सी - सेक्शन (सिझेरियन) समज आणि गैरसमज

सी - सेक्शन (सिझेरियन) समज आणि गैरसमज

प्रसुतीवेदनांचा त्रास टाळण्यासाठी अथवा काही गुंतागुंतीची स्थिती असेल तर महिलांना सी - सेक्शनचा सल्ला देण्यात येतो. सिझेरियनचा सल्ला जरी डॉक्टरांकडून देण्यात आला नाही तरी काही महिलांच्या बाबतीत त्यांचा स्वतःचा सिझेरियन करण्याचा निर्णय असतो. अशा वेळी डॉक्टरही समजावण्याचा प्रयत्न करत असतात पण तरीही काही महिला या सिझर करण्याचा निर्णय घेतात. सी - सेक्शनच्या बाबत महिलांमध्ये खूपच समज गैरसमज आहेत. दरवर्षी भारतामध्ये सी - सेक्शन शस्त्रक्रियेने 6.6 दशलक्ष बाळांचा म्हणजे अर्थातच आयर्लंडच्या लोकसंख्येइतक्या बाळांचा जन्म होत असतो. महानगरपालिका पब्लिक हेल्थच्या अहवालानुसार भारतातील हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या प्रसूतीमध्ये वाढीबरोबरच सिझेरियन सेक्शन करून घेणाऱ्या प्रसूतींमध्येही वाढ झाली आहे.  नक्की महिलांमध्ये याबाबत काय समज गैरसमज आहेत आणि सी - सेक्शन झाल्यानंतर कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी. तसंच पहिलं सी - सेक्शन झालं असेल तर दुसऱ्यांदा नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते का? असेल तर कशी या सगळ्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.


सिझेरियन म्हणजे काय? (What is Cesarean)


सिझेरियन म्हणजे नेमकं काय आणि हे का करण्यात येतं असा प्रश्न नेहमीच सगळ्यांना पडतो. खरं तर गरोदर महिलेच्या प्रसूतीच्या वेळी काही गुंतागुंत होत असेल. अर्थात बाळ पायाळू असणं, बाळ फिरायचं थांबणं, बाळाचं डोकं मोठं असणं अशा परिस्थितीत सिझेरियन करण्यात येऊन बाळाचा जन्म होतो. सिझेरियन शस्त्रक्रियेमध्ये तुमचे डॉक्टर तुमच्या पोटाला आणि गर्भाशयाला छेद देतात आणि मग बाळाचा जन्म होतो. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर सिझेरियन म्हणजे योनीमार्गातून बाळ बाहेर न आणता ओटीपोटावर छेद देऊन बाळ पोटावरून बाहेर काढणे. ओटीपोटाला एक छोटीशी आडवी चीर देण्यात येते आणि मग गर्भाशयातून बाळ बाहेर काढण्यात येतं. गर्भाशय रिकामं करून पुन्हा तो भाग शिवला जातो. आता हा भाग स्टॅपलदेखील करण्यात येतो. पण हे ऑपरेशन करण्याआधी प्रत्येक आईला भूल देण्यात येते.


C Section 1


सिझेरियन नक्की कधी करावं लागतं? (When can Cesarean can happen)


काही महिलांचा गैरसमज असतो की, प्रत्येक महिलेला हल्ली सिझेरियन करावं लागतं. पण अशी परिस्थिती नसते. सिझेरियन करण्याची काही कारणं असतात. ती नक्की कोणती कारणं असतात ते जाणून घेऊया -


 • ओटीपोटामध्ये मूल हलायचे थांबल्यास किंवा मूल पायाळू असल्यास

 • बाळंतपणात आईच्या किंवा बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास

 • बाळाचं डोकं मोठं असल्यास

 • बाळाच्या गळ्याभोवती नाळ गुरफटली जाणं

 • बाळाच्या आईला मधुमेह, हृदयविकार अथवा कॅन्सरसारखा कोणता आजार असल्यास

 • प्लेसेंटा प्रिव्हिया अर्थात खालच्या भागामध्ये वार असल्यास (ही सहसा वरच्या भागामध्ये असते). शेवटच्या दिवसात ही वार तुटते आणि रक्तस्राव होतो. अशावेळी नैसर्गिरिकरित्या बाळाला जन्म देणं शक्य नसतं

 • आईचं वय जास्त अर्थात 30 पेक्षा अधिक असल्यास

 • बाळाचं डोकं ठराविक वेळात खाली न सरकल्यास अथवा गर्भाशयाचे तोंड वेळेवर न उघडल्यास


तज्ज्ञांचे मत (Experts' Opinion)


बऱ्याचदा पहिलं बाळ सिझेरियनने झालं तर दुसऱ्या बाळाचा जन्म नैसर्गिकरित्या होणार नाही असाही गैरसमज असतो. त्यासाठी आम्ही खारघर येथील मदरहूड हॉस्पिटमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनू विज यांच्याशी संवाद साधून याविषयी माहिती घेतली. अनू विज यांच्या म्हणण्याप्रमाणे, ‘एकदा सिझेरिअन झाल्यावर नेहमी सिझेरिअनच करावे लागते यामध्ये अलीकडच्या काळात फारसे तथ्य राहिलेले नाही. पहिली प्रसूती सी-सेक्शन शस्त्रक्रियेने झाली असेल तर दुसरे मूलही सी-सेक्शन प्रसूतीनेच होते, असा महिलांचा गैरसमज आहे. एखादी माता पुन्हा सामान्यपणे (व्हीएबीसी) प्रसूत होऊ शकते किंवा नाही या संदर्भात आम्ही पती व पत्नीचे समुपदेशन करतो. व्हीएबीसीला टोलॅक (ट्रायल ऑफ लेबर आफ्टर सिझेरिअन) असेही म्हणतात. अर्थात, व्हीएबीसी करताना काही घटक लक्षात घेणे गरजेचे असते. योनीमार्गाद्वारे होणाऱ्या प्रसूतींपैकी १५% या व्हीएबीसी होत्या.’ तसंच त्यांनी पुढे असंदेखील सांगितलं की, ‘तरूण, सुदृढ महिलेची पहिली प्रसूती सी-सेक्शनने झाली असेल तरी ती दुसऱ्या खेपेला सहज सी-सेक्शन प्रसूती करू शकते. सक्रीय जीवनशैली, सामान्य प्रकृती (विशेषतः रक्तदाब) आणि गर्भाची योग्य स्थिती (डोके खालच्या बाजूस) हे सामान्य प्रसूतीचे द्योतक असतात.’


वाचा - ‘अशी’ लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही गरोदर आहात हे समजा


व्हीएबीसी कधी शक्य आहे? 


सिझेरिअन शस्त्रक्रियेमध्ये तुमचे डॉक्टर तुमच्या पोटाला आणि गर्भाशयाला छेद देतात आणि बाळाचा जन्म होतो, तर आधीच्या सिझेरिअनमध्ये आडवा छेद कमी दिला असेल तर गर्भाशय फाटण्याची शक्यता कमी असते.


व्हीएबीसी कधी करू नये?


1.      बाळ पायाळू स्थितीत असेल


2.      बाळाचा आकार मोठा असेल


3.      बाळाच्या नाडीच्या ठोक्यांचा वेग कमी होत असेल


4.      गर्भाशयाला प्लॅसेंटाने कव्हर केले असेल


5.      पहिल्या प्रसूतीच्या वेळी ज्या महिलांची प्लॅसेंटा कमी असेल


व्हीएबीसी यशस्वी होण्याची शक्यता खालील घटक ढोबळपणे वाढवतातः


1.      आधीच्या सिझेरियन प्रसूतीमध्ये गर्भाशयाला आडवा छेद कमी दिला असेल.


2.      सामान्य आकाराचे बाळ सामावून घेण्यासाठी पुरेसा श्रोणीभाग


3.      एकच भ्रूण असलेली गर्भावस्था


4.    बाळ पायाळू असल्यामुळे किंवा इतर वैद्यकीय समस्येमुळे पहिली प्रसूती सिझेरियन शस्त्रक्रिया केली असेल आणि या गरोदरपणात ती परिस्थिती नसेल, म्हणजे तीच लक्षणे पुन्हा दिसत नसतील.


वाचा - गरोदरपणानंतर काय घ्यावी काळजी, जाणून घ्या


सी - सेक्शननंतर कशी असते अवस्था?  


सी - सेक्शनच्या दुसऱ्या दिवशी


सी - सेक्शन केल्यानंतर त्या दिवशी हालचाल करणं अजिबात शक्य नसतं. हालचाल करण्यासाठी तुम्हाला साधारण 2-3 दिवस लागतात. सिझेरियनचा निर्णय हा काही वेळा ठरवून घेतला जातो तर काही वेळा निर्णय अचानक ठरवावा लागतो. त्याप्रमाणे प्रसूती होण्यापूर्वी पेनकिलर देण्यात येतात. सिझेरियन झाल्यानंतर 48 तास घामाचं आणि मूत्रविसर्जनाचं प्रमाण वाढतं. शिवाय ऑपरेशन झाल्यानंतर काही तासातच तुम्ही ग्लानीत असताना थंडी वाजते. बऱ्याचदा रक्तस्राव खूप जास्त प्रमाणात होत असतो. त्यामुळे तुम्ही योग्य ती काळजी घ्यायला हवी. तुम्ही वापरत असणारी पॅड्स व्यवस्थित असायला हवीत. सिझेरियन झाल्यास साधारण पाच ते सहा दिवस हॉस्पिटलमध्ये तुम्हाला आणि बाळाला ठेवण्यात येतं. तसंच काही दिवस तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रासही सहन करावा लागतो. पण जेव्हा तुम्ही हळूहळू चालायला सुरुवात करता तेव्हा हा त्रास कमी होतो. ऑपरेशन झालं असल्यामुळे तुमचं पोट खूप जड असतं. तुम्हाला कोणत्याही संवेदनी नीट जाणवत नाही. भूल दिलेल्या इंजेक्शनचा प्रभाव बराच काळ राहतो.


सी - सेक्शननंतर आठवड्याने


आठवड्याने तुमच्या औषधातील पेनकिलर बंद करण्यात येतात. त्यामुळे तुम्हाला होणाऱ्या त्रासासाठी सहनशक्ती ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कोणतंही जड काम, व्यायाम या गोष्टी सिझरियननंतर करू नका. तुमचं शरीर तुम्हाला कशी साथ देत आहे त्याप्रमाणेच हालचाल करा. अति ताण देऊ नका. यावेळी तुमची भूक नक्कीच मंदावते पण तुम्हाला तुमच्या बाळाला दूध द्यायचं असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच योग्य आहार घ्या. त्याचा परिणाम तुमच्या शौचावर होतो. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास बळावण्याची शक्यता असते.  याकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवं. दर साधारण 10-12 दिवसांनी तुम्हाला ड्रेसिंग बदलायला जावं लागतं. त्यामुळे योग्य साफसफाई आपल्या शरीराची ठेवायला हवी. साधारण महिनाभरानंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही व्यायाम करू शकता. शिवाय तीन महिने कोणताही वातूळ पदार्थ अथवा थंड पदार्थ न खाणंच योग्य आहे.


सिझेरियनमुळे मातेवर होणारा परिणाम


C Section FI


सिझेरियननंतर मातेवर नक्की काय परिणाम होतो याची माहितीदेखील तुम्हाला माहीत हवी. जाणून घेऊया नक्की काय होतं -


 • सिझेरियन ही खूप मोठी शस्त्रक्रिया असते. त्यामुळे या शस्त्रक्रियेनंतर रक्तस्राव होणं, रक्ताच्या गुठळ्या होणं, भूल असल्यामुळे मातेच्या शरीरात गुंतागुंत होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा ऑपरेशनच्या वेळी अधिक रक्ताची गरजही भासते

 • तसंच ऑपरेशननंतर आईला जंतुसंसर्ग होणं, स्टिचेस असलेला भाग चिघळणे अर्थात जखम चिघळणे, टाक्यांना जंतुसंसर्ग होणे असंही घडतं

 • टाक्यांमुळे आणि उठता न आल्यामुळे बऱ्याचदा ऑपरेशननंतर महिलांचा हॉस्पिटलमध्ये मुक्काम वाढतो त्यामुळे सदर महिलांना आणि त्यामुळे बाळालाही संसर्ग होण्याची भीती असते

 • सिझेरियन झालेल्या महिलेच्या प्रकृतीवर दूरगामी आणि कायमचे परिणाम होऊ शकतात. याबाबत रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना माहिती करून देण्याचं काम हे डॉक्टरांचं आहे

 • कायमस्वरूपी एखाद्या महिलेला कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो

 • तसंच घातलेल्या टाक्यांचा त्रास हादेखील जन्मभरासाठी असतो. कोणतीही सिझेरियन झालेली महिला जड वस्तू त्यानंतर कधीही उचलू शकत नाही. कारण त्यामुळे तुमच्या टाके घातलेल्या जागेवर दबाव येऊन पुन्हा टाके उलगडायची शक्यता असते


सिझेरियनमुळे जन्म झालेल्या बाळावर होणारे परिणाम


C Section 2


सिझेरियन झाल्यावर केवळ मातेवरच परिणाम होतो असं नाही तर त्याचा परिणाम बाळालाही काही अंशी सोसावा लागतो. नक्की काय परिणाम होतो ते पाहूया -


 • नवजात बाळाला आईचं दूध मिळायला सिझेरियनमुळे उशीर होतो. सिझेरियनमुळे आईला उठून बसता न आल्यामुळे बाळाला लगेच दूध मिळत नाही

 • बाळाला श्वसनासंबंधी आजार उद्भवू शकतात

 • आई नसल्यामुळे बाळाला इतर नातेवाईक हाताळतात. त्यामुळे बाळाला संसर्ग होण्याचा धोका असतो. शिवाय अशा प्रकारच्या असुरक्षित वातावरणाला बाळाला सामोरं जावं लागतं

 • बाळ अधिक काळ हॉस्पिटलमध्ये राहिल्यामुळे त्यालादेखील आईप्रमाणेच संसर्गाचा धोका वाढतो


सी - सेक्शननंतर आंघोळ कधी करायची?


सी - सेक्शन झाल्यानंतर खूप थकवा आलेला असतो. त्यात अंगावर खूपच चिकटपणा जाणवत असतो. शिवाय रक्तस्राव होत असल्यामुळे खूपच घाणही वाटत असतं. त्यामुळे महिलांना बऱ्याचदा कधी एकदा आंघोळ करू असं वाटतं. पण सी - सेक्शननंतर आंघोळ करण्याची कधीही घाई करू नये. आंघोळ करताना नक्की काय काळजी घ्यायची ते पाहूया -


 • सी - सेक्शननंतर तुमच्या ज्या ठिकाणावर टाके अथवा जखम आहे त्याठिकाणी डॉक्टरांकडून नीट पट्टी लावून घ्या. आंघोळ कधी करायची याचा सल्ला डॉक्टरही तुम्हाला योग्य तऱ्हेने देतात. तरीही तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही नीट विचारून घ्या.

 • पहिल्या दोन ते तीन दिवसात अंग केवळ पुसून घ्या. आंघोळ करण्याची घाई करू नका

 • आंघोळ करत असताना टाक्यांची जागा कोरडी ठेऊन बाकी भागावर पाणी घ्या. गरम पाण्याने चांगलं शेका. हवं असल्यास आंघोळ करताना उशीची मदत घ्या

 • टाके असल्यामुळे स्टूलावर बसून आंघोळ करू नका

 • टाक्यांना धक्का लागणार नाही अशा स्वरूपातच स्वतःची काळजी घेत आंघोळ करा


सिझेरियन झाल्यावर टाळण्याच्या मुख्य गोष्टी


 • कॅथेटर काढल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर शक्य होईल तितकी हालचाल करा. त्यासाठी मदत घ्या. पण झोपून राहू नका

 • नैसर्गिक विधींसाठी शौचालयाचाच वापर करा. कितीही वेळा जावं लागलं तरीही चालून शौचालयापर्यंत जा

 • मसालेदार पदार्थ खाणं टाळा

 • बाळाशिवाय कोणतंही वजन अजिबात उचलू नका. याचा परिणाम तुमच्या टाक्यांवर आणि जखमेवर होण्यीच जास्त शक्यता असते. त्यामुळे निदान दोन ते तीन आठवडे वजन उचलण्याच्या भानगडीत पडू नका

 • व्यायाम लगेच सुरू करू नका. व्यायामाला सुरुवात करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या

 • घट्ट कपडे अथवा जीन्स असं काहीही घालून नका. किमान एक महिना तरी ढगळ कपडे घाला. कारण घट्ट कपडे घातल्यास तुमच्या पोटावर दबाव येऊन रक्तस्राव होण्याची शक्यता असते

 • मॅटर्निटी बेल्टचा वापर शक्यतो करू नका. नैसर्गिकरित्या तुमचं पोट कमी होईल. त्यासाठी थोडा वेळ द्या. या बेल्टमुळे हार्निया होण्याची शक्यता वाढते


योग्य स्थितीमध्ये झोपा


बाळाचा पाळणा नेहमी जवळ ठेवा. म्हणजे दूध देण्यासाठी वळल्यावर जखमेवर ताण येणार नाही
जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा जेणेकरून बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही. वातूळ पदार्थ अजिबात खाऊ नका
सेक्स करण्याची घाई करू नका


वाचा - सी-सेक्शन प्रसूतीनंतर पूर्ववत होण्यासाठी उपाय


समज - गैरसमज


एखादी शस्त्रक्रिया केल्यानंतर महिलांना पुन्हा प्रसूती होणं शक्य नसतं असा गैरसमज आहे. पण यामध्ये काहीही तथ्य नाही. नवीन पद्धतीच्या सिझेरियनमध्ये जखम पुन्हा उसविण्याची भीती पूर्वीच्या तुलनेत अगदीच कमी आहे. शिवाय सिझेरियनमुळे मृत्यूदरातही खूपच घट झाली आहे. याबाबत बरेच समज आणि गैरसमज आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदा सिझर झाल्यानंतर पुन्हा सिझेरियन करूनच दुसरं मूल जन्माला येऊ शकतं असा सर्वात मोठा गैरसमज आहे. पण असं अजिबात नाही. त्याची माहितीदेखील आम्ही तुम्हाला सांगितली आहे.


सिझेरियन प्रक्रिया शाप की वरदान


अडलेल्या स्त्री ला योग्य तऱ्हेने सोडवण्यासाठी ओटीपोटाला छेद देत ऑपरेशन करण्याची ही प्रक्रिया सुरु झाली. या शस्त्रक्रियेची निर्मिती म्हणजे जगातील महिला आणि नवजात बालकांसाठी नक्कीच वरदान आहे.  पण कोणत्याही गोष्टीची अतिशयोक्ती केल्यास, ती गोष्ट शापच ठरते. पण याबाबत डॉक्टरांवर विश्वास ठेवायला हवा आणि डॉक्टरांनीदेखील योग्य माहिती देऊन आवश्यक असेल तर सिझेरियन करायला हवं.


फोटो सौजन्य - Shutterstock