तुपाचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का in Marathi | POPxo

तुपाचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का

तुपाचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का

"खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी" ही म्हण आपण ऐकलीच असेल. तुपाला भारतीय खाद्यसंस्कृतीत अगदी मानाचं स्थान आहे. अनेक खाद्यपदार्थांना तुपामुळे एक विशिष्ट स्वाद आणि सुगंध येतो. गरमागरम पुरणपोळी, मोदक, मुग डाळ खिचडी, शिरा असे  अनेक पदार्थ तुपाशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. स्वयंपाकासोबत अनेक धार्मिक विधींमध्येदेखील तुपाचा वापर केला जातो. या शिवाय घरात मंगल प्रसंगी देवाजवळ तुपाचा दिवा लावण्यात येतो. सण-समारंभ, लग्नविधी अशा अनेक कार्यक्रमातील जेवणाच्या पंगतीत पाहुणचार करताना आग्रहाने तुप वाढलं जातं. तूप आरोग्य आणि त्वचेसाठीदेखील फायदेशीर ठरतं. यासाठी प्राचीन काळापासून आहारात तुपाचा वापर करण्यास सांगितलं जातं. तुपात मधूर, शक्तीशाली, पित्तशामक, मेद आणि शुक्रधातूंचे पोषण करणारे घटक असतात. शिवाय त्यात व्हिटॅमिन्  ए आणि डी, कॅल्शियम, फॉस्फरस मिनरल्स, पोटॅशियम, अॅन्टी ऑक्सिडंट आणि अॅन्टी व्हायरल घटकदेखील असतात. दोन प्रकारचं तूप तुम्ही आहारात वापरू शकता. गाईच्या दुधापासून आणि म्हशीच्या दुधापासून असे दोन प्रकारचे तूप तयार केले जाते. या दोन्ही प्रकारच्या तुपाच्या सेवनाने शरीर बळकट आणि निरोगी होण्यास मदत होते.


ghee benefits 2


मात्र आजकाल तुपाबाबत अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. तुपामुळे वजन वाढतं या समजापोटी अनेक जण आहारातून तुप वर्ज्य करतात. मात्र आयुर्वेद शास्त्रानुसार तुप शरीराच्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचे असते. म्हणूनच  आयुर्वेदात तुपाला सात्विक अन्नाचा दर्जा देण्यात आला आहे. अनेक विकारांमध्ये तुपात औषधे टाकून त्याचे चाटण रुग्णाला दिले जाते. शरीरस्वास्थ निरोगी राहण्यासाठी रिकाम्यापोटी तुपाचे सेवन केल्यामुळे अथवा नाकात शुद्ध तूप टाकल्याने अनेक आजारपणे दूर ठेवता येतात.


तुपाचे आरोग्यदायी फायदे


शरीराला उष्णता मिळते


हिवाळ्यात तुपात तयार केलेले विविध प्रकार लाडू, हलवा, शिरा असे पदार्थ खाण्याची  पद्धत आहे. कारण तुपातून तुमच्या शरीराला उष्णता मिळू शकते. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी तुप फायदेशीर ठरू शकते.


इन्स्टंट एनर्जी मिळते


ghee benefits 1


अनेक संशोधनानुसार तुपात त्वरीत उर्जा निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे.  शरीराची झीज भरून काढण्यासाठी तुप फायदेशीर ठरते. यासाठी नवमातांना बाळंतपणानंतर झालेली शरीराची  झीज भरून काढण्यासाठी, खेळाडूंना त्यांचा स्टॅमिना टिकविण्यासाठी, कुस्ती खेळणाऱ्या लोकांना तुपाचा खुराक देण्यात येतो.


स्मरणशक्ती वाढते


तुपाचा तुमच्या मेंदूच्या आरोग्यावरदेखील चांगला फायदा होतो. ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्यास मेंदूच्या नसांना योग्य पोषण मिळते. नियमित तुप खाण्यामुळे तुम्हाला भविष्यात अल्झामर अथवा स्मृतीभ्रंश होण्याचा धोका कमी असतो.


मुळव्याधीचा त्रास कमी होतो


ghee benefits 5


नियमित आहारात तुपाचा समावेश केल्यास अथवा  झोपताना दुधात एक चमचा तूप टाकून प्यायल्यास सौचाला साफ होते. ज्यामुळे मुळव्याधीचा त्रास कमी होतो.


सांधेदुखीतून आराम मिळतो


तुपामुळे शरीराला नैसर्गिक वंगण मिळते. शिवाय तुपात ओमॅगा 3 फॅटी असतात ज्यामुळे सांध्याचे कार्य सुधारते आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.


लहान मुलांच्या वाढीसाठी उत्तम


लहान मुलांच्या वाढीसाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी तूप एक योग्य  आहार आहे. तुपातील ओमॅगा 3 फॅटी अॅसिडमुळे तुमची मजबूत राहतात.


वजन नियंत्रित राहते


ghee benefits 3


तुपाचे सेवन केल्यामुळे पचनशक्ती सुधारते. पचनशक्ती सुधारल्यामुळे तुम्हाला वेळेत भूक लागते आणि तुम्ही अवेळी चुकीचे पदार्थ कमी खाता. ज्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.


तूप कॅन्सर पेंशटसाठी उपयुक्त


तुप कर्करोगाच्या रूग्णासाठी अतिशय फायदेशीर आहे. कारण तुपामध्ये कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी करण्याचे गुणधर्म असतात.


अशक्तपणा कमी होतो


तुपामध्ये मेंदूच्या कार्याला स्फुर्ती देण्याचे सामर्थ्य आहे. ज्यामुळे तुम्ही लवकर थकत नाही. अशक्तपणा आल्यास तुपाचा आहार वाढवावा ज्यामुळे तुम्हाला उत्साही वाटू शकते.


हातापायाची जळजळ कमी होते


तुप थंड गुणधर्माचे असल्यामुळे तुपाने हात आणि पायाच्या तळव्यांना मालिश केल्यामुळे हातापायांना होणारी जळजळ कमी होते.


डोळ्यांचे विकार कमी  होतात


डोळ्यांच्या समस्या असतील तर डोळ्यांमध्ये शुद्ध तूप टाकल्यामुळे चांगली झोप लागते. शिवाय शुद्ध तुपापासून तयार केलेले काजळ डोळ्यांमध्ये लावल्यास डोळ्यांना आराम मिळतो.


मुत्रविकार कमी होतात


मुत्रविकारांची समस्या असेल तर जेवणाआधी आणि जेवणानंतर औषधी तूप घेतल्यास मूत्र समस्या कमी होतात.


उचकी थांबते


उचकी लागल्यास ती लवकर थांबत नसेल तर तुपाचे चाटण घ्या. ज्यामुळे उचकी लवकर थांबण्यास मदत होईल.


अल्सर बरा होतो


पोटात अल्सरमुळे झालेले व्रण तुपाने बरे होतात. त्यामुळे अशा रुग्णांनी तूप सेवन केल्यास पोटात होणाऱ्या वेदनांमधून आराम मिळू शकतो.


जुलाबाचा त्रास कमी होतो


जुलाबाचा त्रास होत असेल तर सुंठ, साखर आणि तुपाचे चाटण करावे. ज्यामुळे तुम्हाला चांगला आराम मिळू शकतो. जुलाबामुळे पोट रिकामे होते ज्यामुळे तुम्ही डिहाड्रेट होता. मात्र तुपामुळे आतड्यांना स्निग्धता मिळते ज्यामुळे पोट दुखण्याचा त्रास कमी होतो.


तुपाचे त्वचेवर होणारे चांंगले फायदे


  • तुपामुळे तुमच्या त्वचेचे योग्य पोषण होते. नितळ आणि चमकदार त्वचेसाठी नियमित आहारातून तूप घेण्यासोबतच त्वचेवर तुपाने मालिश देखील जरूर करा. कारण तुपामुळे तुमच्या त्वचेतील ओलावा कायम राहतो आणि त्वचा कोरडी पडत नाही.   

  • जखम, व्रण, पायांच्या टाचा फुटणे, अंगाला खाज येणे अशा त्वचेच्या समस्यांवर आपण शुद्ध तूपाचा मलमासारखा वापर करू शकतो.

  • जुने तूप पूर्वीच्या काळी युद्धात झाल्यामुळे होणाऱ्या जखमा बऱ्या करण्यासाठी वापरला जात असे. त्यामुळे तूप जितकं जुनं तितकं ते त्वचेसाठी उत्तम ठरतं.


नाकात तूप टाकून करा आजारपणांवर करा मात


  • केसांच्या समस्या दूर करण्यासाठी आणि केस वाढण्यासाठी दररोज नाकात शुद्ध तेलाचे दोन थेंब टाका.

  • त्वचेवर अॅलर्जी उठत असेल तर नाकात तूप टाकल्यामुळे ती कमी होऊ शकते.

  • मायग्रेनच्या त्रासातून मुक्त व्हायचं असेल दररोज नाकात दोन थेंब शुद्ध तूप टाकण्याची सवय लावा.

  • डोकेदुखी थांबविण्यासाठी नाकात तूप टाकल्यामुळे अथवा डोक्यावर तुपाचा मसाज केल्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो.

  • नाकातून रक्त येत असल्यास नाकात तूप टाकल्यामुळे आराम मिळतो.

  • नाकाचे हाड वाढल्यास नाकात तूप सोडल्यामुळे बरे वाटते.

  • सर्दी झाल्यास नाकात तूप टाकल्यामुळे चोंदलेले नाक मोकळे होते


तूप बनविण्याची घरगुती पद्धत


ghee benefits 5 %281%29


नियमित दुधावरची मलई फ्रीजमध्ये साठवून ठेवा. मलई हवाबंद डब्यात आणि फ्रीजमध्ये  ठेवल्यामुळे लवकर खराब होत नाही. पुरेशी मलई साठल्यावर ती भांड्यात काढा आणि घुसळून त्यापासून लोणी तयार करा. लोणी काढण्यासाठी विशिष्ठ वेगात ताक घुसळण्याची गरज असते. आजाकाल मिक्सर अथवा फूडप्रोसेसरमध्ये लोणी काढले जाते. लोणी लवकर जमा होण्यासाठी तुम्ही त्यात बर्फ अथवा थंड पाणी वापरू शकता. लोण्याचे भांडे गॅसवर ठेवून मंद आचेवर लोणी कढू द्या. हळू हळू लोण्याचे तुपात रूपांतर होऊ लागेल. लोण्याचा रंग बदले पर्यंत ते कढू द्या. लोणी कढवताना त्यात तुम्ही विड्याचे पान टाका. कढलेले तूप थंड झाल्यावर ते गाळून हवाबंद बरणीत भरून ठेवा.


तुपाबाबत असलेले काही प्रश्न FAQs 


तुप लवकर खराब होते का ?


नाही तूप लवकर खराब होत नाही. घरी केलेले आणि चांगले कढवले असल्यास तुम्ही तूप अनेक महिने टिकवून ठेवू शकता.


कोलेस्ट्रॉल अथवा रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांनी तूप खाणे योग्य आहे का ?


तूप आरोग्यासाठी नेहमीच उत्तम असते. जरी तुम्हाला कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबाचा त्रास असला तरी तुम्ही प्रमाणात तुपाचा आहार घेऊ शकता. कारण तुपामुळे तुमचे मेटाबॉलिझम वाढते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. मात्र यासाठी तुम्हाला घरातील शुद्ध तूप आहारातून घ्यावे लागेल. बाजारात मिळणाऱ्या बटरचा वापर करणं चुकीचं ठरेल


आमच्या घरी सर्व जेवण तूपात तयार केले जाते आम्ही खाताना खाद्यपदार्थांवर तूप घेऊ शकतो का ?


ghee benefits 8


प्रत्येक व्यक्तीने दररोज कमीतकमी तीन ते चार चमचे तूप खाणे आरोग्यासाठी हितकारक आहे. याप्रमाणानुसार तूप तुम्ही खाता का याची तपासणी करा.  तुम्ही जर स्वयंपाकासाठी प्रमाणात तूप वापरत असाल तर खाद्यपदार्थांवर वरून तूप खाण्याची विशेष गरज नाही. मात्र रोज सकाळी औषधासाठी ते रिकाम्या पोटी तूप घेण्यास काहीच हरकत नाही.


बाजारातील विकतचे तूप की घरी तयार केलेले तूप कोणतं तूप आहारासाठी चांगलं ?


बाजारात आजाकाल घरी केलेलं शूद्ध तूपदेखील विकत मिळतं. जर तुम्हाला घरी तूप तयार करणं शक्य नसेल तर बाजारातून शुद्ध तूप विकत घ्या. मात्र डालडा अथवा बटर आहारासाठी नक्कीच चांगलं नाही.


आहारासाठी म्हशीचं तूप की गाईचं तूप योग्य ठरेल ?


दोन्ही प्रकारचं तूप आरोग्यासाठी योग्यच असतं. मात्र तुम्हाला यापैकी कोणत्या प्रकारचं तूप पचतं ते महत्त्वाचं आहे.


तुप आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी नक्कीच महत्त्वाचं आहे. मात्र कोणताही पदार्थ अती प्रमाणात खाऊ नये. कोणताही पदार्थ अती प्रमाणात सेवन केल्यास निसर्गनियमानुसार त्याचे दुष्परिणाम भोगावेच लागणार. म्हणूनच तुपाचे सेवनदेखील आहारात योग्य प्रमाणात करावे. आयुर्वेदशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने कमीने कमीत कमी तीन ते चार चमचे तूप दिवसभरात सेवन करावे. या प्रमाणापेक्षा तूपाचे सेवन केल्यास तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता अधिक आहे. 


अधिक वाचा


दररोज काहीतरी नवीन स्वयंपाक करण्यासाठी ट्राय करा या ‘टॉप 25’ भारतीय डिनर रेसिपीज


उन्हाळ्यात जेवणाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही करा या रेसिपीज


पदार्थांचे असे ‘कॉम्बिनेशन’ आरोग्यासाठी ठरु शकते घातक


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक