हसण्याचे '7' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का

हसण्याचे  '7'  आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का

हसरा आणि प्रसन्न चेहरा स्वतःसोबत इतरांनाही आनंद देतो. सहाजिकच हसऱ्या व्यक्तिमत्वाची माणसं सर्वांनाच आवडतात. एखाद्याच्या निरागस हास्यामध्ये अनेक दुःखांना दूर करण्याचं सामर्थ्य असू शकतं. शिवाय हसणं हा एक नैसर्गिक व्यायाम देखील आहे. त्यामुळे सतत आनंदी आणि हसणारी माणसं दीर्घायुषी आणि निरोगी राहतात. हसण्यामुळे तुमच्या अनेक आरोग्य समस्या दूर होऊ शकतात. यासाठीच हसण्याचे हे आरोग्यदायी फायदे जरूर जाणून घ्या.


 laughter 1


ताण-तणाव कमी होतो-


आजकाल सतत वाढणारी स्पर्धा आणि कामाचा ताण यामुळे मनावर सतत एक ओझं असतं. आयुष्य जगताना समोर येणाऱ्या अडचणींमुळे टेंशन सतत डोक्यावर असू शकतं. थोडक्यात चिंता आणि काळजी अनेकांच्या हा जगण्याचाच एक अविभाज्य भाग असतो. मात्र सतत चिंता काळजी करत बसल्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. यासाठी हसणं हा दैनंदिन ताणतणावाला दूर करणारं उत्तम औषध ठरू शकतं. जर ताणतणावाला दूर करायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीत हसत रहा. कारण हसण्यामुळे शरीरातील सर्व पेशी मोकळ्या होतात. ज्यामुळे ताणतणावात निर्माण होणारे हॉर्मोन्स कमी प्रमाणात निर्माण होतात.


विचारसरणी सुधारते-


आजकाल माणुस सतत नकारात्मक विचार आणि चिंता काळजी करताना दिसून येतो. मनातील विचारांचा नकळत तुमच्या शरीरावर परिणाम होत असतो. जर तुम्ही सतत नकारात्मक विचार करत असाल तर त्यामुळे तुम्हाला शारीरिक समस्या होऊ शकतात. याउलट सतत आनंदी आणि प्रसन्न राहील्यास मनात केवळ चांगले आणि सकारात्मक विचार येतात. सकारात्मक विचारांमुळे तुमची विचार सरणी सुधारते. तुम्ही सतत जे विचार करता त्याप्रमाणे तुमचे भविष्य घडत असते. यासाठी सतत आनंदाचे विचार करा आणि हसत रहा.


आरामदायक वाटते-


दैनंदिन जीवन हे दगदग आणि ताणाचे असू शकते. मात्र या ताणाला आणि दगदगीला दूर करून रिलॅक्स व्हायचे असेल तर दिवसभरात काही वेळ हसण्यासाठी जरूर द्या. ज्यामुळे तुमच्या शरीरातील नसा मोकळ्या होतात, रक्तप्रवाह सुधारतो आणि रिलॅक्स वाटू लागते.


शरीर सुदृढ राहते-


शारीरिक दुखणी आणि आरोग्य समस्या दूर ठेवायच्या असतील तर नेहमी हसत रहा. कारण हसणं हा एक उत्तम शारीरिक आणि मानसिक व्यायाम आहे. हसल्यामुळे तुमच्या शरीरराला व्यायाम मिळतो शिवाय मेंदूला रक्तपुरवठा झाल्यामुळे त्याचा शरीरावर चांगला परिणाम होतो. शिवाय मानसिक आजार आणि हॉर्मोनल असतुंलन दूर करण्यासाठी हसणं हा एक चांगला उपाय आहे.


शांत झोप लागते-


 laughter 2


जर तुम्हाला निद्रानाश अथवा अपुरी झोप लागण्याची समस्या असेल तर दररोज सकाळी उठल्यावर काही मिनीटे हसण्याचा व्यायाम करा. झोपण्यापूर्वी हा व्यायाम केल्यामुळे तुमचे शरीर शिथील होण्यास मदत होते. ताणतणाव कमी झाल्यामुळे आणि रिलॅक्स वाटू लागल्यामुळे तुम्हाला शांत आणि निवांत झोप लागते.


कामाची गुणवत्ता सुधारते-


सतत टेंशन आणि ताणात काम केल्यामुळे कामाचा दर्जा घसरतो. मात्र जर तुम्हाला कामाची गुणवत्ता सुधारण्याची इच्छा असेल तर हसण्याचा प्रयत्न करा. हसणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. हसत-खेळत काम केल्यामुळे काम तर चांगले होतेच शिवाय कामाचा अती ताणदेखील येत नाही.


व्यक्तिमत्वाचा विकास होतो-


सतत हसणाऱ्या आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या व्यक्ती इतरांना नेहमीच आकर्षित करतात. जर तुम्हाला लोकसंग्रह करण्याची सवय असेल अथवा तुम्ही सामाजिक कार्यात सक्रीय असाल तर हसण्याचा तुमच्या व्यक्तिमत्वावर चांगला परिणाम होऊ शकतो.


मानसिक ताणाला दूर ठेवण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय (How to Relieve Mental Pressure in Marathi)


आनंदी जीवन जगण्यासाठी या '10' गोष्टी अवश्य करा


 


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम