लहान मुलांना हेल्दी खाण्याची सवय कशी लावाल

लहान मुलांना हेल्दी खाण्याची सवय कशी लावाल

निरोगी आणि सुदृढ शरीरप्रकृतीसाठी पोषक आणि संतुलित आहार गरजेचा आहे हे आपण सारे जाणतोच. मात्र तरिही बऱ्याचदा अपथ्यकारक आणि चुकीचे अन्नपदार्थ आपणच खात असतो. याचा परिणाम नकळत शरीरावर होऊ लागतो. आपण जसे वागतो तशीच सवय मुलांना लागत असते. जीवनशैलीत झालेल्या या बदलामुळे आजकाल लहान मुलांना जंकफूड, चायनिज, प्रकिया केलेले पदार्थ खाण्याची सवयच लागली आहे. ज्यामुळे लहान वयातच मुलांचे वजन प्रमाणापेक्षा वाढलेलं दिसून येतं. शिवाय या पदार्थांमधून त्यांचे योग्य पोषणही होत नाही. एका जागतिक संशोधनानुसार भारतात कुपोषणग्रस्त मुलांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. गरीब कुटुंबातील मुलं त्यांना पुरेसं खायला मिळत नाही म्हणून कुपोषित असतात. तर चांगल्या सुखसुविधा प्राप्त झालेली मुलं चुकीचे पदार्थ खाण्याने कुपोषित झालेली असतात. लहानपणीच मुलांना जर चांगले पदार्थ खाण्याची सवय लावली तर भविष्यात याचा सुपरिणाम नक्कीच दिसून येऊ शकतो.

यासाठीच लहान मुलांना चांगले पदार्थ अथवा हेल्दी खाण्याची सवय लावण्यासाठी महत्वाच्या टिप्स जरूर वाचा.

मुलांना पौष्टिक अन्नपदार्थांची ओळख करून द्या -

मुलांना अन्नपदार्थ आणि त्यातील पोषक घटक जर लहानपणापासूनच माहीत असतील तर ते चुकीचे पदार्थ कमी प्रमाणात खाऊ शकतात. यासाठी घरात एखादा पदार्थ तयार केल्यावर तो मुलांना किती पोषक आहे आणि त्यामुळे शरीरावर कसा सुपरिणाम होतो हे सांगा. चांगले पदार्थ खाल्यामुळे त्याला कसं वाटलं , काय परिणाम शरीरावर झाला, त्यात किती प्रमाणात कोणती पोषणमुल्यं होती याबाबत मुलांशी चर्चा करा.

खाद्यपदार्थ आकर्षक तयार करा -

चव आणि सजावट यामुळे मुलं कोणत्याही पदार्थाकडे आकर्षित होत असतात. यासाठी नवनवीन रेसिपी मुलांसाठी घरीच तयार करा. एखादा बोरिंग पदार्थ जर तुम्ही आकर्षक पद्धतीने त्यांच्यासमोर सर्व्ह केला तर तो त्यांना नक्कीच आवडू शकतो. यासाठी साध्या पदार्थांना त्यांच्या आवडीप्रमाण सजवून त्यांना खाण्यासाठी द्या.

Shutterstock

घरात हेल्दी पदार्थच ठेवा -

घरात मुलांसाठी जो कोरडा खाऊ तुम्ही ठेवला असेल तो शक्य तितका पौष्टिक असेल याची काळजी घ्या. बऱ्याचदा फ्रीजमध्ये जंकफूड, चॉकलेट, आईस्क्रीम, कोल्डड्रिंक, पॅक्ड फूड भरून ठेवलेले असतात. ज्यामुळे  मुलांना ते पदार्थ सतत खाण्याची सवय लागते. असे पदार्थ कधीतरी खाण्यास काहीच हरकत नाही. मात्र जर घरात अपथ्यकारक पदार्थ समोर असतील तर ते वारंवार खाल्ले जातात. यासाठी सूपरमार्केटमधून सामान विकत घेताना विनाकारण अशा पदार्थांची साठवण होणार नाही याची काळजी घ्या.

मुलांना स्वानुभव घेऊ द्या -

मुलं नेहमी स्वानुभावातून आणि पालकांच्या आचरणातून शिकत असतात. त्यामुळे मुलांसमोर असे पदार्थ तुम्ही स्वतः खाणे टाळा. ज्यामुळे मुलांना या गोष्टीचे महत्त्व पटू लागेल. शिवाय एखादा चुकीचा पदार्थ खाण्याने काय त्रास होतो हे त्यांना स्वतः अनुभव घेऊन शिकू द्या. पोट बिघडल्यावर, अपचन झाल्यावर त्यांना त्या मागचे कारण मात्र जरूर पटवून द्या.

स्वयंपाक करताना मुलांची मदत घ्या-

मुलांना चांगले पदार्थ खायला शिकवण्यासाठी ही युक्ती नक्कीच तुमच्या उपयोगी पडू शकते.  स्वयंपाक करताना अथवा स्वयंपाकाचा मेन्यू ठरवताना मुलांची मदत घ्या. त्यांना किचनमधील छोटी छोटी कामे करण्यासाठी सांगा. ज्यामधून त्यांना तुम्ही पौष्टिक खाद्यपदार्थांचे महत्व समजावून सांगू शकता. एखादा पदार्थ करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे जेव्हा त्यांना स्वतः समजेल तेव्हा तो पदार्थ ते नक्कीच मनापासून खातील.

अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी करून तुम्ही तुमच्या मुलांना चांगलं आणि पौष्टिक खाण्याची सवय नक्कीच लावू शकता.

अधिक वाचा

लहान मुलांना वाचनाची गोडी कशी लावाल

बॉलीवूडच्या ‘या’ टॉप १० अॅक्टर्सनी अनाथ मुलांना घेतलं दत्तक

सिंगल मदर्ससाठी खास टिप्स, असं घडवा तुमच्या मुलांना

फोटोसौजन्य -  इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक