चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा असेल तर त्वचेवर लावा 'दुधाची साय'

चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा असेल तर त्वचेवर लावा 'दुधाची साय'

दुधावरची मऊ आणि पांढरीशुभ्र साय खाण्यात एक वेगळीच मजा येते. या सायीला आपण मलई असंही म्हणतो. मात्र काहीजण फिटनेस  अथवा वजन नियंत्रित राखण्यासाठी ही मलई खाणं पसंत करत नाहीत. तुम्हालादेखील साय अथवा मलई खाणं नको असेल तर तिचा वापर तुम्ही तुमचं सौदर्य वाढविण्यासाठी करू शकता. दुधाची साय अथवा मलईमुळे तुमच्या त्वचेवर नक्कीच चांगले परिणाम होऊ शकतात. सायीमध्ये असलेले पोषकतत्त्व तुमच्या त्वचेला मऊ आणि चमकदार करतात. शिवाय यासाठी फार खर्च मुळीच करावा लागणार नाही. घरात असलेल्या दुधावर येणारी साय वापरून तुम्ही तुमचे सौंदर्य खुलवू शकता. सायीमध्ये असं काय  असतं ज्यामुळे तुमच्या त्वचेवर एवढा चांगला परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी दुधाच्या सायीचे हे फायदे जरूर वाचा.

1.उत्तम मॉश्चराईझर

दुधावर जमा होणारी साय म्हणजेच मलई तुमच्या त्वचेचं चांगलं पोषक करते. म्हणूनच तुम्ही साय एक नैसर्गिक मॉश्चराईझर म्हणून वापरू शकता. यासाठी एका वाटीत ताजी साय घ्या आणि चमचा अथवा बीटरने बीट करून तिची एक मऊसुत पेस्ट तयार करा. त्वचेवर काही मिनीटे या पेस्टने मसाज करा. ही पेस्ट तुमच्या त्वचेत मुरू द्या. थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवून टाका. यामुळे तुमच्या त्वचेतील कोरडेपणा कमी झालेला आणि त्वचा फ्रेश झालेली तुम्हाला जाणवेल. 

2. अॅंटि एजिंग क्रीम

वाढते प्रदूषण आणि धकाधकीचे जीवन यामुळे वयाच्या आधीच म्हातारपणाची लक्षणे चेहऱ्यावर दिसू लागतात. जर तुम्हाला चिरतरूण दिसायचं असेल तर चेहऱ्यावर नियमित दुधाची साय जरूर लावा. दुधातील प्रोटिन्स आणि इतर पोषक घटकांमुळे तुमच्या चेहऱ्यावरील एजिंगच्या खुणा कमी होऊ लागतील. सुरकुत्या कमी करण्यासाठी हा एक बेस्ट उपाय ठरेल.

3. काळे डाग कमी करण्यासाठी उपयोगी

ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग आणि चट्टे आहेत. त्यांना दुधाची साय नक्कीच फायदेशीर आहे. कारण डाग आणि काळ्या चट्टांमुळे तुमचे सौंदर्य डागाळले जाते. जर तुम्ही नियमित चेहऱ्यावर दुधाची साय लावली तर चेहऱ्यावरील हे डाग कमी होण्यास मदत होऊ शकते. डाग कमी करण्यासाठी दुधाची साय आणि एक ते दोन थेंब लिबांचा रस टाकून एक पेस्ट तयार करा आणि ती चेहऱ्यावर लावा.

4. त्वचेवर नैसर्गिक चमक येते

जर तुमची त्वचा धुळ आणि प्रदूषणामुळे निस्तेज झाली असेल तर दुधाची साय तुमच्यासाठी वरदानच ठरेल. कारण दुधातील पोषक घटक या सायीमध्ये एकत्र झालेले असतात. ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक प्राप्त होते. यासाठी दुधाच्या सायीमध्ये काही थेंब मध टाका आणि  त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा. आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा हा प्रयोग केल्यास तुमच्या त्वचेवर एक नैसर्गिक ग्लो येऊ लागेल.

5. टॅनिंग कमी होतं.

बाहेर फिरताना सुर्यप्रकाशामुळे त्वचा बऱ्याचदा टॅन होते. हे सनटॅन काढण्यासाठी तुम्ही मलईचा वापर करू शकता. कारण त्यामुळे तुमच्या त्वचेला एक प्रकारचा उजळपणा मिळू शकतो. त्वचेला क्लिंझिंग, मॉश्चराईझिंग आणि टोनिंगची  गरज असते. सायीमध्ये लॅक्टिक अॅसिड योग्य प्रमाणात असतं. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते आणि तुम्ही नेहमीपेक्षा अधिक सुंदर दिसू लागता. 

 

अधिक वाचा

केस आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी दही आहे उपयुक्त

नितळ त्वचा हवी असेल तर वापरा हे 'बेस्ट पील ऑफ मास्क'

नितळ त्वचा हवी असेल तर असा करा हळदीचा वापर

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक