साधारण पाऊस सुरु झाला की, अनेक आजार डोकं वर काढू लागतात. सर्दी, खोकला, ताप, कावीळ, टायफॉईट, मलेरिया, लेप्टो, डेंग्यू असे आजार डोकं वर काढू लागतात. डेंग्यू हा आजार मात्र पाऊस जाता जाता अधिक बळावतो. या दिवसात या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होते. डेंग्यूची लागण झाली की, मृत्यू ओढावतो अशी भीती अनेकांना वाटते. पण योग्य काळजी घेतली तर डेंग्यूला घाबरण्याचे काहीच कारण नाही. पावसाळा आता सुरु झाला आहे. या आजाराविषयीची माहिती असणे फारच गरजेचे आहे. म्हणूनच जाणून घेऊया डेंग्यू संदर्भात सर्वकाही
सावधान पाऊस येतोय! कावीळविषयी घ्या अधिक माहिती
डेंग्यू हा संसर्गजन्य आजार असून तो डासाच्या चावण्यामुळे होतो. एडिस इजिप्टाय या डासांच्या चावण्यामुळे हा आजार होतो. तोच डास जर दुसऱ्या कोणाला चावला तर त्याला देखील डेंग्यू होण्याची शक्यता असते. आता या डासांबाबत विशेष सांगायचे झाले तर डेंग्यूचे डास हे वेगळे असतात. ते पहाटे घरात प्रवेश करतात. शिवाय ते 1 फुटांपेक्षा जास्त वर उडत नाहीत. त्यामुळे असे डास अनेकदा पायांना चावतात. या डासांच्या 5 ते 6 वेळा चावल्यामुळे हा आजार होण्याची शक्यता असते. डेंग्यूचे एकूण 4 प्रकार आहेत. यातील डेंग्यू 2 हा प्रकार अधिक गंभीर आहे कारण या मध्ये तुमच्या प्लेटलेट्स म्हणजेच पांढऱ्या पेशींची संख्या कमी होऊ लागते. झपाट्याने ही संख्या कमी झाली तर एखादा अवयवही निकामी होऊ शकतो. त्यामुळे डेंग्यू 2 हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.
जाणून घ्या मधुमेहावरील घरगुती उपचारपद्धती
डेंग्यूचा डास चावल्यानंतर तुम्हाला त्याची बाधा झाली असेल तर तुमच्यामध्ये या तापाची ठराविक लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे कोणती ते देखील पाहुया
वातावरण बदलानंतर ताप येणे आणि डेंग्यूचा डास चावल्यानंतर ताप येणे यात फरक असतो. जर तुम्हाला अगदी फणफणून ताप आला असेल तर तो या दिवसात डेंग्यूचा ताप असण्याची शक्यता असते. त्यामुळे ताप हे याचे पहिले लक्षण आहे.
डोळ्यांच्या मागे जळजळ आणि डोळे जळजळणे हे डेंग्यूचे दुसरे लक्षण आहे. तुमच्या डोळ्यांमागे खूप जळजळ होऊ लागते. शिवाय तुमचे डोळेही दुखू लागतात.
सर्वसाधारण तापामध्ये अंगदुखी ही होते. पण डेंग्यूच्या तापामध्ये तुमचे हात पाय, सांधे देखील दुखू लागतात. डेंग्यूमुळे हे प्रमाण अधिक होते. तुम्हाला काहीच करावेसे वाटत नाही.
डेंग्यूचा ताप आल्यानंतर तुम्हाला काहीही करण्याचा कंटाळा येऊ लागतो. कशातच लक्ष लागत नाही. अंथरुणातून उठण्याची देखील इच्छा तुम्हाला होत नाही.
तापामध्ये खाल्लेले पचत नाही त्यामुळे उलट्या होतात.तुम्हाला सतत मळमळल्यासारखे आणि उलटी सारखे वाटते. काहींना उलट्यांमधून रक्तस्रावही होतो. जर तुम्हाला रक्तस्राव होऊ लागला म्हणजे तुम्हाला तुमची अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
डेंग्यूमधील हे आणखी एक लक्षण म्हणजे तुमच्या अंगावर लाल चट्टे उठू लागतात. शिवाय तुमच्या अंगावर लाल पुळ्या येऊ लागतात. जर तुम्हाला तापात तुमच्या अंगावर चट्टे येताना दिसत असतील तर तुम्हाला डेंग्यू असण्याची शक्यता आहे.
अनेकदा डेंग्यूमध्ये अंगदुखीसोबत तुम्हाला डोकेदुखी होते. ही डोकेदुखी असह्य असते. या डोकेदुखीमुळे तुम्हाला फक्त पडून राहावेसे वाटते.
इतर तापांप्रमाणेच डेंग्यूमध्येही भूक मरते. तुम्ही अंगदुखी, डोकेदुखीने इतके असह्य असता की, त्यामुळे तुम्हाला काहीही खाण्याची इच्छा नसते. तुम्हाला काहीही खाण्याची इच्छा होत नाही.त्यामुळे भूक मरणे हा अगदी सर्वसाधारण त्रास या दिवसांमध्ये होतो.
डेंग्यूमधील सर्वात मोठी भीती ही तुमच्या पांढऱ्या पेशी कमी होणे हे आहे. या तापामुळे तुमच्या रक्तातील पांढऱ्यापेशी झपाट्याने कमी होऊ लागतात. जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक असते.अगदी लाखोंच्या संख्येने या प्लेटलेट्स कमी होत असतात.
या दिवसात तुम्हाला पोट फुगण्याचा त्रास देखील होतो. मुळात आहारच नीट नसल्यामुळे पोटाशी निगडीत विकारही तुम्हाला या दिवसात होऊ लागतात.
आता तुम्हाला डेंग्यू झाल्याचे पहिले कारण कळले असेल ते म्हणजे डासांच्या चावण्यामुळे डेंग्यू होऊ शकतो. डेंग्यूचा डास हा विशेष असतो.तो चावल्यानंतर डेंग्यू होतो.
जर एखाद्या व्यक्तीला डेंग्यू झाला असेल. अशा आजारी व्यक्तीला डेंग्यू चावला आणि तो दुसऱ्याला चावला तर त्यांच्या संसर्गामुळे डेंग्यू होण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात खूप ठिकाणी पाणी साचते. या साचलेल्या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होते. डासांमुळे डेंग्यूच नाही तर मलेरिया होण्याची देखील शक्यता असते.
डेंग्यू झाल्यानंतर किंवा तुमच्या आजूबाजूला डेंग्यूचे रुग्ण असतील तर तुम्हाला काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते. कारण जर अशा रुग्णांना डास चावला आणि तो तुम्हाला चावला तर तुम्हालादेखील डेंग्यूचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे डासांपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी मॉस्किटो क्रिम लावा. जर तुम्हाला ते लावण्याची सवय नसेल तर तुम्ही ही सवय लावून घ्या.
बहुगुणी तुळस ही आवर्जून लावली जाते. तुळशीचे फायदे हे अनेक आहेत. अनेक आजारांवर तुळस ही गुणकारी आहे. शिवाय तुळस मनुष्याला आवश्यक असलेला ऑक्सिजन उत्सर्जित करते म्हणूनच वैज्ञानिक दृष्टया देखील तुळस लावण्याचे अनेक फायदे आहेत. घरात डेंग्यूचा रुग्ण असेल तर घरात शुद्ध हवा खेळती राहण्यासाठी तुळशीचे रोप मदत करते. त्यामुळे तुम्ही घरी तुळशीचे झाड आवर्जून लावायला हवे.
कचऱ्याचे नियोजन करणे हे फार गरजेचे असते. पावसात अनेक ठिकाणी पाणी साचते. या साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. ओल्या कचऱ्यावरदेखील डासांची उत्पत्ती असते. मुळात जिथे घाण असते. तिथेच डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे तुम्ही कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करायला हवे.
सुंगधी द्रव्यांचा या दिवसात वापर करु नका असे मानले जाते. कारण सुगंधी द्रव्याला डास अधिक आकर्षित होतात. त्यामुळेच सुंगधी द्रव्यांचा वापर करु नका असे सांगितले जाते.
तुमच्या घरात येणारे डास हे डेंग्यूचेच आहेत की नाही हे तुम्हाला लगेचच कळू शकत नाही. पण जर तुमच्या आजूबाजूला डेंग्यूचे रुग्ण असतील तर अशावेळी तुम्ही खबरदारी घेणे जास्त गरजेचे असते. म्हणूनच घरी येणाऱ्या डासांना रोखण्यासाठी पहाटे आणि संध्याकाळच्यावेळी दार- खिडक्या बंद करायला विसरु नका. जर दार-खिडक्या बंद करणे शक्य नसेल तर तुम्ही त्यांना जाळ्या तरी लावा.
डेंग्यूनंतर तुम्हाला डॉक्टरांकडून औषधे दिली जातात. पण या व्यतिरिक्त तुम्हाला घरच्या घरीही काळजी घेणे आवश्यक असते. तुमच्या खाण्यापिण्यात तुम्हाला काही बदल करावे लागतात. काही गोष्टींचा तुम्हाला आहारात समावेश करायचा असतो. अशाच काही घरगुती उपचार पद्धती पाहूयात.
पपईच्या पानांचा रस हा अनेकदा वेगवेगळ्या साथीच्या आजारांवेळी दिला जातो. पपईच्या पानांचे सेवन या दिवसात करायला सांगितले जाते. पपईच्या पानांचा रस करुन तुम्ही तो दिवसातून दोनदा तरी प्यावा.
डेंग्यूमध्ये तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते. बकरीचे दूध तुमच्यातील रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकते म्हणून तुम्ही या दिवसात बकरीचे दूध प्यायला हवे.जर तुम्हाला बकरीचे दूध मिळत नसेल तर तुम्ही गायीचे दूध पिऊ शकता.
कडुनिंबाचा काढा किंवा कडुनिंबांची पाने तुम्ही या दिवसात नक्कीच खायला हवी. आता कडुनिंबाचा पाला अर्थात कडूच असणार पण तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही त्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
तुळशीच्या पाने तुम्हाला नुसती चघळायला आवडत असतील तर तुम्ही अशावेळी तुळशीची पाने खायला हवीत.तुळशीचे औषधी गुणांचा तुम्हाला या दिवसात चांगला फायदा होऊ शकतो
गुळवेल ही अनेक आजारामध्ये गुणकारी असल्याचे म्हटले जाते. गुळवेलीची पावडर हल्ली सगळीकडे सहज मिळते. गुळवेलीच्या काढयाने तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तापानंतर तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी गुळवेलीचा काढा पिण्याचा सल्ला दिला जातो.
मेथीमध्ये भरपूर प्रमाणात आर्यन असते. तापामध्ये शरीराला योग्य पोषकतत्वांची गरज असते.त्यामुळे तुमच्या आहारात तुम्ही मेथीचा समावेश करायला हवा.
सध्या बाजारात सगळीकडे ड्रॅगन फ्रुट नावाचे गुलाबी फळ मिळते. गुलाबी रंगाचे हे फळ किवी प्रमाणेच असते. म्हणजे किवी हिरव्या रंगाचे असते. तर ड्रॅगन फ्रुटचा गर पांढऱ्या रंगाचा असतो आणि त्यात काळ्या रंगाच्या बिया असतात. या फळाला फार अशी काही चव नसते. पण या फळांचे सेवन तुम्ही या दिवसात केले तर तुम्हाला आराम मिळू शकतो.
जाणून घ्या सर्दी खोकल्यावरील घरगुती आणि सोपे उपाय
डेंग्यू हा घरी बरा होण्यासारखा आजार नाही. याची लागण झाल्यानंतर तुम्हाल डॉक्टरांकडे जाऊन तपासून घेणे गरजेचे असते. तुम्हाला आलेला ताप खूप असेल आणि तो दोन दिवसांपेक्षा जास्त काळासाठी असेल. शिवाय तुम्हाला तुमच्या तापाची लक्षणे डेंग्यूसारखे वाटत असतील तर तुम्हाला तुमची तपासणी करुन घेणे गरजेचे असते. रक्ततपासणी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या तापानुसार औषध दिली जातात. त्यानुसारच औषधोपचार पद्धतींचा अवलंब दिला जातो.
इतर तापाप्रमाणेच डेंग्यू झाल्यानंतर तुम्हाला ताप येतो. पण हा ताप खूप जास्त असतो. शिवाय या तापात तुमच्या अंगावर पुरळ यायला सुरुवात होते. त्यामुळे जर तुम्हाला अचानक खूप ताप आला असेल तर त्याची योग्य तपासणी करुन घेणे गरजेचे असते.
डेंग्यू संदर्भातील रक्त तपासणी केल्यानंतर तुम्हाला त्यानुसार उपचार पद्धती सांगितल्या जातात. त्यामुळे या उपचारपद्धती वेगळ्या असू शकतात.
डेंग्यूचा ताप हा आधी अगदीच साधा वाटतो. म्हणजे हा ताप तुम्हाला बरा होईल असे वाटते. पण चौथ्या दिवसानंतर या तापाचा जोर वाढू लागतो. जर तुम्ही डॉक्टरांना योग्यवेळी दाखवले नाही तर त्याचा त्रास अधिक वाढू शकतो. तुमचे आरोग्य जास्त बिघडू शकतो. या तापाचा परिणाम कमी झाला तरी तुम्हाला त्यातून पूर्ण बरे व्हायला कमीतकमी महिना जातो.
डेंग्यूचे चार प्रकार आम्ही आधीच सांगितले आहे. यातील डेंग्यू 2 हा प्रकार अधिक त्रासदायक असतो. या प्रकारात तुम्हाला अधिक रक्तस्राव होतो. तुमच्या प्लेटलेट्स कमी होऊ लागतात. तुम्ही योग्यवेळी लक्ष दिले नाही तर मृत्यू ओढावण्याची शक्यता येऊ शकते. पण तुम्ही या आजाराला घाबरण्याची काहीच गरज नाही.
डेंग्यूच्या रुग्णांची काळजी घेणे अधिक गरजेचे असते. त्यांच्या आरोग्याची काळजी घेताना तुम्हाला त्यांच्या आहाराकडे लक्ष द्यायचे असते. या दिवसात या रुग्णांना अगदी हलकेफुलके खायला द्यायचे हवे. वरण- भात आणि पालेभाज्या असा आहार तुम्ही रुग्णांना आहारात द्यायला हवा.
(फोटो सौजन्य- shutterstock)