सर्वांसाठी सर्व काही असलेला ग्लोबल कोकण महोत्सव

सर्वांसाठी सर्व काही असलेला ग्लोबल कोकण महोत्सव

येवा कोकण आपलाच असा, हे ब्रीदवाक्य खरं करणारा ग्लोबल कोकण महोत्सव तुमच्या वीकेंड प्लॅनसाठी आयडियल आहे. कोकण संस्कृती, स्वादिष्ट खाद्यजत्रा, लोककला, पर्यटन आणि उद्योग असा सर्वांसाठी सर्व काही असलेला ग्लोबल कोकण महोत्सव सध्या गोरेगावमध्ये सूरू आहे. जर वीकेंडसाठी तुमचा काही प्लान ठरला नसेल तर कोकणची चव चाखण्यासाठी आणि कोकण संस्कृती जवळून पाहण्यासाठी तुम्ही या महोत्सवाला भेट द्या.    


ग्लोबल कोकण महोत्सवातील प्रमुख आकर्षण


पर्यटन प्रदर्शन, कृषी प्रदर्शन, मत्स्य महोत्सव
कला दालन, कोकण खजिना दालन, मेक इन कोकण, व्यवसाय मार्गदर्शन
कोकण फूड फेस्टीव्हल आणि लोककला महोत्सव


विविध प्रदर्शन, कला दालन आणि मत्स्य महोत्सव


global-kokan-3


जर या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही कोकणात जायचा प्लॅन करत असाल तर या महोत्सवात कोकणातील विविध पर्यटनस्थळांची माहीती देणारे अनेक स्टॉल्स आहेत. ज्यामध्ये फोटोज आणि व्हीडीओजच्या माध्यमातून कोकणातील पर्यटन सुविधांची माहीती देण्यात येतेय. 720 किमी पसरलेल्या कोकणच्या सागर संपत्तींचे प्रदर्शनही इथे भरवण्यात आले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविणाऱ्या कोकणातील कलाकारांच्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतींचे प्रदर्शन इथे पाहता येईल


शॉपिंग आणि बरंच काही


global-kokan-4


शॉपिंग आणि कोकणप्रेमींसाठी इथे खास कोकण खजिना दालन आहे. या दालनातील स्टॉल्स खास नारळाच्या झावळ्यांनी सजवण्यात आले आहेत.


global-kokan-1


ज्यामध्ये फळांचा राजा आंबा आणि त्यापासून बनवलेले विविध पदार्थ, कोकम, सेंद्रीय उत्पादन (तांदूळाचे विविध प्रकार, विविध डाळी), कोकणचा मेवा काजू आणि काजूपासून बनविलेले विविध प्रकार (फ्लेवर्ड काजू, काजू चॉकलेट), आंबा आणि माश्याचं लोणची, चटण्या, खास कोकणात उत्पादन होणारे कच्चे मसाले इथे रास्त दरात उपलब्ध आहेत.


कोकण फूड फेस्टीवलमुळे खवय्यांची चंगळ


कोकण म्हंटल्यावर जीभेवर चव येते ती इथल्या माश्यांची. तुम्हीही जर मासांहारी असाल तर हा महोत्सव तुमच्यासाठी स्वर्ग सुख देणारा आहे. कारण या महोत्सवात कोकणातील भंडारी, कोळी, ब्राम्हणी, मराठा, मालवणी यांसारख्या विविध पद्धतीच्या जेवणाची मेजवानी आहे. सागुती वडे, पापलेट फ्राय, कोळंबी मसाला, खेकडा रस्सा, बांगडा करी, मटण भाकरी, कोंबडी वडे यांसारखे पदार्थ आहेत. शाकाहारींसाठी जास्त पर्याय नसले तरी त्यांच्यासाठीही खास कोकणी पदार्थ घावने, नारळाच्या दुधातल्या शेवया, स्पेशल कोकणी थाळी, पुरणपोळी, मोदक आणि थालीपीठ यांसारख्या पदार्थांचा आस्वाद घेता येईल.


मनोरंजनासाठी भव्य लोककला महोत्सव


global-kokan-3 %281%29


या महोत्सवाच्या माध्यमातून तुम्हाला कोकणातील लोककला जवळून पाहता येणार आहेत. या महोत्सवाच्या निमित्ताने कोकणातील 100 हून अधिक लोककलाकरांनी यात सहभाग घेतला आहे.


 


जाखडी, नमन, दशावतार, कोळीनृत्य, शंकासूर, मंगळागौर, तारपानृत्य अशा कोकणातील अभिजात लोककलांचा आविष्कार असणारे रंगारंग कार्यक्रम इथे पाहता येतील


मनोरंजनासह गुंतवणूक दालन आणि व्यवसाय मार्गदर्शन


global-kokan-2


या महोत्सवाचा हेतू फक्त मनोरंजन करणं नसून इथे कृषी परिषद आणि व्यवसाय मार्गदर्शन ही करण्यात येणार आहे. कोकणच्या विकासात हातभार लावणाऱ्या उद्योग समूहांचे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. ज्यामध्ये कोकणातील नामवंत उद्योग समूह आणि कंपन्यांचा सहभाग आहे. तसंच कोकणात आगामी काळात होऊ घातलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहीती देणारं अॅडव्हान्टेज कोकण दालनही आहे. तसंच कोकणातील अनेक उद्योगांबद्दल इथे मार्गदर्शनही केले जात आहे.


महोत्सवाची वेळ आणि ठिकाण 


हा महोत्सव गोरेगाव येथील मुंबई एक्झिबिशन सेंटर येथे 3 ते 6 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 या वेळात सुरू राहणार आहे. या ठिकाणी पोचण्यासाठी शेअर ऑटो उपलब्ध असून हे ठिकाण हायवेवर असल्याने चारचाकीने येणेसुद्धा सोयीस्कर आहे.