जाणून घ्या सकाळी लवकर उठण्याचे फायदे (Benefits Of Waking Up Early In Marathi)

सकाळी लवकर उठण्याचे फायदे

“लवकर निजे,लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे” हे वाक्य तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. खरंतर पूर्वजांच्या या शिकवणीचे अनेक चांगले फायदे आहेत. ज्या लोकांना लवकर झोपून लवकर उठण्याची सवय असते ते  जीवनात सुखी, बुद्धीवान, श्रीमंत आणि निरोगी असतात. अनेक यशस्वी आणि श्रीमंत माणसांच्या यशाचे गुपित लवकर उठण्याच्या सवयीत दडलेले आहे. जर तुम्हाला ही जीवनात सुखी आणि यशस्वी व्हायचं असेल तर लवकर उठण्याची सवय लावून घ्या. मात्र जर लवकर उठण्याची सवय लावायची असेल तर तुम्हाला आधी वेळेवर झोपण्याची सवय स्वतःला लावावी लागेल. कारण माणसाला रात्रभरात कमीत कमी सात ते आठ तास झोप मिळणं फार गरजेचं आहे. सकाळी लवकर उठून सकाळी चालण्याचे फायदेही असतात. 


सकाळी लवकर उठण्याचे फायदे


सकाळी लवकर उठण्यासाठी फॉलो करा या टीप्स


सकाळी उशीरा उठण्याचे दुष्परिणाम


Benefits Of Waking Up Early In Marathi


सकाळी लवकर उठण्याचे फायदे (Benefits Of Waking Up Early In Marathi)


सकाळी लवकर उठल्यामुळे तुमच्या दिवसाची सुरूवात फ्रेश होते. महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण होतात. सकाळी लवकर उठल्यामुळे वाचन, प्रार्थना अथवा मेडीटेशन, व्यायाम अशा चांगल्या गोष्टी करता येतात.


सुर्योदय पाहता येतो (To See Sunrise)


Sunrise


सुर्योदय पाहणं आजकाल प्रत्येकाच्या नशिबात असतेच असे नाही. कारण अनेकांची दिवसाची सुरूवात सुर्य डोक्यावर आल्यावर होते. सुर्योदय पाहणं हा एक अद्भूत अनुभव असतो. कारण त्यामुळे दिवसाची सुरूवात उत्साह आणि आनंदाने होते. रात्रीच्या काळ्या गर्भातून होणारा अरुणोदय नवसंजीवनी देणारा असतो. शिवाय कोवळ्या उन्हात फिरल्यामुळे तुम्हाला व्हिटॅमीन डी पुरेशा प्रमाणात मिळते. थोडक्यास सकाळी लवकर उठून सुर्याचे दर्शन घेतल्यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही निरोगी आणि आनंदी होते.


उत्साही वाटते (Sounds Exciting)


सकाळी लवकर उठणारे लोक फार उत्साही आणि कार्यक्षम असतात. कारण जे लोक दिवसाची सुरूवात ब्रम्हमुहुर्तावर करतात त्यांची बुद्धी अतिशय तल्लख आणि तेजस्वी असते. ‘ब्रम्हमुहुर्त’ म्हणजे रात्रीचा चौथा प्रहर आणि सुर्योदया आधीचा पहिला प्रहर. दिवसाच्या चोविस तासात एकुण तीस मुहुर्त असतात. यापैकी तिसावा मुहुर्त हा ब्रम्हमुहुर्त असतो. या ब्रम्हमुहुर्ताला अतिशय महत्व आहे. साधारणपणे पावणे तीन ते पावणे पाचच्या दरम्यान ब्रम्हमुहुर्त असू शकतो. या वेळी एखाद्या गोष्टीचा अभ्यास,प्रार्थना, चिंतन,मनन, ध्यान करणे फार फायदेशीर ठरते. वास्तविक माणसाचे शरीर चक्र हे सुर्यानुसार चालते. त्यामुळे सकाळी उठल्यामुळे निसर्गनियमानुसार तुम्हाला फ्रेश वाटते.


आनंद मिळतो (For Pleasure)


जी माणसे उत्साही आणि सशक्त असतात ती नेहमीच आनंदी राहतात. म्हणूनच जर तुम्ही सकाळी लवकर उठला तर तुम्हाला उत्साही आणि आनंदी वाटते.


आत्मविश्वास वाढतो (Increases Confidence)


सकाळी लवकर उठल्यामुळे तुमची कामे वेळत पूर्ण होतात. काम वेळेत झाल्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास अधिक वाढतो. 


सकारत्मक विचारसरणी (Positive Thinking)


सकाळचे वातावरण अतिशय शांत आणि निवांत असते. अशा वेळी उठून आपली नित्याची कामे  सुरू केल्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटते. जेव्हा मन प्रसन्न असते तेव्हा याचा चांगला परिणाम तुमच्या विचारसरणीवर होतो. मनात चांगले आणि हिताचे विचार येतात. जे तुमच्या दिवसाच्या सुरूवातीसाठी अतिशय उत्तम असतात. याउलट उशीरा उठल्याने कामाचा ताण वाढतो. ज्यामुळे दिवसभर चिडचिड आणि कंटाळा येऊ शकतो.


व्यायामासाठी वेळ मिळतो (Time For Exercise)


सकाळी लवकर उठल्यामुळे तुम्ही तुमच्या दिवसभराच्या कामाचे योग्य नियोजन करू शकता. पूजापाठ, ऑफिसला जाण्याची तयारी, नास्ता तयार करण्यासाठी पुरेसा वेळ असल्यामुळे तुम्ही तुमच्या व्यायामासाठी वेळ काढू शकता. सकाळच्या वेळी चालणे, धावणे, योगासने केल्यामुळे दिवसभर तुमचे  शरीर कार्यक्षम राहते.


रात्री गाढ झोप येते (Good Sleep At Night)


अनेकांना रात्री झोप न येण्याची समस्या सतावत असते. ज्यांना निद्रानाशाची समस्या असेल त्यांनी सकाळी लवकर उठण्याची सवय लावावी. कारण जे लवकर उठतात त्यांना रात्री लवकर आणि निवांत झोप लागते. शिवाय लवकर उठल्यामुळे दिवसभराची कामे वेळेत पूर्ण होतात. त्यामुळे रात्री झोपताना कामाचा ताण अथवा चिंता सतावत नाही.


ताण-तणाव दूर होतो (Relieves Stress)


जर तुम्ही सकाळी लवकर उठला तर तुमची कामे वेळेत पूर्ण होतात. त्यामुळे तु्हाला कामाचे टेंशन येत नाही. शिवाय कामे वेळेत झाल्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकता. कुटुंब आणि प्रिय व्यक्तीसोबत गुजगोष्टी करत दिवसाची सुरूवात केल्यामुळे तुमच्या मनात सुखद भावना निर्माण होतात.


कार्यक्षमता वाढते (Increases Efficiency)


रात्रीभर पुरेशी झोप झाल्यामुळे मेंदूला आराम मिळतो. त्यामुळे सकाळी लवकर उठल्यावर तुमचा मेंदू अधिक कार्यक्षम होतो. एखादे काम करताना तुम्हाला थकवा अथवा कंटाळा येत नाही. जे काम करता ते पूर्ण लक्ष देऊन केल्यामुळे तुम्हाला लवकर यश मिळते. जर तुम्हाला जीवनात लवकर यशस्वी व्हायचं असेल तर लवकर उठणं फायदेशीर ठरू शकतं.


भुक चांगली लागते (Increases Appetite)


सकाळी लवकर उठून व्यायाम केल्यामुळे तुम्हाला चांगली भुक लागते. सकाळी पुरेसा वेळ असल्यामुळे तुम्ही वेळेवर आणि पौष्टिक नाश्ता करू शकता. ज्यामुळे दुपारी आणि रात्री वेळेत भुक लागते आणि तुम्ही व्यवस्थित जेवता. ज्यामुळे तुम्ही जंकफूड आणि अहितकारक पदार्थ खाणे टाळता.


आजारपणापासून बचाव होतो (Prevents Illness)


सकाळी लवकर उठल्यावर तुम्ही नेहमी फ्रेश आणि कार्यक्षम वाटते. शिवाय व्यायाम केल्यामुळे तुमची शरीरप्रकृती ठणठणीत राहते. सकाळची ताजी आणि शुद्ध हवा  यामुळे तुमचे शरीर आणि मेंदूला पुरेशा ऑक्सिजनचा पुरवठा होतो. सहाजिकच यामुळे तुम्ही आजारपणांपासून दूर रहाता.


वेळेचा सदुपयोग होतो (Prevents Wastage Of Time)


झोप आणि दिवसभराची कामे यांचे गणित चुकल्यामुळे तुमची दिवसभर चिडचिड होत असेल तर सकाळी लवकर उठा. कारण लवकर त्यामुळे तुमची कामे लवकर पूर्ण होतील. सकाळी लवकर उठल्यामुळे तुम्ही कामाचे नियोजन करू शकता. ज्यामुळे तुम्ही दिवसाच्या चोविस तासांचा योग्य सदूपयोग करू शकता.


सकाळी लवकर उठण्यासाठी काय करावे (Tips To Wake Up Early In Marathi)


 • रात्री झोपताना मनाला सूचना द्या की तुम्हाला सकाळी किती वाजता उठायचे आहे. कारण तुम्ही जे विचार रात्री झोपताना करता ते जीवनात साकार होत असतात. यामागे तुमच्या अंर्तमनाचे शास्त्र कामी येत असते.

 • सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न सोडून देऊ नका. जर तुम्हाला ठरविल्याप्रमाणे जाग आली नाही तर पुन्हा दुसऱ्या दिवशी प्रयत्न करा.

 • मानसशास्त्रानुसार एखादी गोष्ट 21 वेळा केली तर त्या गोष्टीची सवय तुम्हाला लागू शकते. यासाठी सलग 21 दिवस लवकर उठण्याचा प्रयत्न करा.

 • एकदम पहाटे उठण्यापेक्षा सुरूवातीला तुमच्या नेहमीच्या वेळेपेक्षा अर्धा तास आधी उठण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे हळूहळू तुम्ही ठरविलेल्या वेळेवर उठण्याचे ध्येय गाठू शकता.

 • रात्री झोपताना बेडरूमच्या खिडकीचे पदडे सरकवून ठेवा. ज्यामुळे सकाळी तुम्हाला सुर्यप्रकाशामुळे लवकर जाग येईल.

 • दररोज रात्री वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करा. अगदी सुट्टीच्या दिवशीपण वेळेवर झोपा आणि उठा. ज्यामुळे तुम्हाला वेळेवर झोपून सकाळी लवकर उठण्यासाठी सवय लागेल.

 • जर तुम्हाला सकाळी लवकर उठायचे असेल तर रात्रीची गाढ झोप घेण्याचा प्रयत्न करा. माणसाला दररोज कमीत कमी सात ते आठ तासांची झोप घेण्याची गरज आहे. झोप पूर्ण झाली की सकाळी वेळेवर जाग येते.

 • दिवसाची झोप घेणे टाळा. कारण तुम्ही दिवसा झोप घेतली तर रात्री तुम्हाला लवकर झोप येणार नाही आणि सकाळी उठणे तुम्हाला कठीण जाईल.

 • झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने अंघोळ करा. ज्यामुळे तुमचे शरीर रिलॅक्स होईल आणि तुम्हाला चांगली झोप येईल.

 • रात्री झोपण्यापूर्वी जड आहार घेऊ नका. झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तास आधी हलका आहार घ्या. ज्यामुळे झोपताना तुमच्या पचनसंस्थेवर ताण न येता तुम्हाला शांत झोप येईल.

 • झोपण्यापूर्वी तुमच्या आवडीचे काम करा, आवडीचे पुस्तक वाचा अथवा मंद स्वरातील गाणी ऐका ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल.

 • संध्याकाळी सात नंतर मद्यपान, चहा कॉफी अशी उत्तेजक पेय घेणं टाळा कारण त्यामुळे तुमच्या झोपेवर विपरित परिणाम होऊ शकतो.

 • झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी टिव्ही, मोबाईल अथवा इतर गॅझेट्स वापरणे बंद करा. ज्यामुळे तुमच्या मेंदूला झोपण्याचा संकेत मिळेल.

 • झोपण्यासाठी आरामदायक गादी आणि उशी वापरा. कारण जर तुम्हाला झोपताना आरामदायक वाटले तर तुम्हाला गाढ झोप येऊ शकते.

 • रात्री झोपताना अती घट्ट कपडे घालू नका. सैल आणि सुती कपडे घाला.


सकाळी उशीरा उठण्याचे दुष्परिणाम (Disadvantage Of Waking Late In Morning)


 • पचनक्रिया बिघडते

 • दिवस कंटाळावाणा आणि निरुत्साही जातो

 • दिवसभर चिडचिड होते

 • कामाचा ताण आणि टेंशन येते

 • व्यायामासाठी वेळ काढणे कठीण जाते

 • सकाळचा नाश्ता अथवा ब्रेकफास्ट करण्यास वेळ मिळत नाही.

 • विनाकारण दगदग आणि धावपळ होते

 • शरीराचे आरोग्य बिघडते

 • केस आणि त्वचा निस्तेज होते


काही प्रश्न आणि उत्तरे-FAQ'S


1. पहाटे लवकर उठल्याचे खरंच चांगले फायदे होतात का?


होय, नक्कीच मात्र रात्री उशीरा झोपून सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करू नका. कारण शरीराला पुरेशी झोप देखील मिळणं गरजेचं आहे. लवकर उठण्यासाठी  लवकर झोपणंदेखील तितकच गरजेचं आहे. जर तुम्हाला रात्री झोपण्यास उशीर होत असेल तर झोप पूर्ण न करता लवकर उठण्याचा प्रयत्न करू नका.


2. सकाळी अर्लाम बंद करून पुन्हा झोपण्याची सवय कशी मोडावी?


Alarm


सकाळी लवकर उठण्यासाठी जर तुम्ही अर्लाम लावणार असाल तर तो  तुमच्या बेडपासून दूर ठेवा. कारण सकाळी जाग आल्यावर तो बंद करण्यासाठी तुम्हाला बेडमधून बाहेर यावे लागेल. जर तुम्ही अलार्म जवळ ठेवला तर तो बंद करून तुम्ही पुन्हा झोपण्याची शक्यता अधिक असते.


3. उशीरा उठणारी माणसे जीवनात यशस्वी होत नाहीत का?


जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न आणि सकारात्मक विचार गरजेचे असतात. त्यामुळे ज्यांच्याकडे ते असतात ती माणसे जीवनात यशस्वी होतात. सकारात्मक विचारसरणी आणि वेळेचा सदूपयोग करण्यासाठी सकाळी लवकर उठणे फायदेशीर ठरते.


4. ब्रम्हमुहुर्तावर उठण्याचे काय फायदे होतात?


ब्रम्हमुहुर्तावर उठल्यामुळे तुमचे शरीर चक्र निसर्गनियमानुसार सुरू राहते. शिवाय यावेळी अभ्यास अथवा चिंतन केल्यास बुद्धी अधिक तीक्ष्ण आणि तेजस्वी होते.