आयुर्वेदामध्ये कडूलिंबाच्या पानाला खूपच महत्त्व देण्यात आलं आहे. कडूलिंबाच्या (Indian Lilac) वापराने बरेच आजार बरे होतात. कडूलिंबाची पानं भलेही कडू असतात पण मधील अँटिबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीपॅरासिटीकसारखे गुण असतात, जे कडूलिंबाला अतिशय खास बनवतात. भारतामध्ये कडूलिंबाला साधारणतः ‘गावठी औषध’ असं म्हटलं जातं. यामध्ये अनेक गुण आढळतात. कडूलिंबाचं झाड असं झाड आहे, ज्याचा प्रत्येक भाग कोणत्या ना कोणत्या आजारावर गुणकारी आहे.
भारतीय वेदांमध्ये कडूलिंबाचं नाव हे सर्व प्रकारच्या आजारांवरील औषध म्हणून घेतलं जातं. रोग निवारण औषधी अर्थात सर्व आजारांना रोखणारी वनस्पती कडूलिंबाला म्हटलं जातं. कडूलिंब हे दोन प्रकारचं असतं. त्यापैकी एक गोड कडूलिंब आणि एक कडू कडूलिंब असतं. दोन्हीमध्ये औषधीय गुण आढळतात. पण गोड कडूलिंबापेक्षाही कडू कडूलिंबामध्ये औषधीय गुण जास्त असतात. आधुनिक शोधाप्रमाणे सिद्ध झालं आहे की, कडूलिंबामध्ये असणाऱ्या औषधीय गुणांचा हात कोणीच धरू शकत नाही.
Table Of Content
भारतामध्ये घराजवळ कडूलिंबाचं झाडं असणं हे शुभ मानलं जातं कारण कडूलिंबाचा अनेक आजारांवर फायदा होतो. कडूलिंबाचं झाड हे बऱ्याच गोष्टींसाठी फायदेशीर ठरतं. आज आपण इथे कडूलिंबाच्या पानांचा नक्की काय फायदा होतो ते पाहणार आहोत. तुमच्या आरोग्यासह तुमच्या सौंदर्यासाठीही कडूलिंबाच्या पानाचा फायदा होतो. तुमच्या सौंदर्यामध्ये यामुळे भर पडते.
आरोग्यासह सौंदर्यासाठीही कडूलिंबाचा पाला हा रामबाण उपाय आहे. वास्तविक कडूलिंबाच्या पानांमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स आढळतात, जे तुमच्या त्वचेची काळजी करण्यासह तुमच्या त्वचारोगासंंबंधी आजारही बरे करतात. बाजारामध्ये मिळणाऱ्या सर्व सौंदर्य प्रसाधनांमध्ये कडूलिंबाच्या पानांची पेस्ट नक्कीच मिसळली जाते. जाणून घेऊया काय आहेत याचे फायदे
प्रत्येकालाच वाटतं की, आपल्याला कधीही म्हातारपण येऊ नये. पण आजकालच्या लाईफस्टाईलमुळे वेळेआधीच चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागतात. पण तुम्हाला माहीत आहे का? कडूलिंबाच्या पानांमध्ये एजिंग समस्येवर तोडगा आहे. हे यावरही एक चांगलं औषध आहे. वास्तविक कडूलिंबाची पानं ही तुमचं वय वाढवण्याची प्रक्रिया कमी करतं आणि त्यामुळे तुमची त्वचा ही तुकतुकीत राखण्याचं काम कडूलिंबाची पानं करतात.
तापमान वाढल्याने शरीरामधून एक्स्ट्रा तेल निघू लागतं, जे चेहऱ्यावर जमा होतं आणि त्यामुळे तुमची त्वचा ही तेलकट दिसायला लागते. तुम्हाला जर यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर तुम्ही कडूलिंबाचा वापर करा. चेहऱ्यावरील तेल काढून टाकण्यासाठी आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. कडूलिंबाची पानं वाटून त्यामध्ये दही आणि लिंबाचा रस मिसळून एक जाडी पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर 20 मिनिट्स ठेवा. त्यानंतर पाण्याने धुवा.
तुम्हाला पिगमेंटेशनमुळे तुमच्या त्वचेवर डाग येत असतील आणि त्याचे निशाण तसेच राहात असतील तर तुम्ही कडूलिंबाचा वापर करा. यामुळे तुम्ही तुमच्या त्वचेवरील डाग कमी करू शकता. यासाठी तुम्ही कडूलिंबाची पानं सुकवून पावडर बनवा आणि दोन चमचे बेसन एकत्र करून त्यात 1 चमचा कडूलिंबाची पावडर मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट तुम्हाला पिगमेंटेशन असेलेल्या ठिकाणी लावा. त्यानंतर 15 मिनिट्सने चेहरा धुवा. असं तुम्ही आठवड्यातून किमान 2 वेळा करा. वांग घालवण्याचे घरगुती उपाय केल्याने तुम्हाला लवकरच फरक दिसून येईल.
यामध्ये एक औषधीय गुण हा पण आहे की, तुमच्या चेहऱ्यावर अजिबात डाग पडू देत नाही आणि चेहऱ्यावर उजळपणा आणतं. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर उजळपणा आणू इच्छित असाल तर, काही कडूलिंबाची पानं आणि गुलाबाची पानं एकत्र गुलाबपाण्यात वाटून घ्या. ही तयार झालेली पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर साधारण 10 ते 15 मिनिट्स लाऊन ठेवा आणि सुकल्यानंतर पाण्याने साफ करा. आठवड्यातून तुम्ही 2 वेळा असं केल्यामुळे तुमची त्वचा चमकदार होण्यासह डागविरहित आणि मुलायमदेखील होते.
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि त्वचेवरील पिंपल्स घालवण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. वास्तविक कडूलिंबामध्ये असलेल्या अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग जाण्यासाठी मदत होते. त्वचेचं रक्षण करण्यास याची मदत होते.
लिंबाचा फेसपॅक तुम्ही बऱ्याच तऱ्हेने बनवू शकता. इथे आम्ही तुम्हाला डाग कमी करण्यासाठी आणि तुमच्या चेहऱ्यावर उजळपणा आणण्यासाठी कडूलिंबाचे फेसपॅक कसे बनवयाचे आहेत हे सांगणार आहोत. हे फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला कडूलिंबाची ताजी पानं घेण्याची गरज आहे. ही पानं तुम्ही नीट धुऊन घ्या. त्यानंतर तुम्ही मिक्सरमधून वाटून घ्या. आता त्यामध्ये एक चमचा मुलतानी माती आणि गुलाबपाणी मिक्स करा. आता हा पॅक पूर्ण चेहऱ्यावर लावा. पॅक सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
कडूलिंब ही केसांसाठी खूपच फायदेशीर वनस्पती आहे. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्व असतात, जे आपल्या केसांची खूप काळजी घेतं आणि केसांचं पोषण करतं. याचबरोबर यामुळे केसांच्या समस्यांमधूनही सुटका मिळते.
कडूलिंबामध्ये अँटिबॅक्टेरियल आणि अँटिफंगल गुण आढळतात, ज्यामुळे तुम्ही स्काल्प क्लीन म्हणून वापर करू शकता. तुमच्या केसांमध्ये उवा अथवा कोंड्याची समस्या असेल तर, कडूलिंबाची पानं उकळून घ्या आणि ते पाणी केस धुवायला वापरा. याशिवाय कडिलिंबाची पानं उकळून त्यामध्ये मध मिसळा आणि त्याची जाड पेस्ट बनवा आणि ती कोंड्यावर लावा. त्यामुळे समस्या मूळापासून निघून जाईल. तसंच यामुळे तुमच्या केसांची चमक वाढेल आणि केस मुलायमदेखील बनतील.
जास्त लोक आपले केस काळे करण्यासाठी हेअर कलरचा वापर करतात. पण तुम्हाला माहीत आहे का? त्वचेला कोणतंही नुकसान पोहचवल्याशिवाय तुम्ही कडूलिंबाने केसांचा काळा रंग बराच काळ ठेऊ शकता. त्यासाठी कडूलिंबाच्या पावडरमध्ये नारळाचं तेल घालून 5 मिनिट्स उकळा. त्यानंतर हे थंड करून एका बॉटलमध्ये भरून ठेवा. नियमित रात्री झोपण्यापूर्वी हे तेल केसांना लावा आणि सकाळी डोकं धुऊन टाका. 10 दिवसांमध्ये तुम्हाला याचा परिणाम दिसायला हवा.
आजकल बऱ्याच जणांना केसगळती आणि तुटण्याची समस्या जास्त आहे. तुम्हालादेखील ही समस्या असेल तर एकदा कडूलिंबाच्या तेलाचा वापर करून पाहा. हे तेल तुमच्या स्काल्पवर लावल्यास, इन्फेक्शन काढून टाकतं, त्यामुळे केसगळती बंद होते. कडूलिंबाच्या तेलाचा नियमित वापर केल्यास, केस लवकर वाढतात.
खराब लाईफस्टाइल सध्या प्रत्येकाची आहे त्यामुळे बऱ्याचदा लोक आजारी असतात. काही आजार हे रक्त शुद्ध नसल्यामुळे होतात. याची लक्षणं चेहऱ्यावर डाग, अॅक्ने, त्वचा रोग इत्यादीमुळे समजायला लागतात. कडूलिंब एक शक्तीशाली औषधी वनस्पती आहे. हे शरीराच्या भागाला आवश्यक पोषक तत्व आणि ऑक्सीजन देण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे शरीरातील हानिकारक आणि दूषित पदार्थांपासून सुटका मिळण्यासाठीही याची मदत होते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन रोज जेवणाबरोबर नीम कॅप्सूल तुम्ही घेतली तर तुमचं रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
डायबिटीस अर्थात मधुमेह रोखण्यासाठी आणि साखर नियंत्रणात आणण्यासाठी कडूलिंबाच्या पानांचा खूप उपयोग होतो हे अभ्यासातूनही सिद्ध झालं आहे. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी रोज कडूलिंबाची पानं रिकाम्या पोटी खाल्ली त्यांची मधुमेहापासून सुटका होऊ शकते.
कडूलिंबामध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकचा हानिकारक प्रभाव थांबवू शकतात, त्यामुळे शरीरामध्ये कॅन्सर होण्याचा धोका टळतो. त्याशिवाय कडूलिंब हृदयरोगासाठीही रामबाण इलाज आहे.
मलेरियावरील उपचारासाठी कडूलिंबाचा वापर औषध म्हणून केला जाऊ शकतो. कडूलिंबाच्या पानांमध्ये गेडुनिन (Gedunin) तत्व आढळतं. मलेरियाच्या उपचारासाठी याचा फायदा होतो. डॉक्टरदेखील मलेरिया झाला असल्यास, कडूलिंब खाण्याचा सल्ला देतात.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे युरिन इन्फेक्शन झाल्यास, तुम्ही कडूलिंबाचं सेवन केलंत तर तुम्हाला लवकरच आराम मिळेल. त्यासाठी रोज सकाळी उठून कडूलिंबाची 4 ते 5 पानं चावून खा. आराम मिळेल.
वैज्ञानिकांंच्या म्हणण्याप्रमाणे कडूलिंब हे नैसर्गिक स्वरूपात गर्भनिरोधक म्हणून वापरलं जाणारं सहज उपलब्ध होणारं औषध आहे. बऱ्याच संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की, कडूलिंबामध्ये अँटिफर्टिलिटी तत्व असतात. सेक्स करण्यापूर्वी कडूलिंबाच्या तेलाचा वापर केल्यास, कोणतीही महिला गर्भवती राहणार नाही.
तुम्हाला माहीत असल्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास, नुकसान होतं. कडूलिंबाचंही तसंच आहे. कडूलिंबाचा पाला हा खरं तर अतिशय थंड असतो त्यामुळे उन्हाळ्यात याचा वापर जास्त केला तर काहीही अडचण येत नाही. पण थंडीच्या दिवसात याचा वापर हा अतिशय जपून करायला हवा. अन्यथा यामुळे नुकसान होऊ शकतं. तुम्ही गर्भवती असल्यास, याचं सेवन अजिबात करू नका. तसंच कडूलिंब अधिक खाल्ल्यास, पोटामध्ये जळजळ होण्याची शक्यता असते. तसंच लहान मुलांना यापासून दूरच ठेवा कारण याचं सेवन लहान मुलांनी केल्यास, त्यांना किडनी आणि यकृताचे त्रास उद्भवण्याची शक्यता आहे.
फोटो सौजन्य - Shutterstock