उन्हाळ्यात जेवणाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही करा या रेसिपीज

उन्हाळ्यात जेवणाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही करा या रेसिपीज

उन्हाळ्यात जेवणाचा कधीकधी कंटाळाच येतो नाही का? अशावेळी तुम्हाला काहीतर उडत खावंस वाटतं. पण प्रत्येकवेळी कंटाळा येतो असे म्हणून तुम्ही जेवण तर टाळू शकत नाही ना? म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी अशा काही रेसिपी आणल्या आहेत. त्या तुम्ही झटपट करु शकता. हे पदार्थ तुम्हाला हलके- फुलके वाटतील . पण तितकेच ते पोटभरीचे आणि पौष्टिक असतील. मग करायची का या उन्हाळ्यातील हटके रेसिपीजनी सुरुवात.


उन्हाळ्यात ही 5 थंडपेयं तुम्हाला ठेवतील कूल


भेळ


bhel


भेळ अनेकांची ऑलटाईम फेव्हरेट असते. पण भेळ आणि ती जेवणासाठी असे तुम्हाला वाटत असेल तर तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. भेळ तुम्हाला जितकी हलकी फुलकी वाटते. तितकी ती नाही बरं का? म्हणजे तुम्ही घरच्या घरी पौष्टिक भेळ बनवू शकता. आता ही पौष्टिक भेळ कशी बनवायची?


साहित्य- कुरमुरे,मखाणा,चणे- शेंगदाणे, उकडलेला बटाटा, कांदा, टोमॅटो, कैरी, चिंच- खजूराची चटणी, पुदिना चटणी,


कृती- तुम्ही जर दुपारच्या जेवणाला भेळ करणार असाल  तर उत्तम, तुम्हाला कुरमुरे घेऊन त्यात मखाना घालायचा आहे. मखाणा थोडे महाग असल्यामुळे ते अगदी मोजूनच घाला. त्यात उकडलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवी नुसार चटणी घाला आणि भेळ मस्त बाऊलमध्ये काढून खा.


भेळेमधील बटाटा, कुरमुऱ्यांमुळे तुमचे पोट भरते. कांदा-टोमॅटो, कैरी, चिंच- खजूर यामुळे तोंडाला चव येते.


आंबेडाळ


aambedal


उन्हाळा अनेकांना दोन कारणांसाठी आवडतो. एक सुट्ट्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आंबा..साधारण फेब्रुवारी महिन्यापासून बाजारात कैरी दिसू लागतात. त्यापासून तुम्ही आंबेडाळ नावाचा पदार्थ बनवू शकता. पोळी किंवा नुसती सुद्धा ही आंबेडाळ खाता येते.


साहित्य- तोतापुरी कैरी, चणाडाळ, फोडणसाठी- तेल, कढीपत्ता, मिरची,हिंग, मोहरी, कोथिंबीर, हळद, साखर


कृती- साधारण 4 तास तरी चणाडाळ भिजत घाला. पाण्यातून काढून एका मिक्सरच्या भांड्यात घ्या.पाणी न घालता जाडसर वाटून घ्या. कैरी किसून कैरी किती आंबट आहे. त्यानुसार तुम्ही ती चणाडाळीच्या मिश्रणात एकत्र करा. आता वेळ आहे फोडणी देण्याची. आपण आंबेडाळीला वरुन फोडणी देणार आहोत. त्यामुळे तयार मिश्रण एका खोलगट भांड्यात काढून थोडं पसरवून घ्या.  फोडणीच्या भांड्यात तेल गरम करुन त्यात कढीपत्ता, मिरची, हिंग, मोहरी, हळद यांची फोडणी द्या. ही फोडणी कैरीच्या मिश्रणात ओतून त्यावर कोथिंबीर भुरभुरा. तयार आंबेडाळीत अर्धा चमचा साखर घाला. साखर एकजीव झाली की, तुमची आंबेडाळ तयार


कच्च्या कैरीपासून बनवा या स्वादिष्ट रेसिपी


कढी पकोडा 


kadhi pakora


तुम्हाला दह्याचे काही पदार्थ खायचे असतील तर तुम्ही कढी पकोडादेखील करु शकता. भातासोबत कढीपकोडा फारचं छान लागतो. त्यामुळे या उन्हाळ्यात तुम्ही हा प्रकार नक्कीच खाऊन बघा.


साहित्य- पकोड्यासाठी लागणारे साहित्य- ½ कप बेसन,मिरची, आले, बेकिंग सोडा,मीठ,तेल


कढीसाठी लागणारे साहित्य- 1 कप दही, ¼ कप बेसन, पाणी, हळद, मीठ


फोडणीसाठी- जिरे,मोहरी, आल्याचा तुकडा, लाल तिखट, काश्मिरी लाल तिखट


कृती-सगळ्यात आधी आपण पकोडे तयार करणार आहे. एका भांड्यात बेसन, मिरची, आले, बेकिंग सोडा,मीठ घालून त्याचे भजीसाठी लागणारे मिश्रण करुन घ्या. भजी छान तेलात तळून घ्या. आता वळूया कढीकडे कढीसाठी तुम्हाला दह्यात बेसनचे मिश्रण घालून त्यात पाणी पाणी घालायचे आहे. दही आणि बेसनच्या गुढळ्या मोडून घ्यायच्या आहेत. आता फोडणीसाठी तुम्हाला एका भांड्यात तेल गरम करुन त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, आल्याचा तुकडा घालायचा आहे. त्यावर तयार बेसन आणि दह्याचे मिश्रण ओतायचे आहे. बेसनाचा वास जाण्यासाठी तुम्हाला हे मिश्रण  चांगलं उकळायचे आहे. त्यात तुम्हाला लाल तिखट, काश्मिरी लाल तिखट घालायचे आहे. साधारण एक दोन मिनिटांनी त्यात तुम्हाला तयारी भजी घालायच्या आहेत. एक उकळी काढून त्यावर कोथिंबीर भुरभुरुन तुम्हाला गरम गरम कढी पकोडा भातासोबत सर्व्ह करायचा आहे. मस्त पोट भरेल.


आमरस पुरी


aamras puri


आंब्याच्या सीझनमध्ये थंडगार आमरस मिळाला तर काय विचारायलाच नको. झोप तर चांगली येतेच. शिवाय तुमचे पोट भरते. त्यात तुम्हाला आंबे आवडत असल्यास तृप्तीचा ढेकर येतो तो आणखी वेगळा. आमरसची रेसिपीपण  सोपी आहे म्हणा.


साहित्य- हापूस आंबे असल्यास उत्तम, साखर किंवा गूळ, वेलची पावडर,( सुंठ)


कृती- आंब्याची साल काढून त्याचा गर काढून घ्यावा. जर तुम्ही फोडी केल्या असतील तर तुम्हाला आंबा मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे. आंब्याच्या गोडीनुसार तुम्हाला त्यात साखर अथवा गूळ घालायचे आहे. हे लक्षात ठेवा तुम्हाला मिश्रण खूपवेळ मिक्सरमधून काढायचे नाही. त्यामुळे आंब्याची चांगली चव निघून जाईल. मिक्सरमधून तयार मिश्रण काढून त्यात वेलची पावडर टाका. जर तुम्हाला वेलची पूड आवडत नसेल तर तुम्ही त्यात सुंठ घालू शकता. सुंठामुळे आंबरस पचण्यास मदत होते. आता आमरस तयार झाला आहे म्हटल्यावर तुम्ही त्यासोबत पुरी किंवा पोळी खाऊ शकता.  पण त्या आधी आमरस थोडा थंड करुन घेतल्यास उत्तम


पिस्त्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहे का?


खिचडी


khichdi


कधीकधी साधे जेवणसुद्धा उन्हाळ्यात जेवायला बरे वाटते. ताक आणि खिचडी असे कॉम्बिनेशनही खायला एकदम छान वाटते. घरच्या घरी अगदी 10 ते 15 मिनिटात खिचडी तयार होते.


साहित्य- 1 वाटी जुना तांदूळ, ½ वाटी हिरव्या सालीची मूग डाळ किंवा पिवळी मूग डाळ, आल- लसूण- मिरचीची पेस्ट, मोहरी, हिंग, तेल, कढीपत्ता, हळद, गोडा मसाला


कृती- कुकरच्या भांड्यात तुम्ही ही खिचडी कराल तर एकदम छान. कारण ती पटकन होते. तांदूळ आणि डाळ धुवून बाजूला ठेवा. एका भांड्यात खिचडी शिजवण्यासाठी लागेल इतके पाणी गरम करा. पाण्यात मीठ घाला. त्यामुळे तुमच्या खिचडीला अगदी व्यवस्थित मीठ लागेल.


आता कुकरच्या भांड्यात पाणी गरम करुन त्यात कढीपत्ता, मोहरी,हिंग,आल-लसूण-मिरची पेस्ट, कढीपत्ता घालून मिश्रण परतून घ्या.त्यात स्वच्छ धुतलेला तांदूळ आणि डाळ घाला. त्यात थोडी हळद घालून मिश्रण फोडणीवर परतून घ्या. त्यात थोडासा गोडा मसाला घालून गरम पाणी घाला आणि कुकरबंद करुन साधारण दोन शिट्ट्या काढून घ्या. जर तुम्हाला खिचडी पातळ हवी असेल तर त्यात थोडं जास्त पाणी घाला.


गरमा गरम खिचडीवर तूप घाला आणि मस्त थंडगार ताकासोबत त्याचा आस्वाद घ्या.


वाचा - Malvani Masala Recipe In Marathi


 पेज


कधीतरी खूप जास्त खाल्ल्यानंतर काहीच खायची इच्छा होत नाही. तेव्हा उकड्या तांदळाची पेज तुमच्या पोटाला आराम देते. शिवाय तुम्हाला एक वेगळी चव देखील देते.


साहित्य- उकडे तांदुळ, पाणी, मीठ


कृती- साहित्य इतके कमी हे की कृती कमी असणारच. कुकरच्या भांड्यात धुतलेले तांदुळ घेऊन त्यात नेहमीपेक्षा जास्त पाणी घाला. कुकरच्या 4ते 5 शिट्ट्या काढून कुकर उघडल्यानंतर त्यात मीठ घाला. मस्त खोलगट भांड्यात सर्व्ह करा. त्यासोबत तुम्हाला जर कैरीची चटणी मिळाली तर क्या बात है


 उकड


ukad


गरमा गरम उकड खायला अनेकांना आवडते. म्हणजे मी खूप जणांकडून ऐकले आहे की, उकड हा पदार्थ अगदी कोणत्याही सीझनमध्ये खायला एकदम फर्स्ट क्लास लागतो


उकडसाठी लागणारे साहित्य-  तांदळाचे पीठ, आंबट ताक, आल-लसूण- मिरची पेस्ट, मीठ, साखर


कृती- आबंट ताकात वरील साहित्य एकत्र करुन घ्या. सााधारण 5 मिनिटं ठेवा. एका कढईत तेल गरम करुन त्यात तुम्हाला फोडणी द्यायची आहे. फोडणीतील एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे कढीपत्ता. तुम्हाला कढीपत्ता जास्त टाकायचा आहे. कारण त्याची चव त्यात उतरते आणि ती चांगली लागते. फोडणी झाल्यानंतर त्यात तुम्हाला तयार मिश्रण टाकायचे आहे. फोडणीत ते मिश्रण गेल्यानंतर बुडबुडे यायला लागतील. पण तुम्हाला लगेचच त्यावर झाकण ठेवायचे आहे. साधारण उकड शिजेपर्यंत तुम्हाला मंद आचेवर ते ठेवायचे आहे. तयार उकडीवर कच्चे तेल घालून तुम्ही उकड सर्व्ह करा.


थालीपीठ आणि लोणी,दही


thalipith


पराठा खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही थालीपीठ हा प्रकार देखील ट्राय करुन पाहायला हवा. बाजारात थालीपीठाचे रेडीमेड पीठ मिळते. ते तुम्ही विकत आणू शकता.


तुमच्याकडे तयार पीठ  असेल तर तुम्हाला हवा बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, चवीपुरते मीठ घालायचे आहे. तयार थालीपीठ तव्यावर थापून तुम्हाला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे. तयार थालीपीठ तुम्ही लोणी किंवा दह्यासोबत खाऊ शकता. हा असा पदार्थ आहे ज्याने पोट भरतंच भरतं.


    दहीवडा


dahi wada


दह्याची आणखी एक गोड रेसिपी म्हणजे दहीवडा. जितका खायला मस्त तितका करायलाही सोपा. त्यामुळे तुम्ही या दिवसात दहीवडा करुन पाहायला हवा


साहित्य- उडदाचे जाडसर वाटलेले मिश्रण, मिरची, कोथिंबीर, बारीक चिरलेलं आलं, थोडा ओवा (पचण्यासाठी), दही आणि साखर


कृती- उडदाच्या जाडसर दळलेल्या मिश्रणात तुम्हाला बारीक ठेचलेली मिरची, कोथिंबीर, आल्याचे बारीक तुकडे, ओवा घालायचा आहे. तयार मिश्रणाचे गोळे तयार करुन मंद आचेवर तुम्हाला त्याची भजी तळून घ्यायच्या आहेत. तयार गरम भाजी पाण्यात टाकून तते पिळून घ्यायचे आहे. एका भांड्यात तुम्हाला दही  आणि साखर घेऊन मिश्रण चांगले फेटून घ्यायचे आहे. त्यात पिळलेले गोळे घालून वर चाट मसाला, लालतिखट भुरभुरायचे आहे.दही थंड असेल उत्तम


(सौजन्य- Instagram)