पावसाळ्यात नक्की ट्राय करा या पौष्टिक भजी (Monsoon Special Healthy Pakora Recipes)

पावसाळ्यात नक्की ट्राय करा या पौष्टिक भजी (Monsoon Special Healthy Pakora Recipes)

उकाड्यातून बाहेर पडत आता वातावरणात आल्हाददायक गारवा सुद्धा आलाय. खरं सांगू का? आता खरं तर भजी करण्याचा मौसम आलाय. पावसाळ्यात तुम्हालाही मस्त गरमगरम कॉफी, चहा किंवा ग्रीन टी आणि भजी खाण्याचा मोह होत असेल तर आज तुमच्यासाठी अशा काही पौष्टिक भजी आणि त्यांची रेसिपी


  • मिश्र डाळीचे वडे


    dalwada


आता नावावरुनच तुम्हाला ही भजी पौष्टिक असल्याचा अंदाज आला असेल. दोन पेक्षा जास्त डाळी या वड्यांमध्ये वापरण्यात येतात.


साहित्य:  1 वाटी तुरडाळ, हरभरा डाळ, 1 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ, कोथिंबीर,मीठ,आलं-लसूण-मिरची पेस्ट, आवडत असल्यास कांदा, हळद, हिंग, तेल


कृती: आदल्या रात्री सगळ्या डाळी भिजत घाला. कमीत कमी 3 ते4 तास डाळ भिजत घातली तरी चालेल. मिश्र डाळी मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या. त्यात मीठ, आल-लसूण-मिरची  पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हळद, हिंग घालून मिश्रण एकजीव करा. लक्षात ठेवा. तुम्हाला वडे अगदी सहज तेलात सोडता यायला हवे. असे हे मिश्रण व्हायला हवे.


तयार सारणाच्या वड्या तेलात तळून किंवा शॅलो फ्राय करुन मस्त सॉससोबत ही भजी सर्व्ह करा.


तुम्ही याच्या अगदी बारीक बारीक भजी तेलात सोडल्यास उत्तम


  • चवळी-मेथीची भजी
chavlichi bhaji


भजीचा हा प्रकारही चवीला एकदम मस्त लागतो. कडधान्य आणि मेथीच्या पाल्याची ही भजी चवीला तर मस्त आहेच शिवाय पौष्टिकही आहे.


साहित्य: 1 वाटी पांढरी चवळी (लहान/मोठी कोणतीही घ्या),  एक वाटी मेथीची पाने,आलं-लसूण-मिरची पेस्ट, मीठ, हिंग,हळद, तिखट, जीरं, बारीक चिरलेला कांदा


कृती: साधारण 5 ते 6 तास चवळी भिजवून घ्या. मिक्सरमधून चवळी वाटताना त्यात अजिबात पाणी घालू  नका. मिश्रण जाडसर दळून घ्या. त्यात तिखट, मीठ, हळद, आलं-लसूण- मिरची पेस्ट, जीरं, बारीक चिरलेला कांदा, हिंग, मेथीची चिरलेली पानं घालून मिश्रण एकजीव करुन घ्या. तयार पीठाच्या भजी तयार करुन मस्त तेलात फ्राय करुन या भजींचा आस्वाद घ्या. हिरव्या चटणीसोबत ही भजी एकदम मस्तच लागतात.


  • पालक भजी
palak bhaji


खूप जणांना पालक खायला अजिबात आवडत नाही. पण या पालकापासून केलेली भजी आहाहा. कसली भारी लागते माहीत आहे का? पालक भजी करुन तुम्ही तुमचा पावसाळा मस्त इन्जॉय करु शकता.


साहित्य: पालकाची पाने, 3 ते 4 मोठे चमचे बेसन, 2 चमचे तांदुळाचे पीठ जीर, हिंग, ओवा, लाल तिखट, एक बारीक चिरलेला कांदा,धणे-जीरे पूड हळद, मीठ, तेल


कृती: पालकाची पाने स्वच्छ धुवून चिरुन घ्यावीत. साधारण 10 ते 15 पान तरी घ्यावीत. एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ एकत्र करावे.  चिरलेल्या पालकमध्ये एक लहान कांदा चिरुन घालावा. त्यात हळद, जीरं, ओवा, तिखट,धणे-जीरे पूड घालावी. मिश्रण एकजीव करुन घ्यावे. मीठामुळे तुम्हाला पालक ओला वाटेल. यात अंदाज घेऊन बेसन- तांदळाच्या पीठाचे सारण घालावे. जितके पीठ लागेल तितके घालावे. भजी सोडण्याइतके मिश्रण झाल्यानंतर तयार पिठाच्या भजी करुन घ्याव्यात . मुठीया सारखा आकार करुन या भजी तेलात सोडल्या तरी चालेल.


  • शिळ्यापोळीची भजी
polichi bhaji


पौष्टिक भजी तर आपल्याला बनवायला आवडतातच. पण तुमच्याकडे उरलेल्या पोळ्यांपासून तुम्ही कधी भजी बनवली आहे का? मग चला तर बनवूया


साहित्य: 1 कप दही, साधारण चार पोळ्या /चपाती, तुमच्या आवडीच्या भाज्या (मटार, कोबी, गाजर, कांदा, ), मीठ, हळद, तिखट, कोथिंबीर, हिरव्या मिरचीची पेस्ट, बेसन, रवा, तेल, हिंग, खायचा सोडा आवश्यक असल्यास


कृती: चपाती मिक्सरमधून फिरवून घ्या. एका भांड्यात दही फेटून घ्या. त्यात पोळ्यांचा चुरा घालून मिश्रण साधारण 15 ते 20 मिनिटे ठेवा. पोळ्या दह्यात चांगल्या भिजतील. त्यात तुमच्या आवडीनुसार भाज्या घाला. साधारणपणे मटार, गाजर, कांदा, कोबी घाला. मिश्रण एकजीव करुन त्यात मीठ, हळद, तिखट, हिरव्या मिरचीची पेस्ट, हिंग घाला. बेसन आणि रवा आवश्यकतेनुसार घालून भजी सोडता येतील इतके मिश्रण घट्ट ठेवा. भजी तळून शेजवॉन सॉस आणि मेयॉनिजसोबत सर्व्ह करा.


  • ओनिअन रिंग्ज


    onion rings


आता तुम्ही म्हणाल आपली टेस्टी कांदा भजी असताना ओनियन रिंग्ज कशाला ? पण कांदा भजी तुम्हाला हवी तशी होईलच असे सांगता येत नाही. जर तुम्हाला काहीतरी वेगळे खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही ओनिअन रिंगज करुन पाहू शकता.


साहित्य: मोठे कांदे, कॉर्न स्टार्च, ब्रेड क्रम्स, मैदा,बेकिंग पावडर,गार्लिक पावडर, काळीमिरी पावडर,मीठ, तेल


कृती: या रेसिपीसाठी तुम्ही पांढरे कांदे वापरले तरी चालतील. कांद्याच्या साधारण इंचाच्या गोल गोल चकत्या कापायच्या आहेत. त्या गोल गोल चकत्या तुम्हाला रिंग्जच्या आकारात आणण्यासाठी तुम्हाला आतील भाग एक एक काढायचा आहे. तयार रिंग्ज एका बाजूला ठेऊन एका भांड्यात तुम्हाला कॉर्नस्टार्च, मेंदा, बेकिंग पावडर, गार्लिक पावडर, काळीमिरी पावडर एकत्र करुन त्याचे भजीच्या पिठासारखे मिश्रण तयार करायचे आहे. त्यात तुम्हाला कांदाच्या रिंग्ज घालायच्या आहेत. कांद्याच्या रिंग्जना हे मिश्रण लागायला हवे. या रिंग्ज तुम्हाला ब्रेड क्रम्समध्ये घालून तयार रिंग्ज मस्त तेलात तळायच्या आहेत.


गरमगरम रिंग्ज तुम्ही छान केचअप सोबत खाऊ शकता.


*भजीचे हे काही प्रकार तुम्ही या पावसाळ्यात नक्की करुन पाहा. तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कळवा