नेहमी ड्रायक्लीनच करावं लागतं. जाळीचे अथवा नेटचे पडदे इतर कोणत्याही प्रकारच्या पडद्यांसोबत उठून दिसू शकतात. नेटमध्ये बऱ्याचदा सफेद रंगाचे अथवा हलक्या रंगाचे पडदे कॉम्बिनेशन करुन लावता येतात. उष्ण प्रदेशात अथवा उन्हाळ्यात वाळ्याचे पडदेदेखील लावले जातात. वाळ्याच्या पडद्यांमुळे घरात थंडावा निर्माण होतो. शिवाय हे पडदे पर्यावरण पूरक असल्याने उष्णतेमुळे होणारा दाह यामुळे कमी होतो. ऑफिसमध्ये आजकाल रिमोट द्वारे नियंत्रित करण्यात येणारे पडदे वापरले जातात.
Also Read About नागपुर कशासाठी प्रसिद्ध आहे?
आजकाल दैनंदिन वापरासाठी कॉटन, हँडलूम अशा कापडातील पदडे वापरण्याचा ट्रेंड आहे. तुम्ही तुमच्या बेडशीट आणि कुशन अथवा घरातील इतर सजावटीच्या रंगसंगतीप्रमाणे या पडद्यांची निवड करू शकता. सुती कापडापासून तयार केलेल्या पडद्यांच्या मेंटनेन्ससाठी लागणारा खर्च कमी असतो. तुम्ही घरीदेखील हे पडदे स्वच्छ करू शकता. बऱ्याचदा पडदे माप देऊन शिवून घेतले जातात. मात्र सध्या बाजारात विशिष्ट मापाचे रेडीमेड पडदे उपलब्ध आहेत. रेडीमेड पडदे निवडताना खिडक्यांच्या आकारानुसार त्यांची निवड करावी. पाच इंच, सात इंच आणि नऊ इंच अशा तीन मापाचे तयार पडदे बाजारात मिळतात. तुमच्या घराच्या रंगसंगतीनुसार एक अथवा दोन रंगाचे पडदे कॉम्बिनेशन करुन तुम्ही वापरू शकता.
आजकाल घरातील प्रत्येक रुममध्ये वेगवेगळ्या प्रकारचा लुक देण्याची पद्धत आहे. घरातील माणसांच्या आवडीनुसार घरातील प्रत्येक रुमला रंग दिला जातो. त्यामुळे प्रत्येक रुममध्ये साजेशा रंगाचे पडदे लावावेत. तुमचं घर जर आलिशान अथवा अनेक मजल्यांचं असेल तर वरच्या मजल्यावर गडद रंगाचे पडदे लावावेत आणि तळघरातील रुम्सना हलक्या रंगाचे पडदे लावावेत. घरातील खिडक्या कोणत्या दिशेला आहे यावर तुम्ही कोणत्या रंगाचे पडदे लावावे हे अवलंबून असू शकतं. कारण जर घरात भरपूर सूर्यप्रकाश येत असेल तर गडद रंगाचे पडदे लावणं सोयीस्कर ठरू शकतं. जर घरात फर्निचर फार गडद रंगाचं असेल तर मात्र हलक्या रंगाचे पडदे लावावेत. घरातील भिंतीचा रंग गडद असेल तर त्या भिंतीवर फिकट रंगाचा पडदा अधिक खुलून दिसेल. लिव्हिंग रुमला शक्यतो फॉर्मल लुकचे पडदे लावावेत. जाळीचे पांढऱ्या रंगासोबत मॅच होणारे पडदे तुमच्या लिव्हिंग रुमला रॉयल लुक देऊ शकतात. बेडरुम्समध्ये फ्रेश ब्लु, सॉफ्ट यलो अशा कुल रंगाचे पडदे वापरावेत. लहान मुलांच्या रुममध्ये मात्र त्यांच्यातील सळसळती ऊर्जा दर्शवणारे ब्राईट कलरच वापरले तर अधिक चांगला लुक मिळू शकतो. पडद्यांच्या रंगाप्रमाणेच त्या पडद्यावरील डिझाईन्सदेखील खूप महत्त्वाच्या ठरतात. आजकाल मोठ्या आकाराच्या फुलांच्या डिझाईन्स आणि कॉन्स्ट्रास्ट रंगाच्या प्लेन पडद्यांच्या कॉम्बिनेशनला जास्त मागणी आहे. मात्र घर लहान असेल तर फार मोठ्या आकाराच्या डिझाईन्स वापरू नयेत. अशा वेळी नाजूक डिझाईन्समुळे घराचा आकार मोठा दिसू शकतो.
पडद्यांच्या रॉडमध्येदेखील अनेक प्रकार उपलब्ध असतात. सिल्व्हर, गोल्डन, ब्लॅक आणि कॉपर अशा रंगांमध्ये आणि विविध आकारांंमध्ये हे रॉड तुम्हाला मिळू शकतात. आजकाल पडद्यांना लावण्याचे विविध क्लच आणि डिझाईनर लेसेस देखील बाजारात उपलब्ध असतात. ज्यामुळे तुमच्या घराला रॉयल लुक नक्कीच मिळू शकतो.
आम्ही तुम्हाला हॅंडलूम आणि कॉटन मधील काही हटके रंग आणि ट्रेंडिग डिझाईन्स देत आहोत. ज्यामुळे तुम्ही कमी खर्चात घराला एक वेगळा लुक नक्कीच देऊ शकता.
आता हेच पहा या पडद्यामुळे तुमच्या लिव्हिंग रुमला अगदी युनिक लुक मिळेल. पांढऱ्या पडद्यावर दोन प्रकारच्या डिझाईन आहेत ज्या ऑरेंज चेक्सच्या या पडद्यासोबत अगदी खुलून दिसत आहेत.
जर तुम्हाला बेडरुममध्ये उठून दिसेल असा पिवळा रंग हवा असेल तर पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचे दोन्ही कॉम्बिनेशन अगदी उत्तम ठरतील. या दोन्ही पडद्यांसाठी कॉटन फॅब्रिक वापरण्यात आलं आहे.
जर तुम्हाला गडद रंग आणि पांढऱ्यां रंगाचं कॉम्बिनेशन आवडत असेल तर यासाठी मरुन आणि जांभळ्या रंगाला मॅच करणारे हे काही पडदे तुमच्या घराचा लुक नक्कीच बदलतील.
निळा रंग डोळ्यांना आल्हाददायक वाटतो. दैनंदिन धकाधकीतून घरी आल्यावर हा कुल रंग तुम्हाला निवांतपणा देऊ शकतो. त्यामुळे तुमच्या बेडरुमला या निळ्या चेक्स आणि पांढऱ्या पडद्याच्या रंगसंगतीने अगदी हटके लुक मिळू शकतो.
राखाडी आणि पांढऱ्या रंगाच्या या रंगसंगतीचा वापर तुम्ही घरात अथवा ऑफिसमध्ये नक्कीच करु शकता. ज्यांना फार गडद रंग आवडत नाहीत त्यांना या रंगामुळे घरात वेगळा लुक नक्कीच आणता येईल.
ज्यांना डिझाईनमध्ये वेगळेपणा हवा असेल त्यांच्यासाठी हा स्प्रिंग लीफ डिझाईनचा एक हटके लुक असलेला पडदा देखील नक्कीच आवडू शकेल.
निसर्गप्रेमींना घरात नेहमी निसर्गाच्या रंगाशी मिळते जुळता लुक असावा असं वाटत असतं. तुम्हीदेखील पर्यावरण प्रेमी असाल तर हे हिरव्या रंगांच्या छटा असलेले पडदे तुम्हाला नक्कीच आवडतील.
पडद्यांची योग्य काळजी घेण्यासाठी ते ड्रायक्लीन करणं हाच उत्तम उपाय आहे. कारण त्यामुळे पडद्यांंचा रंग आणि कापड खराब होत नाही. मात्र जर तुम्हाला पडदे घरीच स्वच्छ करायचे असतील तर त्यासाठी आधी थोडं पाणी घेऊन पडद्याचा एखादा थोडासा भाग स्वच्छ करुन पहा. जर तो खराब नाही झाला तर तुम्ही तो पडदा घरी नक्कीच धुवू शकता. तुम्हाला पडदे वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ करायचे असतील तर अगदी सौम्य साबण अथवा शॅम्पूचा वापर करा. धुण्यापूर्वी पडद्यांच्या रॉडमध्ये घालायच्या रींग एका कापडामध्ये गुंडांळुन एकत्र बांधून ठेवा. कारण बऱ्याचदा या रींग प्लास्टिकच्या असतात वॉशिंग मशीनमध्ये पडदा धुताना त्या एकमेंकांवर आपटून तुटण्याची शक्यता असते. पडदे धुतल्यानंतर त्यांना इस्त्री करा म्हणजे ते पुन्हा पूर्वीप्रमाणे दिसू शकतात. शिवाय वरचेवर व्हॅक्युम क्लीनरने पडदे स्वच्छ केल्यास ते लवकर खराब होत नाहीत.
पडदा हा घराचं सौंदर्य वाढवण्याचा एक भाग आहे. तुम्ही बाहेरून जसे तुमच्या आवडीचे पडदे आणता तसेच तुम्हाला वेळ असल्यास, तुम्ही घरच्या घरीदेखील जुन्या साड्यांचे पडदे तयार करू शकता. यासाठी तुमच्या कॉटन आणि इरकलच्या साड्यांचा यासाठी वापर करा. असे पडदे घरच्या घरी धुण्यास उपयुक्त तर ठरतातच शिवाय खर्चाच्या दृष्टीनेही परवडण्यासारखं असतं. अशा विविध क्लृप्ती आणि रंगसंगती वापरून तुम्ही पडद्यांच्या सहाय्याने तुमचं घर सजवू शकता.
अधिक वाचाः
वास्तुशास्त्रानुसार घरात असावेत हे पाळीव प्राणी (Pets For Home In Marathi)
उशांमुळे घराला आणा वेगळा ‘लुक’
चूकून ही तुमच्या बेडजवळ ‘ह्या’ वस्तू ठेऊ नका, होऊ शकतं नुकसान
रांगोळीचे विविध प्रकार आणि सोप्या डिझाईन्स (Simple Rangoli Designs In Marathi)
फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम