लहान मुलांना वाचनाची गोडी कशी लावाल

लहान मुलांना वाचनाची गोडी कशी लावाल

लहान मुलांना काही ठराविक काळात चांगल्या सवयी लावणं आणि योग्य संस्कार देणं फार गरजेचं असतं. कारण जे संस्कार त्यांच्यावर लहान वयात होतात ते त्यांचा प्रभाव मोठेपणी जाणवू लागतो. लहान मुलांवर करण्यात येणारा एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे त्यांना वाचनाची गोडी लावणं. वाचन केल्यामुळे मुलांमधील व्यक्तिमत्व अधिक खुलून येतं. जर तुम्हाला तुमच्या मुलांनी हुशार आणि बुद्धीमान व्हावं असं वाटत असेल तर लहानपणापासून त्यांना वाचनाची गोडी लावा. मात्र आजकाल दुर्देवाने थोरामोठ्यांमध्येही वाचनाची आवड कमी झालेली दिसून येते. आम्हाला वाचायला वेळच नाही असं काही लोक सांगतात. चांगल्या सवयी जोपासण्यासाठी वेळ काढावा लागतो. वास्तविक वाचनामुळे माणसाच्या विचार आणि बुद्धीचा खऱ्या अर्थाने विकास होत असतो. यासाठीच वाचन संस्कृती टिकुन राहणं फार गरजेचं आहे. शिवाय पुस्तकं ही माणसाची एक उत्तम संगत असू शकते. वाचनाची आवड असलेल्या माणसाला कधीच नैराश्य येत नाही. कारण वाचन करण्यासाठी त्यांच्याजवळ जगभरातील अनेक चांगली पुस्तकं सज्ज असतात. शिवाय जर मुलांना वाचनाची आवड असेल तर याचा त्यांना शैक्षणिक जीवनातदेखील चांगला फायदा होऊ शकतो. वाचन केल्यामुळे मुलांच्या स्मरणशक्तीत वाढ होते, एकाग्रता वाढते, मुलांमध्ये प्रंसगी स्वतः निर्णय घेण्याची क्षमता वाढते, एखाद्या गोष्टीबाबत तर्क करण्याचे कौशल्य विकसित होते, संवेदनशीलता वाढते, समाज आणि देशाविषयी प्रेम निर्माण होते, मानसिक आणि बौद्धिक विकास होतो. 

shutterstock

मुलांमध्ये वाचनाची आवड लावण्यासाठी सोप्या टिप्स

 • बाळ गर्भात असताना जर आईने चांगली चरित्र अथवा पुस्तकं वाचली तर त्याचा गर्भावर चांगला परिणाम होतो ज्यामुळे बाळाला देखील वाचनाची आवड असते.
 • लहानपणीच मुलांना गोष्टी, कथा, चरित्र सांगून मुलांच्या मनात पुस्तकांबाबत कुतूहल निर्माण करा.

वाचा - मराठी साहित्यप्रेमींसाठी खास मराठी कादंबरी यादी

 • लहान मुलांना मोठ्या पानांची अथवा ज्यावर मोठी मोठी आकर्षक चित्रे असतील अशी पुस्तके भेट द्या
 • मुलांसमोर नियमित वाचन करा. कारण पालक मुलांचे खरे आदर्श असतात. शिवाय मुलं नेहमी पालकांचं आचरण करत असतात. मुलांसमोर पुस्तके वाचल्यामुळे त्यांना हे आपले एक दैनंदिन कर्म आहे असं  वाटू लागेल.
 • घरात तुमच्यासाठी आणि मुलांसाठी एक छोटेखानी लायब्ररी निर्माण करा. ज्यात मुलांसाठी त्यांच्या हाताला सहज लागतील अशी त्यांच्या आवडीची पुस्तके लावा. मुलांना त्यांच्यासाठी असलेली पुस्तकं स्वतः काढून वाचण्याची परवानगी द्या.
 • एक ते पाच वयोगटातील मुलांना स्टोरी बुक्सच्या माध्यमातून वाचन करण्याची सवय लावा.
 • लहान मुलांना मोबाईलवर गेम खेळायला देण्यापेक्षा ई-बुक वाचण्याची सवय लावा.
 • नियमित अथवा एखाद्या सण-समारंभाला देवाप्रमाणेच पुस्तकांना नमस्कार करण्याची सवय मुलांना लावा. 
 • मुलांना एखादा विषय द्या आणि त्याविषयी माहिती त्यांना स्वतः गोळा करण्यास सांगा.
 • मुलांचे शैक्षणिक प्रोजेक्ट तयार करण्यासाठी तुम्ही त्यांना मदत करण्याऐवजी फक्त मार्गदर्शन करा ज्यामुळे स्वशिक्षणाची त्यांना गोडी वाटु लागेल. 
 • शाबासकी देण्यासाठी त्यांना पुस्तके भेट द्या.
 • मुलांना जगभरातील प्रसिद्ध वाचनालये आणि त्याविषयी अधिक माहिती सांगा.
 • घरात एका ठराविक वेळेत सर्वांनी मिळुन वाचन करण्याचे वळण लावा.
 • एखाद्या प्रश्न अथवा शंकेचं समाधान पुस्तक अथवा गुगलवरून कसं शोधायचं हे मुलांना शिकवा.
 • वाचलेल्या पस्तकांची नोंद आणि सारांश काढण्यासाठी मुलांना मदत करा. ज्याचा फायदा त्यांना त्यांच्या अभ्यासात होऊ शकेल.
 • अभ्यासा व्यतिरिक्त इतर पुस्तके वाचण्याच्या सवयीमुळे मुलांचा वैचारिक विकास होईल. 
 • मुलांच्या वयानुसार एखादे पुस्तक निवडून ते तुम्ही आणि मुलांनी मिळुन वाचा आणि त्यावर वैचारिक चर्चा करा.
 • मुलांच्या वाचनाच्या आवडीबाबत त्यांचे मनापासून कौतुक करा. ज्यामुळे त्यांच्यामध्ये हा छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन वाढेल.

अधिक वाचा

सिंगल मदर्ससाठी खास टिप्स, असं घडवा तुमच्या मुलांना

जलद वजन करायचं असेल कमी, तर ‘या’ 10 सवयी आवश्यक

तुमच्या 'या' सवयींमुळे नकळत खर्च होत आहेत तुमचे पैसे

फोटोसौजन्य - शटरस्टॉक