भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक संस्काराला विशिष्ट महत्त्व आहे. बाळ जन्माला येण्यापूर्वी गर्भावर केल्या जाणाऱ्या संस्कारांना ‘गर्भसंस्कार’ असं म्हणतात. गर्भसंस्कारांमुळे जन्माला येणारं बाळ हुशार आणि बुद्धीमान होते. यासाठीच जाणून घ्या गर्भंसंस्कार म्हणजे काय आणि गर्भसंस्काराचं बाळावर काय चांगले फायदे होतात. भारतीय संस्कृतीमध्ये गर्भधारणा झाल्यावर तिसऱ्या तिमाहीनंतर आणि दुसऱ्या तिमाही नंतर गर्भवती महिलेची ओटी भरली जाते. हा देखील तिच्यावर आणि तिच्या होणाऱ्या बाळावर केला जाणारा संस्कारच आहे. घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याचे स्वागत आर्शीवाद आणि प्रेमाने करण्यासाठी केला जाणारा हा एक संस्कार आहे. या काळात गर्भवती महिला जास्तीतजास्त आनंदी कशी राहील याची काळजी घेतली जाते. कारण तिच्या मनातील विचारांचा तिच्या होणाऱ्या बाळावर परिणाम होत असतो.
भारतीय वेदशास्त्रानुसार माणसावर जन्मापासून मरेपर्यंत एकूण सोळा संस्कार केले जातात. त्यापैकी स्त्रीला गर्भधारणा झाल्यावर अथवा गर्भधारणा व्हावी यासाठी केल्या जाणाऱ्या संस्काराला गर्भसंस्कार असे म्हणतात. जन्माला येणारे बाळ सर्वगुणसंपन्न व्हावे यासाठी गर्भसंस्कार अतिशय महत्त्वाचे ठरतात. मात्र याबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. गर्भसंस्कार हा केवळ एखादा धार्मिक विधी नसून विज्ञान आणि वैद्यकीय शास्त्रानेदेखील गर्भसंस्काराचे महत्त्व मान्य केले आहे. गर्भधारणा होताना निर्माण होणाऱ्या प्रथम पेशीपासून गर्भावर संस्कार होत असतो. गर्भसंसस्कार हे आईवडिलांच्या विचारातून बाळावर होत असतात. बाळ जन्माला येणाऱ्यापूर्वी मातेच्या मनात बाळाच्या भविष्याविषयी शुभ विचार मनात असतील तर जन्माला येणारे बाळ त्याप्रमाणेच घडते. इतिहासात घडून गेलेली अनेक उदाहरणे याची साक्ष देतात.
गर्भसंस्कार आणि त्याचे महत्त्व प्राचीन काळापासून सांगितले जाते. पुराण काळात अशी अनेक उदाहरणे आहेत. ज्या कथांमधून तुम्हाला गर्भसंस्कारांचे फायदे कळू शकतात.
शिवाजी महाराजांच्या जन्माआधीच मुघलांनी भारतावर अधिराज्य गाजवण्यास सुरूवात केली होती. मुघलांच्या अत्याचारामुळे प्रजा त्रस्त झाली होती. जिजाबाईंना प्रजेची ही अवस्था पाहून त्रास होत असे. त्याचवेळी त्यांच्या मनात राष्ट्रसंरक्षणासाठी एखाद्या सत्पुषाचा जन्म आपल्या पोटी व्हावा अशी ईच्छा निर्माण झाली होती. जिजामाता त्यावेळ गरोदर होत्या आणि असं म्हणतात की, जिजामाता यांना शिवाजी महाराज पोटात असताना घोड्यावर बसण्याचे, तलवार बाजीचे, दांडपट्टा चालवण्याचे डोहाळे लागले होते. जिजामाता यांच्या या दिव्य आणि क्रांतीकारक विचारांमधूनच शिवाजी महाराजांकडून स्वराज्याची निर्मिती झाली. ज्यामधून गर्भसंस्कारांचे महत्त्व नक्कीच पटू शकते.
गर्भसंस्कारांबाबत महाभारतामध्ये अभिमन्युची गोष्ट सांगितली जाते. अर्जुनाने सुभ्रद्राला प्रसववेदनांपासून लक्ष विचलित करण्यासाठी अभिमन्यु पोटात असताना सुभद्राला चक्रव्यूह भेदन कसे करावे हे सांगितले होते. अभिमन्युने ते गर्भात असताना ऐकले होते. महाभारतील महायुद्धात जेव्हा अर्जुन जवळ नसताना पांडवांवर चक्रव्यूह भेदन करण्याची वेळ आली तेव्हा तेवीस वर्षांच्या अभिमन्युला गर्भात असताना ऐकलेली चक्रव्यूह भेदन करण्याची गोष्ट आठवली होती.
स्वामी विवेकानंद यांनी एकदा त्यांच्या माता भुवनेश्वरीला प्रश्न विचारला होता की, “मी माझ्या जन्माआधी कुठे होतो ? तेव्हा त्यांच्या मातेने कौशल्याने त्यांना उत्तर दिले. भुवनेश्वरी यांनी विवेकानंद यांना सांगितले होते की, “तु तुझ्या जन्माआधी माझ्या विचारात होतास.” शिवाय भुवनेश्वरी स्वामी विवेकानंद पोटात असताना ध्यानधारणा करत असत ज्यामुळे त्यांच्या विवेकानंद लहानपणापासून ध्यानविद्या जाणत होते. यावरून गर्भसंस्कारांचे महत्त्व प्राचीनकाळापासून असल्याचे दिसून येते.
वास्तविक एखाद्या जोडप्याने गर्भधारणेसाठी प्रयत्न सुरू केल्यावर गर्भसंस्कार करणं गरजेचं आहे. कारण आधीच सांगितल्याप्रमाणे जर गर्भाच्या निर्मितीतील प्रथम पेशीपासून गर्भसंस्कार झाल्यास त्याची अधिक चांगली फळे मिळू शकतात. गर्भधारणेपूर्वी भावी आईवडिलांच्या मनात जे विचार येतात त्याप्रमाणे त्यांची संतती जन्माला येते. जर या काळात माता-पित्याचे मन निराश अथवा नकारात्मक विचारशैलीचे असेल तर त्याचा परिणाम गर्भावर आणि पर्यायाने बाळावर होऊ शकतो. यासाठी या काळात केल्या जाणाऱ्या गर्भसंस्कारांविषयी प्रत्येक भावी माता-पित्याला माहीत असणं फार महत्त्वाचं आहे.
गर्भसंस्काराचे अनेक फायदे आहेत. गर्भधारणा झाल्यापासून बाळाचा जन्म होईपर्यंत केल्या जाणाऱ्या संस्कारांना गर्भसंस्कार म्हटलं जातं. यासाठी बाळासाठी प्लॅनिंग सुरू केल्यावरच गर्भसंस्कार करण्यास सुरूवात करणं फायदेशीर ठरतं. मात्र त्यासाठी गर्भसंस्कारांचे हे फायदे तुम्हाला नक्कीच माहीत असायला हवे.
गर्भधारणा झाल्यापासून प्रसूतीपर्यंतचा काळ प्रत्येक महिलेसाठी एक सुखद काळ असतो. या काळात गर्भवती स्त्रीचे मन जर प्रसन्न आणि उत्साही असेल त्याचा परिणाम तिच्या गर्भावर होत असतो. याकाळात गर्भवती महिला कसा विचार करते, तिच्या आजूबाजूचे वातावरण, तिचे डोहाळे, तिच्याशी तिच्या पतीचे आणि होणाऱ्या बाबाचे नाते, नातेवाईकांशी असलेले नातेसंबध या सर्व गोष्टींचा बाळावर परिणाम होत असतो. कारण गर्भातील बाळ आजूबाजूचे वातावरण आणि आईवडिलांचा संवाद ऐकत असते. त्याच्यावर नकळत अनेक संस्कार या माध्यमातून होत असतात. यासाठीच हे संस्कार योग्य पद्धतीने आणि चांगले असावे याची काळजी घ्यावी लागते.
जे संस्कार बाळाला गर्भात असताना होतात त्याचा परिणाम आयुष्यभर त्याच्यावर होत असतो. कारण समजा जर बाळ पोटात असताना एखाद्या स्त्रीचा छळ झाला तर त्या बाळावर त्याचा परिणाम होतो. कारण अशा परिस्थितीत ती महिला जे विचार करत त्यानुसार तिचं बाळ जन्माला येतं. कधी कधी अशा परिस्थितीत जन्माला आल्यामुळे मोठं झाल्यावर ते बाळ एकतर बंडखोर अथवा आत्मविश्वास नसलेलं होऊ शकतं.
गर्भवती महिला जरा विचार करते त्याप्रमाणे तिच्या पोटातील बाळावर संस्कार होतात. सहाजिकच जर अशा महिलेने सतत तिचं बाळ बुद्धीमान, तेजस्वी, मनमिळावू, सर्वांवर प्रेम करणारं, हुशार, शक्तीमान, भाग्यशाली व्हावं असा विचार सतत केला तर तिच्या पोटी सर्वगुणसंपन्न बाळ जन्माला येऊ शकतं. यासाठीच गर्भसंस्कार फार महत्त्वाचे ठरतात.
गर्भात असताना त्या बाळासोबत त्याच्या आई, वडिल, आजी, आजोबा यांनी संवाद साधला. सतत त्याच्याबद्दल चांगले विचार केले तर बाळ जन्माला आल्यावर त्या लोकांसोबत त्याचे बॉडींग पटकन होतं. आईशी बाळाचं नातं हे नाळेने जोडलेलंच असतं. मात्र वडिल आणि इतर नातेवाईक गर्भातील बाळाबद्दल शुभविचार करून त्यांच्याशी गर्भापासून आपलं नातं जोडू शकतात.
गर्भधारणेपासूनच स्त्रीच्या मनात प्रेम आणि मातृत्वाची भावना निर्माण होत असते. मात्र गर्भसंस्कार केल्यामुळे गर्भवती स्त्रीचं मन आणि व्यक्तिमत्वात चांगले बदल होऊ शकतात. जर एखाद्या महिलेची सतत चिडचिड होत असेल तर गर्भसंस्काराचे महत्त्व पटल्यामुळे ती तिच्या विचारांमध्ये योग्य ते बदल करू शकते. या शिवाय गर्भसंस्कारांमुळे गर्भवती महिलेच्या आचारांमध्येदेखील चांगले बदल होतात.
गर्भसंस्कार विविध पद्धतीने केले जातात. प्राचीन काळापासून गर्भसंस्काराचे महत्त्व सांगितले जाते. भावी आई-वडील, घरातील मंडळी सर्व मिळून होणाऱ्या बाळावर संस्कार करू शकतात. यासाठी या काही गोष्टींचा दैनंदिन जीवनात समावेश करा.
संस्कार हे सर्वात आधी विचारातून केले जातात. यासाठीच गर्भवती महिलेचे विचार नेहमी सकारात्मकच असावेत. तिने गरोदरपणाच्या काळात बाळ आणि त्याच्या भविष्याविषयी सतत चांगले आणि शुभ विचार केल्यास त्याची चांगली फळं बाळ मोठं होताना दिसू लागतात.
आपण जो आहार घेतो त्याचा परिणाम तुमचे शरीर आणि मन यावर होत असतो. गर्भवती महिलेच्या गर्भाचे पोषण ती घेत असलेल्या आहारातून होत असते. त्यामुळे याकाळात गर्भवती महिलेने बाळाला पोषक असाच आहार घेणे गरजेचे आहे. गर्भवती महिलेन गरोदरपणात सात्विक आहार घेतल्यास बाळावर त्याचा नक्कीच चांगला परिणाम होऊ शकतो. या शिवाय गर्भवती महिलेने या काळात कोणतेही व्यसन करू नये कारण ते गर्भासाठी हानिकारक ठरू शकते.
प्रार्थना केल्यामुळे मन शांत आणि निवांत होते.गर्भारपणात प्रत्येक स्त्रीचं मन प्रसन्न असणं गरजेचं आहे. यासाठीच या काळात दररोज ठराविक काळ प्रार्थना केल्यास तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.
गरोदरपणात कठीण व्यायाम नक्कीच करू नये. मात्र तज्ञांच्या मदतीने अथवा सल्लाने काही योगायने आणि प्राणायम तुम्ही नक्कीच करू शकता. ज्यामुळे तुमचे शरीर लवचिक राहते आणि प्रसूतीकष्ट कमी होतात.
मेडिटेशन अथवा ध्यानधारणा ही प्रत्येक गरोदर महिलेसाठी वरदानच ठरू शकते. कारण या काळात तुमच्या शरीरात अनेक बदल होत असतात. ज्यामुळे तुमची चिडचिड होणं स्वाभाविक आहे. मात्र गर्भावर सुसंस्कार करण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी मेडिटेशनचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.
गर्भधारणेच्या काळात गरोदर महिलेन जर एखादे प्रेरणादायी पुस्तक वाचले तर त्याचा परिणाम तिच्या मनावर आणि विचारांवर होतो. राम, कृष्ण, शिवाजी महाराज, चाणक्य, विवेकानंद अशा थोर पुरूषांच्या कथा वाचल्यामुळे तुमचे बाळ देखील त्यांच्याप्रमाणे सदगुणी व्हावे असे तुम्हाला वाटू लागते. ज्यामुळे तुम्ही बाळावर तसे संस्कार करू शकता.
तुम्ही तुमच्या बाळासाठी काही स्वयंसूचना देखील निर्माण करू शकता. स्वयंसूचना म्हणजे तुमचे बाळ तुम्हाला जसे हवे तशी वाक्यरचना करून सतत त्याचा विचार करणे. या सूचना तुम्ही तुमच्या बाळासाठी स्वतः तयार केलेल्या असल्यामुळे त्याला स्वयंसूचना असे म्हणतात. उदा. माझे बाळ बुद्धीमान आहे. माझे बाळ हुशार आहे. माझे बाळ प्रेमळ आहे अथवा माझे बाळ सर्वगुणसंपन्न आहे असा विचार तुम्ही नियमित करू शकता. पोटावर हात ठेऊन दररोज या सूचना तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता.
बाळावर योग्य संस्कार व्हावा यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही या काही टीप्स फॉलो करून तुमच्या होणाऱ्या बाळावर योग्य संस्कार करू शकता.
आधी सांगितल्याप्रमाणे स्वयंसूचना देत अथवा पोटावर हात ठेऊन तुम्ही तुमच्या बाळाशी संवाद साधू शकता. काही संशोधनानुसार गर्भातील बाळ तुमचे बोलणे ऐकत असतं हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. त्यामुळे तुम्ही जे बोलता ते तुमचे बाळ पोटात असताना ऐकते आणि त्याप्रमाणे तुम्हाला प्रतिक्रिया देते. तुमची प्रसूती सुखरूप होण्यासाठीदेखील याय गोष्टीचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. कारण प्रसूती काळात अशा सूचना दिल्यामुळे बाळ जन्माला येताना तुम्हाला चांगले सहकार्य करते.
गरोदरपणात कोणताही ताण घेऊ नका. जर तुम्ही नोकरी करणाऱ्या महिला असाल तर या काळात कामाची अधिक जबाबदारी घेणं टाळा. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गरोदरपणात ताणतणावाला सामोरं जावं लागणार नाही. त्याचप्रमाणे कुटुंबातील लोकांनादेखील याची जाणिव करून द्या ज्यामुळे तुम्हाला ते चांगले सहकार्य करतील.
बाळाला सर्वात जास्त जर कोणाची संगत लाभते तर ती त्याच्या आईची. त्यामुळे जर तुम्ही आता आई होण्याचा निर्णय घेतला असेल तर तुम्हाला तुमच्यामध्ये योग्य ते बदल करावे लागतील. जर तुम्ही पूर्वी धुम्रपान अथवा मद्यपान करत असाल तर आता या गोष्टी तुम्हाला दूर ठेवाव्या लागतील. कारण याचा परिणाम तुमच्या बाळाच्या आरोग्य आणि संगोपनावर होऊ शकतो.
आयुर्वेदानुसार गरोदरपणात मांसाहार अथवा इतर तामसी आहार न घेणंच योग्य ठरू शकतं. त्यामुळे शक्य असल्यास या काळात सात्विक आहार घेण्याचा प्रयत्न करा.
संगीताामुळे मन शांत होण्यास मदत होते. गरोदरपणात तुम्हाला शांत आणि निवांतपणाची अधिक गरज असते. यासाठी खाली दिलेल्या संगीताचे प्रकार जरूर ऐका.
गर्भसंस्कार करण्याचे विविध प्रकार आहेत. त्यामुळे नेमके कोणत्या पद्धतीने गर्भसंस्कार करावे असे तुमच्या मनात नक्कीच येऊ शकते. यासाठी खाली दिलेली काही पुस्तके तुम्ही अभ्यासू शकता. गर्भपूर्व आणि गर्भसंस्कारांसाठी ही पुस्तके तुमच्या नक्कीच फायद्याची ठरू शकतात.
गर्भसंस्कार हे बाळाला जन्म देण्याचा विचार करण्याआधीपासूनच करावेत. मात्र जर याबाबत माहीत नसल्यामुळे तुम्ही तुमच्या बाळावर गर्भसंस्कार केले नसतील तर चिंता करण्याचे काहीच कारण नाही. कारण लहान मुलांवर वयाच्या एका विशिष्ठ काळापर्यंत जाणिवपूर्वक संस्कार करता येतात. ज्यांना बालसंस्कार असे म्हणतात. तुम्ही लहान मुलांवर बालसंस्कार करूनदेखील त्यांना सुसंस्कारित करू शकता.
नक्कीच. आधीच सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही तुमच्या गर्भातील बाळासोबत गर्भसंस्कारांच्या माध्यमातून संंवाद साधत असाल. तर प्रसूतीकाळात त्यासोबत तसाच संवाद साधू शकता. ज्यामुळे तुमचे बाळ प्रसूतीकाळात तुम्हाला सहकार्य करू शकते आणि तुमची नैसर्गिक आणि सूलभ प्रसूती होऊ शकते.
आईची आणि बाळाची नाळ ही जन्मतःच जोडलेली असते. त्यामुळे आईचे बाळावर संस्कार होतच असतात. मात्र याशिवाय बाळाचे वडील, आजी, आजोबा, मोठं भावंड त्याच्याशी गर्भात असताना संवाद साधू शकतात. ज्यामुळे जन्माला आल्यावर बाळाचं नातं त्यांच्यासोबत आपोआप दृढ होतं.
तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:
नेहा धुपियाच्या या १० फॅशन टिप्समुळे गरोदरपणातही दिसू शकता स्टायलिश
नोकरी करणाऱ्या महिलांनी गरोदरपणी अशी घ्यावी स्वतःची काळजी
गरोदरपणानंतर काय घ्यावी काळजी, जाणून घ्या (Post Pregnancy Care Tips In Marathi)
जर तुम्हाला ही लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही प्रेग्नंट असू शकता
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक