मराठीतील बहारदार लावण्या (Best Marathi Lavani Songs In Marathi)

मराठीतील बहारदार लावण्या (Best Marathi Lavani Songs In Marathi)

ढोलकीचा ताल...घुंगरांचे बोल आणि सौंदर्याची नजाकत म्हणजे लावणी. लावणी हा महाराष्ट्रातील लोकनृत्याचा एक लोकप्रिय प्रकार आहे. आजही महाराष्ट्रामध्ये लावणी लोककलांमध्ये आपला दर्जा राखून आहे. लावणीची जादू मराठी प्रेक्षकांवर इतकी आहे की, मराठी चित्रपटसृष्टी आणि अगदी बॉलीवूडलाही लावणीची भूरळ पडली आहे. या लेखात आपण मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध लावण्यांवर नजर टाकणार आहोत.

Table of Contents

  महाराष्ट्रातील प्रसिध्द नृत्यप्रकार लावणी (Lavani - Famous Dance Of Maharashtra)

  या लोकनृत्य प्रकाराची उत्पत्ती 15 व्या शताब्दीत झाल्याचं मानलं जातं. संपूर्ण देशात आज जवळपास 5000 पेक्षा जास्त नर्तकी वेगवेगळे समूह बनवून लावणी हे लोकनृत्य सादर करत आहेत. आजही मुंबई वगळता महाराष्ट्रभरातील जत्रांमध्ये लावणीचे फड फिरतात. लावणीही मुख्यतः स्त्री नृत्यांगनाकडून सादर केली जाते. जाणून घेऊया लावणीबाबतची काही वैशिष्ट्य -

  आलो अकसा बीचवर वाचला

  लावणीचे विविध प्रकार (Style And Variety In Lavani)

  पारंपारिकरित्या लावणी नृत्यप्रकारात समाजातील विविध समस्यांवर भाष्य करण्यात येत असे. उदाहरणार्थ समाज, धर्म, राजकारण आणि शृंगार. लावणीतील काही गाणी इरोटीक प्रकारातली असत तर काही सोशल पॉलिटीकल सटायर प्रकारातही असत. पारंपारिक लावणीत ढोलकं, तुणतुणं, पेटी आणि मंजिरा यासारखी वाद्य प्रामुख्याने वापरली जात असत. लावणीमध्ये मुख्यतः दोन प्रकार आढळतात.

  निर्गुण लावणी - आधीच्या काळात निर्गुण लावणीतून समाजप्रबोधन केलं जात असे. ज्यामध्ये भक्तीरसाचाही समावेश असायचा.

  शृंगारी लावणी - तर दुसरीकडे शृंगारी लावणीचा बाज हा सेन्शुअस आणि इरोटीक असायचा. यानंतरही सादरीकरणाच्याबाबतीत लावणीचे दोन प्रकार आढळतात. ते म्हणजे फडाची लावणी आणि बैठकीची लावणी.

  फडाची लावणी ही मोठ्या संख्येतील प्रेक्षकांसमोर सादर केली जाते. ज्याला एखाद्या थिएटरसारखं वातावरण असतं. यालाच फडाची लावणी म्हटलं जातं.

  तर बैठकीची लावणीही खाजगीरित्या आणि निवडक प्रेक्षकांसमोर सादर केली जाते. ज्यामध्ये ही लावणी नृत्यांगना बसून ती सादर करतात. ज्याला बैठकीची लावणी असं म्हटलं जातं. नंतरच्या काळात समोर आलेला लावणीचा प्रकार म्हणजे संगीत बारी लावणी. संगीतबारी लावणी हीसुद्धा खाजगीरित्या छोट्या थिएटर्समध्ये सादर केली जाते. जिथे नृत्यांगना प्रेक्षकांनी सांगितलेल्या लावणी गाण्यांवर नृत्य सादर करतात. मग ती लावणीची गाणी हिंदी, मराठी आणि अगदी कन्नड भाषेतीलही असू शकतात.

  Also Read : सर्वोत्कृष्ट मराठी कादंबरी

  बेस्ट मराठी लावणी गाणी (20 Best Marathi Lavani Songs List)

  आता पाहूया मराठी चित्रपटसृष्टीतील 20 प्रसिद्ध लावण्या. यामध्ये समावेश आहे अगदी ब्लॅक अँड व्हाईट एरापासून ते अगदी आत्तापर्यंत आलेल्या चित्रपटातील गाजलेल्या लावण्यांचा. ज्या तुम्ही आजही ऐकल्यावर तुम्हाला लगेच ठेका धरावासा वाटतो.  

  क्लासिकल डान्स क्लास बद्दलही वाचा

  दिसला गं बाई दिसला (Disla Ga Bai Disla)

  मराठी चित्रपटसृष्टीत लावणी म्हटलं की, डोळ्यासमोर येणार पहिला चित्रपट म्हणजे पिंजरा. हा संपूर्ण चित्रपट हा लावणी आणि त्याच्याशी निगडीत कथानकावर आधारित होता. 1972 साली आलेल्या व्ही शांताराम यांच्या चित्रपटाने रातोरात दिग्गज अभिनेते श्रीराम लागू आणि अभिनेत्री संध्या यांना लोकप्रिय बनवलं. ही कहाणी होती एका सज्जन आणि प्रामाणिक शिक्षकाची. जो एका लावणी नृत्यांगनेच्या प्रेमात पडतो आणि त्याच्या संपूर्ण आयुष्यालाच कलाटणी मिळते. हे गाणं जगदीश खेबूडकरांनी लिहीलेलं असून संगीत राम कदम यांनी दिलं आहे. तर गायिका होत्या उषा मंगेशकर. या गाण्याची कोरिओग्राफीही त्या काळाच्या मानाने हटके होती. हातात मशाल घेऊन अभिनेत्री यांनी संध्या गाण्यात एंट्री करतात. ही संपूर्ण लावणी त्यांनी हातात मशाल धरून सादर केली आहे.

  अप्सरा आली (Apsara Aali)

  मधल्या काळात प्रेक्षकांना लावणीचा विसर पडला होता. तो पुन्हा एकदा नटरंग सिनेमामुळे झाला. नटरंग सिनेमातील सोनाली कुलकर्णीवर चित्रीत झालेली ही लावणी फारच सुंदर आहे. हे गाणं बेला शेंडे हिने गायलं असून तिचा आवाज अगदी तंतोतंत सूट झाला आहे. हे गाणं फारच लोकप्रिय झालं. सोनालीने तिच्या अदाकारीने तर या गाण्याला चारचांद लावले आहेत.

  वाजले की बारा (Wajle Ki Bara)

  हे गाणंही नटरंग सिनेमातील गाजलेल्या लावण्यांपैकीच आहे. रवी जाधव दिग्दर्शित या चित्रपटातील लावणीला सादर केलं ते अमृता खानविलकरने. या गाण्याला संगीत दिलं होतं ते अजय-अतुल या जोडीने. हेही गाणं बेला शेंडेने गायलं असून लिहीलं आहे गुरू ठाकूर यांनी. अप्सरा आली आणि वाजले की बारा या दोन्ही गाण्यांनी नटरंगच्या लोकप्रियतेत अजूनच भर पाडली आणि पुन्हा एकदा चित्रपटातील लावणीला ग्लॅमर मिळवून दिलं.

  उगवली शुक्राची चांदणी (Ugvali Shukrachi Chandni)

  दे धक्का या चित्रपटातील हे गाणं असून हा चित्रपट अतुल काळे आणि सुदेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला होता. मुख्यतः शास्त्रीय गायिका असणाऱ्या आरती अंकलीकर यांनी ही लावणी फारच सुंदररित्या गायली आहे. तर याचं लेखन केलं होतं श्रीरंग गोडबोल यांनी. तर संगीत दिलं आहे अजय-अतुल-समीर यांनी. या गाण्याचं संगीत खूपच छान आहे. हे गाणं टिपीकल लावणी प्रकारातील नाही. चित्रपटातील बाल कलाकार एका रिएलिटी शोमध्ये हे गाणं सादर करते असं यात दाखवण्यात आलं आहे.

  छबीदार छबी (Chabidar Chabi)

  मराठी चित्रपटसृष्टीतील लावणीमधील माईलस्टोन असणाऱ्या पिंजरा या चित्रपटातील हे दुसरं गाणं आहे. हे गाणं उषा मंगेशकर यांनी गायलं असून संगीत होतं राम कदमा यांचं. मराठीतील चित्रपटातील सदाबहार लावण्यांमध्ये या लावणीची गणती होते. या लावणीतील अभिनेत्री संध्या यांचं नृत्य तुम्हाला खिळवून ठेवतं. योगायोगाने यातील अभिनेत्री यांचा लुक नटरंगमधील अप्सरा आली या गाण्यातील सोनाली कुलकर्णीच्या गाण्यासाठी करण्यात आला होता.

  मला लागली कुणाची उचकी (Mala Lagli Kunachi Uchki)

  पिंजरा या चित्रपटातील हे तिसरं सदाबहार लावणी साँग आहे. जे जगदीश खेबूडकर यांनी लिहीलं असून संगीत होतं राम कदम यांचं. गायिका होत्या उषा मंगेशकर.

  बाई मी पतंग उडवीत होते (Bai Mi Patang Udvit Hote)

  लाखात देखणी या चित्रपटातील लावणीचा समावेशही माईलस्टोन लावणी गाण्यांमध्ये होतो. ही लावणी लेजंडरी गायिका आशा भोसले यांनी गायली असून संगीत सुधीर फडके यांनी दिलं होतं. तर गीतकार होते कवी ग दि माडगूळकर. हे गाणं अभिनेत्री जयश्री गडकर यांच्यावर चित्रीत करण्यात आलं होतं.

  बाई माझी करंगळी मोडली (Bai Mazi Karangali Modli)

  पडछाया चित्रपटातील हे गाणं. आजही ही लावणी त्याच उत्साहाने सादर केली जाते. ही लावणी गायली होती आशा भोसले यांनी. ही लावणी कवी ग दि माडगूळकर यांनी लिहीली असून संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं.

   

  मी सोडून सारी लाज (Mi Sodun Sari Laaj)

  हे गाणं टिपीकल लावणी प्रकारातील नाही. तरीही लावणीच्या गाण्यांमध्ये याची गणती होते. तरी हे गाणं लावणीच्या गाण्यांमध्ये नेहमी सादर केलं जातं. 

  सोळावं वरीस धोक्याचं (Solav Varis Dhokyach)

  सवाल माझा ऐका या चित्रपटातील गाणं आहे. ही लावणी गायली होती सुलोचना चव्हाण यांनी तर गीतकार होते जगदीश खेबूडकर. तर संगीत होतं वसंत पवार यांचं. हे गाणं इतकं प्रचलित आहे की, याचे बोल हे म्हण म्हणूनही सर्रास वापरले जातात. हे गाणं अभिनेत्री जयश्री गडकर आणि अभिनेता अरूण सरनाईक यांच्यावर चित्रीत करण्यात आलं होतं.

  रेशमाच्या रेघांनी (Reshmachya Reghanni)

  मराठी तितुका मेळवावा या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांच्या काळातील ही लावणी आहे. ही लावणी लिहीली होती शांता शेळके यांनी तर संगीत दिलं होतं आनंदघन यांनी. तर गायिका होत्या आशा भोसले.  

  या रावजी तुम्ही बसा भावजी (Ya Ravji Tumhi Basa Bhavaji)

  शृंगारिक रसातील ही लावणी गायिली होती आशा भोसले यांनी. नावं मोठं लक्षण खोटं या चित्रपटातील हे गाणं असून गीतकार होते जगदीश खेबूडकर तर संगीतकार होते अनिल अरूण. या लावणीची अनेक गायिकांच्या आवाजातील बरीच व्हर्जन्सही नंतर आली. पाहा सुरेखा पुणेकर यांनी सादर केलेली ही लावणी.

  बुगडी माझी सांडली गं (Bugdi Majhi Sandli Ga)

  गायिका आशा भोसलेंच्या आवाजातील ही सदाबहार लावणी आहे सांगत्ये ऐका (1959 साली) या चित्रपटातली. या लावणीचे गीतकार होते ग दि माडगूळकर तर संगीत दिलं होतं राम कदम यांनी. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं अनंत माने यांनी. हे गाणं जयश्री गडकर यांच्यावर चित्रीत करण्यात आलं असून या चित्रपटात अभिनेत्री सुलोचना, हंसा वाडकर आणि चंद्रकांत हेही होते.  

  पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा (Piklya Panacha Deth Ki Ho Hirva)

  कलावंतीण या चित्रपटाली ही शृंगारिक लावणी गायली आहे शोभा गुर्टू यांनी. गीतकार जगदीश खेबूडकर असून संगीत दिलं होतं राम कदम यांनी. ही लावणी यमन रागातली आहे.

  लटपट तुझं चालणं (Latpat Tuz Chalan)

  गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेली ही लावणी आहे अमर भूपाळी या चित्रपटातली. गीतकार शाहीर होनाजी बाळा असून संगीत होतं वसंत देसाई यांचं.

  येऊ कशी तशी मी (Yeu Kashi Tashi Mi)

  विठ्ठल शिंदे यांनी संगीत दिलेली ही सदाबहार लावणी असून गीतकार आहेत श्रावण गायकवाड. तर या लावणीला आवाज दिला आहे रोशन सातारकर यांनी.

  कुण्या गावाचं आलं पाखरू (Kunya Gavach Aal Pakhru)

  ब्लॅक अँड व्हाईट एरातील सुशीला या चित्रपटातील हे गाणं आहे. हे गाणं उषा मंगेशकर यांनी गायलं असून संगीत होतं राम कदम यांचं. हे गाणं मराठीतील नावाजलेली जोडी रंजना देशमुख आणि अशोक सराफ यांच्यावर चित्रीत करण्यात आलं होतं.

  खेळताना रंग बाई (Kheltana Rang Bai)

  सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातील ही बहारदार लावणी आजही आवडीने सादर केली जाते. या लावणीचे गीतकार यादवराव रोकडे असून संगीत दिलं होतं विठ्ठल चव्हाण यांनी.

  डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस (Darling Darling Kay Mhantos)

  ही टिपीकल लावणीपेक्षा वेगळी लावणी होती. रोशन सातारकर यांनी ही लावणी गायली असून गीतकार राम मोरे तर संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. पाहा लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी सादर केलेली ही लावणी

  चला जेजुरीला जाऊ (Chala Jejurila Jau)

  अभिनेता सचिन पिळगांवकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील हे गाजलेलं गाणं. ही लावणी सादर केली होती किशोर शहाणे यांनी. हे गाणं गायलं होतं उत्तरा केळकर यांनी.

  कळीदार कपुरी पान (Kalidar Kapuri Paan)

  गायिका सुलोचना चव्हाण यांनी गायलेली ही लावणी. संगीत श्रीनिवास खळे यांचं असून गीतकार आहेत राजा बढे.

  लावणी संदर्भातल्या काही रंजक गोष्टी (Interesting Facts About Lavani)

  • लावणीही मुख्यतः नऊवारी साडी नेसून सादर केली जाते. यासाठी खास पारंपारिक दागिने घालून नृत्यांगता तयार होतात. आजकाल या नऊवारी साड्यांनाही मॉर्डन लुक दिला जात असल्याचं आढळतंय.
  • लावणीमध्ये परफॉर्म करणाऱ्या पुरूष कलाकारांना ‘नाच्या’ (तमाश्यामध्ये बाई आणि पुरूषाची भूमिका साकारणारा कलाकार) असं म्हटलं जातं.
  •  लावणीला तमाशा असंही म्हटलं जातं. ज्यामध्ये मुख्यतः शृंगारिक लावण्यांचा समावेश असतो.
  • महाराष्ट्रातील मुंबई विद्यापीठातील लोककला या विषयांमध्येही लावणीचा समावेश करण्यात आला आहे.
  • बॉलीवूडमधील अनेक नायिकांनीही ठसकेदार अंदाजात लावणी सादर करून प्रेक्षकांना घायाळ केलं आहे.

  लावणी या लोकनृत्य प्रकाराचं वैशिष्ट्य म्हणजे आजही या नृत्यप्रकाराची जादू कायम आहे. इतकंच नाहीतर महाराष्ट्राबाहेरही लावणीचे प्रयोग केले जातात.

  हेही वाचा -

  लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी लावायलाच हवी ही evergreen गाणी 

  ब्रेकअप झाल्यानंतर हमखास रडवतात ही ११ ब्रेकअप गाणी 

  होळीच्या दिवशी धमाल करण्यासाठी बॉलीवूडची टॉप 16 होळीची गाणी

  मराठी देशभक्तीपर गीतं आणि त्याचा अर्थ