पावसाळ्यात मधुमेहींनी अशी घ्यावी पायाची काळजी

पावसाळ्यात मधुमेहींनी अशी घ्यावी पायाची काळजी

पावसाळ्यात सर्वांनीच स्वतःची घेणं गरजेचं आहे. मात्र पावसाळ्यात मधुमेहींनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी.  मधुमेहींना पायाला दुखापत झाल्यास ती लवकर बरी होत नाही. यासाठी पावसाळ्यात मधुमेहींनी पायाला कोणतीही दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी. पावसाळ्यात पाय ओले राहील्यामुळे अथवा ओलाव्यामुळे पायांच्या तळव्याला इनफेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. ज्याचा परिणाम पुढे गॅंगरिन होण्यामध्ये होऊ शकते. याशिवाय पावसाळ्यात घाम, ओलावा, बुरशी आणि सुक्ष्मजीवांना पोषक वातावरण असते. ज्याचा मधुमेहींना नक्कीच त्रास होऊ शकतो. एका संशोधनानुसार जगभरात पाच लोकांपैकी एका व्यक्तीला मधुमेह असतो. भारतात तर याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठीच मधुमेहींनी स्वतःची योग्य काळजी घेणे गरजेचं आहे. 

Shutterstock

मधुमेहींनी पावसाळ्यात अशी घ्यावी पावलांची काळजी

 • जर पावसामुळे अथवा हवामानातील ओलाव्यामुळे तुमच्या पाय अथवा तळव्याला खाज येत असेल तर नखे लावून तो भाग मुळीच खाजवू नका.
 • पावसाळ्यात जखम टाळण्यासाठी मधमेहींनी नियमित नखे कापावीत. कारण नखांमध्ये म पाणी, माती आणि चिखल साचल्यास त्यामुळे तुम्हाला  इनफेक्शन होऊ शकते.
 • मधुमेहींनी रात्रीची नखे कापू नयेत कारण त्यामुळे दुखापत होण्याची अधिक शक्यता असते.
 • जर तुमची त्वचा कोरडी आणि रूक्ष असेल तर त्वचेवर नियमित नारळाचे अथवा बदामाचे तेल लावा. ज्यामुळे तुमच्या त्वचेला सतत खाज येणार नाही.
 • पावसाळ्यात योग्य चप्पल अथवा शूजचा वापर करा ज्यामुळे तुमच्या पायांना जखम  अथवा इनफेक्शन होणार नाही.
 • आहारावर नियंत्रण ठेवा ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखर अतीप्रमाणात वाढणार नाही.
 • मधुमेहींनी औषधे घेण्याचा कंटाळा आणि टाळाटाळ मुळीच करू नये. कारण त्यामुळे पायाची जखम चिघळण्याची शक्यता अधिक असते.
 • जर पावसामुळे तुमचे पाय ओले झाले असतील तर घरी अथवा ऑफिसमध्ये  गेल्यावर पाय लगेच कोरडे करा.
 • पावसात भिजून घरी गेल्यावर पाय स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर थोडे कोमट पाणी आणि मीठ याचा वापर करून पाय निर्जंतूक करा. 
 • पायांची काळजी घेण्यासाठी मधुमेहींनी नियमित पेडीक्युअर करावे.
 • पार्लरमध्ये पेडीक्युअर करणं शक्य नसल्यास घरीच कोमट पाणी आणि पेडीक्युअर साधनांचा वापर करून पाय स्वच्छ करावे.
 • पायांना एखादी जखम झाल्यास त्वरीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 • मधुमेहींनी नेहमी रात्री झोपताना पाय स्वच्छ धुवावेत शिवाय ते कोरडे करून त्याला मॉश्चराईझर लावावे.
 • रात्री झोपताना मधुमेंहींनी पायामध्ये पातळ मोजे घालून झोपावे.
 • चालताना ठेच लागणे, धडपडणे, खरचटणे अशा गोष्टी तुमच्यासाठी धोकादायक असू शकतात. यासाठी पावसात फिरायला  गेल्यावर चालताना या गोष्टींची जरूर काळजी घ्या.
 • पाय स्वच्छ करताना पावलाच्या बोटांच्या मधील जागादेखील व्यवस्थित कोरडी करा. कारण बोटांच्या मध्ये पाणी साठून तो भाग अस्वच्छ झाल्याने तुम्हाला इनफेक्शन होण्याचा धोका अधिक असू शकतो.
 • पायात काटा घुसणे, भोवरी होणे अशा समस्या झाल्या तर त्यावर डॉक्टरांच्या सल्लाने उपाय करा. स्वतः पिन, सुई अशा टोकदार वस्तू वापरून घरीच उपचार करण्याचा प्रयत्न करू नका.
 • नियमित पायाची देखभाल आणि चेकअप जरूर करा. 
 • मधुमेहींसाठी काही खास फुटवेअर आणि शूज बाजारात विकत मिळतात त्याचा वापर करा
 • तुमच्या मापाचेच फुटवेअर वापरा शिवाय फुटवेअर जास्तीत जास्त आरामदायक असतील याची काळजी घ्या.
 • एखाद्या किरकोळ दुखापतीकडे मुळीच दुर्लक्ष करू नका. कारण कधी कधी अशा छोट्या छोट्या दुखापती गॅंगरिनसारखे गंभीर रुप धारण करू शकतात. 

अधिक वाचा

‘या’ सवयींमुळे वाढू शकतो मधुमेहाचा धोका

मधुमेहावर करा घरगुती उपचार आणि करा मधुमेहाला दूर (Home Remedies for Diabetes)

मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम