साडी कितीही जुनी झाली तरी ती फेकून द्यायची इच्छा कोणालाच नसते. म्हणजे एखादी साडी आता काढून टाकायची असा विचार आपल्या आईने जरी केला तरी किमान ४ ते ५ महिने ती साडी आई पुन्हा एकदा कपाटात जपून ठेवते. प्रत्येक साडीशी महिलांच्या आठवणी जोडलेल्या असतात. पण त्याच साडींना जर पुन्हा नवा लुक देता आला तर ? हो आता त्यासाठी या साड्या फाडाव्या लागतील. पण हमखास ही साडी पुन्हा काही वर्ष का असेना नव्या रुपात वापरली जाईल. जर तुमच्या कपाटातही महाग आणि आवडीच्या साड्या असतील तर त्यांना बाहेर काढा आणि आम्ही दाखवलेल्या काही लेटेस्ट फॅशनपैकी ड्रेस शिवा आणि या नव्या ड्रेससोबत #sareereused म्हणत एक छान फोटो काढा.
साडीपासून शिवलेला हा प्रकार एकदम छान आहे. ज्यांना शॉर्ट ड्रेस घालण्याची हौस असेल त्यांना जुन्या साडीतून शिवण्यासारखा हा चांगला पर्याय आहे. अशा पॅटर्नचा ड्रेस बनवण्यासाठी तुम्हाला कॉटन सिल्क मटेरिअलमधल्या मोठ्या काठाची साडी लागेल. आता या दाखवलेल्या पॅटर्नप्रमाणे बाह्या मोठ्या, फ्रंटला राऊंडनेक आणि मागे राऊंड डिपनेक आणि पोठली वर्क करु शकता. हा पॅटर्न शिवायला सोपा आहे. याला थोडा घेर देण्यासाठी कंबरेपासून खाली असलेल्या भागाला जास्त चुण्या ठेवण्यास सांगा. जर तुम्हाला बॉक्स प्लेटस आवडत असतील तर त्यात व्हरायटीही आणू शकता.
टीप- मोठ्या काठाच्या साड्या कांजीवरम प्रकारांमध्ये अधिक असतात असा ड्रेस शिवायचे ठरवत असाल तर साडी प्लेन हवी. आणि समजा घरात प्लेन साडी असल्यास तुम्ही काठ विकत आणूनही हा प्रकार शिवू शकता. एका साडीत एक फुल साईज आणि लहान मुलीचा ड्रेस सहज होऊ शकतो.
सध्या मिडी ड्रेसची चलती आहे. ऑफिस किंवा इतरवेळी कोणत्याही समारंभात हे मिडी ड्रेस चांगले दिसतात. त्याहीपेक्षा ते अधिक कम्फर्टेबल असतात. जर तुमच्याकडे कॉटनमटेरिअलच्या साड्या असतील तर त्यापासून असे ड्रेस बनवता येऊ शकतात. या ड्रेसची आणखी एक खासियत अशी की,याला खिसे शिवता येऊ शकतात.त्यामुळेही त्याला वेगळा लुक येतो शिवाय हा ड्रेस अगदीच ट्रेडिशन वाटत नाही.
मराठीत नौवारी साडीचे प्रकारही वाचा
टीप- अशा प्रकारच्या मिडी ड्रेसवर ऑक्साईडचे कानातले किंवा गळ्यातले चांगले दिसतात. त्यामुळे असे ड्रेस शिवल्यानंतर त्यावर अशाच पद्धतीची ज्वेलरी घाला.
वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांपासून वेगवेगळ्या पद्धतीचे गाऊन बनवता येऊ शकतात. लग्न समारंभात अगदी टिपिकल गाऊन घालायचा कंटाळा आला असेल तर साड्यांपासून गाऊन तयार करुन पाहाच छान दिसतात. पैठणी, इरकल,पेशवाई अशा कोणत्याही साड्यांपासून ते तयार होतात. पैठणीचा गाऊन शिवायचा विचार करत असाल तर पैठणीची खरी ओळख असते तिचा पदर. कारण तिच्यावर जरतारीचा मोर असतो. त्याचा योग्य वापर करुन तुम्हाला गाऊनचा पॅटर्न तयार करता येऊ शकतो. खाली दाखवलेला अगदी साध्या पद्धतीचा गाऊन आहे.
असा सारखा प्रकार तुम्हाला इरकल,मधुराई कॉटन/ सिल्क किंवा पेशवाई साड्यांमध्येदेखील शिवता येईल.
आता एखाद्या साडीचा पदर जर चोळीवर घेण्यासारखा नसेल तर मग तो हातासाठीही तुम्ही वापरु शकता. तसा हात शिवत असाल तर तुमचा उरलेला ड्रेस हा प्लेन होईल त्यानुसार साड्या निवडा.
आता कित्येक जणींच्या कपाटात भरलेल्या साड्या असतील. विशेषत:एक तरी बनारसी साडी प्रत्येकाकडे असते. जर तुमच्याकडे जड बनारसी साडी असेल तर त्याचा पार्टी गाऊन उत्तम होऊ शकतो. कोल्ड शोल्डर किंवा ऑफ शोल्डर आणि घेरदार असे गाऊन तुम्ही त्यापासून शिवू शकता. आता ही साडी जितकी वजनदार असेल तितकी तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागेल. यासाडीपासून गाऊन शिवताना आत अस्तर चांगल्या प्रतीचे वापरा जर तुम्हाला अधिक घोळ हवा असेल तर आत वेगळे अस्तर मिळते. जो ड्रेसच्या घेरचा आकार अधिक खुलवते.
हल्ली सर्रास लग्नसमारंभात आवर्जून आणि आवडीने घातला जाणारा प्रकार लेहंगा चोळी. तुम्ही जितके पाहाल तितके पॅटर्न तुम्हाला यात मिळू शकतात. पण घरी असलेली एखादी जुन्या पण गडद आणि उठावदार साडी तुम्ही यासाठी निवडा. कारण तरच तुम्ही दिलेल्या भल्या मोठ्या शिलाईला न्याय मिळेल. आता पॅटर्नचा विचार कराल तर आता इतके पॅटर्न्स तुम्हाला लेहंगा चोळीमध्ये मिळतात की विचारता सोय नाही.जर तुम्ही साडीचा लेहंगा शिवणार असाल तर त्यातील एखादा ब्राईट कलर निवडून प्लेन कापडाची चोळी शिवा. थोडा लेटेस्ट टच येण्यासाठी तुम्ही ऑफ शोल्डर, सिंग्लेट, बॅकलेस अशा पद्धतीचे ब्लाऊज शिवू शकता.
टॅटू काढायचा आहे मग तुम्हाला हे माहीत हवं
सारा अली खानच्या केदारनाथ सिनेमामुळे गराऱ्याची फॅशन पुन्हा एकदा आली. आता तुमच्या कपाटात एखादी छान जॉर्जेटची साडी असेल तर तिचा उपयोग अशा प्रकारे गरारा शिवण्यासाठी होऊ शकतो. आपण आतापर्यंत सिल्क, पेशवाई, बनारसी अशा काही साड्या पाहिल्या पण आता हा प्रकार तुमच्या जॉर्जेटच्या साडीपासून बनवण्यासारखा आहे यातही तुम्ही तुमचा टॉप वेगळ्या मटेरिअलमध्ये तर गरारा आणि त्याची ओढणी तुम्ही जॉर्जेटमध्ये शिवू शकता. आता जर तुमच्या कडे नेटच्या साड्या असतील तर त्याचाही गरारा उत्तम होऊ शकतो.
सिगरेट पँटस किंवा स्ट्रेट फिट पँटस तुम्हाला आवडत असेल तर सिल्क साडयांपासून बनवलेल्या सिगरेट पँटस चांगल्या दिसतात. प्लेन कुडती आणि त्यावर स्ट्रेट फिट पँट चांगल्या दिसू शकतात. आता साडीपासून बनवताना मेहनतही आहेच. पदरावरील डीझाईन्स तुम्हाला आवडली असेल आणि तिचा उपयोग कसा करायचा ते देखील कळायला हवे. जर प्रिटेंट पँटस असतील तर कुडता प्लेन असावा इतके भान ठेवा.
सध्या फ्युजनचा काळ आहे. पारंपरिक कपड्यांना थोडा वेस्टर्न टच दिला तर तो पॅटर्नही तितकाच हटके वाटतो. असे काही पॅटर्न आहेत जे तुमच्या साध्या साडीलाही रॉयल लुक देऊ शकतात.
अघळपघळ पण तितकाच क्लासी दिसणारा हा ड्रेसचा प्रकार. तुम्ही तुमच्याकडे असलेल्या लिनन साडीपासून शिवू शकता.प्लेन लिननची साडी असेल तर त्यावर एखादे प्रिटेंट जॅकेट शिवा. लग्नसमारंभात, रिशेप्शन पार्टीला तुमचा ड्रेस अगदीच उठून दिसेल.
धोती पँटस तुम्ही कधीच ट्राय केली नसेल तर आता करा. कॉटन लिनन,आर्टिफिशल सिल्क मटेरिअलच्या साड्यांमध्ये असा एखादा पॅटर्न तुम्हाला शिवता येईल. यावर शॉर्ट ब्लाऊज आणि वर एखादे नेटेट जॅकेट शिवले की, तुम्ही पार्टीसाठी एकदम रेडी!
आता हा प्रकार तसा नवीन नाही. पण तुम्ही साडीचा शिवताना नवा लुक देऊ शकता. साडीचा प्लेन भाग वापरुन गाऊन शिवा.आणि पदराकडील भाग अशा पद्धतीने पुढील भागावर पदरासारखा लावून घ्या. या ड्रेससाठी फिटींगही महत्वाची गोष्ट आहे. या पॅटर्न व्यतिरिक्त तुम्ही ऑफ शोल्डर, कोल्ड स्लिव्हज अशी काही व्हरायटी ठेऊनही हा प्रकार शिवू शकता.
मालिकांमुळे प्रसिद्ध झालेल्या मंगळसूत्राच्या डीझाईन्स
जॅकेटस ही अशी गोष्ट आहे की, मुलींकडे कितीही असली तरी ती हवीच असते. साडीच्या काठाचा उपयोग करुन एखाद्या साध्या जॅकेटला तुम्हाला वेगळा लुक देता येऊ शकतो. जर तुम्हाला ड्रेस किंवा लेहंगा शिवण्याची इच्छा नसेल तर अशा साड्यांचे लांब जॅकेटस शिवा जे तुम्हाला स्ट्रेट फिट पँटसवर घालता येतील.
अत्यंत महत्वाची गोष्ट - प्रत्येक पॅटर्न तुमच्या मनाप्रमाणे हवा असा वाटत असेल तर ते शिवण्यायोग्य टेलर आधी शोधा. वर दाखवलेल्या पॅटर्नवरुन तुम्हाला तुमच्या काही क्रिएटिव्ह आयडियाज लावायच्या आहेत. काही ठिकाणी तुम्ही गळ्यामध्ये व्हरायटी आणा. स्टँड काॅलर, डीप नेक,डोरी असे काही एक्सपेरीमेंट करायला काहीच हरकत नाही.
फोटो सौजन्य- Instagram