ADVERTISEMENT
home / मनोरंजन
शिळ्या नोटबंदीला दिलेली फोडणी म्हणजे ‘नशीबवान’

शिळ्या नोटबंदीला दिलेली फोडणी म्हणजे ‘नशीबवान’

पैशाची हाव कोणाला नसते? पैसा मिळाला तर त्याच काय करु आणि काय नको असं होऊन जातं. त्यात ज्यांनी पैसा पाहिलाच नाही अशा लोकांना जर घबाड सापडलं तर काय होईल? याचा कधी विचार केला आहे का? हे सगळं दाखवणाराच हा ‘नशीबवान’ हा सिनेमा आहे.

नशीबवान थोडक्यात…

सिनेमात बबन (भाऊ कदम) महापालिकेत काम करणारा सफाई कामगार आहे. पत्नी, मुलगा, मुलगी असा त्यांचा छोटासा परिवार मुंबईच्या उपनगरीय भागात झोपडीवजा घरात राहतो. सफाई काम करुन मिळालेल्या पगारात तो कसाबसा घर चालवत आहे. घर चालवण्यासाठी बबनची बायको गीता (मिताली जगताप- वराडकर) घरकाम करते. महिनाभर काम करुनही दोघांच्या हातात शिल्लक असे काहीच नसते. शिवाय सफाई कामगाराला म्हणावा तसा आदर समाज देत नाहीच हे  दु:ख सिनेमात दाखवण्यात आले आहे. अपूरा पगार, प्रतिष्ठा नसलेली नोकरी या सगळ्यात घराचा गाडा हाकायचा कसा ? असा या दोघांना कायमच पडलेला प्रश्न. पण एकदा असं काही घडतं की, बबनचे आयुष्यच पलटून जातं. त्याच्या हाती पैशाची खाणचं लागते. काम करत असताना खराट्यातील काड्या एकत्र करण्यासाठी ती झाडू तो भिंतीवर आपटतो तो काय त्याला दिसतात १००० आणि ५००च्या नोटांचा एक मोठा डोंगर. इतके पैसे पाहून पैशाची हाव कोणाला आवरली जाईल म्हणा. कुटुंबांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तो त्यातील पैसा घेतो आणि बायको- मुलांना इतर लोकांना मिळणारा आनंद देतो. बबनची बायको आलेल्याय या आनंदाच्या क्षणांमुळे खुश तर होते. पण घरात सतत येणारा पैसा तिची चिंता वाढवू लागतो. पैसा आल्यावर कसली चिंता असे म्हणत बबन रोज अलिबाबाच्या त्या गुहेतून पैसा आणत राहतो. बबनची हुशार बायको मात्र या संधीचे सोने करुन आधी काही जबाबदाऱ्यातून मुक्त होते. सिनेमाचा इंटरवल आधीचा भाग अगदीच सिनेमाप्रमाणे ‘नशीबवान’ वाटतो. पण दुसऱ्या क्षणी मनात आता काय होईल? याचा शोध घेण्याची उत्सुकता वाढवतो. 

बबन रोज पैसा आणत राहतो.त्या पैशांमुळे एका रात्रीत त्यांचे राहाणीमान बदलून जाते. खाकी कपडे घालून कचऱ्याची गाडी ओढणारा निरागस बबन मागे पडू लागतो. आता गळ्यात सोन्याची चेन, हातात ब्रेसलेट आणि अंगठी चेहऱ्यावर पैशाचे तेज दिसू लागते. पण बायकोच्या मनात सतत चिंता सतावत असते की हे पैसे आपलेच आहेत ना? आणि ती रास्त असते. पण बबनला दिसत असतो फक्त पैसा.. एरव्ही देशी गुत्त्यावर इतर सफाई कामगार मित्रांसोबत दारु प्यायला बसणारा बबन तो पर्यंत बबन शेठ होतो.. आता तो मित्रांसोबत बसण्यापेक्षा डान्सबारमध्ये जाणे पसंत करु लागतो. बायकोच्या मागणीनुसार चाळीतील एका खोलीचे घर दोन खोल्यांचे होते. इतरांकडे असलेल्या बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे येतात. पण त्यांच्या कुटुंबातील मायेचा ओलावा मात्र कमी होऊ लागतो. मेहनत न करता मिळवलेल्या पैशातून चांगले काही करण्यापेक्षा तो पैसा खर्च करण्याकडे बबनचा अधिक ओढा असतो. तर गीताच्या मुलांच्या भवितव्यासाठी पैसा गुंतवून ठेवण्याकडे अधिक कल  असतो. त्यामुळे या दोघांमध्ये दुरावा येऊ लागतो. पैशांच्या नादाला लागून अनेक व्यसने बबनला लागतात. या दोघांमधील संवाद संपतो. घरातील कपाटात पैशांशिवाय दुसरे काहीच राहत नाही. या कुटुंबाच्या कहाणीत रेश्मा (नेहा जोशी) देखील आहे. चाळीत राहणारी रेश्मा साधारण पंचवीशीतीली मुलगी. एका मुलावर जीवापाड प्रेम करणारी त्याच्यासाठी सगळं काही करायला तयार असणारी. तिच्या प्रियकराला समस्येतून काढण्यासाठी ती बबनची मदत घेते. पण बबनच्या मनात तिच्याविषयी वेगळ्याच भावना निर्माण होतात. त्यामुळे बायकोपासूनही तो दुरावला जातो. पण या पैशाची मजा ती कितीवेळ राहणार नाही का? हाच सिनेमाचा ट्विस्ट आहे. पोलिसांना बबनला हाती लागलेल्या घबाडाची माहिती झाल्यानंतर पोलीस इन्स्पेक्टर धनंजय जाधव (राजेश श्रृगांरपुरे) बबनचा तपास घेतात आणि त्याच्या अलिबाबाच्या गुहेचे रहस्य , रहस्य राहात नाही तर ते आता रेश्मा आणि धनंजय दोघांना कळते. पैशाची बॅग भरुन रेश्मासोबत मजा करण्याचे स्वप्न पाहणारा बबन पूर्वीचा बबन झालेला असतो. कारण त्याच्याकडे काहीच पैसे उरत नाही.तशाच अवस्थेत घरी परतल्यानंतर घरातल्या तिजोरीत ठेवलेला पैसाही गायब असतो. पैसे नाहीत म्हटल्यावर चवताळलेला बबन बायकोचा शोध घेण्यासाठी गावी जातो ते पैसा कुठे गेला याचा जाब विचारण्यासाठी पण तो पोहोचण्याआधीच बायकोने पैशाची योग्य ती गुंतवणूक करुन ठेवलेली असते. वडिलांचे बदलते स्वरुप पाहून मुलेही बबनपासून दुरावतात. त्यामुळे आहे त्या मध्ये समाधान मानणारे एक सुखी कुटुंब पैशामुळे उद्धवस्त झाले याची प्रचिती येते. हा असा सगळा सिनेमा सुरु असताना दाखवण्यात आलेल्या ५०० आणि १००० च्या नोटा म्हणजे नोटबंदीचे यात काही आहे का? असे संकेत देऊन जातो आणि मग काय शेवट नोटाबंदीच्या निर्णयाने होतो ज्याचा फटका बबनला नाही पण पोलीस इन्स्पेक्टर धनंजय जाधवला बसतो. तो कसा यासाठी तुम्हाला सिनेमाच पाहायला हवा.

ADVERTISEMENT

 सफाई कामगारांच्या वेदना नाहीच

भाऊ कदम यांनी सफाई कामगाराचे काम केले म्हणजे सिनेमा या कामगारांच्या आयुष्यातील काही गोष्टी अधोरेखित करणारा आहे, असे वाटते. पण गरिबी वगळता त्यांच्या इतर समस्या यात दाखवण्यात आल्या नाहीत. क्लीन-अपचे कपडे घातलेला बबन महापालिकेत कामाला आहे आणि पैसा आल्यानंतर तो त्याच्या जागी दुसऱ्या कामगाराला कामासाठी ठेवतो. म्हणजेच या विभागात होणारा भ्रष्टाचार दाखवण्याचा प्रयत्न होतो. पण त्यांच्या कामाची अधिक माहिती लोकांपर्यंत जात नाही. कारण सिनेमाचे कथानक हे केवळ सापडलेल्या काळ्या पैशाभोवती फिरत राहते.  शिवाय बबनची साईबाबांवर असलेली निस्सिम श्रद्धाच त्याला मोठ्या संकटातून वाचवते हे देखील सिनेमात दाखवण्यात आले आहे.

सिनेमा का पाहावा?

सिनेमाच्या जमेची बाजू या सिनेमातील कलाकारांचा अभिनय आहे. भाऊ कदम यांच्या अभिनयाची चुणूक आधीही पाहिली आहे. टाईमपास, जाऊ द्याना बाळासाहेब, हाफतिकिट, वाजलचं पाहिजे, बॉईज, मिसमॅच, सायकल अशा दमदार सिनेमातून भाऊ कदमने आधीही काम केले आहे. सहकलाकारांच्या भूमिकाही त्यांच्या जागी योग्य असल्यामुळे अभिनय ही सिनेमाच्या जमेची बाजू आहे. शिवाय दिग्दर्शनामुळे सिनेमात शेवट काय होणार ही उत्सुकता तशीच राहते. शिवाय तुम्ही आनंद शिंदेच्या गाण्याचे फॅन असाल तर ‘ब्लडी फूल’ हे गाणं देखील अगदी मस्त जमलं आहे. तुमच्या अधिक माहितीसाठी हा सिनेमा लेखक उदय प्रकाश यांच्या ‘दिल्ली की दिवार’ या पुस्तकावर आधारित आहे.

ADVERTISEMENT

सिनेमा का पाहू नये?

८ नोव्हेंबर २०१६ हा दिवस कोणीच विसरु शकत नाही. या दिवशी देशात नोटबंदी करण्यात आली. नोटबंदीची ही घोषणा करणाऱ्या पंतप्रधानांचे भाषणही सगळ्यांच्या लक्षात आहे. ते पुन्हा पाहायचे नसेल तर हा सिनेमा नक्कीच पाहू नका.. विनोदाचा भाग. पण सिनेमातील काही गोष्टी अगदीच खटकतात. इतका पैसा आणला कुठून ? हा प्रश्न कधीच कोणाला पडत नाही. त्या पैशांसाठी बबन काय काम करतो ? हे देखील कोणी जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही. खऱ्या आयुष्यात असे घडत नाही त्यामुळे काही गोष्टी नक्कीच खटकतात. शिवाय विषय नोटाबंदीकडे घसरल्यामुळे सिनेमा संपताना अरेरे! हा शेवट कशाला ?असे वाटते. पण बबनला नशीबवान करण्यात साईबाबांपेक्षा तिच्या बायकोच्या हुशारीचा हात असतो. ती हुशारी पाहण्यासाठी सिनेमा नक्की पाहावा.

चित्रपट- नशीबवान

कथा- उदय प्रकाश लिखित ‘दिल्ली की दिवार’

ADVERTISEMENT

पटकथा,संवाद, छायाचित्रण आणि दिग्दर्शन-  अमोल वसंत गोळे

कलाकार- भालचंद्र (भाऊ) कदम, मिताली जगताप वराडकर, नेहा जोशी

निर्माते- अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील

निर्मिती संस्था- फ्लाईंग गॉड फिल्मस आणि गिरी मीडिया फॅक्टरी

ADVERTISEMENT

 

10 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT