‘या’ आश्चर्यकारक फायद्यांसाठी आहारात करा लाल भोपळ्याचा समावेश

‘या’ आश्चर्यकारक फायद्यांसाठी आहारात करा लाल भोपळ्याचा समावेश

भोपळा हा शब्द ऐकताच डोळ्यासमोर येते ती “चल रे भोपळ्या टुनूक टुनूक” म्हणणारी लहानपणीच्या गोष्टीमधली, लेकीकडे जाणारी म्हातारी आणि जंगली प्राण्यापासून तिला लपवणारा भलामोठा भोपळा. पण भोपळ्याचं महत्त्व या गोष्टींपुरतंच मर्यादीत नक्कीच नाही.

महाराष्ट्रात अनेक सणसमारंभात लाल भोपळ्याची भाजी अगदी आवर्जून केली जाते. पावसाळा सुरू झाला की लाल भोपळा बाजारात दिसायला सुरूवात होते. लाल भोपळ्याचा वापर भाजी, सांबर, पुऱ्या, पछडीमध्ये केला जातो. चवीला उत्कृष्ठ असलेला लाल भोपळा पचायला हलका असल्यामुळे या भाजीला पथ्याची भाजी असंही म्हणतात. लाल भोपळ्याचा वापर आहारात केल्यास अनेक आजार दूर राहू शकतात. कारण लाल भोपळ्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात.

shutterstock

जाणून घ्या लाल भोपळा खाण्याचे आरोग्यदायी फायदे

वजन कमी होते

लाल भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. ज्यामुळे तुम्हाला लवकर भुक लागत नाही. शिवाय भोपळ्यात कॅलरीजचे प्रमाणही कमी असते. पाव किलो भोपळ्यामधून जवळजवळ 60 ते 70 कॅलरीज मिळतात. ज्यामुळे तुमच्या शरीराचे योग्य पोषण होते आणि शरीरात फॅट्स वाढत नाहीत.

दृष्टी सुधारते

भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असते. व्हिटॅमिन ए मुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. डोळ्यातील रॅटीना सुरक्षित राहण्यासाठी आणि दृष्टी सुधारण्यासाठी शरीराला व्हिटॅमिन ए गरजेचे आहे. नियमित आहारात लाल भोपळ्याचा समावेश केल्यास मोतीबिंदू आणि वाढत्या वयामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या समस्या नियंत्रणात राहण्यास मदत होते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

जर तुम्ही सतत आजारी पडत असाल तर तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याची गरज आहे. लाल रंगाची आणि व्हिटॅमिन युक्त फळं आणि भाज्यांमुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. लाल भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, ई आणि सी मुबलक प्रमाणात आढळतात. सहाजिकच आजारपणांपासून दूर रहायचे असेल तर नियमित लाल भोपळा अवश्य खा.

त्वचा चिरतरूण राहते

लाल भोपळ्यामध्ये बीटा कॅरोटीन असते. ज्यामुळे तुम्हाला लवकर अॅंटी एजिंग समस्या होत नाहीत. चेहऱ्यावर वाढत्या वयामुळे दिसणाऱ्या सुरकुत्या अथवा इतर एजिंगच्या खुणा नको असतील तर आहारात लाल भोपळ्याचा समावेश नक्की करा. तुम्ही लाल भोपळ्यापासून एक मस्त फेसपॅक देखील तयार करू शकता. यासाठी पाव वाटी पिकलेल्या लाल भोपळ्याचा गर घ्या. गर काढण्यासाठी लाल भोपळ्याच्या बिया काढून तो मिक्सरमध्ये वाटून घ्या. या गरात अंड्याचा पांढरा भाग, मध  आणि चमचाभर दूध मिसळा. या मिश्रणाचा एक फेसपॅक तयार करा आणि चेहरा आणि मानेवर लावा. वीस ते तीस मिनीटांनी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

कर्करोगापासून रक्षण होते

लाल भोपळ्यामधील बीटा कॅरोटीन जितके तुमच्या डोळे आणि त्वचेसाठी उत्तम आहे तितकेच ते तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी चांगले आहे. जर तुम्ही नियमित लाल भोपळ्याचा वापर आहारात करत असाल तर तुमच्या आरोग्याला कर्करोगाचा धोका कमी होतो. कारण भोपळ्यामधील पोषक घटक कॅन्सरच्या फ्री रेडिकल्सपासून तुमचे रक्षण करू शकतात.

मधुमेहींसाठी अतिशय उत्तम

भोपळ्याची चव थोडी गोडसर असते. ज्यामुळे मधुमेहींसाठी भोपळा उपयुक्त आहे की नाही हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मात्र मुळीच चिंता करू नका. कारण लाल भोपळ्यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहते.

shutterstock

भोपळ्याच्या बिया देखील असतात उपयुक्त

वास्तविक फळातील बिया जमिनीत रोवून पुन्हा त्या झाडाची निर्मिती केली जाते. खाताना मात्र फळं आणि फळभाज्यांमधील बिया बऱ्याचदा काढूनच टाकल्या जातात. भोपळ्याच्या बिया मात्र आरोग्यासाठी फार उपयुक्त असतात. भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा 6 फॅटी अॅसिड असते. यासोबतच या बियांमध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असल्यामुळे या बिया खाणं तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतं.

अधिक वाचा

कढीपत्त्याचे फायदे वाचाल तर आजपासूनच कढीपत्त्याचा वापर कराल सुरू

अशी ओळखा केमिकल-फ्री फळं How to recognize chemical free fruits

सौंदर्य खुलविण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी नियमित खा 'पपई'

फोटोसौजन्य - इन्साग्राम