माझी आणि करणची भेट लंडनला झाली, जिथे आम्ही दोघंही पुढचं शिक्षण घेण्यासाठी आलो होतो. आमची लव्हस्टोरी परफेक्ट होती आणि लगेच लग्नाचा विचार केला नसला तरी भविष्यात करूच हे मात्र नक्की होतं. जेव्हा मी लंडनहून परत आले, तेव्हा घरच्यांनी माझ्यामागे लग्न करण्यासाठी तगादा लावला. खरंतर करण हा माझ्यापेक्षा लहान होता आणि त्याला इतक्यात लग्न करायचं नव्हतं. मुख्य म्हणजे मला त्याच्यावर कोणत्याही प्रकारे लग्नासाठी प्रेशर टाकायचं नव्हतं. पण अखेर माझ्या घरच्यांच्या दबावाखाली येऊन तो लग्नाला हो म्हणाला. त्याच्याही घरच्यांची त्याने इतक्या लवकर सेटल व्हावं अशी ईच्छा नव्हती. पण नंतर तेही लग्नाला तयार झाले. मग तर माझ्या आनंदाला उधाणच आलं. जणू मी एखाद्या स्वप्नवत दुनियेत असल्यासारखं मला भासू लागलं होतं. माझं लग्न होणार होतं आणि तेही माझं ज्या मुलावर प्रेम होतं त्याच्याशी.
लग्न ठरलं म्हटल्यावर एकेका गोष्टीच्या खरेदीला आणि बाकीच्या तयारीला सुरूवात झाली. मला अपेक्षा होती की, त्याची आई मला त्यांच्यासोबत लग्नाच्या शॉपिंगला नेईल आणि आम्ही एकत्र वेळही स्पेंड करू. पण तसं कधी झालंच नाही. मला वाटलं की त्यांना माझी आवड कळली आणि त्या मला आवडेल असेच कपडे माझ्यासाठी खरेदी करतील.
त्यांच्याकडच्या पद्धतीप्रमाणे साखरपुड्याच्या दिवशी होणाऱ्या सूनेने मुलांकडच्यांनी दिलेलेच कपडे घालायचे असतात. त्याप्रमाणे माझ्या सासूबाईंनी मला एका बुटीकचा पत्ता दिला आणि त्या ठिकाणी जाऊन माझ्या ब्लाऊजचं माप द्यायला सांगितलं. मी तिकडे गेल्यावरही मला नेमके कोणते कपडे माझ्यासाठी निवडले आहेत हे पाहता आलं नाही. मला वाटलं कदाचित त्यांना मला सरप्राईज द्यायचं असेल म्हणून त्यांनी मला ते कपडे दाखवले नाहीत. त्यामुळे मीही काही बोलले नाही. पण ज्या दिवशी माझ्या हातात ते साखरपुड्याला घालण्याचे कपडे आले. त्यावेळी खरं सांगते की, मला आश्चर्य वाटण्याऐवजी धक्काच बसला. कारण माझे ते साखरपुड्याला घालण्याचे कपडे इतके वाईट होते की, माज्या साखरपुड्याच्या दिवशी मला ते घालण्याची अजिबातच इच्छा नव्हती. मला नेहमी पेस्टल शेड्स घालायला आवडतात. ज्यावर बारीक आणि नाजूक अशी एम्ब्रॉयडरी केली असेल. पण माझ्या सासरच्यांनी माझ्यासाटी जो लेहंगा घेतला होता त्यात भरपूर रंग होते आणि मी कधीच विचार केला नव्हता असे ते कपडे होते. मी थोडी हेल्दी असल्यामुळे माझ्यावर मोठ्या डिझाईनची एम्ब्रॉयडरी कधीच चांगली दिसत नाही. त्यामुळे तो लेहंगा पाहून मला रडूच आलं. पण माझ्या आईने मला शांत केलं. तिने मला नीट समजावलं की, आता काहीच करता येणार नाही. त्यामुळे मला हाच लेहंगा घालावा लागेल आणि तेही चेहऱ्यावर हास्य ठेवत. मीही कशीबशी यासाठी तयार झाले. कारण मला माझ्या होणाऱ्या सासूसासऱ्यांबरोबर नात्याच्या सुरूवातीलाच कोणताही वाद किंवा गैरसमज होऊ द्यायचा नव्हता.
अखेर साखरपुड्याच्या दिवशी मी तोच लेहंगा घातला. पण मला कल्पना नव्हती की, पुढे अजून काय वाढून ठेवलं आहे. त्यांच्याकडील अजून एका परंपरेनुसार मुलाकडची मंडळी होणाऱ्या सूनेला भेट म्हणून ज्वेलरी देतात. माझ्या सासूबाईंनीही अगदी माझ्या लेहंग्याला मॅच होईल, अशी ज्वेलरी माझ्यासाठी आणली होती. तुम्हाला कळलंच असेल की, ती ज्वेलरी कशी असेल. ती ज्वेलरी अगदीच मला न आवडणाऱ्या पॅटर्नची होती. त्यावेळी भर फंक्शनमध्ये मला काहीच रिएक्ट करता आलं नाही. कारण सगळीच लोक जमलेली होती आणि माझ्या सासूबाई मला तो सेट घालायला मदत करत होत्या. मला काहीच बोलताही आलं नाही आणि वरून मला स्माईलही करावं लागेल. माझ्या आईला माझ्याकडे पाहून माझ्या मनातलं काय चालंल असेल ते कळलं होतं. पण तीही काहीच करू शकत नव्हती. जसा साखरपुड्याचा कार्यक्रम संपला तसं मी माझ्या आईजवळ गेले आणि आरडाओरडा सुरू केला.
माझं अगदी दोन दिवसांवर आलेलं लग्न, नवीन घरी जाऊन अॅडजस्ट व्हायचं टेन्शन आणि त्यातच झालेला हा प्रकार त्यामुळे मला काहीच कळत नव्हतं. माझ्या होणाऱ्या सासूबाईंना माझ्याबाबत काहीच समजून घेता आलं नव्हतं. त्यामुळे माझी अजूनच चिडचिड होत होती. मला लग्न तर करायचं होतं पण मला माझ्या साखरपुड्याचे फोटो पाहायचीही ईच्छा नव्हती. तो मला न आवडलेला लेहंगा आणि ज्वेलरीतील ते फोटो मला अजिबात नको होते. माझ्या मते ही खूपच नैसर्गिक गोष्ट आहे की, होणाऱ्या नववधूला तिच्या आवडीने आणि तिच्यावर छान दिसतील असे कपडे तिच्या महत्त्वाच्या दिवशी घालायचे असतात. ज्यामध्ये ती सर्वात सुंदर दिसेल. कारण या महत्त्वाच्या दिवसांच्या आठवणी तिच्यासोबत आयुष्यभरासाठी राहणार असतात. माझ्या आईने मला खूप समजवलं. तिने मला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि मला सांगितलं की, लग्नानंतर मला नेहमीच अशा लहानमोठ्या गोष्टींमध्ये चिडचिड न करता समजून घ्यावं लागेल. आमच्या लग्नानंतर माझ्या सासूबाईंनी मला अनेक वेळा फॅमिली फंक्शन्सना जाताना तो साखरपुड्याचा ज्वेलरी सेट घालायचा आग्रह केला पण मी नेहमीच काही ना काही कारण सांगून ते टाळलं.
नशिबाने माझा नवराही मला समजून घेणारा आणि नेहमी सपोर्ट करणारा असल्यामुळे त्यालाही कळलं की, मी तो सेट का घालू शकत नाही. कदाचित त्यावेळी मी खूपच असमजूतदारपणे वागले असं आज मला वाटतं. आज माझ्या लग्नाला आज 10 वर्ष पूर्ण झाली आहे. आता जेव्हा जेव्हा मी माझ्या साखरपुड्याचा अल्बम पाहते तेव्हा मला हसूच येतं. माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी घेतलेला लेहंगा चुकीचा नव्हता. पण मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीवर इतके पैसे खर्च करणार असता. तेव्हा ज्या व्यक्तीसाठी ती वस्तू घेत आहात, तिची आवडही नक्कीच विचारात घेतली पाहिजे. कारण शेवटी त्या व्यक्तीला ते कपडे आणि ज्वेलरी घालायची असते. कदाचित त्यांच्या पिढीच्या लोकांना तसं वाटत नसावं. पण जेव्हा माझ्या मुलाचं लग्न असेल तेव्हा मी मात्र नक्कीच माझ्या होणाऱ्या सुनेला सोबत घेऊन सर्व शॉपिंग करेन.
भारतीय परंपरेनुसार लग्नाच्या सप्तपदीचं महत्त्व, जाणून घ्या
वरील कथेवरून तुम्हाला लक्षात आलं असेलंच की, लग्न ठरण्याच्या आणि होण्याच्या काळात असे अनेक किस्से घडतात. लक्षात घ्या, अरेंज असो वा लव्ह मॅरेज असो. प्रत्येक लग्नाच्या वेळी कधी घाईगडबडीत तर कधी नकळत एकमेंकांचं मन दुखावल जातं किंवा एकमेंकांची आवड लक्षात घेतली जात नाही. पण याचा अर्थ असा नाही की, लगेच ते नातं तोडावं किंवा त्या क्षणी लगेच त्या गोष्टींची जाणीव त्या व्यक्तीला करून द्यावी. प्रत्येकाने ही बाब लक्षात घेतली तर प्रत्येक साखरपुडा आणि प्रत्येक लग्न कोणत्याही गैरसमजुती किंवा त्रासाशिवाय पार पडेल. आधीच्या पिढीनेही पुढच्या पिढीची आवड ओळखून वागावं आणि पुढच्या पिढीने मोठ्यांचा आदर ठेवावा. असं झाल्यास प्रत्येक नातं किती सुंदर होईल. त्यामुळे जर तुमचं लग्न ठरलं असेल किंवा ठरणार असेल तर या गोष्टींचा नक्की विचार करा. कारण हा राग त्या क्षणापुरता असतो, त्यामुळे समजूतदारपणा दाखवणं हे कधीही चांगलंच.
फोटो सौजन्य – Instagaram
हेही वाचा –
मैत्रिणीचं लग्न ठरलंय ? मग तुमच्या मनात हे विचार हमखास येणार
लग्न वर्धापनदिनाचे शुभेच्छा संदेश