मासिक पाळीच्या समस्या व उपाय (Menstrual Problem And Their Solution In Marathi)

मासिक पाळीच्या समस्या  व उपाय

प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एका विशिष्ट वयामध्ये मासिक पाळी सुरु होते आणि ती एका विशिष्ट वयापर्यंत सुरु राहते. पण मासिक पाळी या प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असला तरीही मासिक पाळीच्या अनेक समस्याही महिलांना असतात. ही प्रत्येक स्त्री साठी सामान्य गोष्ट असली तरीही तिला होणारा त्रास हा मात्र बरेचदा असामान्य असतो. त्यामुळे आयुष्यात प्रत्येक स्त्री ला यासाठी कधी ना कधीतरी डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज भासते. अशी एकही स्त्री सापडणार नाही जिला कधी मासिक पाळीचा त्रास झाला नाही. प्रत्येक महिलेला कधी ना कधीतरी हा त्रास झालाच आहे. त्यातून सुटका मिळवण्यासाठी अनेक उपायही केले जातात. आपण पाहणार आहोत की नक्की कोणकोणत्या प्रकारच्या मासिक पाळीमध्ये उद्भवतात आणि त्यावरील उपाय काय आहेत. पण एक नक्की तुम्हाला जर मासिक पाळीचा त्रास होत असेल तर वेळच्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर उपाय करायला हवेत कारण त्याचा सर्वात जास्त परिणाम हा तुमच्या शरीरावर होत असतो.


मासिक पाळी म्हणजे काय


मासिक पाळीचे 3 टप्पे (Stages Of Menstrual Cycle)


मासिक पाळीमुळे येणाऱ्या समस्या (Problems With Menstrual Cycle)


मासिक पाळी येण्यासाठी उपाय (Home Remedies For Menstrual Cycle)


मासिक पाळी म्हणजे काय? (Menstrual Cycle In Marathi)


प्रत्येक मुलीला साधारणपणे वयाची 12 - 13 वर्ष झाली की, योनीमार्गमधून रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी (Menstrual Cycle) असं म्हणतात. काही मुलींना या वयाच्या आधीदेखील पाळी सुरु होऊ शकते. प्रत्येकाच्या शरीरानुसार पाळी येण्याचं वय अवलंबून असतं. प्रत्येक स्त्री ला दर 27 ते 30 दिवसांनी मासिक पाळी येत असते. हे चक्र वयाच्या पंचेचाळीस ते पन्नास वर्षांपर्यंत चालू राहतं. पाळी संपल्यानंतर दोन आठवड्यांनी अथवा पुढची पाळी येण्याअगोदर स्त्री चे बिजांड परिपक्व होतं आणि त्यातूनच स्त्री गरोदर राहते. फक्त 10 ते 15 टक्के स्त्रियांमध्ये मासिक पाळीचं चक्र हे अचूक 28 दिवसांचं असतं. बाकी स्त्रियांना नेहमीच पाळीच्या समस्यांना सामोरं जावं लागतं असं अभ्यासातून सिद्ध झालं आहे.  


मासिक पाळीचे 3 टप्पे (Stages Of Menstrual Cycle)


मासिक पाळीचे 3 टप्पे असतात याची तुम्हाला कल्पना आहे का? आम्ही तुम्हाला याबद्दल अधिक माहिती देतो. हे तीन टप्पे खालीलप्रमाणे आहेत -


1. फॉलीक्युलर - फॉलिक्युलरचा टप्पा सुमारे 13-14 दिवसांचा असतो. या तिन्ही टप्प्यांपैकी या टप्प्याच्या कालावधीमध्ये सर्वात जास्त बदल होतात. मेनोपॉजच्यावेळी हा टप्पा कमी दिवसांचा असतो. ल्युटिनायझिंग संप्रेरकांचं प्रमाण जेव्हा वाढतं तेव्हा हा टप्पा संपतो आणि परिणामी अंडं बाहेर सोडलं जातं अर्थात ओव्ह्यूलेशन होतं.


2. ओव्ह्युलेटरी - ल्युटिनायझिंग संप्रेरकांचं जेव्हा प्रमाण वाढतं तेव्हा हा टप्पा सुरु होतो. ल्युटिनायझिंग संप्रेरकामुळे डॉमिनंट फॉलिकलला उत्तेजना मिळते आणि त्यानंतर बीजांडकोशाच्या भिंतीमधून ते बाहेर येतं आणि अंडं सोडलं जातं. त्यानंतर फॉलिकलला उत्तेजित करणाऱ्या संप्रेरकाचं प्रमाण मंदपणे वाढतं.


3. ल्युटिल - ओव्ह्यूलेशननंतर हा टप्पा सुरू होतो आणि, फलन न झाल्यास, सुमारे १४ दिवस चालून पुढील मासिक पाळीच्या आधी संपतो. ह्यामध्ये अंडे बाहेर सोडल्यानंतर फाटलेले फॉलिकल पुनः सांधले जाते आणि त्यातून बनलेल्या आकृतीस कॉर्पस ल्युटेअम असे म्हणतात.


मासिक पाळीमुळे येणाऱ्या समस्या (Problems With Menstrual Cycle)


1. पाळी लवकर येणं अथवा उशीरा येणं - ही समस्या साधारणतः बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मुलींच्या बाबतीत घडताना दिसते. साधारणतः मुलींना 12 व्या वर्षानंतर पाळी येते. पण काही मुलींच्या बाबतीत ही घटना या वयाच्या आधीही घडू शकते. म्हणजे जर 10 व्या पाळी आली तर त्याला ‘पाळी लवकर आली’ असं म्हणतात. अशा मुलींमध्ये स्त्रीत्वाची लक्षणं लवकर दिसू लागतात. उदा. स्तन वाढणं, काखेमध्ये केस येणं. साधारणतः 14 वर्षानंतर पाळी आली तर ‘पाळी उशीरा आली’ असं म्हटलं जातं. पण एखाद्या मुलीचं वय 16 झालं तरीही पाळी येत नसेल तर अशा वेळी डॉक्टरांकडे जाणं अत्यंत गरेजचं आहे.


2. पाळी न येणं - एखाद्या मुलीचं वय 16 झालं तरीही पाळी येत नसेल तर अशा वेळी डॉक्टरांकडे जाणं अत्यंत गरेजचं आहे. असं जेव्हा आम्ही सांगतोय तेव्हा त्याला काही महत्त्वाची कारणं आहेत. कारण काही स्त्रियांमध्ये पिच्युटरी ग्रंथी अथवा बीजांडामध्ये वाढ होत नाही वा दोष असतो. त्यामुळे त्यांच्यामधील संप्रेरक निर्माण होण्यासाठी अडथळा निर्माण होते. त्यामुळे वाढच अपुरी असेल वा सदोष असेल तर पाळी येत नाही. शिवाय स्त्री - पुरुष यांच्यामधली अवस्था अर्थात तृतीय पंथी असणं, गर्भाशय वा योनीमार्ग एखाद्याचा बंद असणं, बीजांडामध्ये दोष, गर्भाशय नसणं यासारख्या कोणत्याही दोषामुळे पाळी येत नाही.


3. पाळी कमी दिवस राहणे - काही महिलांना पाळी वेळेवर येते पण दोन दिवस राहते. पूर्ण चार दिवस रक्तस्राव होत नाही. यामुळे अर्थातच गर्भधारणा होण्यात कोणताही त्रास होत नाही. तरीही हे योग्य नाही. त्यासाठी योग्य वेळी डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे. याचा अर्थ शरीरामध्ये काहीतरी बिघाड आहे पण त्यामुळे घाबरून जाण्याची काहीही गरज नाही.


4. पाळीच्या वेळी वा आधी पोटात दुखणं - हा सर्वसामान्य सर्वच स्त्रियांना होणारा त्रास आहे. पाळी येण्यापूर्वी एक ते दोन दिवस पोटात दुखू लागतं किंवा बऱ्याचदा पाळी आल्यानंतर पोटदुखीचा त्रास सुरु होतो. काही महिलांना ओटीपोटामध्ये असह्य कळा येत राहतात. पाळीचे चारही दिवस काही महिलांना पोटदुखीचा त्रास होत असतो. अर्थात हा त्रास कमीजास्त प्रमाणात असतो. त्यामुळे या काळामध्ये सतत महिलांची चिडचिड होत असते, वारंवार लघवीला जावं लागतं, पोटात कळ येते, बद्धकोष्ठाचा त्रास होतो, स्तन दाटून येतात अशा अनेक गोष्टींना महिलांना यावेळी सामोरं जावं लागतं. हे सर्व शरीरातील क्षार कमी झाल्यामुळे होतं. त्यामुळे तुम्ही पाणी आणि मीठ एकत्र करून पिऊ शकता. काही महिलांना अगदी आठवडाभर आधी ओटीपोट आणि कंबरदुखीचा त्रास सुरू होतो. हा त्रास पाळी चालू झाल्यावर थांबतो. हा त्रास ओटीपोटामध्ये काहीतरी आजार असल्यास सुरु होतो. त्यामुळे त्यासाठी तुम्ही वेळेवर डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घ्यावा.


5. जास्त रक्तस्राव होणं - बऱ्याच महिलांना अंगावरून जास्त रक्तस्राव पाळीच्या दिवसात होत असतो. या काळात प्रचंड चिडचिड होते. काही वेळा गर्भाशयाच्या गाठी, गर्भनलिका आणि बीजांड यांची सूज, इतर दोष यामुळे पाळीच्या दिवसात जास्त रक्तस्राव होतो. पण याचे कारण अजूनही नीटसं सापडलेलं नाही. पण याकडेदेखील वेळेवर लक्ष देणं गरजेचं आहे. काही महिलांना गर्भाशयाचा कोणताही आजार नसला तरीही रक्तस्रावाचा त्रास होत राहतो. अशावेळेला टी. सी.आर. नावाचा उपचार डॉक्टरांकडून केला जातो. यामध्ये गर्भाशय काढून न टाकता दुर्बिणीतून लेझरच्या सहाय्याने आतील आवरण जाळून टाकले जाते. तर काही महिलांना अति त्रास झाल्यास, गर्भाची पिशवी काढून टाकण्यासाठी ऑपरेशन करावा लागतो.


6. पाळी थांबताना होणारा त्रास - वयाच्या साधारण 45 ते 50 दरम्यान प्रत्येक स्त्री ची पाळी थांबते. त्यावेळी महिलांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रासातून जावं लागतं. यामध्ये थकवा, नैराश्य, चिडचिडेपणा या सर्व गोष्टी अतिशय कॉमन आहेत. त्या महिलांना या गोष्टी कळत नसतात. पण त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींना अशावेळी समजून घ्यायला हवं. पाळी थांबताना घाम येणं, छातीमध्ये धडधड होणं, हातपाय बधीर होणं, मुंग्या येणं, डोकंदुखी, लैंगिक इच्छा वाढणं, शरीरावरील चरबी वाढणं, पोटामध्ये गॅस होणं, लघवीचा त्रास या गोष्टींचे प्रत्येक महिलेला वेगवेगळे अनुभव येत असतात. यावेळी गर्भाशयाचे तोंड लहान होते आणि गर्भाशयाचे अस्तर आणि स्नायू हे पातळ होतात. त्वचा सुरकुतते आणि योनीद्वारावरील केसदेखील कमी होतात. पण पाळी सुरु झाल्यापासून ते पाळी संपतानाही प्रत्येक महिलेला त्रास होतो हे नक्की. 


मासिक पाळी येण्यासाठी उपाय (Home Remedies For Menstrual Cycle)


पाळीच्या दुखण्यासाठी नक्की काय करायचं हे बरेचदा सुचत नाही आणि सारखं सारखं तेच दुखणं घेऊन डॉक्टरकडे जायचं असा विचारही केला जातो. पण खरं तर हे दुखणं अंगावर काढणं चुकीचं आहे. त्यामुळे या दुखण्यावर नक्की काय घरगुती उपाय (masik pali upay) आपण करू शकतो हे आम्ही तुम्हाला सांगतो -


1. गरम पाण्याची बाटली किंवा हिटिंग पॅड पोटाच्या खालच्या बाजूला लावून ठेवल्यास, तुम्हाला या त्रासापासून सुटका मिळू शकते. रात्री झोपण्यापूर्वी लक्षात ठेऊन हे हिटिंग पॅड बाजूला ठेवा.


मासिक पाळी येण्यासाठी उपाय


2. पोटाच्या खालच्या बाजूला हलकं मालिश केल्यास तुम्हाला या पोटदुखीपासून सुटका मिळेल.


3. कोमट पाण्याने आंघोळ करा आणि या व्यतिरिक्त तुम्ही एरोमाथेरेपी करून मासिक पाळीपासून सुटका मिळवू शकता.


4. गरम पेय पदार्थ जसं तुम्ही पेपरमिंट टी (349 Rs) योग्य प्रमाणात यावेळी पिऊ शकता


5. या दरम्यान तुम्ही अतिशय हलकं जेवण जेवायला हवं आणि काही काही वेळाने थोडं थोडं खायला हवं


6. जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्स असायला हवेत - उदा. साबुदाणा, धान्य, फळं आणि हिरव्या भाज्या


7. थंड आणि आंबट गोष्टी खाण्यापासून यावेळी स्वतःला आवरा. तसंच साखर, मीठ, अल्कोहोल आणि कॅफीन कमी प्रमाणात खा


8. यावेळी तुम्हाला झेपतील असे व्यायाम करा आणि झोपलेले असाल तर सरळ उठा आणि मग डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला तुमचे पाय दुमडून उठा


yoga


9. नियमित चाला आणि त्याशिवाय रोज सोपे योगाभ्यास आणि ध्यान करा


10. विटामिन बी 6, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची औषधं घ्या


निरोगी मासिक पाळीसाठी टिप्स (Tips For Healthy Menstrual Cycle)


वरील उपायांनीदेखील तुम्हाला जर आराम मिळत नसेल तर यावर नक्की काय करायचं हे आम्ही तुम्हाला सांगतो. पण हे करत असताना व्यवस्थित काळजी घ्यावी.


1. पॅरासिटेमॉलची गोळी जास्त दुखत असल्यास घ्यावी. NSAIDS आणि अँटीइन्फ्लेमेटरी औषधं ही या दुखण्यावर जास्त चांगलं काम करतात. कारण पाळीचं मुख्य कारण प्रोस्टाग्लँडिन (PGS) बनवणं रोखू शकतं. याशिवाय तुम्ही पोनस्टॅन आणि नॅप्रोजेरिक या दोन्ही गोळ्या खाऊ शकता.


2. यासाठी तुम्ही नैसर्गिक औषधांचादेखील उपयोग करू शकता. यासाठी तुम्ही रोज इव्हिनिंग प्राईमरोज ऑईल विशेषतः वापरू शकता.


3. यानंतरही तुम्हाला जर दुखत असेल तर तुम्हाला डॉक्टर जी औषधं लिहून देतील ती घ्या


4. अगदीच असह्य दुखणं होत असेल तर हे पेल्व्हिक इन्फ्लेमेटरी डिसिझ, एडोनोमायोसिस, फायब्रॉईड्स, अँडोमिट्रियोसिस या रोगांचं दुखणंही असू शकतं. पण हे आजार लहान वयात होत नाहीत. त्यामुळे तुम्ही यासाठी वेळेवर डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यायला हवा


5. टीन एजच्या मुलींमध्ये जास्त प्रमाणात अशा बाबतीत औषधांची गरज भासत नाही. अगदीच असह्य झाल्यास त्यांना औषध द्या


6. जास्त दुखत असल्यास, औषध आणि घरगुती उपायच यावर इलाज आहे


7. पाळीच्या दिवसात तुम्ही तुमचं खाणं - पिणं आणि जीवनशैली योग्य ठेवा आणि त्यामुळे तुम्ही पाळीचा त्रास नियंत्रणात आणू शकता


8. या दरम्यान कोणताही तणाव घेऊ नका आणि रागावर नियंत्रण ठेवा. तुम्ही स्वतःला जितकं शांत ठेऊ शकाल तितकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा


9. मासिक पाळीच्या वेळात हायजीनची विशेष काळजी घ्यायला हवी आणि वेळोवेळी तुम्ही तुमची अंतर्वस्त्र बदलायला हवीत


10. मासिक पाळीच्या दिवसात पोटदुखीपासून वाचायचं असेल तर मेडिटेशन खूपच उपयोगी आहे. यामुळे तुमचा चिडचिडेपणा कमी होतो.