साडी आणि महिलांचं एक अतूट नातं आहे. किशोरवयीन मुलींपासून वयस्कर महिलांपर्यंत सर्वांनाच साडी नेहमीच भुरळ घालत असते. कारण साडीत कोणत्याही स्त्रीचं मुळ सौंदर्य अधिक खुलून येतं.
सिल्कची साडी हा तर महिलांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे प्रत्येकीलाच आपल्या वॉर्डरोबमध्ये सिल्कच्या साड्यांचं अप्रतिम कलेक्शन असावं असं वाटत असतं. साडी प्रेमापोटी अनेकजणी विविध प्रकारच्या सिल्कच्या साड्यांची खरेदी नेहमीच करत असतात. मात्र पावसाळ्यात या साड्यांची काळजी कशी घ्यायची हे प्रत्येकीपुढे एक मोठं आव्हानच असतं. एकतर सिल्कचे कपडे अथवा साड्या घरी धुता येत नाहीत. शिवाय त्या अतिशय नाजूक आणि महागड्या असतात. त्यात पावसाळ्यात घरातील आणि बाहेरील वातावरण अतिशय दमट झालेलं असतं. हवामानात वाढलेल्या हा आर्द्रतेचा तुमच्या वॉर्डरोबमधील सिल्कच्या साड्यांवर नक्कीच परिणाम होतो.
सिल्कचे कापड हे अतिशय तलम धागे आणि नैसर्गिक रंगांपासून तयार केलेलं असतं. त्यामुळे सिल्कच्या साड्यांमध्ये दमटपणा निर्माण झाला तर त्याचे रंग एकमेकांमध्ये मिसळू शकतात. शिवाय रेशीम हे मऊ आणि तलम असल्यामुळे त्याला बुरशीचा प्रादूर्भाव लगेच होऊ शकतो. सिल्कच्या साड्यांमध्ये वापरण्यात येणारी जर ओलसर राहिल्यास ती फाटू शकते ज्यामुळे तुमच्या साडीचं नुकसान होतं. यासाठी पावसाळ्याआधी आणि पावसाळ्यात सिल्कच्या साड्यांची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे.
ब्लाउज बॅक डिझाइन बद्दल देखील वाचा
सिल्कच्या साडीची काळजी घेण्यासाठी खास टिप्स
- सिल्कच्या साडीची काळजी घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिल्कच्या साड्या वारंवार ड्रायक्लिन करू नका. त्याऐवजी ती नेसून झाल्यावर थोडावेळ पंख्याखाली अथवा हवेवर मोकळी करून ठेवा. ज्यामुळे साडीला घामामुळे अथवा बाहेरील वातावरणामुळे झालेला दमटपणा कमी होईल. तुम्ही एखादी साडी दोन ते तीन वेळा नेसल्यावर एकदा ती साडी ड्रायक्लिन करण्यास काहीच हरकत नाही. मात्र त्यामुळे त्या साडीचा पोत हळूहळू खराब होऊ लागतो.
- पावसाळ्याआधी वातावरण कोरडं असताना कपाटातील सर्व साड्या बाहेर काढा आणि पलंग अथवा सोफ्यावर काही तास मोकळ्या करून ठेवा. ज्यामुळे त्या पावसाळ्यात कोरड्या राहतील.
- साडी हॅंगरवर लावून ठेवण्याऐवजी तिची घडी घालून एखाद्या पांढऱ्या रंगाच्या सुती कापडामध्ये गुंडाळून ठेवा. ज्यामुळे हवा खेळती राहील आणि साडीचं आयुष्य वाढेल. शिवाय साडीवरील जरीकाम लवकर खराब होणार नाही.
- ठेवणीतल्या साड्या घडी घालताना त्यांच्या आतील बाजूने बटरपेपर घालून ठेवा. ज्यामुळे पावसाळ्यातील दमटपणामुळे साडीचा रंग इतर भागाला लागणार नाही.
- सर्व सिल्कच्या साड्या कमीत कमी तीन महिन्यांनी वॉर्डरोबमधून बाहेर काढून त्यांना मोकळ्या हवेत ठेवायची सवय लावा. शिवाय त्या पुन्हा वॉर्डरोबमध्ये ठेवण्यासाठी सुती कापडात गुंडाळून ठेवताना त्यांची घडी उलट दिशेने घाला म्हणजेच त्या रिफोल्ड करा. ज्यामुळे त्या घडीवर विरघळणार नाहीत.
- पावसाळ्यापूर्वी साड्यांना ऊन दाखवण्यासाठी सिल्कच्या साड्या थेट ऊनात ठेवू नका. कारण यामुळे तुमच्या साड्यांमधील नैसर्गिक रंग उडून जावू शकतो. त्या खोलीतच उघड्या हवेवर ठेवा.
- कपाटामध्ये बरेच दिवस साडी ठेवल्यामुळे अथवा पावसाळी वातावरणामुळे सिल्कच्या साड्यांना कोंदट वास येण्याची शक्यता असते. यासाठी बाजारात मिळणारे सुंगधी पाऊच साड्यांमध्ये ठेवा. जर तुमच्याकडे असे काही साधन नसेल तर कडूलिंबाची पाने सुकवून ती एका सुती कापडात गुंडाळून साडीमध्ये ठेवा. ज्यामुळे वॉर्डरोबमधील वातावरण निर्जंतूक होईल आणि कपड्यांना बुरशी लागणार नाही.
- साडीला सुंगध येण्यासाठी तुम्ही वॉर्डरोबमध्ये सोनचाफ्याची फुले सुकवूनदेखील एखाद्या सुती कापडात गुंडाळून ठेवू शकता.
- कपाटात चंदनाचे लाकूड ठेवल्यास कपाटातील कपड्यांना सुंदर सुंगध येऊ शकतो.
- साडी नेसल्यावर थेट परफ्युम अथवा डिओचा वापर करू नये कारण यामुळे तुमची साडी खराब होऊ शकते.
- पावसाळ्यात सण-समारंभ भरपूर असतात. मात्र अशा वेळी हातमागावर विणलेल्या, प्युअर सिल्कच्या साडया नेसणं टाळावं कारण हवामानातील ओलसरपणामुळे त्या साड्या लवकर खराब होऊ शकतात. त्याऐवजी तुम्ही सिल्क आणि इतर कापड मिक्स केलेल्या मशीनमेड साड्या या दिवसात नेसू शकता. साडीवरील प्रेम जपण्यासाठी प्रत्येक महिलेने साड्यांची अशी काळजीे नक्कीच घ्यायला हवी. आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा.
अधिक वाचा
साडी नेसताना या ’14’ चुका टाळा (Saree Wearing Tips In Marathi)
साडी पेटीकोट विषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का
साडीबरोबर घाला हे 7 Sexy ब्लाऊज
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम