मुळव्याध हा रूग्णाला बेजार करणारा एक आजार आहे. कारण याची लक्षणे सुरूवातीला जाणवत नाहीत. शिवाय अवघड जागेवर असलेल्या मुळव्याधीचे निदान आणि उपचार करण्यासाठी अनेकांना नेहमी संकोच वाटतो. या कारणामुळे बऱ्याचदा मुळव्याधीकडे दुर्लक्ष केले जाते. जेव्हा मुळव्याधीमुळे दैनंदिन काम करणं अथवा बसणं कठीण जाऊ लागतं तेव्हा यावर उपचार करण्याकडे भर दिला जातो. तोपर्यंत मुळव्याधीची समस्या अधिकच वाढलेली असते. यासाठी प्रत्येकाला मुळव्याधीविषयी माहीत असणं फारच गरजेचं आहे. कारण वेळेवर उपचार केल्यास मुळव्याधीपासून नक्कीच मुक्तता मिळू शकते. मुळव्याधीवर वैद्यकीय आणि घरगूती अशा दोन्ही प्रकारे उपचार केले जातात.
Table Of Content
मुळव्याध म्हणजे काय ? (What Is Piles In Marathi)
मूळव्याध लक्षणे (Symptoms Of Piles In Marathi)
मुळव्याधीची कारणे (Causes Of Piles In Marathi)
मुळव्याधीवर काय उपचार करावेत (Home Remedies For Piles In Marathi)
मुळव्याधीवर घरगुती उपचार (Piles Home Remedies In Marathi)
मुळव्याधीबाबत असलेलेल काही प्रश्न (FAQ's)
मुळव्याध हा गुदद्वाराच्या मुखावर होणारा एक विकार आहे. आयुर्वेदानुसार या विकाराची दोन प्रकारात विभागणी करता येऊ शकते. एका प्रकारात गुदद्वारावर मोडासारखा भाग येत असल्यामुळे त्याला मोड मुळव्याध असे म्हणतात. तर दुसऱ्या प्रकारात गुदद्वारातून रक्त येत असल्यामुळे त्याला रक्त मुळव्याध अथवा असे म्हणतात. मोड मुळव्याधीचे रूपांतर रक्त मुळव्याधीत होऊ शकते. गुदद्वाराजवळ काही महत्वाच्या रक्तवाहिन्या असतात. अयोग्य आहारामुळे आणि बैठ्या जीवनशेैलीमुळे या रक्तवाहिन्यांना सुज येते आणि त्यातून रक्त येऊ लागते. गुदद्वाराजवळ मुळव्याध होत असल्यामुळे बऱ्याचदा रूग्णाला आपल्याला मुळव्याधीचा त्रास होत आहे हे समजण्यास वेळ लागतो. शिवाय प्रत्येकाच्या मुळव्याधीचा आकार आणि प्रकार हा निरनिराळा असू शकतो. शिवाय गुदद्वाराच्या आत आणि बाहेर अशा दोन्ही बाजूने मुळव्याधी होऊ शकते. मुळव्याधीमुळे अती रक्तस्त्राव झाल्यास तुम्हाला अशक्तपणा येऊ शकतो. बऱ्याचदा यामुळे इनफेक्शन होण्याचा धोकाही वाढतो. जर गुदद्वाराजवळ भेगा पडल्या असतील तर त्याला भगंदर अथवा फिशर असं म्हणतात. भगंदरच्या वेदना आणि दाह असह्य असतो. मुळव्याधीचा त्रास लहान मुलांना होत असेल तर त्याला रेक्टल प्रोलॅप्स असं म्हणतात. शौचाला त्रास झाल्यामुळे गुदद्वारीचे मांस बाहेर येण्याला रेक्टल प्रोलॅप्स असं म्हणतात.
जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर त्यामुळे मुळव्याध होण्याची शक्यता आधिक वाढते. पोट स्वच्छ न झाल्यास बद्धकोष्ठता होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या लोकांनी वेळेत या समस्येवर उपाय न केल्यास भविष्यात मुळव्याध होण्याची शक्यता अधिक वाढते. बद्धकोष्ठतेमुळे गुदद्वाराजवळील मळ कठीण होतो. ज्यामुळे तो सहज बाहेर येऊ न शकल्यामुळे गुदद्वाराजवळच्या रक्तवाहिन्या कमजोर होतात. कुथूंन शौच बाहेर काढण्याच्या प्रयत्नांमध्ये मुळव्याधीचा त्रास हळू हळू वाढतच जातो. त्याचप्रमाणे बद्धकोष्ठता आणि वजन वाढविण्यासाठी हा उपाय करून पहा.
ऑफिसमध्ये अथवा घरी तासनतास बसून काम करणाऱ्या लोकांना मुळव्याध होण्याची शक्यता अधिक वाढते. बैठी जीवनशैली असलेल्या लोकांची शारीरिक हालचाल कमी असते शिवाय जर ते कोणताही व्यायाम करत नसतील तर त्यांना अपचन, बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू लागतो. ज्यामुळे पुढे मुळव्याध होण्याची शक्यता अधिक असते. मूळव्याधीचा त्रास प्रेग्नंन्सीमध्ये ही होऊ शकतो.
अती तेलकट, तिखट, मसालेदार आणि मीठाचे पदार्थ खाणे अथवा आहारात मैद्यापासून बनवलेले पदार्थ खाणे, अती प्रमाणात मांसाहार, अती चहा अथवा कॉफी घेणे यामुळे तुम्हाला मुळव्याध होऊ शकतो. पचनसाठी योग्य आहार आवश्यक असतो. पण अशा पदार्थांमुळे पचनक्रियेवर भार पडतो आणि अपचन होते. ज्याचे रूंपातर पुढे मुळव्याधीमध्ये होऊ शकते.
मद्यपान अथवा धूम्रपानाची सवय नेहमीच घातक ठरते. जे लोक अती प्रमाणात व्यसन करतात त्यांचे शरीर लवकर डिहायड्रेट होते. मद्यपानाची सवय सोडणे हे वेळीच केले पाहिजे. नाहीतर पाईल्स होण्याची शक्यता देखील नक्कीच वाढते.
नियमित अती जागरण केल्यामुळे तुम्हाला पाईल्स होऊ शकतो. कारण जागरणाचा परिणाम तुमच्या शरीर आणि पचनक्रियेवर होत असतो.
जर तुम्ही नेहमी अवेळी जेवत असाल तर तुमच्या शरीराला अन्नाचे पचन करणे कठीण जाते. ज्यामुळे तुम्हाला भविष्यात पाईल्स अथवा मुळव्याध होऊ शकतो.
जर तुमच्या आई अथवा वडीलांना मुळव्याधीचा त्रास असेल तर अनुवंशिकतेने तुम्हालाही मुळव्याधी होऊ शकते.
शिळे अन्न पचायला जड जाते. पचन चांगले होण्यासाठी आणि निरोगी शरीरासाठी नेहमी ताजे अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र काही जणांना अन्न वाया जाऊ नये यासाठी शिळे अन्न खाण्याची सवयच लागलेली असते. शिळे अन्न सतत खाण्याने तुम्हाला मुळव्याधीचा त्रास होऊ शकते.
गरोदरपणात पोटाचा आकार वाढल्याने अपचन आणि बद्धकोष्ठता या समस्या वारंवार जाणवतात. जर गरोदरपणी तुम्ही अयोग्य आहार घेतला तर तुम्हाला त्यामुळे मुळव्याधीचा त्रास होऊ शकतो. शिवाय गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीनंतर गुदद्वारावर गर्भाचा ताण आल्यामुळेदेखील मुळव्याधीचा त्रास होण्याची शक्यता वाढते. यासाठी वाचा गरोदरपणात होणाऱ्या बद्धकोष्ठतेची कारणे आणि सोपे उपाय
जुलाब आणि अतिसारामुळे तुम्हाला मुळव्याधीचा त्रास होऊ शकतो. कारण जुलाब अथवा अतिसाराच्या समस्येमुळे पोटातील पाणी शौचावाटे पूर्णपणे निघून जाते. ज्यामुळे तुम्ही डिहायड्रेट होता आणि गुदद्वाराचे मांस बाहेर येते. ज्यामुळे मुळव्याधीचा त्रास सुरू होतो.
जी माणसे अती वजन उचलण्याचं काम करतात त्यांच्या गुदद्वारावर ताण येतो. या ताणाचा परिणाम तुम्हाला मुळव्याध होण्यामध्ये होऊ शकतो.
मुळव्याधीवर वैद्यकीय आणि घरगुती अशा दोन्ही प्रकारे उपचार केले जातात. तुमचा मुळव्याधीचा त्रास नेमका कसा आहे यावरून कोणते उपचार करावेत हे ठरवावे लागते.
मुळव्याधीचा त्रास वाढू लागल्यास तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे. मात्र संकोच वाटल्याने अनेकजण या व्याधीकडे दुर्लक्ष करतात. डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर प्रथम तुमची शारीरिक तपासणी करतात. ज्यासोबत ते तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतात. ज्यामुळे त्यांना तुमच्या मुळव्याधीचे कारण समजते. तुमच्या कुटूंबात इतर कोणाला मुळव्याधीचा त्रास आहे का? शौचाला जाताना त्रास होतो का आणि रक्त पडते का? शौचाचा रंग कसा असतो ? तुमच्या कामाचे स्वरूप काय ? अशा काही प्रश्नांवरून आणि मुळव्याधीच्या परिक्षणावरून डॉक्टरांना तुमच्या दुखण्याचे स्वरूप समजते.
जर मुळव्याधी गुदद्वाराच्या आतील बाजूस असेल तर डॉक्टर तुमचे प्रोटोस्कोपच्या मदतीने डिजीटल रेक्टल परिक्षण करतात. काही वेळेस जर व्याधी गंभीर स्वरूपाची असेल तर तुम्हाला त्यासाठी शस्त्रक्रिया करून उपचार करावे लागतात. डॉक्टर जखम भरून निघण्यासाठी औषध आणि मलमदेखील देतात. ज्यामुळे आराम मिळू शकतो. काही दिवस त्यानंतर तुम्हाला त्रास जाणवतो मात्र मुळव्याधीची समस्या कायमस्वरूपी कमी होऊ शकते. जवळजवळ दहा पैकी एकाला मुळव्याधीसाठी ऑपरेशन करावे लागते.
यासोबतच शस्रक्रीया न करता काही ओव्हर दी काऊंटर औषधे आणि मलम लावूनदेखील मुळव्याधीमध्ये आराम मिळतो. मात्र यासाठी तुम्हाला तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे.
बऱ्याचदा मुळव्याधी घरगुती उपचार (mulvyadh gharguti upay) करून देखील बरी करता येऊ शकते. गंभीर स्वरूप नसल्यास अथवा मुळव्याधीची सुरूवात असल्यास तुम्ही काही उपाय आणि आहारात बदल करून मुळव्याधीपासून नक्कीच सुटका मिळवू शकता.
दररोज रात्री कोमट पाण्यातून त्रिफळा चुर्ण घ्या. त्रिफळा चुर्णामुळे तुमचे पोट सकाळी स्वच्छ होते. सौैचाला साफ होऊ लागल्यामुळे मुळव्याधीची समस्या हळुहळु कमी होते. नियमित 21 दिवस हा प्रयोग करा. ज्यामुळे तुम्हाला अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होईल. यासोबतच त्रिफळा चुर्णाचे फायदे देखील जाणून घ्या.
ताक हे अपचनावरील एक रामबाण उपाय आहे. दररोज दुपारी जेवताना एक ग्लास ताक प्या. ताकात सैंधव मीठ आणि जिरेपूड टाका. ज्यामुळे तुमच्या पोटातील अन्नाचे पचन होण्यास मदत होईल. मुळव्याधीच्या रूग्णांनी नियमित ताक प्यायल्याने त्यांना सौचाला त्रास होणे कमी होईल.
रात्रीचे जेवण हलके करा आणि झोपण्याआधी कमीत कमी दोन तास आधी जेवा. ज्यामुळे झोपताना तुमच्या पचनसंस्थेवर ताण येणार नाही. रात्री जड जेवण केल्यास अन्न पचनक्रिया उशीरा पर्यंत सुरू राहते. ज्यामुळे तुमच्या आतडयांवर अतिरिक्त भार येतो आणि अन्नाचे पचन नीट होत नाही. अपचनाचा परिणाम तुमच्या गुदद्वारावर होतो आणि तुम्हाला मुळव्याध होण्याची शक्यता आधिक वाढते.
नियमित मुबलक पाणी पिण्याने तुमचे शरीर हायड्रेट राहते. शरीराचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी शरीराला पुरेश्या पाण्याची गरज असते. पाणी भरपूर पिण्याने तुमच्या शरीराच्या सर्व क्रिया सुरळीत होतात. अपचन कमी झाल्याने मुळव्याधीची समस्या कमी होते..
काकडी, बीट, गाजर, मुळा अशा सॅलेड अथवा कोशिंबीर खाण्याने तुमच्या शरीराला पुरेशे फायबर मिळतात. फायबरमुळे मलावरोध कमी होतो. मुळव्याध कमी होण्यासाठी शरीराला भरपूर प्रमाणात फायबर मिळतील याची काळजी घ्या..
मुळव्याधीचा फार त्रास होत असेल तर हा उपाय फारच उपयुक्त ठरेल. यासाठी एका टबमध्ये गरम पाणी घ्या आणि त्यात थोडं मीठ टाका. या कोमट पाण्यामध्ये काही वेळ बसा. ज्यामुळे तुमच्या गुदद्वाराला कोमट पाण्याचा शेक मिळेल. हा उपाय केल्यामुळे मुळव्याधीमुळे होणारा दाह काही वेळासाठी कमी होऊ शकेल.
जेष्ठमध आणि तुपाचे चाटण दिवसभरात कमीत कमी तीन वेळा घ्या. कारण यामुळे तुम्हाला सौचाला त्रास होणार नाही.
कोरफडाच्या गरामुळे अनेक त्वचा समस्या कमी होऊ शकतात. कारण कोरफडामध्ये अॅंटी इनफ्लैमटरी गुणधर्म असतात. कोरफडाचा गर गुदद्वारावर लावल्यामुळे मुळव्याधीचा त्रास कमी होतो.
काळ्या मनुका रात्री भिजत ठेवा आणि सकाळी त्या अनोशीपोटी चघळून खा. ज्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होईल. ज्यामुळे तुम्हाला मुळव्याधीच्या त्रासातूनदेखील आराम मिळेल.
जर तुम्हाला मुळव्याधीचा त्रास होत असेल तर गुदद्वाराच्या दुखऱ्या भागात नारळाच्या तेलाने मसाज करा. मसाज केल्यावर तो भाग गरम पाण्याच्या पिशवीने अथवा एखाद्या आईसपॅकने शेकवा. ज्यामुळे तुम्हाला मुळव्याधीपासून आराम मिळू शकतो.
मुळव्याधीचा त्रास पूर्णपणे बरा होऊ शकतो मात्र तुमची समस्या नक्की काय आहे हे तपासणे गरजेचे आहे. जर मुळव्याधीची सुरूवात असेल तर घरगुती उपचार आणि जीवनशैलीत बदल करून तुम्हाला आराम मिळू शकतो. मात्र मुळव्याधीचा त्रास गंभीर असेल आणि शौचाला रक्त पडत असेल तर त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल.
मुळव्याधीचा त्रास असलेल्या लोकांनी आहारात नाचणी, उडीद, मका, वाल, पावटा, चणे, शेंगदाणे, चवळी, पापड आणि लोणची असे पदार्थ टाळावेत. त्यावऐवजी फायबरयुक्त पदार्थांचा समावेश अधिक प्रमाणात करावा. ज्यामुळे शौचाला त्रास होत नाही.
मुळव्याध असलेल्या लोकांनी तांदूळ, गहू, ज्वारी, पडवळ, दुधी, सुरण, तोंडली, मुग, मटकी, लोणी, तूप, ताक, काळ्या मनुका, सॅलेड असे पदार्थ आहारात समाविष्ठ करावे.
भविष्यात मुळव्याधीचा त्रास होऊ नये अशी ईच्छा असेल तर निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा. योग्य आणि सतुंलित आहार, पुरेसा व्यायाम आणि प्राणायम, लवकर झोपून लवकर उठण्याची सवय अशा गोष्टी करून तुम्ही मुळव्याधीला कायमस्वरूपी दूर ठेवू शकता.
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक