#internationalyogaday निरोगी जीवनशैलीसाठी नियमित करा ‘ही’ योगासने

#internationalyogaday निरोगी जीवनशैलीसाठी नियमित करा ‘ही’ योगासने

शारीरिक स्वास्थ आणि मानसिक समाधान या दोन गोष्टी प्रत्येकालाच हव्या असतात. मात्र आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ मिळेनासे झाले आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारं प्रदूषण, कामाचा अती ताण, नातेसंबधांमधील दूरावा, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी याचा तुमच्या शरीर आणि मनावर नकळत परिणाम होतो. यासाठी जीवनशैलीत थोडेसे बदल करणं गरजेचं झालं आहे. आजारपण आणि मानसिक विकारांपासून दूर राहण्यासाठी नियमित व्यायाम आणि योगासने करणं आवश्यक आहे. दिवसभरात कमीत कमी तीस मिनीटे आपल्या आरोग्यासाठी देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. योगासने ही एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ नक्कीच मिळू शकते. यासाठीच जाणून घ्या योगदिनाचं महत्व आणि योगासनांचे काही प्रकार

shutterstock

योग म्हणजे काय (What is Yoga)

योग हा शब्द संस्कृत मुळ धातू ‘युज्’ म्हणजेच जोडणे यापासून तयार झाला आहे. शरीर, मन आणि आत्मा (चैतन्यशक्ती) यांना जोडणे म्हणजे योग होय. योगशास्त्रानुसार शरीर आणि मन शुद्ध करण्यासाठी ज्या स्थितीत काही वेळ ठेवली जाते त्याला योगासने असे म्हणतात. योगशास्त्रात योगाची प्रमुख आठ अंगे सांगितली जातात. ज्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अवस्था असतात.

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व आणि यावर्षीची थीम (International Yoga Day and it’s Theme)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 डिसेंबर 2014 मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या सभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानूसार हा दिवस देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा योग दिनाचे हे पाचवे वर्ष आहे. दरवर्षी हा दिवस एका खास थीमसह साजरा केला जातो. यावर्षीची थीम ‘क्लायमेट अॅक्शन’ ही आहे.  

योगासने करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी

योगसने सुरू करण्यापूर्वी योग्य ज्ञान असणे गरजेचे आहे. कारण योगासने आरोग्यासाठी जितकी फायदेशीर आहेत तितकंच या आसनांचा चुकीचा सराव केल्यामुळे तुमचे नुकसानही होऊ शकतं. यासाठीच योगासनांचा सराव नेहमी तज्ञांच्या देखरेखीखालीच करावा. योगासने करताना तुमच्या शरीचाची अवस्था आणि श्वासाची गती योग्य असावी लागते. योगासने नेहमी पहाटे सुर्योदयापूर्वी आणि सुर्यास्तानंतर करावी. मात्र सकाळची वेळ ही नेहमीच उपयुक्त असते. कारण योगासने करण्यापूर्वी रिकाम्या पोटी करावीत. संध्याकाळी जर तुम्हाला योगासनांचा  सराव करायचा असेल तर त्या आधी कमीत कमी तीन ते चार तास उपाशी राहणं गरजेचं आहे. यासोबत योगासने केल्यावर लगेच अंघोळ करू नये. त्यापेक्षा अंघोळ करून योगासने करावीत. योगासने नेहमी एखाद्या मोकळ्या हवेच्या ठिकाणी आणि आसन घेऊनच करावी. योगासनांचा सराव करताना स्वच्छ, सुती आणि आरामदायक कपडे वापरावेत.

योगासनांचे प्रकार (Types of Yogasana)

योगासनांचे विविध प्रकार आहेत आणि त्यांचे शरीर आणि मनावर होणारे परिणामदेखील निरनिराळे आहेत. यासाठी तुमच्या शरीरप्रकृतीसाठी कोणते आसन योग्य आहे याबाबत तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. आम्ही तुम्हाला काही योगासनांचे प्रकार सूचवत आहोत. ज्यामुळे तुम्हाला योगासनांचा सराव करणे नक्कीच सोपे जाईल.

पद्मासन -

हे आसन बैठक स्थितीत करण्यासारखे एक आसन आहे. या आसनासाठी दोन्ही पायांमध्ये समान अंतर ठेवून ते समोरच्या दिशेने ठेवावेत. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून विरुद्ध दिशेच्या पायांच्या मांड्यावर पावले ठेवावीत. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून हाताची ज्ञानमुद्रा करावी. पाठीचा कणा ताण ठेवावा. ध्यानधारणेसाठी हे आसन अतिशय उत्तम आहे. या आसनामुळे हात, पाय, मांड्या, पाठीचा कणा यावर योग्य ताण येतो.

instagram

वज्रासन -

हे आसन देखील एक बैठक आसन आहे. या आसनाचा सराव करण्यासाठी गुडघ्यात पाय दुमडून चवड्यांवर बसावे. दोन्ही पायांच्या टाचा बाहेरच्या दिशेने ठेवाव्या. पायांच्या टाचांच्या खोबणीत बसावे. या आसनस्थितीत एक विशिष्ठ बंध बांधला जातो. ज्यामुळे रक्ताभिसरण आणि पचनक्रिया सुरळीत होते. हे एक असे एकमेव आसन आहे जे तुम्ही जेवणानंतरदेखील करू शकता. अपचनाची समस्या असल्यास जेवणानंतर काही मिनीटे या आसनामध्ये बसण्याची सवय करावी.

shutterstock

सुखासन -

सुखासनाचा अर्थ सुख देणारे आसन असा होता. हे आसनदेखील एक बैठकस्थितीतील आसन असून त्यामुळे तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात. यासाठी मांडी घालून आरामदायक स्थितीत बसा. ध्यानधारणा अथवा मेडीटेशन करण्यासाठी हे एक चांगले आसन आहे. मनशांती आणि एकाग्रता वाढविण्यासाठी हे आसन तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकते. या आसनस्थितीत मन एकाग्र केल्यामुळे तुमच्या मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि मनात सकारात्मक वाढू लागतात.

shutterstock

दंडासन -

दंडासन हे देखील एक बैठक आसनस्थिती करण्यासारखे आसन आहे. नियमित हे आसन केल्यामुळे तुमच्या हातापायाच्या मांसपेशी मजबूत होतात. या आसनस्थितीचा फायदा असा की या आसनामुळे होणारा फरक लवकर दिसू शकतो. जर तुम्हाला तुमच्या शरीराचे पोश्चर सुधारायचे असेल तर हे आसन जरूर करा.

shutterstock

अर्ध चंद्रासन -

हे आसन करताना शरीराचा आकार चंद्राच्या कोरीप्रमाणे दिसतो म्हणून या आसनाला अर्धचंद्रासन असे म्हणतात. हे आसन केल्यामुळे गुडघे, किडनी, लहान आतडे, यकृत, छाती, फुफ्फुसे आणि मान यांना आराम मिळतो. निरोगी जीवनशैली साठी हे आसन  अगदी उपयुक्त आहे.

shutterstock

भुंजगासन -

आजकाल प्रत्येकालाच पाठदुखीची समस्या जाणवत असते. जर तुम्हाला तुमच्या पाठदुखीपासून आराम हवा असेल तर हे आसन जरूर करा. हे आसन पाठ आणि पाठीचा कण्यावर चांगला ताण येतो. या आसनस्थितीत तुमच्या शरीराचा आकार एखाद्या फणा काढलेल्या नागाप्रमाणे दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन असे म्हणतात. या आसनामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

shutterstock

गोमुखासन -

गोमुखामध्ये तुमच्या शरीराची स्थिती एखाद्या गायीच्या तोंडाप्रमाणे दिसते. महिलांसाठी हे आसन अतिशय उपयुक्त  आहे. गोमुखासन केल्यामुळे तुमच्या पायात गोळे येण्याची समस्या कमी होते. स्तन सैल पडले असल्यास त्यांचा आकार पूर्ववत होऊ शकतात. खांद्याचे स्नायू आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात. मधुमेह, कंबरदुखी, बद्धकोष्ठता आणि पाठदुखी असणाऱ्या लोकांनी हे आसन जरूर करावे.

shutterstock

मांजरासन -

मांजरासनामध्ये तुमच्या शरीराचा आकार मांजराप्रमाणे दिसू लागतो. या आसनस्थितीत येण्यासाठी हाताचे तळवे आणि गुडघ्यांवर शरीर बॅलेंस करावे. या आसनामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा आणि उत्साह मिळतो. या आसनस्थितीचे अनेक फायदे होऊ शकतात.जसो की या आसनामुळे तुमच्या खांदे आणि मनगटाची शक्ती वाढते. पचनक्रिया सुधारते. पोटाचा आकार नियंत्रित राहण्यास मदत होते. रक्ताभिसरण सुधारते ज्यामुळे मन शांत राहते.

shutterstock

शवासन -

कठीण योगासनांचा सराव केल्यावर शरीराला आराम देण्यासाठी शवासन करणे गरजेचे आहे. या आसनामुळे शरीर आणि मनावर येणारा ताण कमी होतो. सेक्सलाईफ आनंदी हवे असेल तर शवासन जरूर करा. सेक्स लाईफ चांगले होण्यासाठी मानसिक शांती गरजेची आहे. शवासन केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. यासाठीच शवासनाचा सराव जरूर करा.