प्रत्येकाच्या लव्हस्टोरीत काही ना काही हटके फॅक्टर हा असतोच. पहिल्यांदाच नजरानजर होणे, पहिला स्पर्श, पहिल्यांदा होणारी प्रेमाची चाहूल सगळंच कसं खास असतं. प्रेमात पडल्यावर एकमेकांच्या स्वप्नांमध्ये हरवून जाण्यात वेगळीच मजा असते. पण काहींच्या प्रेमाची सुरूवात जेवढी गुलाबी असते तसाच त्याचा शेवट असेल असं नसतं. कोणाला आपोआप आपलं प्रेम मिळतं तर कोणाला नाही. एखादा प्रेमात प्रामाणिक असतो तर एखादा धोका देतो. पण जेव्हा प्रेम खरं असतं तेव्हा ते एकमेंकाना समजून घेतात आणि त्यांचं नातं अधिक विश्वासाचं असतं. जे कोणत्याही साधारण नात्यात नसतं. आजच्या #MyStory मध्ये आपण एका अशा मुलीची कथा वाचणार आहोत जिचं प्रेम काही कारणांमुळे तिच्यापासून कायमचं लांब गेलं. श्रेयाच्या पहिल्या प्रेमाची ही अनोखी कहाणी तिच्याच शब्दात –
माझं पहिलं प्रेम माझ्या आयुष्यात तेव्हा आलं जेव्हा मी कॉलेजमध्ये होते. कॉलेजच्या स्पोर्टस इव्हेंटमध्ये भाग घेण्यासाठी हैदराबादला गेले होते. त्याला पाहताच मी प्रेमात पडले आणि कदाचित तोही. कारण आमचं तिकडे बरंच बोलणं झालं. प्रत्येक मॅचच्या वेळी मी त्याला शोधत होते. पण मला माहीत नव्हतं की, नक्की त्याच्या मनातही तेच चालू आहे का जे माझ्या मनात होतं. मी तिकडे पूर्ण पाच दिवस होते. या पाच दिवसात तर मी पूर्णपणे त्याचीच झाले होते. त्यानंतर आम्ही परत आपापल्या शहरात गेलो. मला त्याच्याबद्दल एवढंच माहीत होतं की, तो दिल्लीचा राहणारा आहे. पण पुढच्या भेटीसाठी एवढंच पुरेसं नव्हतं. असो… हैदराबादहून परत आल्यावरही मी त्याचाच विचार करत होते. मी फेसबुकवरही त्याचा शोध घेतला. पण काहीच कळू शकलं नाही. पण मी त्याला सांगितलं होतं की, दिल्लीला माझी एक लांबची मावशी राहते. त्यावर तो काहीच बोलला नव्हता.
फिल्मी स्टाईल नशीबाचा खेळ
नशीबाचा खेळ असा काही होता की, काही दिवसांनी माझ्या मावशीकडून आम्हाला एका कार्यक्रमाचं आमंत्रण आलं. तिच्या नवीन घराची पूजा होती. माझी आई तर जाणारच होती. मीही लगेच तयार झाले. विचार केला की, जर आमची भेट झाली तर. मी आणि आई दिल्लीला पोचलो. तिकडेही मी त्याचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला पण भेट होऊ शकली नाही. एक आठवडा होऊन गेला. आता माझं मन उदास झालं होतं. आम्ही परत जाण्याची तयारी केली आणि स्टेशनवर पोचलो. आम्हाला सोडायला मावशी आणि काकाही आले होते. अचानक मला तो दिसला. माझी लव्हस्टोरी इतकी फिल्मी असेल असं मला वाटलं नव्हतं. मी त्याला बघतच राहिले आणि त्याची नजर माझ्यावर पडली. गाडी सुटायला अजून वेळ होता. मी काहीतरी कारण सांगून ट्रेनमधून बाहेर आले.
मैत्री होण्याआधीच लग्नाची गोष्ट
बाहेर येऊन मी त्याला भेटले आणि म्हटलं की, अखेर मी तुझा शोध लावलाच. तो म्हणाला, तू इकडे कशी? जास्त बोलायला वेळ नव्हता, मी फक्त त्याला एवढंच म्हटल की, तुझा फोन नंंबर दे आणि त्याने लगेच सांगितला. मी लगेच त्याचा नंबर माझ्या फोनमध्ये सेव्ह केला. पुन्हा ट्रेनमध्ये येऊन बसले. पण माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की, आनंद, भीती, उत्सुकता अशा सगळ्याच भावना एकाच वेळी मनात येत होत्या. ट्रेनच्या प्रवासात मी उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहत होते. घरी पोचल्यावर एक दोन दिवसांनी मी त्याला फोन केला. पण त्याने काहीही ऐकून न घेताच सांगितलं की, तो माझ्या लग्न करू शकणार नाही. मी एकदम आश्चर्यचकित झाले. पण थोडं सावरत मी त्याला म्हटलं की, अचानक लग्न कुठून आलं, मी तुला लग्नाबद्दल काही म्हटलं का? आपली तर अजून नीट मैत्रीही झाली नाही. मग तो जरा शांत झाला. हळूहळू आमची मैत्री झाली आणि मग प्रेमालाही सुरूवात झाली. तेवढ्यात मला दिल्लीत नोकरीची ऑफर आली आणि मी तिकडेच शिफ्ट झाले. तो मला एकदा भेटायला आणि आम्ही दिवसभर खूप फिरलो. रात्री माझ्या रूमवर आलो.
आज ही लक्षात आहे तो भोळा स्वभाव
आता मनात विचार येतो की, किती भोळे होतो तेव्हा आम्ही. आम्ही त्या रूमवर एकटे असूनही भरकटलो नाही. तो आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेला. मी त्याला म्हटलं की, मला तुला आंघोळ घालायची आहे. तो इतका लाजला की, वर्णनही करता येणार नाही. त्याचा चेहरा मला अजूनही लक्षात आहे. रात्रभर आम्ही गप्पा मारल्या आणि मग तो सकाळी त्याच्या घरी गेला. पण यावेळीही तो मला सांगत राहिला की, तो माझ्याशी लग्न करू शकणार नाही. कारण त्याच्या घरचे जातीबाहेर लग्न करून देणार नाहीत. जवळजवळ तीन-चार वर्ष आम्ही फोनवर बोलत होतो आणि वर्षातून एकदा आम्ही भेटायचो. पण अचानक दिवस माझ्यावर जणू वीजच पडली. जेव्हा त्याने मला सांगितलं की, त्याच्या घरच्यांनी त्याच लग्न ठरवलं आहे. अशा एका मुलीशी जी त्याला अजिबात आवडली नाहीयं. पण नाईलाजास्तव त्याला हे लग्न करणं भाग होतं. त्याचे आईबाबा आमच्या लग्नासाठी तयार नव्हते आणि तो त्याच्या आईबाबांचं म्हणणं टाळू शकत नव्हता.
माझी काय चूक होती
मी त्याची खूप विनवणी केली, त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की, या लग्नामुळे माझं आणि त्याच्या होण्याऱ्या बायकोचं दोघीचं आयुष्य बरबाद होईल. पण काहीच उपयोग झाला नाही. तो निघून गेला. मला वाटतं की, यात पूर्णपणे चूक माझीच होती की, कारण त्याने मला पहिल्यांदाच सांगितलं होतं की, तो माझ्याशी लग्न करू शकणार नाही पण तरीही या नात्याला मी पुढे नेत राहिले. कधी कधी असं वाटतं की, माझं समजूतदार असणंं ही माझी चूक होती का? की, मी त्याचा प्रोब्लेम समजून घेऊन त्याला जाऊ दिलं. जर कदाचित त्यावेळी मला काही झालं असतं तर तो थांबला असता. मला कळतंच नव्हतं की, काय करावं, स्वतःला सावरण्यासाठी मला खूप वेळ लागला. पण त्याला विसरणं शक्य नव्हतं. लग्न झाल्यावरही तो मला भेटायला आला आणि आश्चर्य म्हणजे मी त्याला माफ केलं. आम्ही पुन्हा भेटू लागलो. मी पुन्हा त्याच्यावर प्रेम करू लागले. मी हा विचार केला नाही की, हा तोच माणूस आहे जो मला सोडून गेला होता आणि मी त्याच्या प्रेमात वेडे झाले होते. तोच आता….आम्ही भेटतो. खूप वर्ष असंच चालू राहीलं. मला स्वतःलाच एका अशा माणसाच्या नात्यात राहायचं होतं जो माझा नव्हता.
आता मी मुक्त आहे
माझं आयुष्य असंच चालू होतं. माझी मैत्रिण मला नेहमी समजवायची की, मी माझं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. पण मला आजही हे कळलं नाही की, मी त्याच्याासाठी इतकी वेडी का होते. त्याच्याशी बोलल्याशिवाय जगणं माझ्यासाठी शक्य नव्हतं. पण हळूहळू मी त्याच्यापासूनन दूर झाले. एक दिवस हिम्मत करून मी त्याला सांगितलं की, मला फोनही करू नकोस आणि भेटूही नकोस. मला खूप त्रास झाला. मी मुंबईला परत आले आणि अखेर त्या मोहातून बाहेर पडले. मला किती त्रास झाला ते मलाच माहीत आहे. आज मी मुक्त आहे आणि आपलं आयुष्य एकटीने जगतेय. आजही मला आयुष्यात त्याची कमतरता जाणवते.