गुलाबाचं फुल जितकं नाजूक दिसतं तितकंच ते सुंदरही असतं. गुलाबाच्या फुलाचा सुंगध मन वेधणारा असतो म्हणूनच देवाला वाहण्याच्या हारामध्ये, परफ्युममध्ये, भेटवस्तू देताना फुलांच्या बुकेमध्ये किवा अगदी मैत्री अथवा प्रेमाची कबुली देताना गुलाबाचं फुल आवर्जून वापरलं जातं. मात्र एवढंच नाही तर गुलाबाच्या फुलाचे अनेक आरोग्यदायी आणि सौंदर्य फायदे देखील आहेत.
गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केलेलं 'गुलाबपाणी' तुम्ही तुमच्या आरोग्यसमस्या दूर करण्यासाठी आणि त्वचा आणि केसांच सौंदर्य खुलविण्यासाठी नक्कीच वापरू शकता. कारण गुलाबपाण्यामध्ये मॉश्चराईझिंग, थंडावा देणारे घटक असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.
गुलाबपाण्यामध्ये त्वचेसाठी पोषक गुणधर्म असतात. गुलाबपाण्यामुळे तुमच्या त्वचेचे संरक्षण तर होतेच शिवाय त्वचा मुळापासून स्वच्छ होते. यासाठी जाणून घ्या त्वचेसाठी गुलाबपाण्याचा वापर कसा कराल.
वातावरणातील वाढते प्रदूषण आणि धुळ, माती यामुळे चेहऱ्यावर अॅक्नेची समस्या निर्माण होते. या समस्येवर योग्य उपचार न केल्यास चेहऱ्यावरील त्याचे प्रमाण वाढतच जाते. आजकाल अनेक किशोरवयीन मुलींना या समस्येला तोंड द्यावं लागतं. चेहऱ्यावरील पिंपल्समुळे चेहरा तर खराब दिसतोच शिवाय त्वचेवर जळजळ आणि लालसरपणादेखील जाणवतो. मात्र गुलाबपाण्यामध्ये ही उष्णता कमी करणारे घटक असतात. शिवाय त्यातील अॅंटिऑक्सिडंट घटकांमुळे तुमच्या त्वचेवरील धुळ आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होते. य़ासाठी पिंपल्स असलेली त्वचा दररोज गुलाबपाण्याने स्वच्छ करा.
त्वचेचे सौंदर्य कायम टिकवण्यासाठी त्वचा नियमित क्लिन, टोनआणि मॉश्चराईझ करणं गरजेचं आहे. मात्र हे माहीत असूनही बऱ्याचदा आपण हे डेली रूटीन फॉलो करण्याचा कंटाळा करतो. नियमित गुलाबपाण्याने चेहरा टोन केल्यास तुम्हाला कोणत्याही त्वचासमस्या होणार नाहीत. शिवाय तुमची त्वचा फ्रेशदेखील दिसेल. कारण गुलाबपाण्यामुळे तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ होते आणि हायड्रेटदेखील राहते.
त्वचेवर अती साबण अथवा क्लिंझर्संचा वापर केल्यामुळे तुमच्या त्वचेमधील पी एचचे प्रमाण असंतुलित होते. ज्यामुळे त्वचेला लवकर जंतूसंसर्ग होतो आणि त्वचा समस्या निर्माण होतात. मात्र नियमित गुलाबपाण्याने चेहरा स्वच्छ केल्यास तुमच्या त्वचेतील पी एच संतुलित राहते.
गुलाबपाण्याने त्वचा नियमित स्वच्छ केल्यामुळे त्वचेच्या आतील धुळ माती निघून जाते. मात्र त्यासोबतच तुमच्या त्वचेतील ओलावादेखील कायम राहतो. त्वचेला पुरेशी आर्द्रता मिळाल्याने तुमच्या त्वचेला एक प्रकारचा तजेदारपणा येतो. यासाठीच उन्हाळ्यात त्वचा फ्रेश दिसावी असं वाटत असेल तर घराबाहेर पडताना एका स्प्रे बॉटलमध्ये गुलाबपाणी भरा आणि सोबत ठेवा. थकवा जाणवू लागल्यास चेहऱ्यावर शिंपडण्यासाठी हे पाणी तुम्ही वापरू शकता. ज्यामुळे तुम्ही लगेच फ्रेश दिसू लागाल.
धकाधकीचं जीवन, अपूरी झोप, जागरण, कामाचा ताण, चिंता, काळजी यामुळे तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं निर्माण होतात. यावर उपाय करण्यासाठी तुम्ही गुलाबपाण्याचा वापर नक्कीच करू शकता. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कॉटन पॅडवर गुलाबपाणी शिंपडा आणि ते डोळ्यांवर ठेवून काही मिनीटं नूसतं पडून रहा. तुमच्या डोळ्यातून दाह बाहेर पडत आहे असं तुम्हाला वाटू लागेल. नियमित असं केल्यास हळूहळू तुमचे डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होईल.
जीवनशैलीत झालेल्या बदलामुळे आजकाल अकाली वृद्धत्वाच्या खुणा चेहऱ्यावर दिसू लागतात. चेहऱ्यावर सुरकुत्या दूर करण्यासाठी जर तुम्ही अनेक प्रयत्न करून थकला असाल तर हा उपाय जरूर करा. कारण गुलाबपाण्यामुळे तुमच्या त्वचेमधील नैसर्गिक चमक आणि ओलावा कायम राहतो. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या अथवा एजिंगच्या खुणा जाणवत नाहीत.
बऱ्याचदा आपल्याला गुलाबपाण्याचा त्वचेवर होणारा चांगला परिणाम माहीत असतो. मात्र गुलाबपाणी तुमच्या केसांसाठीदेखील तितकंच उपयुक्त आहे हे तुम्हाला माहीत आहे का ? नसेल तर पुढील माहिती जरूर वाचा
गुलाबपाण्यामध्ये नैसर्गिक पोषक घटक असतात ज्यामुळे तुमच्या केसांचे सौंदर्य वाढू शकते. गुलाबपाण्यात व्हिटॅमिन ए, बी 3, सी आणि ई मुबलक असते. ज्याचा परिणाम तुमच्या केसांच्या मुळांवर होतो. केसांच्या मुळांचे योग्य पोषण झाल्यामुळे तुमच्या केसांची योग्य वाढ होते. जर तुम्हाला लांबसडक आणि निरोगी केस हवे असतील तर केसांच्या मुळांना तेलासोबत गुलाबपाणी जरूर लावा.
बऱ्याचदा हवामानात झालेला बदल अथवा कोरड्या त्वचेमुळे केसांमध्ये कोंडा निर्माण होतो. वारंवार केसांवर अॅंटि डॅन्ड्रफ शॅम्पूचा मारा झाल्यास केसांचे नुकसान होऊ शकते. यासाठी कोंड्यावर नैसर्गिक उपाय केल्यास नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. यासाठी मेथीचे दाणे गुलाबपाण्यामध्ये काही तास भिजत ठेवा. त्यानंतर त्याची एक जाडसर पेस्ट करून ती केसांना एखाद्या हेअरपॅकप्रमाणे लावा. अर्धा तासाने केस स्वच्छ करा. हा उपाय महिन्यातून एकदा केल्यास तुमच्या केसांमधील कोंडा कमी होईल आणि केसांचे आरोग्य वाढेल
जर तुमच्या केसांमधील त्वचा तेलकट असेल तर तुमचे केस तेलकट आणि चिकट होतात. अशा केसांवर धुळ आणि माती पटकन चिकटते. ज्यामुळे मग केस लवकर खराब होऊ शकतात. केसांच्या मुळांमधील हे अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी तुम्ही गुलाबपाण्याने केसांना मसाज करू शकता. असे नियमित केल्यामुळे तुमच्या केसांमधील तेलकटपणा कमी होण्यास मदत होऊ शकते.
जर तुमचे केस फ्रिझी अथवा कोरडे असतील त्यांना मॅनेज करण्यासाठी तुम्ही गुलाबपाणी वापरू शकता. यासाठी कोरफडीचा गर घ्या त्यामध्ये गुलाबपाणी मिसळून एक मस्त हेअरपॅक तयार करा. हा हेअर पॅक केसांना लावून तुम्ही अर्धा तासाने तुमचे केस धुवू शकता. मात्र आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास तुमचे केस मऊ आणि चमकदार दिसू लागतील.
आजकाल फॅशनेबल राहण्यासाठी आपण केसांवर सतत नवनवीन हेअरस्टाईल करत असतो. मग यासाठी आपण कधी केस आर्यन करतो तर कधी कर्ल. पण असं सतत केसांवर नवनवीन प्रयोग केल्यामुळे केसांचं नुकसान होऊ शकतं. केसांवर सतत आर्यनर आणि कर्लर वापरल्यामुळे केसांमधील नैसर्गिक चमक कमी होते. शिवाय केस निस्तेज आणि कोरजे दिसू लागतात. मात्र जर तुमचे हे डॅमेज हेअर तुम्हाला पुन्हा नीट करायचे असतील तर तुम्ही तुम्ही वापरत असलेल्या तेलामध्ये थोडंसं गुलाबपाणी मिसळून केसांना मसाज करू शकता. केसांवर या मिश्रणाचा दहा ते पंधरा मिनीटं मसाज करा आणि अर्धा एक तासाने केस कोमट पाण्याने धुवा. ज्यामुळे तुमच्या झालेले नुकसान कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
त्वचेसाठी गुलाबपाणी फायदेशीर असलं तरी तुम्हाला त्याचा वापर त्वचेवर कसा करावा हे माहीत असणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही तुम्हाला गुलाबपाण्याच्या त्वचेवर कसा वापर करावा याच्या काही स्टेप्स सांगत आहोत. जे फॉलो केल्यास तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.
साहित्य-
गुलाबपाणी आणि कॉटन पॅड
काय कराल-
गुलापबाणी कॉटन पॅडवर घ्या आणि दररोज सकाळी उठल्यावर, रात्री झोपण्यापूर्वी आणि मेकअप काढल्यावर चेहऱ्यावर लावा.
काय फायदा होईल -
टोनिंग केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील धुळ, माती, प्रदूषण कमी होतं. कारण गुलाबपाण्यामुळे तुमची त्वचा अगदी मुळापासून स्वच्छ होते. त्वचेची छिद्रे मोकळी झाल्यामुळे त्वचेला ऑक्सिजनचा योग्य प्रमाणात पुरवठा होतो. ज्यामुळे तुम्ही फ्रेश दिसता.
साहित्य -
गुलाबपाणी आणि स्रे बॉटल
काय कराल -
गुलाबपाणी रिकाम्या स्रे बॉटलमध्ये भरा. हे पाणी दिवसभरात दोन ते तीन वेळा चेहरा आणि मानेवर स्प्रे करा. ज्यामुळे तुम्हाला त्वरीत फ्रेश वाटेल.
काय फायदा होईल -
दिवसभर बाहेर फिरल्यामुळे तुमची त्वचा कोमेजते आणि निस्तेज दिसू लागते. मात्र अशा वेळी या स्प्रेमुळे तुम्ही त्वरीत फ्रेश दिसू शकता. कारण गुलाबपाण्यामुळे तुमच्या त्वचेला तात्काळ थंडावा मिळतो.
साहित्य -
दहा ते पंधरा तुळशीची पाने, गुलाबपाणी आणि स्प्रे बॉटल
काय कराल -
तुळशीची पानं वाटून त्यात गुलाबपाणी मिसळा. हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरा. काही तास ही बाटली फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर त्यातील थंडगार पाणी सनबर्न अथवा रॅशेस झालेल्या त्वचेवर स्प्रे करा.
काय फायदा होईल -
उन्हाच्या त्रासामुळे जर तुमची त्वचा रापली असेल तर गुलाबपाणी तुमच्यासाठी वरदान ठरू शकतं. कारण गुलाबपाण्याने तुमच्या त्वचेमधील सनबर्नमुळे होणारा दाह आणि जळजळ कमी होते.
साहित्य -
गुलाबपाणी, स्प्रे बॉटल आणि कॉटन पॅड किंवा टिश्यू पेपर
कसं वापराल -
गुलाबपाणी स्प्रे बॉटलमध्ये भरा. चेहऱ्यावर हे पाणी स्प्रे करा. दहा मिनीटांनी चेहरा कापूस, कॉटन पॅड अथवा टिश्यू पेपरने पुसून काढा. तुमच्या चेहऱ्यावरील धुळीकळ आणि माती त्यावर निघून येईल.
काय फायदा होईल -
त्वचेच्या आतील छिद्रे मोकळी न झाल्यास त्यामध्ये धुळ आणि माती अडकून ती बंद होतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेला पुरेश्या ऑक्सिजनचा पूरवठा होऊ शकत नाही. मात्र जर तुम्ही नियमित गुलाबपाण्याने चेहरा स्वच्छ केला तर तुमच्या त्वचेवरील डेड स्किन आणि धुळ व्यवस्थित स्वच्छ होते.
साहित्य -
गुलाबपाणी, थोडंसं ग्लिसरिन आणि शुद्ध नारळाचे तेल
काय कराल -
एका लहान बाटलीत हे सर्व मिश्रण एकत्र करा. त्यानंतर ती बाटली योग्य पद्धतीने शेक करा. एकजीव झालेलं हे मिश्रण बोटांच्या मदतीने चेहरा आणि मानेवर लावा. हळूवार पणे मसाज करत ते त्वचेवर मुरू द्या.
काय फायदा होईल -
त्वचेला नियमित पोषणाची गरज असते. कारण बाहेरील वातावरणाचा तुमच्या त्वचेवर सतत परिणाम होत असतो. गुलाबपाण्यामुळे तुमच्या त्वचेवरील ओलसरपणा टिकून राहतो ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम दिसू लागते.
साहित्य -
गुलाबपाणी आणि स्प्रे बॉटल
काय कराल -
उन्हाळ्यात घराबाहेर पडताना हा स्प्रे तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. यासाठी गुलाबपाणी भरलेली स्प्रे बॉटल नेहमी तुमच्या बॅगेत ठेवा आणि थोड्या थोड्यावेळाने चेहऱ्यावर गुलाबपाणी स्प्रे करत रहा.
काय फायदा होईल -
घराबाहेर सुर्यप्रकाशात प्रवास केल्यामुळे तुमच्या त्वचेवर सुर्यांच्या अतीनिल किरणांचा परिणाम होत असतो. ज्यामुळे त्वचा रापण्याची शक्यता असते. मात्र हा सन बॉडी स्प्रे तुमच्या त्वचेचं योग्य संरक्षण करू शकतो.
साहित्य-
बीटरूट आणि गुलाबपाणी
कसं कराल -
बीटाचे तुकडे वाळवून त्याची पावडर तयार करा. बीटरूटची ही पावडर गुलाबाच्या पाण्यात मिसळून त्याची जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट ओठांवर लावून काही मिनीटांनी ओठ धुवून टाका. हा प्रयोग सतत केल्याने तुमच्या ओठांवरचा काळेपणा कमी होईल.
काय फायदा होईल -
वातावरणाचा परिणाम तुमच्या ओठांवरदेखील होत असतो. ओठ गुलाबी आणि मुलायम असतील तर तुमच्या सौंदर्यात अधिकच भर पडू शकते. यासाठीच या लिपपॅकमुळे तुम्ही तुमचे काळवंडलेले ओठ नैसर्गिक रंगाचे करू शकता.
गुलाबपाणी तुम्ही चेहऱ्यावर विविध पद्धतीने वापरू शकता. मात्र घरीच फेसपॅक तयार करण्यासाठी तुम्हाला गुलाबपाण्याचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. बऱ्याचदा आपण फेसपॅक तयार करण्यासाठी साध्या पाण्याचा वापर करतो. मात्र त्याऐवजी आपण गुलाबपाणी वापरलं तर तुम्हाला एक वेगळाच इफेक्ट चेहऱ्यावर दिसू शकतो.
हा फेसपॅक तयार करण्यासाठी दोन चमचे मुलतानी माती घ्या. त्यामध्ये चिमूटभर हळद आणि गुलापाणी मिसळून एक जाडसर फेसपॅक तयार करा. हा फेस पॅक तुम्ही कमीत कमी आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर नक्कीच लावू शकता. शिवाय मुलतानी माती स्वस्त असल्याने तुम्हाला हा उपाय फार खर्चिक देखील पडणार नाही.
काय फरक पडेल-
मुलतानी माती आणि गुलाबपाण्याच्या या फेसपॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, पुरळ, सुरकुत्या कमी होतील. शिवाय यामुळे तुमची त्वचा नितळ आणि चमकदार दिसू लागेल.
चंदन पावडर आणि गुलाबपाणी या दोन्हीमध्ये त्वचेमधील दाह कमी करणारे घटक असतात. यासाठीच तुम्ही अॅक्ने अथवा चेहऱ्यावर पुरळ असल्यास हा पॅक चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी दोन चमचे चंदन पावडर आणि गुलाबपाणी मिक्स करून फेसपॅक तयार करा.
काय फायदा होईल -
चंदनाचा वापर सौंदर्य वाढविण्यासाठी अगदी फार पूर्वीपासून केला जात आहे. पूर्वीच्या काळी राण्या त्यांच्या शाहीस्नानासाठी चंदन आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करत असत. मात्र आता घाईघाईच्या जमान्यात तुम्ही तुमचे सौंदर्य टिकविण्यासाठी नक्कीच हा फेसपॅक वापरू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येईल.
दोन चमचे बेसन, एक चिमूटभर हळद आणि गुलाबपाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग आणि सुरकुत्या कमी होतात. बेसन ही एक स्वयंपाकघरात असणारी आणि सहज उपलब्ध होणारी गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता.
काय फायदा होईल -
बेसणामुळे चेहऱ्यावरील अनावश्यक केस, डाग, सुरकुत्या, पिंपल्स कमी होऊ शकतात. गुलाबपाण्याचा थंडावा आणि बेसनाचे गुणधर्म तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक उजळपणा आणू शकतात.
मध आणि गुलाबपाण्याचं एक छान फेस पॅक तयार होऊ शकतो. यासाठी एक चमचा मध आणि एक चमचा गुलाबपाणी घ्या. हे मिश्रण चांगलं एकजीव करा आणि चेहऱ्यावर लावा.
काय फायदा होईल-
मधामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ब्लिचींग इफेक्ट येईल. शिवाय मधामुळे आणि गुलाबपाण्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे अनावश्यक केस आणि डागदेखील नक्कीच कमी होतील.
गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्यांची पावडर आणि गुलाबपाणी मिक्स करून केलेला फेस पॅक एखाद्या खास कार्यक्रमासाठी अगदी उत्तम ठरेल. कारण यामुळे चेहरा तर फ्रेश दिसेलच शिवाय अंगाला एक सौम्य सुवासदेखील येईल.
काय फायदा होईल-
गुलाबाच्या पाकळ्या आणि गुलाबपाणी हे एक अनोखं मिश्रण आहे. कारण त्यामुळे तुमची त्वचा अगदी गुलाबाच्या फुलाप्रमाणे टवटवीत आणि सुंदर दिसू लागेल.
यासाठी रात्रभर गुलाबपाण्यामध्ये केशर बुडवून ठेवा. ज्यामुळे सकाळी त्या पाण्याला केशराचा रंग आणि सुंगध येईल. हे केशर आणि गुलाबाचं पाणी तुम्ही कोणत्याही फेसपॅकमध्ये मिसळून वापरू शकता. बऱ्याचदा चंदन पावडरमध्ये हे मिश्रण वापरले जाते.
काय फायदा होईल-
केशर हा एक अलौकिक गुणधर्म असणारा पदार्थ आहे. जर तुम्ही याचे सेवन केले तर तुम्हाला फायदा होईलच पण त्वचेवर ग्लो येण्यासाठी गुलाबपाण्यासोबत केसर लावल्याने त्यातील गुणधर्म अधिक जाणवतील.
काकडीची साले काढून ती मिक्समध्ये वाटून घ्या. त्यामध्ये गुलाबपाणी मिसळून हा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने चेहरा फ्रेश दिसतो शिवाय चेहऱ्यावरील काळे डाग देखील कमी होतात.
काय फायदा होईल-
काकडीमध्ये देखील त्वचेला मुळापासून स्वच्छ करणारे आणि दाह कमी करणाकरे गुणधर्म आढळतात. जेव्हा गुलाबपाणी आणि काकडीचा गर एकत्र करून तुम्ही त्वचेवर लावता तेव्हा त्याचा नक्कीच चांगला परिणाम तुम्हाला मिळू शकतो.
कोरफडाचा गर आणि गुलाबपाणी हे उत्तम कॉम्बिनेशन आहे. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही कोरफडाचा गर आणि गुलाबपाण्याचा फेसपॅक चेहऱ्यावर लावू शकता.
काय फायदा होईल-
कोरफड ही जितकी आरोग्यासाठी उत्तम आहे तितकीच त्वचेसाठी सर्वोत्तम आहे. त्यामुळे गुलाबपाणी आणि कोरफडाचा गर चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहऱ्यावरचे काळे डाग, चट्टे कमी होतात आणि त्वचा नितळ दिसू लागते.
गुलाबपाणी त्वचा आणि केसांसोबतच आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी उत्तम असतं. कारण त्याचा तुम्ही असादेखील वापर करू शकता.
डोळ्यासाठी गुलाबपाण्याचे फायदे जर डोळ्यांमध्ये कचरा केला असेल अथवा इनफेक्शनमुळे डोळ्यांचा दाह होत असेल तर गुलाबपाण्याचा वापर अवश्य करा. यासाठी तुम्ही एखाद्या आय ड्रापरच्या मदतीने गुलाबपाण्याचे काही थेंब डोळ्यांमध्ये टाकू शकता.नियमित असे केल्यास तुमच्या डोळे स्वच्छ होतात शिवाय डोळ्यांमध्ये नैसर्गिक चमक देखील येते.
गुलाबपाणी त्वचेप्रमाणेच दातांवरही चांगले फायदेशीर ठरते. कोणत्याही प्रकारच्या दातांच्या समस्या यामुळे कमी होऊ शकतात. गुलाबपाण्यामुळे दात मजबूत तर होतातच शिवाय दातांमधील सूज आणि हिरड्यांच्या समस्याही कमी करता येतात. नियमित गुलाबपाण्याचा वापर केल्यास तोंडाला येणारा दुर्गंध कमी होतो. यासाठी नियमित गुलाबपाण्याने चुळ भरा. असं केल्याने तुम्हाला फ्रेश वाटू लागेल.
खरंतर बाजारात गुलाबपाणी सहज मिळू शकतं पण घरीच स्वतःच्या हाताने गुलाबपाणी तयार करण्यात एक वेगळंच समाधान आहे. शिवाय कधीकधी बाजारामधील गुलाबपाणी भेसळयुक्त असण्याची शक्यता असते.
साहित्य-
भरपूर गुलाबाच्या पाकळ्या आणि डिस्टिल्ड वॉटर
कृती-
गुलाबाच्या फुलांपासून पाकळ्या वेगळ्या करा आणि कोमट पाण्यामध्ये त्या स्वच्छ धुवून घ्या. ज्यामुळे या पाकळ्यांवर धुळ आणि प्रदूषण राहणार नाही. त्यानंतर एका मोठ्या भाड्यांमध्ये या पाकळ्या ठेवा आणि पाकळ्या बुडतील एवढंच डिस्टिल्ड वॉटर वरुन टाका. या पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्यांना काही वेळ बुडवून ठेवा. नंतर ते भाडं झाकण ठेऊन मध्यम आचेवर गरम करा. 20 ते 30 मिनीटे म्हणजे पाकळ्यांचा रंग उडेपर्यंत ते मिश्रण उकळू द्या. या मिश्रणाला थंड झाल्यावर एका बंद झाकणाच्या डब्बात झाकून ठेवा. गरजेनुसार तुम्ही या पाण्याचा वापर करू शकता.
वास्तविक गुलाबपाणी एक नैसर्गिक सौंदर्यप्रसाधन असल्यामुळे कोणीही गुलाबपाणी वापरण्यास काहीच हरकत नाही. मात्र जर तुमची त्वचा अती संवेदनशील असेल तर मात्र गुलाबपाणा न वापरलेलेच उत्तम.
गुलाबपाणी हे एक नैसर्गिक सौंदर्यप्रसाधन आहे. ते तुम्ही लहान मुलांसाठी नक्कीच वापरू शकता. मात्र लहान मुलांची त्वचा फारच संवेदनशील असल्यामुळे लहान मुलांसाठी फक्त घरीच केलेलं गुलाबपाणी वापरा.
गुलाबपाणी बाजारातून खरेदी करताना त्यावरील लेबल आणि माहिती जरूर वाचा. शिवाय त्याची शुद्धता आणि गुणवत्तेची अवश्य खात्री करुन घ्या. कारण जर भेसळयुक्त गुलाबपाण्यानेही तुमच्या त्वचेला नुकसान होऊ शकतं.