Types Of Nauvari Saree In Marathi - साडी नेसण्याच्या पद्धती आणि रेडीमेड नऊवारी साडी | POPxo

महाराष्ट्राची शान नऊवारी नेसण्याचे प्रकार (Types Of Nauvari Saree In Marathi)

महाराष्ट्राची शान नऊवारी नेसण्याचे प्रकार (Types Of Nauvari Saree In Marathi)

महाराष्ट्रीयन कोणताही सण म्हटला की सर्वात पहिलं समोर चित्र उभं राहतं ते नऊवारी साडीचं. नऊवारी साडी ही महाराष्ट्रातील साड्यांची शान आहे असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. कोणताही सण असला की, विशेषतः मराठी नवं वर्ष गुढीपाडवा की, सर्वच मुली अगदी लहान मुलींपासून ते मोठ्या महिलांपर्यंत नऊवारी साड्यांमध्ये सजूनधजून बाहेर पडलेल्या दिसतात. अगदी सण असो वा लग्न महाराष्ट्राच्या परंपरेत नऊवारी साडीला खूपच महत्त्व आहे. अर्थात या नऊवारी साड्या नेसण्याचेही अनेक प्रकार आहेत. हे  नक्की प्रकार कोणते याची तुम्हाला माहिती आहे का? या साड्या कशा प्रकारे नेसल्या जातात हे माहीत आहे का? हल्ली ही साडी नेसवण्याची पद्धत फारच कमी जणांना माहीत असते. तर काही जण नऊवारी साड्या शिऊनही घेतात. पण खरी मजा आहे ते नेसण्यातच. गुढीपाडवा अर्थात मराठी माणसांचा आणि हिंदू नववर्षाचा पहिला दिवस येऊन ठाकलाय. तर खास तुमच्यासाठी हा लेख - नऊवारी साड्यांचे प्रकार आणि कशा पद्धतीने या साड्या नेसल्या जातात याची माहिती तुम्हाला या लेखाद्वारे आम्ही सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला आवडेल तशी नऊवारी नेसून या नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करायला घ्या.


याचे प्रकार आणि नेसण्याच्या पद्धती


नऊवारीवर घालावेत कोणते दागिने


तयार नऊवारी कशी असते


नऊवारी साडी मिळण्याची मुंबईतील ठिकाणं


नऊवारी साडी म्हणजे काय (What Is Nauvari Saree)


नऊवारी म्हणजे साडीला येणारे नऊ वार अगदी अंगाशी चापून चोपून नेसायला लागणारी साडी. ही साडी नेसण्याची एक विशिष्ट पद्धत असते. मुळात ही साडी नेसण्यासाठी एक प्रकारे कसब आणि प्रशिक्षणही लागतं. तुमची आजी ही साडी नेसत असेल पण तुमच्या आईला ही साडी नेसता येतच असेल असं नाही. पण ही साडी नेसण्याचं कसब तुम्ही शिकून घेतलंत तर पुढील पिढीही या साडीची परंपरा जपू शकेल. नुसता काष्टा काढला की, नऊवारी नेसून झाली असं होत नाही. प्रत्येक नऊवारी नेसण्याची एक विशिष्ट पद्धत असते आणि ती पद्धत अंगवळणी पाडावी लागते. शेतात किंवा इतर कामं करणाऱ्या महिला ही नऊवारी साडी घोट्याच्या वर किंवा गुडघ्यापर्यंत नेसतात. तर सणा समारंभाला ही साडी गुडघ्याखालपर्यंत नेसली जाते. या साडीच्या दुभागलेल्या काष्टा पद्धतीमुळे सतत सावरावी लागत नाही आणि काम करण्यास सोपं जातं. इतकंच नाही तर जलद वावरण्यास आणि अगदी घोडेस्वारी करण्यासाठीही ही साडी नेसणं योग्य आहे. पूर्वी झाशीच्या राणीच्या काळात नऊवारी साडी नेसूनच राणीने लढाई केली होती असं म्हटलं जातं.


nauvari 1


भारतीय परंपरा (Indian Tradition)


भारतीय परंपरेमध्ये नऊवारी साडीचं स्वतःचं असं विशेष स्थान आहे. पारंपरिक पेहरावाला लुगडं असंही म्हटलं जात होतं. पण काही वर्षाने या नऊवारी साडीमध्ये अनेक बदल घडले आणि विविध पद्धतीने ही नऊवारी नेसू जाऊ लागली. नंतर याची जागा पाचवारीने घेतली. पण अजूनही सण - समारंभ म्हटला की, हमखास नऊवारी साडीच पुढे असते. लग्न - मुंज आजकाल नऊवारी साड्यांशिवाय पूर्णच होत नाही. नऊवारी साडीला अनेक वर्षांची परंपरा लाभलेली आहे. मध्यंतरीचा काळात नऊवारी काहीशी दुर्लक्षित राहिली होती. पण आता पुन्हा एकदा नऊवारी साड्यांना आधुनिक टच देऊन वेगवेगळ्या प्रकारामध्ये नेसलेली दिसून येत आहे. तसं बघायला गेलं तर आता तरूणाईदेखील नऊवारीकडे एथनिक वेअर अथवा फेस्टिव्हल वेअर म्हणून बघते. खरं तर आता सणासमारंभाला नऊवारी नाही तर मजा नाही अशी स्थिती दिसून येत आहे. आपली भारतीय परंपरा आपणच जपायला हवी या अनुषंगाने आता पुन्हा एकदा नऊवारीला खास दिवस आले आहेत. आता नऊवारी शिऊन घेतल्या जातात ज्याला स्टिच्ड नऊवारी म्हणतात. पण ही खरी परंपरा नक्कीच नाही.


तसेच साधेचे महत्त्व वाचा


याचे प्रकार आणि नेसण्याच्या पद्धती (Types Of Nauvari Saree And How to Wear)


नऊवारी साड्यांचे अनेक प्रकार आहेत. आपल्याला फक्त नऊवारी साडी इतकंच साधारणतः माहीत असतं. बऱ्याच जणींना वाटतं नऊवारी म्हणजे फक्त काष्टा काढणं. पण असं अजिबात नाही. नऊवारी साडीचे अनेक प्रकार आहेत. ते आपण आधी जाणून घेऊया-


1. ब्राह्मणी पद्धत (Brahmani Method)


brahmani


पूर्वीपासून ब्राह्मण पद्धतीच्या नऊवारी साड्या या विवाह सोहळ्याच्या वेळी अथवा सणा - समारंभाला नेसल्या जातात. ही नेसायची एक विशिष्ट पद्धत आहे. या नऊवारी साडीच्या काठाकडचा भाग वर उचलून कमरेला खोचला जातो. ज्याला ओचा असं म्हटलं जातं. या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे घोळदार ओचा. पूर्वी महिला या ओच्यामध्ये बऱ्याच वस्तू ठेवत असत. कारण हा ओचा साधारणतः 8 ते 10 इंचाचा असतो. शिवाय यामध्ये निऱ्यांचा घोळही जास्त असतो. या साडीमध्ये निऱ्या कमरेला न खोचता त्या एकत्र घेऊन त्याचं ‘केळं’ काढलं जातं. पूर्वी यामध्ये पैसे ठेवले जायचे. ही साडी साधारणतः पायापर्यंत झाकलेली असली तरीही तुमच्या पोटऱ्यांचा काही भाग मात्र उघडा राहतो. सध्या या साडी नेसताना आतमध्ये स्लॅक्सदेखील घातली जाते. पण पूर्वीच्या महिलांना त्याची गरज भासत नव्हती.


साडी काढण्याबद्दलही वाचा


2. कोल्हापूरी पद्धत (Kolhapur Method)


kolhapuri


यामध्ये साधारणतः दोन काष्टा असलेल्या नऊवारी साड्या असतात. ज्याला जिजाऊ डबल काष्टा असंही म्हटलं जातं. पण कोल्हापूरमधील बऱ्याच भागांमध्ये शेतकरी महिला ज्या नऊवारी साड्या नेसतात त्या साधारणतः गुढघ्यापर्यंत नेसतात. तर जिजाऊ डबल काष्टामध्ये दुभागलेल्या भागामध्ये दोन काष्टे दिसतात. ज्याला काठही असतात.  


3. पेशवाई पद्धत (Peshwa Method)


Peshwai


ही नऊवारी साडी नेसण्याची पद्धत साधारण ब्राह्मणी पद्धतीप्रमाणेच आहे. पण ब्राह्मणी पद्धतीच्या तुलनेमध्ये पेशवाई नऊवारीच्या ओचा हा कमी असतो. इतका मोठा ओचा या पद्धतीत काढला जात नाही. अगदी 4-5 इंचाचा ओचा काढला जातो. सुरूवातीच्या काळामध्ये पेशवाई पद्धतीची साडी नेसण्यासाठी भरजरी साड्यांचाच वापर केला जात होता. पण आता त्यामध्ये बऱ्यापैकी बदल झाला आहे.


लाँग गाऊन बद्दलही वाचा


4. मराठा पद्धत (Maratha Method)


या नऊवारी साडीमध्ये ओचा नसतो. पण या साडीचा काष्टा अशा पद्धतीने काढण्यात येतो की, तो पायापर्यंत राहील. ही साडी पायघोळ तर असतेच. पण याचं वैशिष्ट्य म्हणजे या साड्या नक्षीकाम केलेल्या असतात. अशा स्वरूपाच्या साड्याच मराठा नऊवारी पद्धतीमध्ये नेसल्या जातात.


5. कोळी पद्धत (Koli Method)


कोळी समाजामध्ये खूपच वेगळ्या पद्धतीने ही नऊवारी नेसण्यात येते. ही साडी गुडघ्यापर्यंत नेसली जाते. कारण समुद्रामध्ये काम करत असताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तशा पद्धतीत ती साडी नेसली जाते. साधारणतः कोल्हापूरी पद्धतीनेच ही साडी नेसतात. पण या साडीला जास्त घोळ नसतो आणि ही साडी अगदी घट्ट अशी नेसली जाते.  तर साडीच्या पदराचा भाग हादेखील कमरेला गुंडाळला जातो आणि ब्लाऊजवर फुलांची नक्षी असलेली कॉटनची ओढणी घेतली जाते. शिवाय या नऊवारी साड्यादेखील जास्त प्रमाणात कॉटनच्याच असतात. याचं वैशिष्ट्य म्हणजे या साड्यांवर फुलांचं नक्षीकाम जास्त प्रमाणात असतं.


6. लावणी पद्धत (Lavani Method)


19954950 839374329549116 884520185006915584 n


लावणी ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. अगदी बऱ्याच कार्यक्रमाला आपण लावणी डान्स करतो. त्यामुळे लावणी पद्धतीच्या साडीची आपल्याला गरज भासते. ही साडी लोकनृत्य सादर करताना नेसली जाते. अतिशय चापून चोपून अशी शरीराला घट्ट बसेल अशा तऱ्हेने ही साडी नेसण्यात येते. तर घुंगरू पायाला बांधावे लागतात. त्यामुळे पायाकडच्या बाजूला घोळ कमी असतो. तर साडीचा पदर हा एका सरळ रेषेमध्ये काढलेला नसतो आणि खांद्यावरून वरखाली अशा प्रकारे काढला जातो. त्याशिवाय मागचा काष्टा हा दोन्ही काठ मधोमध यावेत अशा तऱ्हेने काढला जातो. फार पूर्वी लावणीसाठी विशिष्ट काठापदराच्या साडीचा उपयोग केला जात होता. पण आताच्या फॅशननुसार डिझाईनर आणि अगदी सिंथेटिक साडीचा वापरही करण्यात येतो.


बॉलीवूड कनेक्शन (Bollywood Connection)


नऊवारी साडीचं बॉलीवूड कनेक्शन बघायला गेलं तर तसं जोरदार आहे. खरं तर बाजीराव मस्तानी या चित्रपटानंतर या नऊवारी साडीला अधिक महत्त्व आलं. अर्थात त्या चित्रपटामध्ये प्रियांका आणि दीपिकाला नेसवण्यात आलेली नऊवारी ही वेगळ्या पद्धतीची होती. पण तरीही त्यावेळी त्यांनी नेसलेली साडी कशी पारंपरिक नाही यावरून बरेच वाद झाले. पण त्यानंतरही नऊवारी नेसण्याच्या किती विविध पद्धती असू शकतात हे समोर आलं. नऊवारी साडीमध्येही वैविध्य आहे. याआधीदेखील बऱ्याच चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या नऊवारी साड्यांचा उपयोग करण्यात आला आहे. विशेषतः काही गाण्यांमध्ये विशेषतः नऊवारी साडीचा उपयोग केलेला दिसून येतो. आताच नाही तर अगदी पूर्वापासून बऱ्याच चित्रपटांमध्ये नऊवारी साडी अनेक अभिनेत्रींनी नेसल्या आहेत. नुकताच काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘मणिकर्णिका’ या कंगना राणौतच्या ऐतिहासिक चित्रपटातही विविध पद्धतीच्या नऊवारी साड्यांचा लुक पाहायला मिळाला.


नऊवारीवर घालावेत कोणते दागिने (Jewellery To Wear With Nauvari Saree)


nauvari


नऊवारी साडीने तर प्रत्येक स्त्री सुंदर दिसतेच. पण त्याला शोभेसे दागिने अंगावर असले की, त्याला अजूनच सोने पे सुहागा असं म्हटलं जातं. सणा- समारंभाला ही साडी नेसायची म्हटली की, दागिन्यांनी सजायला हवंच. नऊवारी कोणत्याही रंगाची असो. त्यावर सर्वात महत्त्वाचा दागिना म्हणजे नथ. मोत्याची नथ घातल्यावर तुमच्या चेहऱ्याला शोभा येते. तुम्ही सोन्याचे दागिने आणि मोत्याचे दागिने असं मिश्रण नऊवारी साडीवर घालयला हवं. केसांचा अंबाडा अथवा खोपा त्यामध्ये माळलेला गजरा, त्यानंतर मोत्याचे वेल आणि कुडी किंवा अगदी झुमकेही यावर चांगले दिसतात. गळ्याला घट्ट बसणारी अशी चिंचपेटी तर हवीच. त्याशिवाय याला शोभा नाही. त्याखालोखाल एक सोन्याच्या रंगाची ठुशी, काहीसा लांब असा मोत्याचा लफ्फा अथवा तीन पदरी मोत्यांचा हार, हातात पाटल्या अथवा बिल्वरचा एखादा प्रकार, मोत्याचा बाजूबंद, कंबरपट्टा, मेखला आणि पायात पैंजण. हा साज जेव्हा तुम्ही नऊवारी साडीबरोबर करता तेव्हा तुमचा पारंपरिक अवतार पूर्ण होतो असं समजलं जातं.


तयार नऊवारी कशी असते (Readymade Nauvari Saree)


सध्या बऱ्याच जणींना हौस तर असते नऊवारी नेसायची. पण स्वतःला नेसता येत नाही आणि नेसवायलाही कोणी मिळत नाही. मग अशावेळी काय करायचं. तर अशावेळी तयार नऊवारी अर्थात रेडीमेड नऊवारीचा पर्याय उपलब्ध असतो. बऱ्याच जणींना रेडीमेड आवडत नाही. पण तरीही घाईच्या वेळेत हा पर्याय नक्कीच चांगला आहे. यामध्ये ब्राह्मणी, मराठमोळी आणि लावणी पद्धतीच्या नऊवारी साड्या मिळतात. यामध्ये विशेषतः ब्राह्मणी पद्धतीच्या नऊवारीला जास्त मागणी असते. तुमचं माप घेऊन ही साडी शिवली जाते. साधारणतः बाजारामध्ये 300 रूपयांपासून या साड्यांची किंमत असते. तुम्ही जसं साडीचं वेगळं मटेरियल वापरला त्याप्रमाणे त्याची किंमत वाढते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचं फिटिंग उत्कृष्ट असतं.  त्यामुळे तुम्हाला वावरताना कोणताही त्रास होत नाही. शिवाय तुम्हाला हव्या त्या रंगामध्ये ही नऊवारी मिळते. या साड्या तुम्हाला मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी मिळू शकतात. तुम्हाला जर तुमच्या घरच्या सणा-समारंभाला नऊवारी साडी नेसायची असेल तर तुम्ही हा पर्यायदेखील निवडू शकता.


नऊवारी साडी मिळण्याची मुंबईतील ठिकाणं (Where To Get Nauvari Saree In Mumbai)


नऊवारी साडी तसं तर बऱ्याच दुकांनांमध्ये मिळते. पण अगदी तुम्हाला हवी असणारी पारंपारिक नऊवारी मिळण्याची काही खास ठिकाणं आहेत. ती जाणून घेऊयात -


1. गिरगाव पंचे डेपो - गिरगांव आणि दादर - गिरगावात नऊवारी साड्यांसाठी तुम्हाला या दुकानात खूपच चांगल्या नऊवारी मिळतील. नऊवारीचे विविध प्रकार तुम्हाला इथे मिळतात.


कुठे आहे - गिरगावमध्ये मांगलवाडी समोर, दादरमध्ये प्लाझासमोर


2. पारशिवनीकर - डोंबिवली पूर्वला फडके रोडवर असणारं हे दुकान लहान आहे. पण अगदी पारंपरिक पद्धतीच्या नऊवारी साड्या यांच्याकडे उपलब्ध आहेत. अगदी रेडीमेड साड्यादेखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 


कुठे आहे - फडके रोडलगत


3. साडीघर - दादर हे खरंतर साड्यांचं माहेरघर असं म्हणतात. दादरमधील साडीघर हे नऊवारी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. शिवाय या ठिकाणी रेडीमेड साड्यांसाठी बुकिंगही करावं लागतं. इथे जास्त ब्राह्मणी पद्धतीच्या साड्यांना मागणी असते. विवाहासाठी लागणाऱ्या साड्या या दुकानामधून रेडीमेड जास्त प्रमाणात घेतल्या जातात.


कुठे आहे - दादर पश्चिम, सुविधासमोर


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा -


या लग्नाच्या सीझनमध्ये साडी नेसा वेगळ्या पद्धतीने


लग्नात साडीला देऊया डिफरंट लुक, हटके स्टाईल


साडी नेसताना या '14' चुका टाळा