आई असते जीव तर बाबा आयुष्याचा आधार….(Father's Day Quotes In Marathi)

आई असते जीव तर बाबा आयुष्याचा आधार….(Father's Day Quotes In Marathi)

आई हा घराचा जीव असते तर बाबा आयुष्याचा आधार, असं म्हटलं तर नक्कीच ते वावगं ठरणार नाही. लहानपणापासूनच सगळ्या गोष्टी आईशी निगडीत असतात. पण बाबा म्हणजे खंबीर व्यक्ती हे कळायला एक वय जावं लागतं. बाबाचा धाक लहानपणापासूनच सर्व मुलांना असतो. अर्थात आता ती परिस्थिती बदलली आहे. अहो बाबाचा आता अरे बाबा झालाय. त्यामुळे मुलांना जितकी प्रिय आई असते तितकाच प्रिय बाबाही असतो. कायम खंबीरपणे पाठिशी उभा राहणारा बाबा मात्र बऱ्याच अंशी तसा प्रशंसा करताना झाकोळलाच जातो. हे सर्व आता सांगण्याचं कारण म्हणजे लवकरच 16 जूनला ‘फादर्स डे’ येत आहे. त्यामुळे निदान यानिमित्ताने का असेना आपण आपल्या आयुष्यात आपल्या वडिलांचं स्थान काय आहे हे नक्की जाणून घेऊया. वर्षभर अर्थातच आपण आपल्या आईवडिलांना वेळोवेळी प्रेम दाखवत असतो. पण या दिवशी मुद्दाम आपल्या वडिलांना खास फील करून देण्यात एक वेगळीच मजा असते. आई ही कुटुंबाला वडिलांच्या आधारामुळेच व्यवस्थित सांभाळून ठेवत असते हा विचारही मुलांनी नीट करायला हवा.


काय आहे ‘फादर्स डे’ चा इतिहास (Father’s Day History)


वास्तविक फादर्स डे हा जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा करण्यात येतो. कॅथलिक युरोपमध्ये मध्ययुगात 19 मार्चला सेंट जोसेफच्या नावाने (इशा मसिहाचं पालनपोषण करणारे त्याचे पिता) फादर्स डे साजरा होत असे. त्यानंतर हा दिवस अमेरिकेत स्पेन आणि पोर्तुगालद्वारे आणण्यात आला. यापूर्वी 20 व्या शतकापर्यंत अमेरिकेतील केवळ कॅथलिक धर्मातच फादर्स डे साजरा करण्यात येत असे. त्यानंतर मात्र ‘मदर्स डे’ प्रमाणे जे वडील आपल्या मुलांना वाढवतात त्यांच्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला. भारतामध्ये नक्की कधी सुरूवात झाली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचंही उत्तर आम्ही तुम्हाला देतो. भारतामध्ये 90 च्या दशकापासून याची सुरुवात झाली. ‘आर्चिस’ या ग्रिटींग कार्डसारख्या दुकांनांचं आगमन भारतात झालं आणि त्यानंतर भारतातही हा दिवस साजरा व्हायला लागला. आता गेल्या काही वर्षात सोशल मीडियाच्या प्रभावामुळे ‘फादर्स डे’ चं ही महत्त्व वाढलं आहे. पाश्चात्य देशात जीवित वडिलांना या दिवशी लाल गुलाब तर मृत पित्यांना सफेद गुलाब देण्यात येतं.


पितृत्वाचं महत्त्व (Importance of Father)


fathers 1


आपण लहानपणापासूनच आईचं महात्म्य नेहमीच ऐकत आलं आहोत. पण वडिलांचं कौतुक फारच कमी ठिकाणी होताना दिसतं. खरं तर बऱ्याच ठिकाणी आईप्रमाणेच वडिलांचंही तितकंच महत्त्व असतं. काही ठिकाणी तर मुलं आईपेक्षाही वडिलांच्या जास्त जवळची असतात. मुलांच्या जन्मापासून ते मुलं मोठी होईपर्यंत त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी न सांगता राबणारा तो बापच असतो. पण वडिलांचं कौतुक सहसा समोर येत नाही. भारतीय परंपरेनुसार जेव्हा उठल्यावर सूर्याला नमस्कार केला जातो तेव्हाच तो नमस्कार आपल्या वडिलांनाही पोहचतो असं म्हटलं जातं. अर्थात प्रत्येक व्यक्तीनुसार त्याच्या आयुष्यात पित्याचं महत्त्व बदलत असतं. पण तरीही जितकी महत्त्वाची आई असते तितकंच महत्त्व पितृत्वाचंही असतं. वडिलांचं प्रेम हे प्रत्येक मुलाच्या आयुष्यात तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे वडिलांना आपलंसं करणं आणि त्यांना जपणंही गरजेचं आहे. कारण एकदा हा आयुष्याचा आधार हरवला की, कितीही परत यावा वाटलं तरीही ते नक्कीच शक्य नसतं.


आई तुला Thanks म्हणायचं राहूनच जातं…


वडिलांसाठी असणाऱ्या भावना नेहमी बोलून दाखवा (Always Share Your Feeling With Your Father)


fathers FI


बरेचदा घरात आईशी प्रत्येक मूल मनापासून आणि अगदी सगळं बोलतं. पण हीच गोष्ट जेव्हा बाबाची येते तेव्हा मात्र बऱ्याच घरात परिस्थिती वेगळी दिसते. काही घरांमध्ये भीतीने असो अथवा अन्य कारणाने असो बाबाच्या जास्त जवळ मूल नसतं. पण खरंतर ही परिस्थिती आता बदलली पाहिजे. या फादर्स डे निमित्ताने का असेना पण आपल्या वडिलांसाठी आपल्या मनात असणाऱ्या भावना प्रत्येक मुलाने त्यांच्याशी शेअर केल्या, बोलून दाखवल्या तर त्याइतकं मोठं गिफ्ट वडिलांसाठी काही नसेल. आजकाल धावपळीच्या आयुष्यात इतका वेळ निघून जातो की, आपल्या जन्मदात्यांशी बोलायला वेळ नसतो. या फादर्स डे ला नक्की त्यांच्यासाठी वेळ काढा आणि बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. खरं तर आईवडिलांना तुमच्या प्रेम आणि काळजीशिवाय काहीच नको असतं. त्यामुळे त्यांना उलट उत्तरं देताना दहा वेळा विचार करा की, नक्की ते कोणाच्या भल्यासाठी हे सांगत आहेत. कदाचित काही वडिलांना तुमच्या स्वप्नांचा अर्थ आणि त्यातील भावना कळणार नाहीत. पण त्यासाठी तुम्ही त्यांना विश्वासात घेऊन ती सांगणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जे करत आहात त्यामुळे तुमचं नुकसान तर होत नाही ना? ही चिंता एक वडील म्हणून त्यांना त्रासदायक ठरत असते आणि तुमची जिद्द तुम्हाला एखादं काम करण्यासाठी ओढून नेत असते. अशावेळीच पिता आणि मुलांमधील दरी वाढू लागते आणि ही दरी आईपेक्षा नेहमीच वडिलांच्या बाबत जास्त वाढलेली दिसते. त्यामुळेच आपल्या वडिलांना आपल्या सगळ्या गोष्टी समजावून द्यायची जबाबदारी ही सर्वस्वी आपल्यावर असते.


फादर्स डे साठी कोट्स (Best Father's Day Quotes In Marathi)


फादर्स डे साठी काही कोट्स तुम्ही तुमच्या वडिलांना आनंदी करण्यासाठी गिफ्ट देताना वापरू शकता. 


- निसर्गाचा अमूल्य ठेवा म्हणजे वडील


- आयुष्यात वडिलांनी एक असं गिफ्ट दिलं आहे ते म्हणजे माझ्यावर कायम विश्वास ठेवला


- माझे वडील जरी आज माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की, त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे


- आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे


- कसं जगायचं आणि कसं वागायचं हे तुम्ही शिकवलंत आणि त्यामुळेच आज या जगात जगायला शिकलोय


- कितीही अपयशी झाल्यावरही विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो तो म्हणजे बाबा


 


- जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात 


- तुम्हीही कितीही मोठे झालात तरी असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही मोठा माणूसच म्हणून पाहणार आणि तो म्हणजे तुमचा बाबा


- माझ्या वडिलांनी मला कसं जगायचं शिकवलं नाही, पण त्यांना बघून मी जगायला शिकलो - क्लेरेन्स बलिंग्टन केलंड


- आपलं मनच आहे जे कायम आपल्याला मुलगा आणि वडील म्हणून एकत्र ठेवतं - जोहान स्किलर


आई, आज तू हवी होतीस ...


पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Father's Day Wishes)


पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


या फादर्स डे ला तुमच्या वडिलांनाही द्या काही विशेष शुभेच्छा -


1. वडिलकीचं नातं हे आहे असं अनमोल,


ज्यामध्ये असतो राग आणि प्रेमही, त्यातच असतो आपलेपणा


फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा


2. स्वप्नं तर माझी, पण ती साकारण्याची ताकद दिली तुम्ही


खंबीरपणे उभे राहिलात माझ्या पाठिशी, तुमच्याही पाठिशी मी असाच राहीन खंबीरपणे उभा


फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा


3. आयुष्य खूप मोठं असलं तरी चिंता खूप आहेत


पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे, म्हणूनच ते सहन करण्याची ऊब येत आहे


फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा


4. न सांगताच तुम्हाला सर्व कळत होतं


माझ्या बाबांना काही सांगावंच लागत नव्हतं


न सांगताच कायम सर्व मिळत गेलं


फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा


5. आपली तहानभूक विसरून झटले जे आमच्यासाठी


त्याचं ऋण कधीही फेडू नाही शकणार या जन्मी


फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा


वडिलांना पत्र (Emotional Letter To Father)


प्रिय बाबा,


आपल्या आयुष्यात एक मित्र अथवा मैत्रीण नेहमीच असा असतो, ज्याला आपल्याबद्दल प्रत्येक गोष्ट माहीत असते. माझ्या आयुष्यातला माझा सर्वात पहिला आणि जवळचा मित्र जर कोणी असेल तर तुम्ही होतात 'बाबा'. आता पहिल्यासारखं समोर येऊन बोलता नाही ना? मलाही वेळ नसतो. जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तुम्ही समोर नसता. मला नेहमी वाटतं की, सर्वात जास्त जेव्हा मला तुमची गरज होती, तेव्हाच बाप्पा तुम्हाला घेऊन गेला. कदाचित त्याला तुमची जास्त गरज होती. अर्थात असं आता प्रत्येकवेळी मनाला समजवावं लागतं. पाच वर्ष होऊन गेली तुम्हाला जाऊन पण एकही दिवस असा गेला नाही की, ज्या दिवशी तुमची आठवण आली नाही. मी कधीही कुठेही अडकले काही चूक केली की, तुम्ही नेहमीच एका मित्राप्रमाणे खंबीर राहिलात माझ्या पाठिशी. कधीही मुलगी नाही तर मुलगा म्हणूनच वाढवलंत. आजही मी अभिमानानं हेच सांगते की, कदाचित तुम्ही माझ्या लहानपणी कठोरपणानं वागला नसतात तर, मला काही गोष्टींमधला चांगुलपणा कळलाच नसता.


आजही जेव्हा मनातलं सगळं बोलायचं असतं तेव्हा वेड्यासारखं वाटतं की, तुम्ही नक्की अचानक याल आणि पटकन मला प्रेमानं हाक मारून पटकन सगळं समजून घ्याल. मन अगदी मोकळं होऊन जाईल. बाहेर असणारी मी आणि तुमच्याशी घट्ट मैत्रीचं आणि मुलीचं नातं असणारी मी ही नक्कीच वेगळी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असतेच त्या व्यक्तीसारखी मैत्री तुम्हाला कदाचित कोणाशीच करता येत नाही आणि माझ्यासाठी माझा पहिला आणि अगदी जवळचा मित्र हा नेहमीच तुम्ही होतात, आहात आणि नेहमीच राहणार.


कितीही काही झालं तरीही तुमच्याकडे येऊन भडाभडा बोलायची सवय. आता ती सवय नाही राहिली. बोलते खूप हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण त्यामागे असणारी 'मी' फारच कमी लोक ओळखतात. अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतकी. मी गप्प राहिल्यावर मला काहीतरी झालं आहे, हे तुम्हाला लगेच कळायचं. मला काय हवंय किंवा काय नकोय हे मी सांगण्यापूर्वीच तुम्हाला माहीत होतं. मला कधी कोणत्या मुलाबरोबर मैत्री करायलाही तुम्ही रोखलं नाही. कदाचित त्यामुळंच मी बिनधास्त झाले. माझे विचार मी फक्त तुमच्यामुळे मांडायला शिकले. गप्प राहून जगात फक्त नुकसान होतं हे तुम्ही शिकवलं. पण काही बाबतीत तुम्ही गप्प राहिलात आणि मी तुम्हाला गमावलं हे मी कधीच विसरु शकणार नाही.


मला पत्रकारितेचं वेगळं क्षेत्र निवडायचं होतं. तुम्हाला काहीच माहीत नव्हतं. पण माझ्यावरच्या विश्वासापोटी कोणतेही आढेवेढे न घेता मला कधीही मागे न ओढता परिस्थिती नसतानाही तुम्ही माझं शिक्षण, माझी आवड जपली. चांगले संस्कार दिले. आपली चूक नसेल तर 'अरेला कारे' करताना मागे हटायचं नाही हा तुमचा बाणा आजही मी जपतेय. माझा बेस्ट फ्रेंड तुम्ही आहात हे कदाचित माझ्या सगळ्याच जवळच्या माणसांना माहीत आहे. पण तुम्हाला सांगण्याची वेळच कधी आली नाही. अर्थात तुम्हालाही ते माहीत होतं. पण आता वाटतं कधीतरी हे व्यक्त करायला हवं होतं. त्यामुळंच या फ्रेंडशिप डेचं निमित्त साधून तुम्हाला हे सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. जन्मोजन्मी मला फक्त आणि फक्त तुम्हीच बाबा मिळावे आणि असे बाबा जो माझा सर्वात जवळचा मित्र असावा हीच एक इच्छा आहे. या फादर्स डे च्या निमित्ताने देवाकडे फक्त एकच मागणं मागावं वाटतं, की तुम्ही माझ्याजवळ परत यावं. तुम्ही जवळ असाल तर मेहनत करण्याची अजून उमेद येईल असं वाटतं बाबा.


म्हणून यंदा नक्की साजरा करा ‘मातृदिन’, द्या हे अमूल्य गिफ्ट


तुमच्यासाठी काही ओळी लिहिल्या होत्या - या फादर्स डे च्या निमित्ताने पुन्हा एकदा इथे मांडाव्या वाटत आहे… तुम्ही त्या वाचायला नाही. पण तरीही या वाचून एखाद्याला आपल्या वडिलांशी किमान दोन शब्द बोलावे वाटले तरी त्याचं सार्थक झालं असं मी म्हणेन,


बाबा अचानक निघून गेला..


खूप बोलायचं राहूनच गेलं, व्यक्त व्हायचं राहून गेलं,


बराच रागीट आणि तितकाच प्रेमळ बाबा,


शिस्त लावणारा आणि मी लवकर घरी नाही आले तर काळजीने व्याकुळ होणारा,


लाडाने पिंट्या हाक मारणारा आणि मी चिडल्यावर त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा तो आनंद आजही डोळ्यातून जात नाही,


मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा,


स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,


तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा,


तुमचा तो प्रत्येक गुण आणि दोष माझ्यात असल्याचा सार्थ अभिमान आहे,


तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे,


कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार,


माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे,


माहीत आहे तुम्ही परत नाही येणार पण माझ्या प्रत्येक गोष्टीत बाबा नक्की असणार,


ज्यांना असतो बाबा कदाचित त्यांना पर्वा नसते, पण खरंच सांगते, बाप हा बाप असतो,


वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो,


आजही लोकांच्या मुलांना बापाबद्दल बोलताना पाहून जीव गलबलतो,


वाटतं अजूनही अचानक डोक्यात टपली मारून माझी कळ नक्की काढेल बाबा,


ती माया, ते प्रेम, तो सहवास, मी दूर जाताना डोळ्यात आलेलं पाणी लपवण्याचा प्रयत्न कधी लपलाच नाही,


माझ्यातून मी कधी तुम्हाला दूर होऊ दिलंच नाही,


शेवटच्या क्षणीदेखील तुमचा हात घट्ट पकडला होता आणि अजूनही त्याच आधारावर आयुष्य काढायची ताकत तुम्ही दिलीत,


बाप नक्की कसा असावा तर तुमच्यासारखा....


बरेच लोक आपल्या आई बरोबर बाबांना गृहीत धरतात. बाप हा असा व्यक्ती आहे जो आधार असूनही कधी जाणवू देत नाही. त्याला आपण चुकीचा समजतो पण वेळेवर त्याला जाणून घ्यायला हवं.


फोटो सौजन्य - Instagram


You might like this:


Happy Birthday Messages For Friends In Marathi


Wedding Anniversary Wishes & Messages In Marathi