हलव्याच्या गोड दागिन्यांनी करा यंदाची संक्रात अधिक गोड in Marathi | POPxo

हलव्याच्या गोड दागिन्यांनी करा यंदाची संक्रात अधिक गोड

हलव्याच्या गोड दागिन्यांनी करा यंदाची संक्रात अधिक गोड

नव्या वर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रात. तिळाचे लाडू आणि साखर फुटाणे वाटून ‘तिळगूळ घ्या गोड- गोड बोला’ असे सांगत वर्षाची सुरुवात आपण हा सण साजरा करुन गोड करत असतो. तिळाच्या लाडूसोबतच या सणाची खासियत म्हणजे 'हलव्याचे दागिने'. या दिवशी हलव्याचे सुंदर दागिने घालण्याची पद्धत आहे. दागिने घालण्याची ही पद्धत जरी पारंपरिक असली तरीसुद्धा यातही कालपरत्वे बदल होत गेले आहेत. म्हणजे जर तुम्हाला आठवत असेल तर आधी साध्या पुठ्ठ्यावर सोनेरी रंगाचा कागद लावून त्यावर साखर फुटाणे चिकटवले जायचे. ते ही दागिने सुंदरच होते म्हणा. पण आता हे दागिनेही आता ट्रेंडी झाले आहेत. गेल्या ३ ते ४ वर्षांपासून या दागिन्यांमध्ये अधिक कला-कुसर पाहायला मिळत आहे. जर तुम्ही अजून हे नवीन हलव्याचे दागिने वापरुन पाहिले नसतील किंवा हलव्याचे दागिने घालून फोटो काढायची तुमची हौस राहून गेली असेल तर हे नवे हलव्याचे दागिने तुम्हाला नक्की आवडतील.


 खरंतरं लग्नानंतरच्या पहिल्या मकरसंक्रांतीला जोडप्याला  हलव्याचे दागिने घातले जातात. काळ्या कपड्यांवर हलव्याचे हे सुंदर दागिने अधिक खुलून दिसतात.या मकरसंक्रातीला तुम्हाला काळी साडी नेसायची असेल तर येथे पाहा साडीचे १८ प्रकार. घरी पाहुण्यांना बोलावून नवीन जोडप्याला ओवाळले जाते.  शिवाय लहान मुलांना या दिवसात बोरन्हाणाला घातले जाते. त्यावेळी या चिमुकल्यांना देखील हलव्याचे दागिने घातले जातात. मग बघुयात यंदा काय नवा ट्रेंड आहे.


कंठी शोभे माळ…


पारंपरिक दागिन्यांची फॅशन पुन्हा परतली आहे. त्यामुळे चिचंपेटी, ठुशी, शाही हार,मोहन माळ, बोर हार असे बाजारात सर्रास पाहायला मिळतात. या दागिन्यांवरील कलाकुसर सोन्यांच्या दागिन्यांना मागे टाकेल अशी असते. साखर फुटाण्यांना अगदी सोन्याच्या दागिन्यांप्रमाणे रंग देऊन लहान मोठ्या साखर फुटाण्यांची गुंफण करुन हे दागिने तयार केले जातात. पारंपरिक दागिन्यांना थोडासा नव्या ट्रेंडप्रमाणे टच दिलेले शाहीहार यात यात आहेत. ३ ते ४ पदर असलेला असलेला हार अधिक खुलून दिसण्यासाठी त्यावर प्लास्टिकची रंगीत फुले, साखरेपासून तयार केलेली फुले आणि अगदी इमिटेशन दागिन्यांवर असलेले डिटेलिंग साखर फुटाण्यांपासूनच तयार केली जाते. त्यामुळे हे हार लक्ष वेधून घेतात.आता राहिला प्रश्न या दागिन्यांच्या किमतीचा तर हे दागिने ५०० रुपयांपासून पुढे असतात. तुम्ही जितके डिटेलिंग केलेले दागिने घ्यायला जाल तशा या दागिन्यांच्या किंमती वाढत जातात. पुरुषांना देखील हलव्याचे दागिने घातले जातात. पुरुषांसाठीही वेगवेगळ्या प्रकारचे हार आहेत जे त्यांच्या काळ्या शर्ट किंवा कुर्त्यावर चांगले दिसतात.


halvyache dagine set


सौभाग्याचे लेणं


हलव्याच्या दागिन्यांमधील मंगळसुत्रेही यंदा अनेक व्हरायटीमध्ये आहेत. साधारणत: या सणासाठी  हलव्यापासून तयार केलेले मोठे मंगळसुत्र घातले जाते. त्यामुळे साधारण ते दोन सरींचे असते. जसं हारांच्या बाबतीत आहे. अगदी तसं मंगळसुत्रांच्या बाबतीत देखील आहे. साखर फुटाण्यांना काळा रंग देऊन काळे मणी तयार केले जातात आणि मग ते गुंफले जातात. मराठी मालिकांमध्ये नायिका जशी मंगळसुत्रे वापरतात. त्यानुसार यामधील ट्रेंड बदलत असतात. तीन पदरी मंगळसुत्रे ही अजूनही बाजारात आहेत यामध्ये यंदा आणखी बारीक काम केलेले पाहायला मिळत आहे. या शिवाय एक सरीचे किंवा दोन सरीचे मंगळसुत्र आणि त्याला वाट्या किंवा अन्य डिझाईन्सचे पेंडट पाहायला मिळत आहे. मंगळसुत्रासोबत आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे नथ.. मासोळी नथ, पारंपरिक नथ यंदा बाजारात सहज उपलब्ध आहेत. अगदी तुम्हाला हव्या त्या आकारात त्या अनेक ठिकाणी बनवून देखील दिल्या जातात. नथ अगदीच बारीक काम असल्यामुळे त्यांच्या किंमती तुलनेने अधिक आहेत. छोटीशी नथ ही १०० रुपयांपासून पुढे आहे.


कमरपट्टा, बांगड्या, बाजूबंद


तुमच्या हलव्यांच्या दागिन्यांना अधिक उठावदार बनवण्याचे काम करणारे इतर दागिने म्हणजे कमरपट्टा, बांगड्या आणि बाजूबंद. पूर्वी  कमरपट्टा आणि बाजूबंद जाडजूड असायचे पण आता अगदी नाजूक असे कमरपट्टे आणि बाजूबंद बाजारात आहेत. तुम्हाला रंगीत साखर फुटाण्यांमधील कमरपट्टा आणि बाजूबंद मिळू शकतात. जर तुम्हाला बांगड्या हव्या असतील. तर त्यातही साखर फुटाण्यांची एक सर लावून तयार केलेल्या बांगड्या मिळतील. शिवाय यात तोडे, कडे असे प्रकार आहेत ते वापरुन पाहायला हरकत नाही.


 हे देखील नक्की ट्राय करा


हे सगळे झाले पारंपरिक दागिने. पण दागिन्यांसोबत तुम्हाला अधिक फॅशनेबल बनवण्यासाठी छल्ला, मेखला, मांग टिक्का असेही काही प्रकार आहेत. काही गोष्टी तर तुम्हाला दुकानदारांनी तयार केलेल्या सेटमध्येच मिळून जातील.या शिवाय जर तुम्ही काळ्या रंगाचे इंडो वेस्टर्न आऊटफिट घालणार असाल तर झुमके,ब्रेसलेट, लांब माळा असे काही पर्याय देखील आहे. तेव्हा हे प्रकारही  नक्की ट्राय करुन पाहा.


zhumka
लहान मुलांसाठी गोड- गोड दागिने


लहान मुलांसाठी असलेले हलव्यांचे दागिनेही आता अधिक ट्रेंडी झाले आहेत. मुलांसाठी साधारणत: कृष्ण सेट बाजारात असतो. यात मुकुट, हार, बाजूबंद, कडे, कमरपट्टा, पायात वाळा असे प्रकार असतात. यातही वेगवेगळ्या कलाकुसर केलेल्या पाहायला मिळतील. यांची किंमत साधारणपणे ३५० रुपयांपासून पुढे आहे. तर मुलींसाठी वेगवेगळे पर्याय आहेत. गळ्यातील माळेपासून ते कानातल्यांचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत.