तुम्हाला चहा आवडतो का, मग मसाला चहाचे हे आरोग्यदायी फायदे जरूर वाचा

तुम्हाला चहा आवडतो का, मग मसाला चहाचे हे आरोग्यदायी फायदे जरूर वाचा

चहा हे पेय सर्वांनाच आवडतं. बाहेर मुसळधार पाऊस पडत असताना गरमागरम मसालेदार चहा पिण्याची बातच न्यारी आहे. भारतातच नाही तर जगभरात चहा आवडीने प्यायला जातो. चहा दिवसभरात कधीही घेता येत असला तरी सामान्यपणे दिवसाची सुरूवात चहाने केली जाते. चहाचा सुंगध, रंग, कडकपणा यासोबत चहामध्ये काही असेही घटक असतात जे तुमच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतात. शिवाय चहा हे सर्वसामान्यांना परवडणारे एक पेय आहे. त्यामुळे भारतात घरी आलेल्या पाहुण्याचे स्वागत पाणी आणि चहा  देऊन करण्याची पद्धत आहे. 

चहा पिण्याबाबत अनेकांच्या मनात गैरसमज असतात. चहात दूध आणि साखर अतीप्रमाणात वापरल्यास अॅसिडिटी अथवा मधुमेहाचा त्रास होऊ शकतो. चहा अतीप्रमाणात घेणं योग्य नसलं तरी जर तुम्हाला आजारापणापासून दूर राहायचे असेल तर तुम्ही मसाला चहा नक्कीच ट्राय करू शकता. मात्र लक्षात ठेवा दिवसभरात कमीत कमी दोन ते तीन कपच चहा घ्या. त्यापेक्षा अधिक चहा घ्यायचा असेल तर चहामध्ये दूध आणि साखर वापरू नका.

यासाठी मसाला चहा करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे जरूर जाणून घ्या.

shutterstock

कसा कराल मसालेदार चहा

मसाला चहा तयार करण्यासाठी आधी गॅसवर एक कप पाणी उकळून घ्या. त्यात थोडंसं आलं किसून टाका. मग अर्धा चमचा चहापावडर टाका. चहा उकळल्यावर शेवटी चहाचा मसाला टाका. चहाला मसालेदार करण्यासाठी तुम्ही त्यात वेलची, दालचिनी, लवंग, काळीमिरी, तुळशीची पाने, गवती चहा वापरू शकता. चहामध्ये साखर आणि दूधाचा वापर कमी करा. ज्यामुळे चहाचे चांगले फायदे तुम्हाला नक्कीच मिळू शकतात.

ब्लॅक टीच्या पौष्टिक मूल्याबद्दल देखील वाचा

shutterstock

मसाला चहातील घटकांचे आरोग्यदायी फायदे

  • मसाला चहात किसलेलं आलं टाकल्यामुळे चहा स्वादिष्ट लागतो. शिवाय आल्यामुळे पावसाळ्यात होणारी सर्दी, खोकला, ताप अथवा डोकंदुखीमधून तुम्हाला आराम मिळू शकतो. सांधेदुखीचा त्रास असल्यास तुम्ही आलं घातलेला चहा घेतल्यामुळे नक्कीच फायदा होऊ शकतो
  • मसाला चहा मध्ये वेलची टाकल्यास तुम्हाला या चहाचा चांगला फायदा होऊ शकतो. कारण वेलचीमुळे पचनशक्ती सुधारते. ज्यामुळे तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास कमी होतो. 
  • साधारणपणे थंड हवेच्या ठिकाणी अथवा हिवाळ्यात मसाला चहामध्ये काळीमिरी आणि लवंग टाकण्याची पद्धत आहे. लवंग आणि काळीमिरी या मसाल्याच्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटी ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते.
  • मसाला चहामध्ये दालचिनी टाकल्यामुळे चहाला एक वेगळाच स्वाद येतो. दालचिनीमुळे तुम्हाला खोकला अथवा कफाचा त्रास होत नाही.
  • तुळशीची पानं टाकून केलेला चहा आरोग्यासाठी नेहमीच उत्तम असतो. तुळस ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. चहात तुळशीची पानं टाकल्यामुळे तुम्हाला मानसिक ताणातून मुक्ती मिळू शकते. 
  • मासिक पाळीमध्ये सामान्यतः महिलांना पोटदुखी, कंबरदुखीचा त्रास जाणवतो. मात्र मसाला चहा पिण्याने तुम्हाला मासिक पाळीच्या या त्रासातून तात्पुरता आराम मिळू शकतो. 
  • मसाला चहा आरोग्यासाठी नेहमीच गुणकारी असतो. मात्र मसाला चहा किती प्रमाणात प्यावा आणि तो कसा तयार करावा हे फार महत्त्वाचे आहे. फॅट फ्री दूध आणि थोड्या प्रमाणात साखर टाकून केलेला चहा घेतल्यास तुमच्या दिवसाची सुरूवात नक्कीच फ्रेश होऊ शकते. त्यामुळे निरोगी जीवनासाठी आणि कामाचा ताण कमी करण्यासाठी दिवसभरात एक ते दोन कप मसाला चहा घेण्यास काहीच हरकत नाही.

अधिक वाचा

Green Tea : मनाला शांत आणि शरीराला निरोगी ठेवणाऱ्या 'ग्रीन टी'चे फायदे (Green Tea Benefits In Marathi)

वजन कमी करण्याबरोबरच इतर गोष्टीतही फायदेशीर आहे हर्बल टी

'दालचिनी'चे असेही फायदे असतील हे माहीत नव्हते (Cinnamon Benefits In Marathi)

फोटोसौजन्य - शटरस्टॉक